पाळणाघरं- गरज आणि वास्तव


“अन्वी, आटप गं लवकर. तुला पाळणाघरात सोडून मला पुढे आॅफीसला जायचंय... किती हळुहळू आवरतेस तू…”
“समीर, आज राधिकाला तू पाळणाघरात सोडशील का ? महत्वाची मिटींग आहे मला आज. संध्याकाळी मी घेऊन येईन तीला...”
“निशा, आज मी अजिबात अर्जुनला पाळणाघरात सोडणार नाही. दोन दिवसांपासून त्यामुळे आॅफीसला उशीर होताय मला...”
    ----------------------------------------------------------------

असे संवाद सध्या शहरांतल्या घरांमध्ये रोज सकाळी हमखास ऐकू येतात. आपल्या लहान मुलांना 9.30 वाजता पाळणाघरात सोडून 10 वाजता आॅफीसला पोहोचण्याची नवरा आणि बायको अशा दोघांनाही घाई असते. त्यामुळे सकाळी उठल्यापासून साधारणपणे नऊ ते साडेनऊपर्यंतची वेळ ही शब्दश: हातघाईची असते. त्यात जर मुलांनी रडणं वगैरे सुरू केलं तर मग आणखीनच चिडचीड होते. त्यानंतर “मुलांना पाळणाघरात कोणी सोडायचं ?” यावरून बऱ्याचदा खटकेही उडतात. कारण दोघांनाही आॅफीसमध्ये वेळेत पोहोचण्याची घाई असते. आणि “रोज मीच का म्हणून सोडायचं मुलाना ?” हा अॅटीट्यूट आपली भूमिका अगदी इमानेइतबारे बजावत असतो. त्यामुळे बऱ्याचदा या विषयावरून घराच स्वास्थ्यही बिघडतं.

सध्याच्या काळात नवरा आणि बायको अशा दोघानीही नोकऱ्या करणे हे गरजेचेच झाले आहे. त्याला आर्थिक आणि शैक्षणिक असे दोन्हीही घटक आहेत. शहरात मुख्यत्वे महानगरांमध्ये आज मोठ्या प्रमाणावर रोजगाराचे केंद्रिकरण झाले आहे. त्यामुळे शिक्षण संपवून महानगरात नोकरीसाठी येणे क्रमप्राप्तच झाले आहे. त्यात महानगराच्या जीवनशैलीत टिकून राहण्यासाठी आर्थिक बाजू भक्कम हवी. त्यासाठी दोघांनाही नोकरी करणे आवश्यकच असते.
त्यातूनच मग विभक्त कुटुंबपद्धतीस सुरूवात झाल्याचे दिसते. निमशहरी आणि ग्रामीण भागातील व्यक्ती नोकरीसाठी महानगरात येतात आणि त्यात ते स्थिरावतातही. मात्र त्यांच्या आई वडिलांना असा बदल करणे मानवत नाही आणि बऱ्याचदा झेपतही नाही. परिणामी एकत्र कुटुंबपद्धतीत वाढलेली मंडळी अपरिहार्यपणे विभक्त कुटुंबपद्धतीकडे वळतात आणि महानगरात वन बीएचकेमध्ये स्थिरावतात. दोघेच असतात तेव्हा फारशी काही काळजी करण्यासारखे नसते मात्र मूल झाल्यावर सर्वांत मोठा प्रश्न उभा राहतो तो “मुलांना साभाळणार कोण ?”.
एकत्र कुटुंबपद्धतीत हा प्रश्न येत नाही, कारण तिथे आजी, आजोबा, काका, काकू, आई वडिल असे अनेक लोकं असतात सांभाळायला आणि बरोबरीच्या मुलांमध्ये लहानपण अगदी सहजतेने निघून जाते, त्यासाठी वेगळ काही करण्याची गरजच भासत नाही. किंबहुना एकत्र कुटुंबपद्धतीत “मुलांना सांभाळणार कोण ?”, हा प्रश्नच उद्भवत नाही.
