महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था (डेक्कन व्हर्न्याक्युलर ट्रान्स्लेशन सोसायटी)

पुण्यातल्या सदाशिव पेठेतील खुन्या मुरलीधर चौकातून निंबाळकर तालीम चौकीकडे जाताना डाव्या बाजूला असलेल्या एका वाड्यात महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था (डेक्कन व्हर्न्याक्युलर ट्रान्स्लेशन सोसायटी) असा फलक दिसतो. बाहेरून अगदी साध्या वाटणाऱ्या या वाड्यात नेमकं आहे काय, हे आत गेल्याशिवाय कळत नाही. मात्र आत गेल्यावर प्रचंड मोठे ग्रंथसंचित आपल्यापुढे खुले होते. महाराष्ट्रातीस सर्वांत जुनी साहित्य संस्था ही या संस्थेची आणखी एक ओळख.

वाचन संस्कृती वाढावी, प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी व्रतस्थपणे काम करणाऱ्या संस्था महाराष्ट्रात आहेत. अनेक संस्थांची स्थापना नामदार गोखले, न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर आदी मान्यवरांनी केली आहे. शंभरपेक्षा अधिक वर्ष या संस्था आजही अविरतपणे कार्यरत आहेत.
अशाच प्रकारचे काम करणाऱ्या एका संस्थेचा परिचय या लेखातून आपण करून घेणार आहोत. ‘महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था’ (डेक्कन व्हर्न्याक्युलर ट्रान्स्लेशन सोसायटी)
गेल्या 122 वर्षांपासून ही संस्था कार्यरत आहे. न्यायमूर्ती रानडे, डॉ. रामकृष्ण भांडारकर, हरि नारायण आपटे, लोकमान्य टिळक आदींसह पंचवीस मान्यवरांनी ही संस्था 29 आॅक्टोबर 1894 रोजी स्थापन केली. त्यावेळी तीचे नाव डेक्कन व्हर्न्याक्युलर ट्रान्सलेशन सोसायटी असे ठेवण्यात आले. मराठी भाषा आणि साहित्याच्या अभ्युदयासाठी काम करणे, असे ध्येय यामागे होते.
संस्थेबाबत माहिती जाणून घेण्यासाठी संस्थेचे सहकार्यवाह डॉ. अविनाश चाफेकर यांची बेट घेतली. ते म्हणतात, “न्यायमूर्ती रानडे यांनी महाराष्ट्रात विविध ठिकाणी अनेक संस्था स्थापन केल्या. मराठी ग्रंथांना उत्तेजन देणे, चांगले लिखाण करवून घेणे, चांगल्या इंग्रजी ग्रंथांचे भाषांतर करून घेणे यासाठी ही संस्था स्थापन करण्यात आली. ग्रंथांना पारितोषिक देण्यास 1895 पासून सुरूवात करण्यात आली.”
डेक्कन व्हर्न्याक्युलर ट्रान्सलेशन सोसायटी या नावाची एक संस्था मुंबई येथे स्थापन करण्यात आली होती. मेलोबी या ब्रिटीश अधिकाऱ्याने चार हजार रूपयांची देणगी त्या संस्थेस दिली होती, मात्र संस्थेचे कोणत्याही प्रकारचे काम सुरू नव्हते. ती रक्कम नव्या संस्थेस मिळावी यासाठी न्यायमूर्ती रानडे यांनी पुण्यात त्याच नावाच्या संस्थेची नोंदणी केली आणि पडून राहिलेली रक्कम मिळवली. त्यानंतर रँग्लर र. पु. परांजपे हे संस्थेचे अध्यक्ष होते, त्यावेळी संस्थेचे इंग्रजी नाव बदलून महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था असे मराठी नाव देण्यात आले.
