पुरोगामी जल्पकं

सध्या एकूणच कथित पुरोगामी, लोकशाहीवादी, सेक्यूलर वगैरे विचारवंत, पत्रकार, कलाकार मंडळींनी ‘जल्पकां’चा (पक्षी ट्रोल्स) म्हणे प्रचंड त्रास होतोय. काही मंडळींना त्यात नेहमीप्रमाणे फॅसिस्टवाद वगैरे दिसलाय, काहींना त्यात संघाचं षडयंत्र दिसलंय तर काहींनी त्याचा आधार घेऊन आपला मोदीविरोधाचा कंड शमवून घेतला आहे. अर्थात या मंडळींचे नैराश्य पाहता ते स्वाभाविकच आहे.

जल्पकांची व्याख्या करायची झाल्यास ती साधारणपणे अशी करता येईल, एखाद्या व्यक्तीला संताप आणणे, भंडावून सोडणे, त्याचं लक्ष अन्यत्र वळवणे, विरोधक असल्यास खच्चीकरण करणे, विश्वासार्हता वगैरे कमी करणे. साधारणपणे समाजमाध्यमांत हा प्रकार चालत असतो.
तर कुण्या स्वाती चतुर्वेदी यांनी आपल्या पुस्तकातून त्याबद्दल लिखाण केले आणि नेहमीप्रमाणे ढोंगी पुरोगाम्यांनी ‘आम्हाला आलेले जल्पकांचे’ अनुभव या छापाचे रडगाणे सुरु केले. त्यांचा एकूणच आवेश हा ‘आम्हाला संपवण्याचे हे कारस्थान आहे’ अशा प्रकारचा होता. अर्थात 2014 नंतर असा रडगाण्यांत वाढ झाली आहेच. असो.
तर या मंडळींचा सूर असा असतो की, “एका विशिष्ट विचारसरणीचे म्हणजे रा. स्व. संघ, भारतीय जनता पार्टी यांच्याशी वैचारिक बांधीलकी असणारी मंडळी ही समाजमाध्यमांत आमच्या विरोधात जल्पकगिरी करत असतात, आमचा आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न करत असतात, खोटेनाटे पसरवित असतात, एकूणच काय तर आमच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आणत असतात.” अर्थात हा शुध्द कांगावा आहे. म्हणजे एखाद्या सधन असा शेटजीने, ज्याचे अनेक प्रकारचे व्यवसाय आहेत. त्याने एखाद्या फुटकळ व्यक्तीच्या व्यवसायाकडे बोट दाखवून याच्यामुळे माझ्या व्यवसायावर परिणाम होतो आहे, असे म्हणण्यासारखे आहे.
मात्र असा कांगावा करताना आपणही जल्पकच आहोत, किंबहुना आपली तशी एक जमातच आहे आणि ती कशी वाढत जाईल असाच विचार आपण करत असतो, याचा नेहमीप्रमाणे सोयीस्कर विसर यांना पडलेला आहे. अर्थात अचानक ‘चारापाणी’ बंद झाल्यामुळे आलेलं सैरभैरपणं त्याचं कारण असू शकतं.
आता या पुरोगामी जल्पकं नेमकी काय करतात, याचाही आढावा घेणे गरजेचे आहेच. अन्यथा या मंडळींना स्वत:चे ढोल बडवण्यास रान मोकळे मिळेल आणि ते धोकादायक आहे.

पुरोगामी जल्पक हे समाजमाध्यमांत साधारणपणे लोकशाहीवादी, सेक्यूलर, समन्वयवादी, व्यक्तीस्वातंत्र्यवादी असे बुरखे घेऊन नांदत असतात. जणुकाही लोकशाही वाचवायचे जागतिक कंत्राट यांनीच घेतले आहे. प्रत्यक्षात मात्र ही मंडळी अत्यंत मुजोर, हेकेखोर आणि लेबलवादी असतात.
या मंडळींना रा. स्व. संघाबद्दल कमालीचा द्वेष आणि तिरस्कार असतो (विरोध असणे आणि द्वेष असणे यात फरक आहे). भारतात जे जे काय वाईट होते ते फक्त आणि फक्त संघामुळे, हा याचा आवडता सिद्धांत असतो. आणि आपला सिद्धात खरा ठरवण्यासाठी ही मंडळी खोट्याचा आधार आवडीने घेतात. बरं, संघ वाईट आहे ना, तर असू देत. पण वाईट असण्यामागची कारणं विचारली तर ती यांच्याकडे कधीच नसतात, कारण या मंडळींना संघ नेमका माहितीच नसतो. कारण म्हणजे द्वेष. कारण विरोध असला तर तो अभ्यासातून मांडतो येतो. मात्र द्वेष कसा मांडणार? संघाबाबतचा यांचा आक्षेप जर कुणी खोडून काढत असेल (तो व्यक्ती संघाशी संबंधीत असेलच असे नाही) तर त्याच्या अंगावर वस्सकन् जाण्यात यांना कमालीचा रस असतो. त्या व्यक्तीस लगेच “तु संघी आहेस, तु मनुवादी आहेस”, अशी खास विशेषणे बहाल केली जातात.