त्यावर गावाकडे राहणाऱ्या आपल्या आई – वडिलांना सोबत रहायला बोलावणे, हा तसा वरवर सोपा वाटणारा पर्याय आपल्या मनात येतो. मात्र तो पर्याय वाटतो तेवढा सोपा नसतो. वन बीएचकेमध्ये काही तासांसाठी जरी पाहुणा आला तरी अस्वस्थ होण्याची सवय लागत चाललेल्याना “एकदम दोन व्यक्ती काही वर्ष आपल्यासोबत राहणार” ही कल्पनाच सहन होण्यासारखी नसते. त्यात दोन पिढ्या आणि त्यातील संघर्ष हा एक वैश्विक मुद्दा असतोच. त्यातूनच मग पाळणाघराचा तोडगा काढला जातो.
त्याचप्रमाणे शहरी भागात वाढलेल्या मुलांचे आईवडील देखील नोकरी करणारे असतात. त्यामुळे पाळणाघरातच वाढलेली पिढी आता तयार झाली आहे. त्यांना लग्न झाल्यावनर लगेच विभक्त होण्याचा पर्याय सुचवला जातो आणि दोघांकडूनही त्याचे स्वागतच होते. मुलांना स्वातंत्र्य देणे हा त्यामागचा विचार असतो. परिणामी आई वडील आणि मुलगा सून हे वेगवेगळे राहतात. एकाच शहरात राहूनही हे आजीआजोबा नातवंडांना सांभाळायला बऱ्याचदा नकार देतात. अर्थात त्यासाठीची कारणंही आहेतच. आयुष्यभर नोकरी केली असल्याने आवडीच्या अनेक गोष्टी करायच्या राहून जातात, त्या निवृत्तीनंतर करण्यास अनेक लोक प्राधान्य देतात, सबब त्यांना निवृत्तीनंतरचे जीवन हे स्वत:साठी स्वत:च्या पद्धतीने जगायचे असते. त्यामुळे आजीआजोबा नातवंडांना सांभाळायला नकार देतात. शिवाय वाढते वय बघता मुलांमागे धावपळ करणेही शारिरीकदृष्ट्या शक्य नसते. तर बऱ्याचदा मुलांना लहानपणापासूनच बाहेर राहण्याची सवय लागावी, यासाठीही मुलांना पाळणाघरात ठेवणारी लोकं आहेत.
पाळणाघर ही आज समाजाची गरज बनली आहे. ती योग्य की अयोग्य हा पुढचा मुद्दा आहे. मात्र महानगरात राहणाऱ्या आणि नोकरी करणाऱ्यांना आपली मुलं सांभाळण्यासाठी पाळणाघरं आज मोठा आधार ठरत आहेत. मागणी मोठ्या प्रमाणावर असलेल्याने सुरुवातीला घरगुती स्वरूपात असणारी पाळणाघरं बघता बघता व्यावसायिक (प्रोफेशनल) बनत चालली आहेत. सकाळी आॅफीसला जाताना पाळणाघरात सोडा आणि संध्याकाळी घरी परतताना घेऊन जा ही पद्धत नोकरदारांसाठी त्यांचा मोठा प्रश्न सोडवण्यात सहाय्यकारी ठरते आहे.
प्रामुख्याने शहरी भागात गरजेपोटी या संकल्पनेचा जन्म झाला आणि ती चटकन रुजलीही. हळुहळू ही संकल्पना आता महानगरांतून शहरी भाग, निमशहरी भागात शिरकाव करते आहे. त्याचे कारण सरळ आहे, एक म्हणजे विभक्त कुटुंबपद्धतीचा होत असलेला र्हास आणि दुसरे म्हणजे दोघानीही नोकरी करण्याची असलेली निकड. अर्थात दोघांपैकी कुणीतरी आपल्या करिअरचा विश्रांती देऊन पूर्णवेळ मुलांच्या संगोपनासाठी देणे हा एक पर्याय आहेच, मात्र सध्या तरी तशी मोजकीच उदाहरणे असल्याचे दिसते.
तर आज महानगरीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग असलेली पाळणाघरं अचानक माध्यमांसाठी ब्रेकिंग न्यूज ठरली आणि एका महत्वाच्या प्रश्नाकडे (उशीरा का होईना !) समाजाचं लक्ष जाऊन त्यावर चर्चा सुरू झाली आहे.
