दीड वर्षाने मिळाली ‘ती’ सायकल...

‘विक्रम पेंडसे सायकल्स- अ जर्नी इन्टू द पास्ट’


सायकल. आपणा सर्वांची पहिली दुचाकी. सायकल म्हटलं की अनेक गोष्टी आपसूकच डोळ्यासमोर तरळून जातात. म्हणजे अगदी हट्ट करून घेतलेली पहिली सायकल, लंगडी करत सायकल शिकणे, मित्रमंडळींसोबत सायकलच्या लावलेल्या शर्यती, सायकलला खास रेडीयम वगैरे लावून सजवणे, नियमित तेलपाणी करणे, घाईच्या वेळी सायकलची हमखास उतरणारी चेन आणि अगदी भर रस्त्यात सायकल उलटी पाडून बसवलेली ती चेन, त्यात आॅईलने माखलेले हात... एक ना दोन अशा अनेक आठवणी.
विक्रम पेंडसे
कालांतराने मग सर्वांच्याच आयुष्यातून सायकल रजा घेते आणि आपण मोटरसायकलला सरावतो. पण तरिही अगदी व्यायामासाठी का होईना, पुन्हा सायकलकडे वळतोच आपण. कारण आयुष्यातली पहिली गोष्ट माणूस सहसा विसरत नाही. मग ते प्रेम असो की सायकल !
आपल्यापैकी अनेकांनी लहानपणी बाबांच्या अॅटलासच्या सायकलच्या दांडवर बसून मनसोक्त फेरफटका मारल्याचं आठवत असेलच... तर अशा या सायकलबद्दल बोलण्याचं कारण म्हणजे पुण्यातल्या विक्रम पेंडसे या सायकलप्रेमीनं चक्क तीन मजली सायकलचं अनोखं असं संग्रहायलय उभारलय. अवघ सायकलविश्व सामावलंय त्यात.
पुणे तसं सायकलींचं शहर म्हणून ओळखलं जायचं. म्हणजे पुण्यात लकडी पूल असो, जंगली महाराज रस्ता असो, फर्गसन – सर परशुरामभाऊ महाविद्यालय असे, टिळक रस्ता असो की अगदी गणेशखखिंड असो. सर्वत्र सायकल असणारचं. अर्थात काळाच्या ओघात ती ओळख आता बऱ्यापैकी पुसली गेली असली तरी विक्रम पेंडसे यांच्या ‘विक्रम पेंडसे सायकल्स- अ जर्नी इन्टू द पास्ट’ या संग्रहालयाने ती ओळख पुन्हा एकदा प्रस्थापित होणार हे नक्की.

