हिंसक माणिक 'सरकार'
‘ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात पुष्पा कपाली या महिलेची कहाणी तर अंगावर काटा आणणारी आहे. ही महिला सात महिन्यांची गरोदर होती. माकपचे कार्यकर्ते तिच्या घरात शिरले. तिला मारहाण केली. मारहाणीमुळे तिचा गर्भपात झाला. पोटातील अर्भकाचा बळी गेला. पुष्पा कपालीचा गुन्हा एवढाच होता, की ती भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत होती. एका गर्भवती महिलेला लाथाबुक्क्याने मारण्यासाठी किती क्रौर्य लागत असेल ? माकप कार्यकर्त्यांच्या क्रौर्याचे हे अपवादात्मक उदाहरण नाही. माकपचा डोलाराच या क्रौर्य आणि आणि दहशतीवर उभा आहे ! अडीच दशकांच्या काळात त्रिपुरामध्ये काडीचाही विकास न करता याच क्रौर्यावर माकपने आपल्या सत्तेचा गड शाबूत राखला.’
'माणिक सरकार कसे साधेपणाने राहतात, माणिक सरकार कसे कमी पैशात जगतात, माणिक सरकार कसे फक्त एक रूपया पगार घेतात, माणिक सरकार कसे लोकाभिमुख कारभार करतात, माणिक सरकार कसे त्रिपुराचा चौफेर विकास करत आहेत...'
मार्क्सवाद्यांचे ‘ब्लू आॅइड बाॅय’ असणाऱ्या काॅम्रेड माणिक सरकारांना तर देशातील समस्त काॅम्रेड्सनी जणू ‘देवदूत’ वगैरेचं वनवून टाकलंय (साम्यवादी देव वगैरे संकल्पना मानत नसले तरी !)’
आपल्या देशातील जनतेला असं कोणी साधेपणाने राहणारा व्यक्ती दिसली की अगदी भरून येतं. त्याच्याबद्दल उगाचच सहानुभूती वगैरे दाटून येते. त्यात तो राजकारणी असेल तर मग विचारायलाच नको. एरवी राजकारण्यांच्या नावे खडे फोडणारे लोकं असा कोणी व्यक्ती दिसला की त्याच्या अगदी प्रेमातच पडतात आणि प्रेम आंधळं असल्याने त्याच्यावर अगदी आंधळा विश्वास ठेवतात (त्यातूनच मग केजरीवाल यांच्यासारखे गणंग तयार होतात). त्याच्या खोलात शिरून सत्य नेमकं काय, हे जाणून घेण्याची तसदी कोणीही घेत नाही.
सामान्यांच्या याच अज्ञानाचा फायदा डाव्यांनी आणि त्यांच्या कलाने वागणाऱ्या माध्यमांनी घेतला आणि माणिक सरकार यांची एक ‘लार्जर दॅन लाईफ’ अशी प्रतिमा तयार केली. डाव्यांच्या प्रपोगंडास मिळालेले मोठे यश म्हणून माणिक सरकार आणि ‘कथित विकासाचं त्रिपुरा माॅडेल’ याकडे पाहता येईल.
माणिक सरकार आणि त्यांच्या हिंसाचार, गुंडगिरी आणि भ्रष्टाचार यांनी बरबटलेल्या राजवटीच खरं स्वरूप पत्रकार दिनेश कानजी यांनी आपल्या ‘त्रिपुरातील अराजकाचा लाल चेहरा- माणिक सरकार’ या पुस्तकात रेखाटलं आहे. कानजी यांनी महिनाभर त्रिपुराचा दौरा केला, परिस्थिती प्रत्यक्ष पाहिली, त्रिपुरातील अन्य पक्ष- भाजप, काँग्रेस आणि त्रुणमूल काँग्रेसच्या नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी आणि सामान्य जनतेशी संवाद साधत माणिक सरकार आणि डाव्यांचा खरा चेहरा सर्वांसमोर मांडला आहे.
‘त्रिपुरातील अराजकाचा लाल चेहरा- माणिक सरकार’ या नावातच माणिक सरकार यांच्या कथित लोकाभिमुख
राजवटीची कल्पना येते. विकासाच्या नावाखाली डाव्या पक्षाने राज्यात फक्त अराजक पसरवलंय आणि माणिक सरकार त्यात सक्रीय आहेत- साधेपणाचा बुरखा घालून ! मात्र राष्ट्रीय माध्यमांचे लाडके असणाऱ्या माणिक सरकारांचा हा चेहरा जनतेसमोर आणायची तसदी एकाही अभिव्यक्ती स्वातंत्र्यांच्या नावाने गावगन्ना हिंडणाऱ्या माध्यममुखंडांना वाटली नाही. सदर पुस्तकात माणिक सरकार यांच्या राजवटीतील अराजक आणि भ्रष्टाचार पाहून माणिक सरकार हे लेनीन, स्टालिन आणि माओच्या हिंसक राजवटीचे खरे उत्तराधिकारी शोभतात.