निमित्त होतं नवी मुंबईतील खारघरमधील एका पाळणाघरात चिमुरडीला सांभाळणाऱ्या महिलेने केलेली अमानुष मारहाण.  पाळणाघरातील मुलांना सांभाळणाऱ्या महिलेने अवघ्या दहा महिन्यांच्या बाळाला जबर मारहाण केली. तसेच अन्य एका पाच वर्षांच्या मुलीनेही सदर महिला आपल्याला काठीने मारहाण करत असल्याचे म्हटले. सुदैवाने सीसीटीव्हीमध्ये ती मारहाण कैद झाली आणि सर्व देश त्यामुळे हादरला. आपल्या लहान मुलांना दिवसातले सात ते आठ तास अनोळखी लोकांसोबत पाळणाघरात ठेवून निर्धास्तपणे नोकरी करणाऱ्या पालकांसाठी तर मोठा धक्काच होता. मग त्यावर आपल्या सध्याच्या माध्यमपरंपरेप्रमाणे चार प्रकारची तज्ज्ञ मंडळी बोलावून वृत्तवाहिन्यांवर चर्चा घेतली गेली, त्यातून काही विधायक मुद्द्यांवर नक्कीच चर्चा झाली.
पाळणाघरांना सरसकट नकारात्मक पद्धतीने पाहणारे बरेच लोक असले तरी ती बदलत जाणाऱ्या समाजाची सध्याची गरज आहे, हे मान्य केलेच पाहिजे. पाळणाघर किंवा डे केअर सेंटर ही तशी पाश्चात्त्य संकल्पना. फ्रान्समध्ये 1840च्या सुमाराला ही संकल्पना पुढे आल्याचे दिसते तर 1850च्या सुमारास अमेरिकेत काही सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने नोकरी करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी पहिले डे केअर सेंटर बफेलो, न्यूयाॅर्क येथे सुरू झाले. त्यानंतर ही संकल्पना सर्वदूर पसरली अर्थात त्यासाठी काही नियमही पाश्चात्य देशांनी तयार केले. आपल्याकडे मात्र “बाहेरच्या देशातील जे स्विकारायचे ते अर्धवटच स्विकारायचे” या परंपरेनुसार हीदेखील संकल्पना आपण स्विकारली. “पैसा मिळतोय” यासाठी अनेक घरगुती पाळणाघरं उभी राहीली. अगदी एखाद्या खोलीतही पाळणाघरं आपल्याकडे चालवली जात आहेत. मात्र खारघरच्या घटनेपासून अचानक सर्व जागे झाल्याचे दिसते आहे. पाळणाघरांना विशिष्ट नियमावली असावी, ही मागणी आता जोर धरत असल्याचे दिसते.
यासंदर्भात आम्ही पुण्यातील पहिले आधुनिक पाळणाघर- ‘आजोळ’च्या संचालिका मोनिका कुलकर्णी यांच्याशी संवाद साधला असता बऱ्याच गोष्टी समोर आल्या आणि पाळणाघरांच्या बाबतीत आपण किती मागे आहोत, याची जाणीव झाली.
साधारणपणे 1999च्या सुमारास पुण्यात ‘आजोळ’ या पाळणाघराची मोनिका कुलकर्णी यांनी स्थापना केली. त्याबद्दल सांगताना त्या म्हणतात, “1999 च्या सुमाराला मी ‘आजोळ’ची सुरूवात केली. तेव्हा आपल्याकडे ही संकल्पना अगदीच नवीन होती मात्र त्याची गरज लोकांना वाटू लागली होती. त्यापूर्वी विद्यामंदीर या नावाने मी प्रि स्कूल चालवत होते. त्यावेळी मुलांना सांभाळायला घरी कोणीच नसल्याची पालकांची अडचण लक्षात येत होती. त्यामुले सुरूवातीला शाळेत येणाऱ्या मुलांसाठीच पाळणाघर का असू नये, हा विचार माझ्या मनात आला आणि ‘आजोळ’ची सुरूवात झाली”,
साधारणपणे 1999 चा काळ म्हणजे आयटी उद्योग नुकताच कुठे वाढायला लागण्याचा काळ. त्याचप्रमाणे अन्य रोजगारही महानगरात केंद्रीत होत होता. त्यामुळे पुण्यात आणि अन्य महानगरांमध्ये रहायचे तर नवरा आणि बायको अशा दोघांनीही नोकरी करणे ही एक गरज झाली आणि त्यातूनच मग मुलांना सांभाळण्याचा प्रश्न उभा राहीला. सुरूवातीला घरगुती स्वरुपाची पाळणाघरं उभी राहीली. त्यात ते चालवणाऱ्यांचा अर्थार्जन हा मुख्य हेतू होता. त्यासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था किंवा नियमावली वगैरे तयार करण्याचे कोणाच्या गावीही नव्हते. परिणामी ज्याला जसे वाटेल तशी पाळणाघरं चालवली जाऊ लागली आणि आजही बर्याच प्रमाणात तशीच परिस्थिती आहे. त्यामुळेच खारघरसारख्या दुर्देवी घटना घडत आहेत.