संस्थेच्या जडणघडणीबद्दल डॉ. चाफेकर सांगतात, “पेशव्यांच्या राजवटीत दरवर्षी चातुर्मासात विद्वानांना दक्षिणा दिली जात असे. त्यामध्ये वैदिक विद्वान, इतर पंथीय विद्वान आणि अन्य धर्मातील पंडितांचा समावेश असे. पुढे इंग्रजांच्या राजवटीतही त्यांनी ती प्रथा नावाने सुरू ठेवली. फक्त त्यांनी त्यात थोडा बदल केला. तो म्हणजे विद्वानांच्या ग्रंथांना पुरस्कार देण्यासाठी त्यांनी त्याचा वापर सुरू ठेवला. या योजनेस बऱ्यापैकी प्रतिसाद मिळू लागला. त्यानंतर ब्रिटीशांनी दक्षिणा प्राइझ कमिटी या नावाने एक स्वतंत्र कमिटी स्थापन केली. 1895 साली या कमिटीचे सर्व काम संस्थेकडे आले, सोबतच इ. स. 1887 पासून कमिटीकडे आलेली सर्व पुस्तके, हस्तलिखिते अशी 102 पुस्तके संस्थेकडे देण्यात आली. संस्थेने तज्ज्ञांकडून त्यांची तपासणी करावी आणि मग योग्य तो पुरस्कार द्यावा, अशा प्रकारचे काम अभिप्रेत होते. संस्थेने शिफारस केलेल्या ग्रंथांना तत्कालिन मुंबई सरकार पुरस्कार देत असे.”
न्यायमूर्ती रानडे यांनी संस्थेसाठी मोलाचे कार्य केले आहे. आजच्यासारखे केवळ संस्था सुरू करणे आणि त्यावर मलिदा लाटणे, असे प्रकार त्याकाळात नसल्यानेच महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था गेली 115 वर्ष उत्कृष्ट मराठी ग्रंथाना पुरस्कार देऊन उत्तेजन देण्याचे कार्य करत आहे.
न्यायमूर्ती रानडे यांनी तत्कालीन इंग्रज सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करत पेशवे दप्तर आणि पेशव्यांच्या रोजनीशी त्यांनी संस्थेसाठी मिळवल्या. दोहोंचे 48 खंड प्रकाशित करण्यात आले आहेत.
पेशवे दप्तर म्हणजे शाहू महाराज गादीवर आले तेव्हापासून ते खडकीच्या लढाईपर्यंत असा सुमारे 110 वर्षांचा इतिहास त्यात आहे. या काळात असलेली महाराष्ट्राची सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक स्थिती, लोकांच्या करमणूकीची साधने, राज्यव्यवस्था, शेतसारा आकारणीच्या व वसुलाच्या पध्दती, मिठावरील कर, सरकार काढत असलेले कर्ज व त्याची परतफेड, दिवाणी आणि फौजदारी खटले कसे चालत, पोलीस, टपाल, टांकसाळ, धर्मदाय, औषधोपचारांची व्यवस्था याविषयी विपुल प्रमाणात विश्वसनिय माहिती पेशवे दप्तरातून मिळते.
ग्रथांना पारितोषिक द्यायच्या पध्दतीविषयी सांगताना डॉ. चाफेकर सांगतात, “त्या काळात असलेली पध्दत म्हणजे एखादा ग्रंथ तीन परिक्षकांकडे पाठवला जात असे. त्यांच्या परिक्षणानंतरच पारितोषिक द्यायचे की नाही हे ठरवले जात असे.”

संस्थेचा मुख्य ठेवा म्हणजे सन 1894 पासूनची मराठी ग्रंथसंपदा आणि विद्वानांनी केलेली त्यांची परिक्षणे. उदाहरणादाखल घ्यायचे झाल्यास वामन बाळकृष्ण रानडे लिखित नामदार सुरेंद्रनाथ बानर्जी यांचे चरित्र, गोविंद नारायण काणे लिखित (प्रकाशनकाल सन 1900) महमद पैंगबर, मोरेश्वर सखाराम चितळे लिखित (प्रकाशनकाल सन 1897) महाराज्ञी व्हिक्टोरीया हे चरित्र. त्याचप्रमाणे विविध ग्रंथांची विद्वानांनी केलेली परखड परिक्षणेही वाचण्यासारखी आहेत. अंतरिक्ष या हरि वामन पावसकर यांच्या ग्रंथाचे परिक्षक वैजनाथ काशिनाथ राजवाडे म्हणतात, “ह्या ग्रंथात कविता ह्या नावाला लायक असे दोन चार श्लोक सापडतील की नाही ह्याची शंका आहे. असे श्लोक वाचून हसू आल्याशिवाय रहात नाही. पुस्तक बक्षिसास अपात्र आहे, असे माझे मत आहे.” विशिष्ट लेखकांच्या विशिष्ट लिखाणास पुरस्कार मॅनेज करणाऱ्या आजच्या वातावरणात हे उदाहरण अतिशय बोलके आहे.
संस्थेत आज 1895 पासूनच्या ग्रंथांची परिक्षणे आहेत. ही परिक्षणे म्हणजे त्या त्या काळातील समाजजीवन समजून घेण्यसाठी अत्यंत महत्वाची आहेत. या परिक्षणांमधून तत्कालीन लेखन आणि त्यावरची विद्वांनाची परखड मते जाणून घेता येतात. इतिहास, समाजशास्त्र आणि मराठी विषयाच्या अभ्यासकांसाठी ही परिक्षणे म्हणजे अनमोल असा ठेवाच आहे.
संस्थेकडे असलेला एक अमूल्य असा ठेवा म्हणजे न्यायमूर्ती रानडे यांचा पत्रव्यवहार. संस्थेने तो अतिशय चांगल्या पद्धतीने जपून ठेवला आहे. इतिहासाच्या दृष्टीने त्या पत्रव्यवहाराचे महत्व अनन्य साधारण असे आहे. त्याबद्दलची एक आठवण डॉ. चाफेकरांनी सांगितली- “महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक गोविंदराव तळवलकर यांनी न्यायमूर्ती रानडे यांच्यावर एक ग्रंथ लिहीला होता. संस्थेने काही काळापूर्वी संस्थेत बोलावून त्यांचा गौरव केला. त्यावेळी रानडे यांचा पत्रव्यवहार संस्थेकडे असल्याचे समजल्यावर, ‘मला जर हे अगोदर कळले असते तर माझा ग्रंथ अधिक समृद्ध झाला असता’” अशी हळहळ त्यांनी व्यक्त केली. सध्या रानडे यांचा पत्रव्यवहार संस्थेने लॅमिनेट करून जतन करून ठेवला आहे.
नवे उपक्रम...
मराठी विकीपीडीया
गेल्या वर्षीच्या जून महिन्यात संस्थेने बंगळुरू येथील सेंटर फाॅर इंटरनेट अँड सोसायटी (सीआयएस) यांच्यात एक करार करण्यात आला आहे. या करारान्वये संस्थेतील शंभर वर्षांपूर्वीपासूनचे सुमारे एक हजार ग्रंथ मराठी विकीपीडीयावर उपलब्ध होणार आहेत. या विकीपीडीयावर संस्थेच्या संग्रही असलेली 1895 पासूनची विद्वानांनी केलेली परिक्षणे, शंभर वर्षांपूर्वीपासूनची हस्तलिखिते आणि दुर्मीळ ग्रंथ, पेशवे दप्तर, विविध प्रकारचे 32 कोश, जुन्या पोथ्या, न्यायमूर्ती रानडे यांचा राइज आॅफ मराठा पाॅवर हा ग्रंथ आदी साहित्य लवकरच आता इंटरनेटवर उपलब्ध होऊ शकणार आहे.
डिजीटायझेशन