दिनेश कानजी यांनी पुस्तकात त्रिपुराचा कथित विकास, सरकारी यंत्रणेवर असलेली डाव्यांची मजबूत पकड, सरकारी यंत्रणांचा डाव्यांकडून होणारा यथेच्छ गैरवापर, विरोधी पक्षांची गळचेपी, विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या सरकारी आर्शिवादाने होणाऱ्या हत्या, दहशतवादास प्रोत्साहन, अंमली पदार्थांचा विळखा, शिक्षणाचा उडालेला बोजवारा, समृद्ध निसर्ग लाभूनही पर्यटनाची दुरावस्था आणि आर्थिक बाजूची लागलेली वाट या सर्व गोष्टी सविस्तरपणे मांडल्या आहेत. ते वाचून विचारी जनांच्या मनात निश्चितच काळजी वाटेल.
माणिक सरकार यांच्या कथित साध्या प्रतिमेच्या प्रेमात अनेक जण आहेत, मात्र खरी परिस्थिती अगदी त्याच्या उलट आहे. माणिकबाबूंकडें स्वत:चे घर नाही, मात्र अत्यंत आलिशान अशा सरकारी निवासस्थानी शानशैकीत राहतात, अगदी चाळीस कि. मी. चा प्रवासही माणिकबाबूंसारखा साधा मुख्यमंत्री हेलिकाॅप्टरशिवाय करत नाहीत. आपले वेतन ते पक्षास देऊन टाकतात मात्र आपल्या राहणीमानवर दरमहा लाखो रूपये ते अगदी सहज खर्च करतात. एकीकडे शोषितांसाठी लढायच्या गोष्टी माकप करते आणि दुसरीकडे माणिकबाबू मात्र आलिशान आयुष्य जगतात. त्यांचे जोडे खास दिल्लीवरून मागवण्यात येतात, आपल्या चष्म्याच्या महागड्या फ्रेम्स ते दर महिन्याला बदलतात, अत्यंत उंची कपडे अशी त्यांची साधी राहणी आहे. अर्थात डाव्यांच्या दांभिकपणास शोभेसे असेच माणिक सरकारांचे वर्तन आहे.
लोकाभिमुख माणिक सरकारांच्या राजवटीत तब्बल 10 हजार 281 कोटींचा ‘रोझव्हॅली चीटफंड घोटाळा’ झाला असून त्यात थेट माकप नेत्यांचे लागेबांधे आहेत. विशेष म्हणजे ‘रोझव्हॅली’ आणि प. बंगालातील ‘सारदा चीटफंड घोटाळा’ या दोहोंची एकत्रित रक्कम 12 हजार 740 कोटी रूपये एवढी आहे, म्हणजे सारदा पेक्षा कित्येक पटींनी जास्त घोटाळा माणिक सरकार यांच्या डाव्या राजवटीने केला आहे. कानजी यांनी त्याचा मांडलेला तपशिल हा धक्कादायक आहे. माणिक सरकार यांचा या घोटाळ्याशी थेट संबंध. त्यांनीच ‘रोझव्हॅली’चे त्रिपुरामध्ये लाँचिंग केले आणि झोकात भाषणही ठोकले. सोबतच ‘रोझव्हॅली’ला मोक्याचे भुखंडही वाटण्यात आले. संतापजनक बाब म्हणजे कंपनीविरूध्द 2012मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतरही कंपनीस सरकारी अनुदान सुरू होते. माणिक सरकार यांचा हा चेहरा निश्चितच ‘साधा’ नाही.
त्रिपुराच्या सीमा या बांग्लादेशास भिडलेल्या आहेत. दहशतवाद्यांचे नंदनवन म्हणून आता हे राज्य आता पुढे येतंय. अर्थात त्यालाही माणिकबाबूंचा वरदहस्त आहेच. लष्कर – ए- तोयबा या दहशतवादी संघटनेचा अतिरेकी हबीबी मियाँ हा राज्याच्या मंत्रालयापासून हाकेच्या अंतरावर दीर्घकाळ वास्तव्यास होता. हरकत उल जिहादी या संघटनाचा अतिरेकी मामून मियाँ हा सुमन उर्फ प्रवीण मुजुमदार या हिंदू नावाने वास्तव्यास होता. माकप सरकारचे मंत्री शाहीद चौधरी यांचे त्याच्याशी एवढे घरोब्याचे संबंध होते की यंत्रणा त्याच्या शोधात असल्याची कुणकुण लागल्यावर मंत्रीमहोदयांच्या पत्नीने सरकारी वाहनातून या दहशतवाद्यास बांग्लादेशात नेऊन सोडले. माणिक सरकारांच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक असलेल्या राजवटीचं हे सत्य कानजी यांनी साद्यंत मांडलंय.