सुरुवातीला चालवली जाणारी पाळणाघरे ही प्रामुख्याने घरगुतू स्वरूपाची होती. म्हणजे अनेक लोकं आपल्या राहत्या घरातच पाळणाघरं चालवत होती. त्यामुळे घर जशा प्रकारचे असेल त्याच परिस्थितीत मुलांना ठेवण्यावाचून गत्यंतर नव्हते. कारण पाळणाघरासाठी विशेष काही करण्याची आवश्यकता आहे, हे कुणाच्या गावीही नव्हते. त्यामध्ये अगदी एका खोलीतही पाळणाघरं सुरू करण्यात आली. शिवाय किती मुले ठेवताना जागेचा, सोईसुविधांचा कोणताही विचार केला गेला नव्हता. कारण ‘पाळणाघर म्हणजे फक्त मुलांना सांभाळणे’ हे बहुतेकांच्या डोक्यात होते.
‘आजोळ’ हे पुण्यातील पहिले आधुनिक पाळणाघर आहे, आधुनिक म्हणजे नेमकं काय, हे विचारले असता कुलकर्णी म्हणाल्या, “पुण्यात प्रोफेशनली चालवली जाणारी पाळणाघरं नव्हती, जी होती ती घरगुती स्वरुपात एखाद्या लहान खोलीत वगैरे चालवली जात होती. सुदैवाने आमचा मोठा बंगला होतात, त्याचा वापर करण्याचे मी ठरवले. सुरूवातील पुण्यातील असलेल्या पाळणाघरांचा मी सर्व्हे केला, त्याची नेमकी स्थिती क्ष जाणून घेतली आणि या सर्वांपेक्षा वेगळं स्वरूप आपल्या पाळणाघराचं असावं, हे नक्की केलं. त्यात मी शिक्षण क्षेत्रातच असल्याने लहान मुलांच्या वागण्याशी, त्यांच्या गरजांशी बर्याच प्रमाणात परिचीत होते. शिक्षण हा पाळणाघरातला एक महत्वाचा भाग असला तरी मुलांची काळजी घेणे हा जास्त महत्वाचा भाग आहे. पाळणाघरात मुलांची झोपण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था, स्वच्छता आणि त्यांचे वाढते वय लक्षात घेता त्यांच्या विकासासाठी काही उपक्रम, असे स्वरूप पाळणाघराचे असावे आणि ‘आजोळ’मध्ये हे सर्व आम्ही देत आहोत”.
मुलांची खाण्याची, झोपण्याची व्यवस्था, स्वच्छता आणि त्यांच्या वाढीला उपयोगी असणारे उपक्रम हे सर्व पाळणाघरांमध्ये असलेच पाहिजे. कारण या वयात मुलांना सर्व काही नवीन समजून घ्यायची इच्छा असते, त्यामुळे पाळणाघर म्हणजे फक्त मुलं सांभाळण नव्हे तर त्यांची सर्वांगिण काळजी घेणे त्यात अपेक्षित आहे. मात्र आज बरीच पाळणाघरं त्यात कमी पडत असल्याचे दिसते आणि पालकांनाही या गोष्टीच काही वावगं वाटत नाही. याला कारण म्हणजे या सर्वांबद्दल असलेले अज्ञान. त्यामुळे “पाळणाघरात टाकले म्हणजे आमची जबाबदारी संपली, आता काय ते पाळणाघरानेच बघावे” अशा प्रकारचा अॅटीट्यूट वाढीस लागला आहे. आणि करिअरचे महत्व सांगून त्याचे समर्थनही केले जाते. मात्र ते करताना आपण आपल्या मुलांच्या भवितव्याशी खेळतो आहोत, याचे भान येणे आवश्यक आहे. खारघरसारखी एखादी घटना घडल्यावरच जर अशा विषयांची चर्चा होत असेल तर ते दुर्दैवी आहे.
