वनवासी कल्याण आश्रम

वनवासी कल्याण आश्रम. देशातील आदिवासी भागात काम करणारी एक स्वयंसेवी संघटना. संघटनेची आणखी एक ओळख म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नामक संघटनेच्या परिघातील म्हणजे ‘संघ परिवार’ यातील एक संघटना. संघटनेची स्थापना स्वातंत्र्योत्तर काळात म्हणजे १९५२ सालात झाली. रमाकांत केशव उपाख्य बाळासाहेब देशपांडे हे या संघटनेचे संस्थापक.
प्रस्तुत लेखात संघटनेची स्थापना, त्यामागचा विचार, महत्वाचे टप्पे आणि कामाचे विविध आयाम यांचा आढावा घेऊया.
स्थापना : वनवासी कल्याण आश्रमाच्या स्थापनेचे प्रामुख्याने दोन टप्पे सांगता येतील :
स्वातंत्र्योत्तर काळात जशपूर (सध्या झारखंड राज्याचा भाग) या तत्कालीन मध्य प्रदेश आणि बरार प्रांतातील गावात या संघटनेची स्थापना झाली. अशा प्रकारची संघटना स्थापन करणे आवश्यक का वाटले, त्याची पार्श्वभूमी :
स्वातंत्र्यानंतर म्हणजे १९५२ सालची एक घटना. तत्कालीन मध्य प्रदेश प्रांताचे मुख्यमंत्री पंडीत रविशंकर शुक्ल यांनी या भागास भेट दिली. अन्य ठिकाणी त्यांचे चांगले स्वागत झाले असले तरी जशपूरनगर येथे मात्र त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. हा प्रामुख्याने आदिवासी लोकसंख्येचा प्रदेश होता आणि ख्रिश्चन मिशनरी या सर्व प्रकारामागे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावर तोडगा काढण्यासाठी आदिवासी भागात काम करणाऱ्या ठक्कर बाप्पा यांच्याकडे सल्ला मागितला. त्यांनी या भागात भारतीय लोकांची संस्था असावी, असे सांगितले. त्यानुसार ‘पिछडा वर्ग समाज कल्याण विभाग’ १९४८ साली स्थापन करण्यात आला. ठक्कर बाप्प्पा यांनी आपले विश्वासू सहकारी पांडुरंग गोविंद वणीकर यांना या कामाची जबाबदारी दिली. जशपूर येथे काम सुरू करणे हे अवघड आहे, याची वणीकर यांना जाणीव होती. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आणि नागपूर येथील रामटेक या ठिकाणी वकिली व्यवसाय करणाऱ्या रमाकांत केशव देशपांडे यांना जशपूर येथील कामाची जबाबदारी दिली. त्यानुसार देशपांडे जशपूर येथे आले आणि प्रवासाला सुरुवात केली. शासनाने सुरुवातीला आठ शाळा, जनजागृती आणि अन्य कार्य यासाठी आवश्यक असे अंदाजपत्रक संमत केले होते, मात्र देशपांडे यांनी अत्यंत आग्रहाने तब्बल १०० शाळांसाठी तरतूद करून घेतली. अवघ्या वर्षभरात त्यांनी १०० शाळांचे आपले उद्दिष्ट पूर्ण करून दाखवले. याचा दृश्य परिणामही लगेच समोर यायला लागला. ज्या भागातील लोक भारताला आपला देशच मानत नव्हते त्या भागात आता ‘भारत माता की जय’ या घोषणा ऐकू यायला लागल्या. आदिवासी समाजास पुन्हा राष्ट्रीय प्रवाहात आणण्याची सुरुवात देशपांडे यांनी यशस्वीपणे केली होती.