कर्वेनगर या पुण्यातल्या शांत आणि बऱ्यापैकी निसर्गरम्य भागात सहवास काॅलनीतल्या हर्ष या आपल्या राहत्या घरातचं तीन मजली संग्रहालय विक्रम पेंडसे यांनी उभारलं आहे. बाहेरूनच अतिशय आकर्षक असं बांधकाम आपलं लक्ष वेधून घेतं. रविवारी सकाळी सकाळी तिथे पोहोचलो आणि सायकलच्या अद्भुतरम्य असा जगात तासभर हरवून गेलो.
आपल्या एकूणच छंदाबद्दल सांगताना विक्रमजी म्हणाले, मला जुन्या गोष्टी जमवण्याची, त्या मिळवण्याची आधीपासूनच आवड होती. त्याची सुरूवात झाली ती स्कुटरपासून. साधारणपणे 1992 साली मी लँब्रेटा डी माॅडेल ही जुनी स्कुटर घेतली आणि तेव्हापासून माझी आवड मी जाणीवपूर्वक जोपासली. सुरूवातीला मी मोटरसायकल जमवायला सुरूवात केली. मग मला जाणवलं की मोटरसायकल्स तर अनेक मंजळी जमवत असतात. पण सायकलकडे फारसं कोणी वळत नाही. त्यानंतर 1996 साली माझ्या वडीलांच्या मित्राने बीएसएची पॅराट्रुपर सायकल भेट दिली. तेव्हापासून मी विशेषत्वाने सायकल्सच्याच मागे लागलो.
संग्रहालयाचं अंतरंग
संग्रहालयात प्रवेश केल्यानंतर पहिल्या मजल्यावर आपल्याला दिसतात ते सायकलचे विविध प्रकारचे मडगार्ड्स- हा सायकलचा महत्वाचा भाग,. त्यानंतर विविध माॅडेल्सच्या, उंचीच्या सायकल आपलं लक्ष वेधून घेतात. मग सायकलची कुलुपं, सायकलचे दिवे, डायनामो, हवा भरण्याचा पंप, तिनचाकी सायकल, लहान मुलंसाठीची सायकल, कोलकात्याची हातरिक्षा, असं सायकलचं विश्व आपल्याला भुरळ पाडतं.
सायकल जमवायला सुरूवात केल्यानंतरचा विक्रमजींचा एकूणच प्रवास फार रंजक आहे. म्हणजे एखादी जुनी विशेष सायकल मिळवल्यानंतर सर्वांत महत्वाचं काम म्हणजे त्याची डागडुजी करणं, आणि डागडुजी अतिशय काळजीपूर्वक करावी लागते, अगदी नजाकतीने ! त्यानंतरचा भाग म्हणजे सायकलचे नसलेले स्पेअर पार्ट्स मिळवणे. ते मिळवण्यासाठी विक्रमजींनी जुन्या बाजारात (जुन्या वस्तू मिळण्याचं खास ठिकाण) अनेक वाऱ्या केल्या. तिथेही सायकलचे अनेक विविध प्रकार त्यांना मिळायचे.
संग्रहालयाचं अंतरंग
सातवीत असल्यापासून विक्रमजी हा छंद जोपासत आहेत. त्यांच्या सायकल प्रेमाचा एक विशेष किस्सा म्हणजे त्या काळात त्यांनी डोंबिवली ते पुणे हा प्रवास सायकलने केला होता. त्याबदद्ल ते म्हणतात की, त्या काळात आई वडीलांनी मुलांना अशी परवानगी देणं हे कठीण काम. मात्र मी ती मिळवली. आजचे पालक, म्हणजे त्यात मी सुद्धा आलो, माझ्या मुलांना अशी परवानगी देईल की नाही याबद्दल शंका आहे.
मुळचे डोंबिवलीचे असलेले विक्रम पेंडसे 1987 साली पुण्यात आले आणि विधी महाविद्यालयात प्रवेश घेतला. आणि दुचाकीच्या गॅरेजमध्ये कामालाही त्यांनी सुरूवात केली. गॅरेजच्या कामात त्यांना विशेष आवड. त्यानंतर त्यांनी पुण्यात डायमंड मोटरसायकल हे स्वत:च गॅरेजही सुरू केलं.
साधारणपणे 1987चा काळ म्हणजे तसा बऱ्यापैकी सायकल मागे पडून मोटरसायकलची चलती सुरू व्हायचा काळ. त्याबद्दल विक्रमजी म्हणतात, साधारणपणे 1982-83 पासूनच रोजच्या वापरातून सायकल कमी व्हायला लागली होती. म्हणजे लहानपणी सुटीत पुण्यात आल्यावरचं लकडी पुलाच्या सिग्ललवर किमान साठ सायकली उभ्या असायच्याच. मात्र ते प्रमाण नंतर कमी व्हायला सुरूवात झाली. मात्र गेल्या पाच दहा वर्षांत पुन्हा सायकल व्यायामासाठी वापरण्याची क्रेझ वाढते आहे. अर्थात आठ ते दहा किलोमीटर सायकल चालवून आॅफिसला जाऊन एखादा व्यक्ती आठ तास काम करू शकेल की नाही याबद्दल मला शंका आहे. सध्या सायकल चालवणाऱ्यांचे दोन प्रकार आहेत- एक म्हणजे व्यायामासाठी सायकल चालवणारे आणि दुसरे म्हणजे कामासाठी सायकल वापरणारे. अर्थात दुसरा प्रकार आता बघायला मिळत नाही फारसा.
सायकलचा दिवा
विक्रमजींच्या संग्रहालयात सध्या 150 तयार सायकली आहेत. काही सायकली या तयार होण्याच्या अवस्थेत आहेत. संग्रहालयातल्या सर्व सायकल्स या त्यांनी भारताततूनच मिळवल्या आहेत. कारण भारतात स्वातंत्र्यापूर्वी सायकलचं उत्पादन होत नव्हतं. भारतात 1948 साली हिंद सायकल ही पहिली कंपनी उभा राहीली. परिणामी आपल्याकडच्या सायकल्स या प्रामुख्याने इंग्लंडमधून येत होत्या. त्यामुळे जर्मन, फ्रेंच बनावटीच्या सायकल आपल्याकडे आल्या नाहीत, विक्रमजी सांगतात.
सायकल जमा करताना त्यांना अनेक अनुभव आले. त्याबद्दल सांगताना ते म्हणाले, मोटरसायकल जमवत असताना अनेक लोकं मला सांगायचे की अमुक ठिकाणी जुनी सायकल आहे, हवी असल्यास बघ. किंवा अनेकदा भंगारवाल्यांकडे अशी व्हिंटेज सायकल आली तर मी ती दुप्पट किंमत देऊन विकत घ्यायचो. जुन्या वस्तू विकणाऱ्या व्यापाऱ्यांकडूनही मी योग्य ती किंमत देऊन सायकल विकत घेतली आहे. माझं हा छंद बघून अनेकांनी मला सायकली भेटही दिल्या, अशा किमान 15 सायकली मला मिळाल्या आहेत. त्यात मला अनेक अनुभव आले. त्यापैकी जेम्स कंपनीची सायकल मिळवण्याचा किस्सा खास आहे. आमच्या परिचयातल्या ढवळे आजोबांकडे जेम्स या कंपनीची, आता दुर्मिळ असणारी सायकल असल्याचं मला कळलं. मग मी त्यांच्याकडे गेलो आणि माझ्या छंदाबद्दल सांगितलं. मात्र मला त्यांनी त्यासाठी ठाम नकार दिला. मग मी दर महिन्याला त्यांच्याकडे जायचो आणि बोलायचो. असं मी तब्बल दीड वर्ष केल्यानंतर त्यांना माझ्या छंदाविषयी विश्वास वाटला आणि दीड वर्षाने जेम्स कंपनीची ती सायकल मला मिळाली.