‘आजोळ’चे वैशिष्ट्य म्हणजे त्याची अभ्यासपूर्ण आखणी करण्यात आली आहे, त्याबद्दल सांगताना कुलकर्णी म्हणतात, “सुरूवातीला एक प्रयोग म्हणून आमच्या घराच्या एका हाॅलमध्ये पाळणाघराला सुरूवात केली. मात्र साधारणपणे महिन्याभरातच 28 ते 30 मुलं पाळणाघऱात येऊ लागली. मग मात्र आम्ही घराचा तळमजला पूर्णपणे त्यासाठी वापरायचे ठरवले. त्यासाठी आवश्यक ते बदल करून घेतले. त्यासाठी पालकांकडून येणाऱ्या सुचनांचाही समावेश करून घेतला. कारण एवढ्या मुलांसाठी खेळ, जेवण, आराम यासाठी एकच खोली वापरणे योग्य नव्हते.”
मुलांची काळजी घेणे आणि त्यांचे सर्वांगिण संगोपन करणे, या हेतूने ‘आजोळ’ चालवले जाते आहे. सध्या पुण्यात नांदेड सिटीमध्ये 2, धायरी, टिंगरेनगर, खराडी आणि हिंजवडी येथे प्रत्येकी 1 तर नाशिकमध्ये 1 अशी सात ठिकाणी पाळणाघर चालवली जात आहेत. त्यासाठी एक विशिष्ट प्रकारची व्यवस्थाही त्यांनी तयार केली आहे. त्याबद्दल सांगताना कुलकर्णी म्हणतात, “आमच्याकडे तीन महिने ते वय वर्षे अकरा अशा वेगवेगळ्या वयोगटातील मुले आहेत. प्रत्येक वयोगटासाठी आम्ही विशेष असा प्लॅन तयार केला आहे. अगदी तीन महिन्याच्या बाळासाठीही त्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वाचे ठरणाऱ्या गोष्टींचा विचार करण्यात आला आहे. मुलांचे खेळ, जेवणात सकस अन्नाचा समावेश, व्यायाम, अभ्यास, झोप या व अशा सर्व गोष्टींचा अभ्यास करून कार्यक्रम तयार केला आहे. मुलांना सांभाळणाऱ्या महिलांचे विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आम्हीच तयार केला आहे, त्याप्रमाणे त्यांचे प्रशिक्षण दिले जाते, कारण मुलांना त्यांच्यासोबत आणि त्यांना मुलांसोबत रहायचे असते. आमच्याकडे मानसोपचारतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञही आहेत जेणेकरून सर्वांगीण आरोग्य हे चांगले रहावे. मुख्य म्हणजे मुलांना एकटे वाटू नये आणि त्याचा परिणाम त्यांच्या विकासावर होऊ नये, यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमची फ्रँचायझी देताना आम्ही खूपच खबरदारी घेतो. ज्या व्यक्तीस फ्रँचायझी हवी आहे, ती किमान पदवीधर असावी अशी प्राथमिक पण महत्वाची अट आहे, त्यानंतर तीला मुलांबाबत जिव्हाळा आहे की नाही यासाठी मानसोपचारतज्ज्ञांची मदत आम्ही घेतो. कारण संबंधीत व्यक्ती जर फक्त अर्थांर्जनासाठी यात पडत असेल तर तो मुलांच्या जीवाशी खेळ ठरतो. त्यानंतर सहा महिन्यांनी आम्ही त्या टिचर्स ट्रेनिंग कोर्स करण्याचे बंधनकारक करतो. कारण पाळणाघर म्हणजे केवळ सांभाळणे नव्हे. शिवाय आमची क्वालिटी कंट्रोल टीम, डॉक्टर्स हे सर्व फ्रँचायझींना भेटी देणे आणि काय सुधारणा करणे गरजेचे आहे हे वेळोवेळी करत असतात. मुलांसाठी अन्य विविध उपक्रमांसाठी आम्ही बाहेरील तज्ज्ञ व्यक्तींचीही मदत घेतो. त्यामुळेच आम्ही पालकांना विश्वास देण्यात यशस्वी ठरलो आहोत”