जानेवारी १९५१ मध्ये ठक्कर बाप्पा यांचे निधन झाले. दरम्यानच्या काळात कामाची व्याप्तीही मोठ्या प्रमाणात वाढली होती. शासकीय चौकटीत राहून काम करणे अवघड बनत चालले होते. त्यामुळे आता स्वतंत्र अशी संस्था बनवण्याचे विचार देशपांडे यांच्या मनात होतेच. दरम्यान एका महत्वाच्या घटनेचा उल्लेख करणे आवश्यक आहे. संविधान लागू झाल्यानंतर १९५२ साली निवडणुकांची घोषणा झाली. प्रदेशातील काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना कदाचित देशपांडे यांची अडचण वाटली असावी, त्यामुळे देशपांडे यांची चौकशी करण्याच्या नावाखाली त्यांना चंद्रपूर येथे स्थानबद्ध केले आणि निवडणुकीपासून दूर ठेवले. निवडणुकीनंतर देशपांडे यांनी आपल्या सरकारी पदाचा राजीनामा दिला आणि जशपूर येथे वकिली व्यवसायाला प्रारंभ केला.
जशपूर येथे पुन्हा येण्यापूर्वी देशपांडे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी (माधव सदाशिव गोळवलकर) यांच्याची विचारविनिमय केला. त्यांनीही एक स्वतंत्र संस्था स्थापन करण्याविषयी सांगितले आणि देशपांडे यांच्या मदतीसाठी संघाचे प्रचारक मोरेश्वर केतकर यांना पाठवले. सुरूवातीला वसतीगृहाची स्थापना करून कामाला सुरूवात करण्याचे ठरले त्यानुसार जशपुर येथील राजा विजयभुषण सिंह जुदेव यांच्याकडे मदत मागितली. त्यांनी आपल्या वापरात नसलेल्या राजमहालाच्या काही खोल्या लगेचच वापरायला दिल्या आणि २६ डिसेंबर १९५२ रोजी वसतीगृहाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर १९५३ साली राजा जुदेव यांनी संस्थेचे औपचारिक नाव असावे असे सुचवले आणि त्यांच्या सांगण्यानुसार  ‘कल्याण आश्रम’ हे नाव निश्चित झाले. अशा प्रकारे १९५२ सालात या संस्थेची स्थापना झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तिसरे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्या सांगण्यावरून १९७७ साली ‘कल्याण आश्रम’ या संस्थेस अखिल भारतीय स्वरूप देण्याचे ठरले आणि ‘अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम’ या नावाने संस्थेची नोंदणी करण्यात आली.
या सर्व प्रवासात जशपूरचे राजा विजयभूषण सिंह जुदेव यांनी सर्वांत मोठे सहकार्य केले. संस्था स्थापनेची प्रेरणा, आर्थिक मदत, जागेची मदत अशा सर्व अडचणी त्यांनी सोडवल्या. या संस्थेच्या वाटचालीमध्ये यांचा वाटा फार मोठा आहे.
वनवासी कल्याण आश्रमाचे प्रमुख काम म्हणजे आदिवासी समाजास मुख्य प्रवाहात आणणे. समाजाचा सर्वांगीण विकास साधतानाच त्यांच्या ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरांना जपणे. त्यांना येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांच्यातूनच नेतृत्व उभे राहील हे पाहणे. एकूणच आदिवासी समाज आणि अन्य समाज यातील दरी बुजवण्याचे काम वनवासी कल्याण आश्रम मुख्यतः करत आहे.

विविध आयाम 

शिक्षण : आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वांत महत्वाची बाब म्हणजे शिक्षण. सरकारचे या बाबतीत अनेक वर्ष मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाले आहे. आजही प्राथमिक शिक्षणासाठी किमान ३ ते ४ किलोमीटरचा प्रवास आदिवासी विद्यार्थांना करावा लागतो.
