तू तेव्हा तशी... भाग २- अनुत्तरीत प्रश्न


सकाळी नेहमीप्रमाणे सत्यजित आॅफिसला निघाला. नेहमीच्या चहाच्या दुकानात मार्लबरो अॅडव्हान्स पेटवली. चहासोबत दुकानातली नेहमीची गाणी होतीच.
खरं तर आता सर्व होऊन दोन – अडिच वर्ष झाली होती. म्हणजे मुव्ह आॅन वगैरे व्हायला एवढा काळ पुरेसा असतो, असं रोज स्वतलाच बजावूनही झालं होतं आणि अनेकांकडून बजावूनही घेतलं होतं.
पण व्हायचं ते रोज होतच होतं. म्हणजे अगदी कधीही आणि कुठेही सर्व काही आठवणं आणि त्यातच मग हरवून जाणं हा तर जवळपास दिनक्रमच झाला होता. म्हणजे अगदी कोणतही कारण त्या आठवणी जाग्या व्हायला पुरत होतं. म्हणजे अगदी कामात असताना, गाडी चालवताना, कार्यक्रमात असताना, मित्रांसोबत असताना आणि एकदा तसं झालं की मग सत्यजित एका वेगळ्याच कोषात जायचा. सुरूवातीला या सर्व प्रकाराने तो पुरता भांबावून गेला होता, कारण त्यामुळे बरेच गैरसमजही वाढले होते त्याच्याबद्दलचे. पण मग या सर्वांतून बाहेर पडायचा एक मार्ग अखेर सापडलाच...

लिखाण... जो त्याचा व्यवसायही होताच आणि आवडही.  त्यामुळे असं आठवणी जाग्या झाल्यवर जो काही मनात भावनांचा कल्लोळ उठायचा, तो लिहून ठेवायला त्याने सुरूवात केली. त्यामुळे पार काही वेगळं घडलं नाही पण किमान अस्वस्थता तरी कमी व्हायला लागली...

अस्वस्थ असतो आपण कारण
छळत असतात आपल्याला
अनुत्तरीत प्रश्न
पण, जेव्हा आपण विचार करतो
की आपणच अनुत्तरीत ठेवलय
प्रश्नांना
मग पुन्हा वाढते अस्वस्थता आपली
अजाणतेपणी प्रश्न अनुत्तरीत राहणं
आणि जाणूनबुजून त्यांना अनुत्तरीत ठेवणं
यात आपण स्वतःलाच  जखडून ठेवत असतो
मग हळुहळू अस्वस्थता आणि
अनुत्तरीत प्रश्न
आपला संपुर्ण ताबा घेऊ लागतात
आणि भानावर येईपर्यंत
खुप खोलवर जाऊन
अडकलेलो असतो आपण
महाकाय लाटा
अस्वस्थतेच्या आणि अनुत्तरीत प्रश्नांच्या
चहुबाजूंनी  घेरून टाकतात आपल्याला
किनारा तर दृष्टीक्षेपातच येत नसतो तेव्हा
मग आपण बुडत जातो...
खोल, खोल आणि खोल.... 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हिंसक माणिक 'सरकार'

नक्षलवाद : बदलते स्वरूप

ती तेव्हा तशी... भाग ४ पुन्हा अस्वस्थता