या सर्व गोष्टीसाठी विक्रमजींना कुटुंबाचं सहकार्य सर्वतोपरी मिळालं. वडील, काक, पत्नी आणि मुलीच्या भक्कम पाठींब्याशिवाय हे सर्व करणं शक्य नव्हतं, हे आवर्जून त्यांनी सांगितलं.
आता सायकल्सचे विविध प्रकार बाजारात येत असले तरी सायकलचं भवितव्य  काय याबाबत ते प्रचंड सकारात्मक आहेत. ते म्हणतात, आता सायकल वापरण्याचं वेडं वाढतयं, दिवसाला 30 किलोमीटर सायकल चालणारे लोक आहेत. आता पूर्वीच्या सायकलप्रमाणे जड सायकल दिसत नाहीत तसेच लोकही आता फार काळ टिकेल अशी सायकल घेत नाहीत. लोक पहिली सायकल साधारण पंधरा हजारांची घेतात, त्यानंतर पुढच्या व्हर्जनची सायकल घेतात. आता हलक्या सायकल प्रामुख्याने आहेत आणि सायकल जेवढी हलकी तेवढा चालवण्याचा आनंद जास्त.
संग्रहालयात सायकलसोबतच जुने दिवे, सिगारेट लायटर, पितळी, तांब्याची भांडी, सिगारेट केस, लिकर फ्लास्क, अॅश ट्रे, विविध आकारांच्या, रंगांच्या बाटल्या, जुने टाईपरायटर अशा अनेक गोष्टी आहेत. त्यावर असणारी कलाकुसर ही खास आहे. सायकल जमा करताना या गोष्टी विक्रमजींना दिसत गेल्या, आवडत गेल्या आणि त्या संग्रही येत गेल्या. सध्या संग्रहालयात फक्त पन्नास टक्केच वस्तू त्यांनी मांडल्या आहेत.
सायकलसोबत आणखी बरंच काही...
सायकलबद्दल विक्रमजी म्हणतात, सर्वसामान्यासाठी अतिशय स्वस्त आणि परवडणारा प्रकार म्हणजे सायकल, व्यायामासाठी म्हणायचं जर आज जीममध्ये जाऊन, भरमसाठ पैसा भरून व्यायाम करण्यापेक्षा सायकलींग कधीही उत्तम. एकूणच आपला खरा मित्र म्हणजे सायकल !

अॅपची साथ !

संग्रहालयाचं मोबाईल अॅप खास तयार करण्यात आलंय. ते आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड केल्यानंतर त्यावरचा क्यूआर कोड प्रत्येक दालनाच्या क्यूआर कोडशी मॅच केल्यानंतर सायकल बद्दलची सर्व माहिती आपण आपल्या मोबाईलवर वाचू शकतो.


कुठे आहे संग्रहालय ?

22, हर्ष, सहवास सोसायटी, कर्वेनगर, पुणे 411052
संपर्क- 8530418517
www.vikrampendsecycles.in
वेळ
सकाळी 11 ते सायंकाळी 7 (मंगळवारी साप्ताहिक सुटी)

●पूर्वप्रसिद्धी: साप्ताहिक विवेक

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नक्षलवाद : बदलते स्वरूप

हिंसक माणिक 'सरकार'

ती तेव्हा तशी... भाग ४ पुन्हा अस्वस्थता