वनवासी कल्याण आश्रमाने यासाठी ‘एकल विद्यालय’ ही अभिनव अशी कल्पना मांडून ती बऱ्याच प्रमाणात यशस्वीही केल्याचे दिसते. ‘एकल विद्यालय’ म्हणजे एका आदिवासी पाड्यात एकच शिक्षक विविध इयत्तांच्या विद्यार्थ्यांना शिकवणार. यामुळे विद्यार्थांची पायपीट आणि वेळ तर वाचतोच शिवाय त्यांना शिक्षणही मिळते. आज देशभरात १३१४ एकल विद्यालये कार्यरत आहेत. सोबतच महाराष्ट्रात सरकारी आश्रमशाळादेखील वनवासी कल्याण आश्रम चालवतो.
वसतीगृह : वसतीगृह हे वनवासी कल्याण आश्रमाचे सर्वांत महत्वाचे काम. वनवासी कल्याण आश्रमाची स्थापनाच वसतीगृहाने झाली आहे, हे आपण पहिलेच आहे. आदिवासी विद्यार्थांना केवळ शिक्षण देऊन भागणार नाही तर त्यांना शिक्षणास अनुकूल असे वातावरण देणेही गरजेचे आहे. त्याच भूमिकेतून वनवासी कल्याण आश्रमाद्वारे वसतीगृहे चालवली जातात. वसतिगृहात विद्यार्थांना अभ्यासासोबतच आरोग्य, शैक्षणिक विकास, कला गुणांचा विकास, मानसिक स्वास्थ्य आदींकडेही लक्ष पुरवले जाते, ज्याचे सकारात्मक परिणाम आज दिसत आहेत. देशभरात आज २०६ वसतीगृहे कार्यरत असून त्यात सुमारे ७५५६ विद्यार्थी आहेत.
वैद्यकीय : आदिवासी भागात वैद्यकीय सुविधांची असणारी वानवा हा मोठा मुद्दा आहे. आदिवासी भागातील सर्वांत मोठी समस्या म्हणजे कुपोषण. अगदी सध्या सध्या उपचारांसाठीदेखील आजही किमान १५ ले ३० किलोमीटर यावे लागते, तसे करूनही उपचार मिळतील याची खात्री नाही. वनवासी कल्याण आश्रम त्यासाठी आरोग्य शिबीर, शस्त्रक्रिया शिबीर आणि स्वास्थ्य रक्षक योजना आदी राबवते.
परंपरांचे जतन – श्रद्धाजागरण : प्रत्येक आदिवासी समाजाच्या स्वतःच्या अशा वेगळ्या काही धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे, ज्या सर्वांचे मूळ हे हिंदू धर्मातच असल्याची वनवासी कल्याण आश्रमाची मांडणी आहे. त्या सर्वांचे जतन करणे आणि ख्रिस्ती मिशनऱ्यांकडून होणाऱ्या धर्मांतरास रोखणे या प्रकारचे काम ‘श्रद्धा जागरण’च्या माध्यमातून केले जाते.
खेलकुद : आदिवासींमध्ये असलेल्या शारीरिक क्षमतेस योग्य वळण देणे आणि त्यांना विविध खेळांचे प्रशिक्षण देऊन चांगल्या खेळाडूंची निर्मिती करणे, हे कार्य वनवासी कल्याण आश्रमाद्वारे केले जाते. ‘सावरपाडा एक्स्प्रेस’ म्हणून ओळखली जाणारी धावपटू कविता राउत ही याच योजनेतून पुढे आलेली खेळाडू.
हितरक्षा : सरकारने आदिवासींच्या हितासाठी वेळोवेळी अनेक कायदे करते, नवनवीन योजना आखते. मात्र बऱ्याचदा आदिवासी समाज या सर्वांशी परिचित नसतो, असे काही आहे हे त्याच्या गावीही नसते. आदिवासी समाजास याबाबतीत जागरूक करण्याचे काम हितरक्षा या माध्यमातून केले जाते.
लोककला : आदिवासी समाजाच्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहेत. लोकगीते, लोकनृत्य आणि अन्य सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा. या सर्वांचे जतन करणे.