लेखकाने माणिक सरकाराची आर्थिक बाजूही नेमकेपणाने मांडली आहे. त्रिपुराचे अर्थशकारण हे विकासाचे नसून बुडीतले आहे. महसूल नसल्यामुळे निधीसाठी सतत केंद्राच्या तोंडाकडे पहायचे. केंद्राकडून मिळालेल्या पैशांचा मनमानी पध्दतीने वापर करायचा आणि या पैशाने पक्ष आणि कार्यकर्ते पोसायचे. एखाद्या कामासाठी घेतलेला पैसा भलत्याच कामांसाठी वापरायचा, असे सर्व प्रकार राज्यात अनेक वर्षांपासून सुरू आहेत. देशात 38 टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली असले तरी त्रिपुरात मात्र हा टक्का तब्बल 67.78 एवढा आहे. राज्यात सरकारी कर्मचारी आणि मध्यमवर्गाचा टक्का साधारणपणे 31.50 एवढी आहे. दारिद्र्यरेषेखालील जनता आणि मध्यमवर्गाची एकूण टक्केवारी 99.28 आहे. सोप्या शब्दात सांगायचं तर अर्थकारणाची सारी सुत्रे 0.72 टक्के लांकांच्या हाती आहेत. आणि त्यात समावेश होतो तो डाव्या पक्षांचे नेते, राज्यातील मंत्री, आमदार आणि ड्रग्ज माफिया यांचा. डाव्यांच्या शोषितांविरूध्दच्या कथित लढ्याचे हे वास्तव स्वरूप !
अशी सर्वत्र अराजकसदृश्य परिस्थिती असताना त्रिपुरामध्ये भारतीय जनता पक्षाकडे जनता अत्यंत सकारात्मक दृष्टीने पाहते आहे. सुनील देवधर हे भाजप नेते कार्यकर्त्यांसमवेत कष्ट घेत असून भाजप आता राज्यात रूजायला लागला आहे. त्रिपुरामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा करिष्मा स्पष्टपणे जाणवतोय. आणि नेमकं हेच माणिकबाबूंना पहावत नाहीये. त्यामुळे राज्यात विरोधी पक्ष- विशेषत: भाजपविरोधात रक्तरंजित राजकारण माणिकबाबू खेळत आहेत. लेखकाने विरोधकांवर होणाऱ्या जीवघेण्यात हल्ल्यांची वस्तुस्थिती मांडली आहे. जी एकाही राष्ट्रीय म्हणवणाऱ्या माध्यमांनी फारशी मांडलेली नाही.
चांदमोहन हा दलपती या गावातील भाजपचा साधा कार्यकर्ता. 26 डिसेंबरच्या पहाटे सहाच्या सुमारास डाव्या पक्षांचे गुंड त्याच्या घरी आले. स्थानिक आमदार ललितमोहन त्रिपुरा यांनी त्याला बोलावल्याचे त्यांनी सागितले. मात्र त्यानंतर चांदमोहनचा थेट मृतदेहच घरी आला, ज्यावर बेदम मारहाणीच्या खुणा होत्या. चांदमोहनची हत्या करण्यामागचे कारण म्हणजे त्याचा उत्तम जनसंपर्क आणि सामाजिक कार्य. मात्र ललितमोहन यांना 2018मध्ये होणाऱ्या निवडणुकीत चांदमोहन हा प्रतिस्पर्धी वाटत होता आणि त्यांनी त्याची मग थेट हत्याच केली. असे अनेक चांदनमोहन माणिक सरकारांच्या राजवटीत संपवले गेले आहेत. आणि त्याचं काही वावगंही त्यांना वाटत नाही. अर्थात हिंसा हेच तत्वज्ञान असणाऱ्या डाव्यांकडून अन्य काही अपेक्षा करणचं चुक आहे.
![]() |
त्रिपुरातील अराजकाचा लाल चेहरा- माणिक सरकार लेखक: दिनेश कानजी चंद्रकला प्रकाशन मूल्य: १६० रुपये पृष्ठसंख्या: १४५ |
●पूर्वप्रसिद्धी: साप्ताहिक विवेक, १६ जून २०१७
http://www.evivek.com/Encyc/2017/6/16/Manik-Sarkar
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा