डिजिटल शाळेची गोष्ट

स्थळ – धुळे जिल्ह्यातील वारूड गाव
वेळ – सायंकाळी 6.30 - 7
गावातील मंदिरासमोरील चौकात शिक्षक मंडळींची प्रोजेक्टर, स्पिकर आदींची मांडामांड सुरू होती. निमित्त होतं ‘प्रेरणा सभे’चं. येणारीजाणारी लोक कुतूहलाने ते सर्व बघत होती, “नेमकं काय चाललंय या मास्तर लोकांचं ?” असा एकंदरीत अविर्भाव होता. हळुहळू विद्यार्थी आणि त्यांच्यासोबत त्यांची आई, वडील, काका, काकू, आजी, आजोबा चौकात येऊन बसली. एका सरांनी थोडं प्रास्ताविक केलं आणि मग हर्षल बोलायला उभा राहिला. अगदी सोप्या शब्दात त्याने शाळा डिजीटल करणे म्हणजे काय, त्याने नेमका काय आणि कसा फायदा होईल हे समजावून सांगितलं. ते उपस्थितांना पटलंही. आणि आपल्या गावातील शाळा डिजीटल झाल्या पाहिजेत हे एकमताने ठरलंही.


सध्या ‘डिजीटल’ या शब्दाला खूप महत्व आलंय. अगदी आबालवृद्धांच्य तोंडी हा शब्द खेळत असतो. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘डिजीटल इंडिया’ हे धोरण ठरवल्यापासून तो एक राष्ट्रीय मुद्दा बनला आहे. सरकारी पातळीवरून जे व्हायचे ते होईलच, मात्र डिजीटल इंडिया प्रत्यक्षात आणण्यासाठी धुळ्यातील हर्षल विभांडीक हा तरूण झपाटल्यासारखा काम करतोय. धुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या तब्बल 410 शाळा हर्षलने डिजीटल केल्या आहेत. वर्षअखेर जिल्ह्यातील सर्व म्हणजे 900 शाळा डिजीटल करण्याचा त्याचा संकल्प आहे. हा प्रकल्प 70 टक्के लोकवर्गणी आणि 30 टक्के हर्षलचे अशा स्वरूपात राबवला जातो आहे.
यासंदर्भात हर्षलसोबत बोललो असता तो म्हणाला, “भारताला जर जागतिक पातळीवर एक समर्थ राष्ट्र म्हणून उभे रहायचे असेल तर शिक्षण क्षेत्रात भरीव काम केल्याशिवाय गत्यंतर नाही. शिक्षण हे एक असं क्षेत्र आहे, ज्यात अगदी दररोज काहीना काही नवीन घडत असतं. त्या बदलांच्या संपर्कात राहणे आवश्यक आहे. त्यासाठी भारतातील शाळांना जगातील प्रगत देशातील शाळांशी जोडण्याची गरज आहे, जेणेकरून बदलत्या जागतिक प्रवाहांशी त्यांची ओळख होईल. जिल्हा परिषदेच्या शाळा डिजीटल करणे हा त्यातील एक भाग झाला”
हर्षल विभांडीक. धुळ्याचा व्यवसायाने इन्व्हेस्टमेंट बँकर असलेला, अमेरिकेत नोकरी करत असलेला तरूण. मात्र आपल्या भागासाठी काहीतरी करायचे या विचाराने तळमळीने काम करणारा. हर्षलचे शालेय शिक्षण हे धुळ्यातच जयहिंद संस्थेत झाले आहे. त्याचे वडिल शहरातील विजय क्लाॅथ स्टोअर्स या कापड दुकानात काम करतात. अभियांत्रिकीचे शिक्षण मुंबई येथून त्याने घेतले, त्यानंतर काही काळ नोकरी केली. त्यानंतर व्यवस्थापनशास्त्राचे (एम.बी.ए.) शिक्षण घेण्यासाठी तो अमेरिकेत गेला. अमेरिकेत हर्षल सध्या इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून कार्यरत आहे.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि विनयजी सहस्रबुद्धे यांचे अमुल्य मार्गदर्शन 
हर्षलच्या या प्रवासाला सुरूवात झाली ती 2014 सालात. त्यावेळी धुळ्यातल्या ग्रामीण भागासाठी काहीतरी करायच्या उद्देशाने हर्षलने जिल्ह्यातील काही दुर्गम गावांना भेटी दिल्या. त्याचप्रमाणे हर्षलने काही मान्यवर व्यक्तींनाही त्याचा मनसुबा सांगितला होताय त्यापैकी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी या संस्थेचे डॉ. विनय सहस्रबुध्दे यांनी हर्षलला सकारात्मक प्रतिसाद दिला. आता त्यांच्या आणि प्रबोधिनीच्या मार्गदर्शनाखाली हर्षल काम करतो आहे. त्यांनतर 2015 सालात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी डिजीटल इंडिया हे नवे धोरण जाहीर केल्यानंतर धुळे जिल्ह्यातील चार तालुक्यातील गावं दत्तक घेऊन त्यांना डिजीटल बनवावे, असा विचार सुरू झाला. मात्र त्यातील व्यावहारिक अडचणी लक्षात घेता तो विचार मागे पडला.

त्यानंतर जिल्ह्यातील तीन ते चार शाळा डिजीटल झाल्या असल्याचे हर्षलला समजले. त्याविषयी त्याने शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांनीच हर्षलला गावं डिजीटल करण्यापेक्षा शाळा डिजीटल करण्याविषयी सुचवले आणि मार्गदर्शनही केले. त्यानंतर सुरू झाला डिजीटल प्रवास...
“गावं डिजीटल करण्यापेक्षा शाळा डिजीटल कराव्यात, हा सरांचा सल्ला मला पटला. कारण भारतातील बहुसंख्य लोक आज फेसबुक, व्हॅाट्स अॅप वापरत असले आणि आॅनलाईन खरेदी करत असले तरी डिजीटलदृष्ट्या मोठी लोकसंख्या ही अशिक्षित आहे. त्यामुळे गावं डिजीटल करायची आणि त्याचा उपयोगच लोकांना होणार नसेल तर ते करून काही उपयोग नाही. त्यामुळे प्रथम शाळा डिजीटल कराव्यात, हे मला पटले आणि त्यादृष्टीने मी काम सुरू केले” हर्षल म्हणाला.
प्रेरणा सभांना सुरुवात...
ही संकल्पना जरी अत्यंत महत्वाची आणि उपयुक्त
 असली तरी ती शिक्षकांपासून गावातील लोकांना प्रथम पटवून देणे गरजेचे होते.
प्रेरणा सभा
त्यासाठी हर्षलने प्रेरणा सभा घ्यायला सुरूवात केली. त्यासाठी सर्वप्रथम त्याने शिक्षकांना डिजीटल शाळांची संकल्पना समजावून सांगितली. शिक्षकांना ती पटली आणि त्यांना याकामी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे हर्षलला आश्वासन दिले. त्यापुढचा टप्पा म्हणजे गावातील लोकांना ही संकल्पना पटवून देणे. त्यासाठी मग प्रेरणा सभांचा उपयोग होऊ लागला. प्रेरणा सभा म्हणजे शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि गावातील लोक यांची एकत्रित सभा. त्यामध्ये हर्षल गावातील लोकांना आणि विद्यार्थ्यांना डिजीटल माध्यमाचे महत्व, शाळा डिजीटल होण्याचे फायदे अगदी सोप्या भाषेत समजावून सांगतो. सोबतच डिजीटल शाळा म्हणजे काय, याचे प्रात्यक्षिकही दाखवले जाते. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी डिजीटल शाळा झाली आहे तेथील शिक्षकही आपले अनुभव त्यांच्यासमोर मांडतात. त्यानंतर डिजीटल वर्ग बनवण्यासाठी गावकऱ्यांकडून देणगी अगदी पाच रुपयांपासूनही देण्याचे आवाहन करण्यात येते. आणि विशेष म्हणजे गावकरी अगदी आनंदाने सढळ हस्ते मदतही करतात.

असे आहे डिजीटल शाळांचे स्वरूप
शाळा डिजीटल बनवण्यासाठी जो खर्च येतो त्याची विभागणी 70 टक्के लोकवर्गणी आणी उरलेली रक्कम हर्षलची अशा प्रकारे करण्यात आली आहे. त्याविषयी बोलताना हर्षल म्हणाला, “यासाठीची 70 टक्के रक्कम आम्ही जाणीवपूर्वक लोकवर्गणीद्वारे उभी करतो. कारण एरवी जिल्हा परिषदेच्या शाळांचा दुरावस्था आणि लोकांना त्याबद्दल नसलेली आपुलकी बघता शाळा डिजीटल झाल्यावर त्याबद्दल लोकांना आपुलकी वाटली पाहिजे. लोकांकडून 70 टक्के रक्कम घेतल्यामुळे आपोआपच लोकांना त्याबद्दल आपुलकी वाटते आणि त्यातच या प्रकल्पाचे खरे यश सामावले आहे.”
शाळांच्या पटसंख्येप्रमाणे विविध प्रकारे डिजीटल बनवले जाते. त्यासाठी स्मार्टबोर्ड असलेल्या इंटिग्रेटेट कॅाम्प्यूटर म्हणजे प्राजेक्टर कम सीपीयू- K-Yan याचा वापर प्रामुख्याने केला जातो. ज्या शाळांची पटसंख्या ही 75 अथवा त्यापेक्षा कमी आहे त्या शाळांना मिनी सीपीयूसह प्रोजेक्टर अथवा एलसीडी प्रकारचा दूरचित्रवाणी संच दिला जातो. तर ज्या शाळांची पटसंख्या 30 अथवा त्यापेक्षा कमी आणि ज्या शाळांमध्ये विजेची समस्या आहे त्या शाळांना टॅबलेट दिले जातात. यासाठी लागणारा पहिली ते दहावीचा अभ्यासक्रमही उपलब्ध करून दिला जातो.
आणि वर्ग डिजिटल झाला...
डिजीटल शाळांमुळे मोठ्या प्रमाणावर फायदे होताना दिसून येत आहेत. यामुळे शिक्षकांमध्ये संगणकाचे ज्ञान आणि हाताळणी मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे, परिणामी शिक्षक विविध नाविन्यपुर्ण पध्दती शिकवण्यासाठी वापरू पाहत आहेत.
डिजीटल प्रकारच्या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांची कौशल्ये वाढण्यास मदत होते आहे. पुस्तकातील धडे त्यांना थेट पडद्यावर चित्रे, चित्रफितींच्या माध्यामातून दिसत आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शाळेत यायचे प्रमाणही वाढले आहे. सोबतच शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील संवादही वाढायला मदत होते आहे.
प्रकल्पासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांचीच का निवड केली, याबद्दल सांगताना हर्षल म्हणतो, “भारतात ग्रामीण मोठ्या प्रमाणात टॅलेंट आहे, मात्र योग्य त्या व्यवस्थेअभावी त्यांना बदलत्या जागतिक प्रवाहांची ओळख होत नाही. परिणामी त्यांच्यातील बुध्दीमत्ता अडगळीत पडते. शिवाय जिल्हा परिषदेच्या शाळा आणि त्यातील विद्यार्थी यांच्याकडे जरा नकारात्मक दृष्टीने पाहिले जाते. अमेरिकेत मी याच्या उलट परिस्थिती अनुभवली आहे, तिकडे जास्तीतजास्त विद्यार्थी हे सरकारी शाळांत शिकतात आणि तेथे दर्जेदार शिक्षणही मिळते. भारतातही असे चित्र निर्माण व्हावे त्यासाठी मी प्रामुख्याने जिल्हा परिषदेच्या शाळांचीच निवड केली”.
धुळे जिल्ह्यातील सुमारे 900 शाळा या वर्षअखेर डिजीटल होणार आहेत. शाळा तर डिजीटल झाल्या, त्यानंतर काय ? या प्रश्नाचेही उत्तर हर्षलकडे आहे. तो म्हणाला, “शाळा डिजीटल होणे, विद्यार्थी आणि शिक्षकांना त्या माध्यमाची सवय होणे ही तर एक सुरूवात आहे. त्यानंतर या सर्व शाळा अमेरिकेतील न्यू जर्सी आणि न्यूयाॅर्क या शहरातील शाळांशी जोडल्या जाणार आहे. हे काम पुर्ण झाल्यावर हे विद्यार्थी आणि शिक्षक आठवड्यातील ठराविक दिवशी परस्परांशी संवाद साधतील. यामुळे बदलत्या शैक्षणिक प्रवाह भारतीय विद्यार्थी आणि शिक्षक जवळून पाहू शकतील, अनुभवू शकतील.”
राज्यपाल विद्यासागर राव यांचेसमवेत हर्षल
अर्थात या कामाचीही सुरूवात झाली आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील घाणेगावमधील जिल्हा परिषदेची शाळा 4 नोव्हेंबर रोजी अमेरिकेतील शाळेशी जोडण्यात आली आहे. राज्याचे प्रधान सचिव (शिक्षण) नंदकुमार यांच्याहस्ते व्हिडीओ काॅन्फरन्सींगद्वारे अमेरिकेतील विद्यार्थी आणि शिक्षकांशी शाळेतील मुलांनी संवाद साधला.
हर्षलने नुकतीच राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन हा उपक्रम समजावून सांगितला आहे. तावडे यांनीही हा पॅटर्न राज्यभर राबवला जाईल, असे सांगितले आहे. राज्याचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचीही हर्षलने भेट घेतली, त्यांनीही या प्रकल्पास सर्वतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

संघप्रेरणा
"असं काही करण्याची प्रेरणा मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मिळाली आहे. मी स्वयंसेवक आहे आणि त्याचा मला अभिमान आहे" हे अतिशय मोकळेपणाने हर्षल सांगतो. अर्थात संघाने हर्षलसारखे असे अनेक लोक तयार केले आहेत, त्यात आपलाही समावेश होणे हे त्याच्यासाठी गौरवास्पद आहे.
डिजीटल हा शब्द तसा भुरळ पाडणाराच. मात्र डिजीटलची नेमका आणि सुयोग्य वापर केला तर व्यवस्थेत आणि समाजात बदल घडविण्याची प्रक्रिया सुरू करता येते, हे हर्षलने दाखवून दिले आहे.

* हर्षलचा संपर्क क्रमांक- 9860685522
* पूर्वप्रसिद्धी- मासिक जडणघडण, जानेवारी २०१७


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हिंसक माणिक 'सरकार'

नक्षलवाद : बदलते स्वरूप

ती तेव्हा तशी... भाग ४ पुन्हा अस्वस्थता