महिला सबलीकरण : कोणत्याही समाजाचा विकास साधायचा असेल तर महिला सबलीकरण हे महत्वाचे काम आहे. वनवासी कल्याण आश्रमाच्या प्रयत्नांनी बालवाडी, आंगणवाडी, संस्कार केंद्रे यांचे संचालन महिला करत आहेत. सोबतच बचत गटांच्या माध्यमातून महिला आता स्वयंपूर्णही झालेल्या आहेत.
ग्रामविकास : आदिवासींच्या उत्पनाचे मुख्य साधन म्हणजे वनोत्पादने आणि शेती. मात्र वनांच्या बाबतीत आलेले सरकारी निर्बंध आणि शेतीच्या नव्या तंत्रज्ञानाशी नसलेला परिचय यामुळे आदिवासी समाज मुख्य प्रवाहापासून दूर राहतो. यावर तोडगा काढण्यासाठी वनवासी कल्याण आश्रम ग्रामविकास या संकल्पनेवरही काम करत आहे. शेतीचे आधुनिक तंत्र, सिंचनाच्या नवनव्या कल्पना, शेतीपूरक उद्योग आणि वनव्यवस्थापन यामध्ये विविध प्रकल्प सूर आहेत. महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेला ‘बारीपाडा’ हे ग्रामविकासाचे मॉडेल ठरत आहे.
शहरी भागातील काम : आदिवासी भागासोबतच शहरी भागातही वनवासी कल्याण आश्रमाचे काम सुरु आहे. शहरी भागाला आदिवासी भागाशी जोडणे आणि परस्पर समाजाची एकमेकांना ओळख करून देणे, हा या मागचा संस्थेचा मुख्य उद्देश आहे. शहरी भागात पुढील उपक्रमांच्या माध्यमातून काम चालते :
वैचारिक जागृती : आदिवासी समाजाशी वैयक्तिक संपर्क, विविध कार्यक्रमांचे आयोजन, प्रदर्शन, व्याख्याने.
आदिवासी भागास भेट : वनवासी कल्याण आश्रम राबवत असलेल्या प्रकल्पांस भेटी देणे.
प्रत्यक्ष सहभाग : वैद्यकीय सेवा पुरवणे- मानव आणि पशू, वसतीगृहे आणि शाळांमध्ये शैक्षणिक मार्गदर्शन.
शहरी भागात मदत : वैद्यकीय बाबतीत मदत, शहरात शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना मदत, सरकारी कामांत सहाय्य.
आर्थिक : उत्पादनाच्या नवनवीन तंत्राची माहिती करून देणे, वितरण व्यवस्थेत सहाय्य करणे, आदिवासी भागातील वस्तू शहरात आणून त्याची विक्री करणे- विक्री केंद्रांच्या माध्यमातून.
अखिल भारतीय स्तरावर काम करणाऱ्या या संघटनेचे संघटन पुढीलप्रमाणे : अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाचे मुख्यालय झारखंड मधील जशपूरनगर येथे आहे. राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय महामंत्री, संघटनमंत्री (उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, मध्य, उत्तर- पूर्वांचल भारत), सहसंघटनमंत्री, प्रांतमंत्री, पूर्णवेळ कार्यकर्ता, विस्तारक तसेच कामाच्या सोयीसाठी जिल्हा समिती, खंड समिती, ग्राम समिती आणि नगर समिती.
सरकारची कोणतीही मदत घ्यायची नाही, असे या संघटनेने सुरुवातीपासूनच ठरवले होते. त्यानुसार अगदी प्रारंभापासूनच देणगीवर या संस्थेचे काम चालते. समाजाचा सहयोग, समजणे दिलेल्या देणग्या, विविध प्रकारची मदत यावर काम चालते. संस्थेच्या आज देशभर ३८२ नोंदणीकृत संस्था आहेत. प्रत्येक जिल्ह्यात समिती आहे. त्यांच्याकडून मिळवल्या जाणाऱ्या मदतीवर काम चालते.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नक्षलवाद : बदलते स्वरूप

पाळणाघरं- गरज आणि वास्तव

हिंसक माणिक 'सरकार'