‘आजोळ’मध्ये ज्याप्रमाणे सर्व गोष्टींचा विचार केला गेला आहे, तसाच विचार प्रत्येक पाळणाघराने करण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वप्रथम “पाळणाघर म्हणजे मुलांना सांभाळणे” हा समज दूर करण्याची गरज आहे. मुलांना फक्त सांभाळणे गरजेचे नसून त्यांचा सर्वांगीण विकास होणेही गरजेचे आहे. कारण ज्या वयात ही मुले असतात, त्या वयात त्यांना सर्व काही जाणून घेण्याची इच्छा असते. त्यासाठी त्यांचे शारिरीक आणि मानसिक आरोग्य हे उत्तम असणे आवश्यक आहे. आपल्या आई वडिलांपासून दिवसातले सात ते आठ तास ही मुले दूर राहतात. आणि या वयातच त्यांना आई वडिलांच्या सोबतीची सर्वाधिक गरज असते. त्यामुळे पाळणाघरात पूर्णपणे शक्य नसले तरी काही प्रमाणात या गरजा भागणे आवश्यक असते. त्यासाठी पाळणाघरांची एक व्यवस्था हवीच. जेणेकरून मुलांचा त्यांच्याशी भावनिक बंध तयार होईल आणि त्यांच्या विकासात कोणतीही बाधा येणार नाही.
खारघरसारख्या घटनेनंतर पाळणाघरांसाठी काही सरकारी  नियमावली असावी ही मागणी पुढे येते आहे, मुळात अशा घटना घडतातच का, याचा विचार करणे गरजेचे आहे. मुळात पाळणाघर ही पूर्णपणे वेगळी संकल्पना असल्याचे लक्षात घेणे गरजेते आहे. त्याबद्दल सांगताना कुलकर्णी म्हणतात, “अनेक ठिकाणी शाळेनंतर त्याच ठिकाणी पाळणाघरं चालवली जातात. खारघरमध्येही तसेच होते. शाळा असते आणि शिक्षक असतात तोपर्यंत सर्व ठिक असते. मात्र शिक्षक गेल्यानंतर मुलांना सांभालायला येणाऱ्या व्यक्तींचा मुलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो, परिणामी करायचे म्हणून त्या काम करत असतात. त्यातूनच मग असे दुर्दैवी प्रकार घडतात. त्यासाठी शाळेनंतर त्याच ठिकाणी पाळणाघरं चालवण्यास बंदी असावी. सरकारी निर्बंधांबाबत बोलायचे तर पाळणाघरांसाठी सरकारी नियम असावेत. तसा प्रयत्न सरकारने केलाही आहे. मात्र त्यात बालवाड्या, अंगणवाड्या, शाळा आणि पाळणाघरं यांना एकाच साच्याच बसवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्याची अंमलबजावणी करणे कठिण आहे. पाळणाघरांसाठी स्वंतंत्र धोरण आखण्याची गरज आहे.”
पाळणाघर समाजाची एक गरज आहे. त्यासाठी काहीएक असे नियम असलेच पाहिजे, जेणेकरून त्याचे फायदे समाजाला मिळू शकतील.
“पाळणाघरात टाकले म्हणजे आमची जबाबदारी संपली” असे म्हणणाऱ्या पालकांनीही जरा वेगळा विचार करणे आवश्यक आहे. “पालकांच्या आमच्याकडून अवास्तव अपेक्षा असतात, आम्ही पैसा देतोय ना, मग सर्व काही तुम्हीच बघा” असे म्हणणारे पालक वाढत असल्याचे पाळणाघरांचे म्हणणे आहे. मात्र काही गोष्टी असतात, ज्या पाळणाघरं पूर्ण करू शकत नाही. त्याचा विचार पालकांनी करणे आवश्यक असते. करिअरइतकीच मुलेही महत्वाची असल्याचे त्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. कारण पाळणाघरं आणि पालक हे एकमेकांच्या गरजा भागवत आहेत.