देशातील सर्वसामान्य जनतेपासून ही मंडळी दोन अंगुळ्या वर चालत असतात. “आम्हालाच काय ते सर्व समजते, बाकी जनतेला काहीही कळत नाही”, हा यांचा अहंगंड असतो. परिणामी आपली स्वतची मतं सामान्य जनतेचीच मतं आहेत, ही सिध्द करण्यात ही मंडळी मग्न असतात. परिणामी सामान्य जनतेपासून यांची नाळ तुटलेली असते.

आपल्या विचारांना कुणीही विरोध केलेला यांना अजिबात चालत नाही (अर्थात विचारस्वातंत्र्याचा पुरस्कार वगैरे हीच मंडळी करत असतात). यांचं विचारस्वातंत्र्य फक्त स्वतच्या विचारांपुरतंच मर्यादीत असतं. त्यात जर यांच्या नावडत्या विचारांचे सरकार निवडून आले तर ही मंडळी लोकशाही आणि निवडणूक पध्दती कशी चुकू शकते, यावर अगम्य अशा भाषेत बोलायला लागतात. उदा. बहुमताची लोकशाही लोकशाहीस धोकादायक असते वगैरे.

केंद्रात 2014 साली भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार निवडून आल्यापासून यांच्यातीलच एका गटाने “टक्केवारीची लोकशाही” यावर बोलणं सुरू केलंय. तर यांचा आवडता युक्तीवाद म्हणजे “विद्यमान सरकारला अमुक टक्के मतं मिळाली आहेत, सबब हे सरकार जरी बहुमताने जनतेने निवडून दिलेले असले तरीही ते मुठभरांचेच सरकार आहे. परिणामी सरकारला सत्तेत राहण्याचा कोणताही हक्क नाही”. त्यांना खाली खेचण्यात पुरोगामी चळवळीचे जिवितकार्य असल्याचे साक्षात्कार बऱ्याचदा होत असतात.

जर कुणी विद्यमान सरकारची बाजू मांडत असेल, तर त्याला लगेच ‘भक्त’ असे लेबल चिकटवण्यात ही मंडळी आघाडीवर असतात. मात्र ते करताना आपणही कोण्या एका व्यक्तीचे, विचारधारेचे समर्थन करत आहोत, याचा विसर पडलेला असतो. एकदा यांनी भक्त असे लेबल चिकटवले की पुरोगामी जल्पक सेना त्या व्यक्तीवर घरचे कार्य असल्यासारखे तुटून पडतात. मात्र त्यावेळी स्वतच्या भक्तीला “विचारांचे पाईक” वगैरे साजूक तुपातली नावं यांनी बहाल केलेली असतात.


खरे तर ही पुरोगामी जल्पकं काँग्रेस अथवा डाव्या पक्षाशी वैचारिक बांधिलकी असणारी मंडळी असतात. अर्थात त्यात वावगे असे काहीही नाही. प्रत्येकाला आपापली वैचारिक बांधिलकी जपण्याचा अधिकार आहेच. मात्र या मंडळींची गोची अशी की यापूर्वीच्या बिगरभाजपा सरकारने या मंडळींना शब्दश: पोसले होते. कुठे कुलगुरू म्हणून नेम, कुठे समित्यांवर नेम, कुठे गेलाबाजार बुद्रूकभुषण आणि तत्सम पुरस्कार दे, अशा विविध प्रकारे यांचे चारापाणी अव्याहतपणे सुरू राहील, याची तजवीज केली होती. आणि 2014 साली सरकारबदल झाल्यामुळे (जो होणारच नाही, हे ही मंडळी छातीठोकपणे सांगत गावगन्ना हिंडत होती) हे चारापाणी अचानक तुटले. परिणामी तडफड, नैराश्य आदी एकत्रच या मंडळींना आले. त्या नैराश्यातूनच ही मंडळी अशी जल्पकगिरी करत असतात. परिणामी लोकशाही वाचवायची आहे, हा त्यांचा सफेद झूठ या प्रकारात मोडतो.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हिंसक माणिक 'सरकार'

नक्षलवाद : बदलते स्वरूप

ती तेव्हा तशी... भाग ४ पुन्हा अस्वस्थता