संस्थेकडे असलेल्या सुमारे 7000 हजार ग्रंथांचे स्कॅनिंग आणि डिजीटायझेशनचे कार्य सध्या सुरू आहे. आतापर्यंत सुमारे 3000 ग्रंथांचे डिजीटीयझेशन पूर्ण झाले आहे. त्यासाठी डॉ. विवेक सांवत आणि एम. के. सी. एल या संस्थेचे विशेष सहकार्य लाभत असून एम. के. सी. एल हे सर्व काम विनामूल्य करत आहे.
आदिवासी बोलींचे संवर्धन
संस्थेची आणखी एक योजना म्हणजे आदिवासी बोलींचे संवर्धन. सेंटर फाॅर इंटरनेट अँड सोसायटी (सीआयएस) याच संस्थेच्या सहकार्याने हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार असून सध्या तो प्रस्तावित आहे. यात प्रथम धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमधील आदिवासी समाजाची बोलीभाषा, त्याच्या बोलीतील म्हणी, त्यांचे संगीत, नृत्य आदी सर्वांचे जतम करण्याचा प्रकल्प संस्था पूर्ण करणार आहे.
दक्षिणा भवन
वनाझ कंपनीतर्फे संस्थेस पुण्यात पौड रस्त्यावर 10000 चौरस फुटाची जागा देणगी म्हणून प्राप्त झाली आहे. त्या जागेत दक्षिणा भवन या नावाची वास्तू उभारण्याची कल्पना आहे. संस्थेचे कार्यालय, वाचनालय, ग्रंथालय, अभ्यासिका, पाहुण्यांची राहण्याची सोय अशा पर्कारची वास्तू उभारण्याचे काम प्रस्तावित आहे.
सिंहावलोकन व्याख्यानमाला
मार्च महिन्यात बी. ए. आणि एम. ए. च्या विद्यार्थ्यांसाठी ही व्याख्यानमाला सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने मराठी भाषा आणि तत्सम विषय असणार असून मराठीचे अभ्यासक व चाहते अशा दोहोंनाही त्यातून लाभ होणार आहे.
भाषाशुद्धी मोहिम
वृत्तपत्रे, रस्त्यांवरील पाट्या अशा सार्वजिनक ठिकाणी होत असलेल्या अशुद्ध मराठी भाषेचा वापर थांबावा, यासाठी अशा प्रकारची मोहिम राबवली जाणार आहे.
मराठी भाषा कशी शिकवावी ?
मराठी भाषा कशी शिकवानी या विषयावर संस्थेत एक अभ्यासक्रम चालवला जातो. शारदा शिंत्रे या मराठीच्या अभ्सासक हा उपक्रम चालवतात. मराठी विषयाचे शिक्षक आणि अभ्यासकांसाठी अतिशय उपयुक्त असा उपक्रम आहे.
अशा प्रकारचे व्रतस्थपणे काम करणाऱ्या संस्था म्हणजे समाजाचे मार्गदर्शकच. मात्र कोणतीही संस्था चालवायची म्हटली त्यासाठी मनुष्य आणि धन असे दोन्ही प्रकारची बळं ही लागतातच. संस्था गेल्या 122 वर्षांपासून अविरतपमे काम करत आहे, मोठे ग्रंथसंचित निगुतीने सांभाळत आहे. संस्थेला अन्यही बरेच उपक्रम सुरू करायचे आहेत, आहे ते पूर्ण करायचे आहेत. त्यासाठी संस्थेला तरूण अभ्यासक आणि धनाची मदत करणारे दानशूर अशा दोहोंच्या मदतीची गरज आहे, जेणेकरून आणखी शेकडो वर्ष संस्था मजबूतपणे काम करत राहील.



टिप्पण्या

  1. अमुल्य माहिती बदल आभार.
    I love Marathi, reading it's my mother tongue. Pune was blessed with great intellectuals. That is the reason it has been recognized as a city of learning. Continue to spread the word.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हिंसक माणिक 'सरकार'

नक्षलवाद : बदलते स्वरूप

ती तेव्हा तशी... भाग ४ पुन्हा अस्वस्थता