पाळणाघरांचे काही निकष असणे आता आवश्यक झाले आहे, अन्यथा खारघरसारखे प्रकार घडतच राहणार.
जागा पुरेशी असावी.
स्वच्छतागृहे पुरेशी असावीत.
मुलांना खेळण्यासाठी, जेवण्यासाठी आणि झोपण्यासाठी चांगली सोय असावी.
मुलांना वयोगटाप्रमाणे ठेवले जावे.
सकस आहार पुरवण्यात यावा
मुलांच्या वयोगटाप्रमाणे त्यांच्या वाढीसाठी आवश्यक असे उपक्रम तयार करण्यात यावेत.
पाळणाघरात मुलांना सांभाळणाऱ्या व्यक्तींना योग्य प्रशिक्षण द्यावे, त्यांचे मानसिक आणि शारिरीक आरोग्य निरोगी असल्याची खात्री करावी.
पाळणाघरात डॉक्टर आणि मानसोपचारतज्ज्ञ असावा.
मुलांची संख्या मर्यादित असावी.
पाळणाघरात आपल्या मुलांना ठेवायचे नसेल तर अन्यही काही करता येणे शक्य आहेच. त्यापैकी पहिला उपाय म्हणजे पुन्हा एकत्र कुटुंबपद्धतीकडे वळणे. यामुळे आजी-आजोबांकडे मुलांची काळजी घेतली जाईल. यामध्ये दोघांपैकी एकाच्या आई-वडिलांना (गावाकडे राहत असल्यास) शहरात बोलवावे. यात सर्वांनी अॅडजस्टमेंट करण्याची गरज आहे. दुसरा उपाय म्हणजे कामाच्या ठिकाणी पाळणाघरांची सोय करणे. केंद्र सरकारने तशा प्रकारचे आदेश काढले असले तरी त्याची अंमलबजावणी फारशा परिणामकारकपणे होताना दिसत नाही. तसे झाल्यास मुलांना आपल्याजवळच ठेवणे पालकांना शक्य होणार आहे. तिसरा पर्याय म्हणजे ‘वर्क फ्रॅम होम’- काही ठराविक काळापर्यंत घरूनच काम करणे. यामध्ये बाळाची काळजी घेा येईल आणि काम देखील करता येईल. चौथा पर्याय म्हणजे दोघांपैकी एकाने बाळ मोठे होईपर्यंत काम थांबवून पूर्ण वेळ बाळास सांभाळणे. अर्थात यात फक्त स्त्रीनेच नोकरी थांबवणे अपेक्षित नाही, पुरुषही घरी थांबू शकतात. हा निर्णय परस्परविचारविनिमयातून घ्यायचा आहे. अर्थात यापैकी एकही उपाय करणे शक्य लसेल तर पाळणाघरं आहेतच..
पाळणाघरांबद्दल अनेकांनी नाकं मुरडली तरी ती आजच्या समाजाची महत्वाची गरज आहे आणि येत्या काळात ती वाढतच जाणार आहे, हे मान्य करावेच लागेल. कारण ज्यांची मुलं आता पाळणाघऱात वाढत आहेत, ती पिढी आपल्या नातवंडांना सांभाळण्यास तयार असेल का ? याचा विचार करणे आवश्यक आहे. कारण “मुलांना घरी सांभाळायचं” हे गावीही नसलेली ती पिढी असणार आहे. या प्रश्नाचे गांभीर्य आणि भविष्यकालीन परिणाम ओळखण्याची गरज आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी उत्तम पाळणाघरं असणे आवश्यक आहे. त्यासाठी पालक, पाळणाघरं आणि व्यवस्था यांनी एकत्र येत आदर्श अशी पाळणाघरं कशी निर्माण होतील, याबद्दल विचार करण्याच गरज आहे.

*पूर्वप्रसिद्ध- मासिक जडणघडण, जानेवारी २०१७

टिप्पण्या

  1. We know these centers charge ~1000 -1200 per hour per month, please present some information on how much salaries are provided to employees. As I had came across investment opportunities from some such centers, which I think not a nice idea.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नक्षलवाद : बदलते स्वरूप

हिंसक माणिक 'सरकार'