साँझ की दुल्हन...
आनंद. १९७१ सालातला ऋषिकेश मुखर्जींचा सिनेमा सुपरस्टार राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाने सजलेला अफाट सिनेमा. हा सिनेमा एकदा बघितल्यावर कधी समाधान होतच नाही. म्हणजे अगदी वारंवार बघितला तरी तो प्रत्येक वेळी अगदी नवा (हो नवाच !) भासतोस. म्हणजे तोच आनंद, तोच डॉ. भास्कर बॅनर्जी, तेच रामुकाका आणि डॉ. कुलकर्णी आणि आनंदला झालेला लिम्फोसर्कोमा ऑफ द इंटस्टाइन या अवघड नावाचा कॅन्सरही तोच.
एक वेगळीच जादू या सिनेमात आहे. आता त्यात अर्थातच ऋषिकेश मुखर्जीं, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाचा वाटा सर्वाधिक आहे. सोबत त्यात असलेली गाणी एक वेगळंच वातावरण तयार करतात. अगदी प्रत्येक गाणं अगदी आठवणीत राहणारं आहे या सिनेमातलं. म्हणजे सुरुवातीचं ‘मैंने तेरे लिए ही सात रंग के सपने चुने’ असो की ‘जिंदगी कैसी ये पहेली’ असो.त्यापैकी ‘कहीं दुर जब दिन ढल जाए’ हे तर अगदी खास गाणं. म्हणजे हे गाणं ऐकताना जे आपल्यासाठीचं लिहीलंय याची प्रत्येक वेळी खात्री पटते. म्हणजे आनंद गॅलरीत उभं राहून, क्षितिजाकडे पाहत ‘कही दूर जब दिन ढल जाए’ हे गाणं म्हणतो तेव्हा ते गाणं ऐकताना तू नकळत आपणही वेगळ्याच विश्वात गेलेलो असतो. आणि त्यातून बाहेर पडावसं खरं तर अजिबात वाटत नसतं पण बाहेर पडणं आवश्यक तर असतचं.
योगेश यांनी लिहिलेल्या त्या गीताला सलिल चौधरी यांनी संगीत दिलंय आणि मुकेश यांनी आपल्या खास आवाजात ते म्हटलंय.
कहीं दुर जब दिन ढल जाए
साँझ की दुल्हन बदन चुराए
चुपके से आए
मेरे खयालों के आँगन में
कोई सपनोंके दीप जलाए
म्हणजे ही अशी अवस्था आपली प्रत्येकाचीच कधीनाकधी होत असते. सुर्य मावळतीला लागलेला असतो. संध्याकाळ दबक्या पावलाने येत असते. जरा अस्वस्थ करणारचं वातावरण असतं तेव्हा. आणि तेव्हाच... अगदी तेव्हाच आपल्या मनात असंख्य अशा आठवणी तरळून जायला सुरूवात होते. त्यातल्या काही प्रिय तर काही अप्रिय, काही हव्याहव्याशा वाटणाऱ्या तर काही नकोशा वाटणाऱ्या... म्हणजे आपल्या मनात चलबिचल सुरू होते. त्यापासून दुरही जाता येत नाही आणि फार काळ त्याच्यासोबतही राहता येत नाही. कुठेतरी एकदम मग काहीतरी वेगळं घडेल अशी चाहूल लागते आणि ती लगेच हुलकावणीही देते.
कभी यूँही जब हुई बोझल साँसे
भर आई बैठे-बैठे जब यूँही आँखे
कभी मचल के प्यार से चल के
छुए मुझे कोई पर नजर ना आए
आपल्या प्रत्येकाच्या मनाच्या कोपऱ्यात अशी एखादी आठवण, एखादा प्रसंग असतोच. जो एगदी कितीही विसरायचा प्रयत्न केला तरी शक्य होत नाही आपल्याला. मग अशाच एका संध्याकाळी त्या सर्व आठवणी, ते सर्व प्रसंग एक एक करून डोळ्यासमोर यायला लागतात. आपसूकच डोळे मग त्या आठवणींनी अगदी गच्च भरून जातात. त्या वातावरणात मग एवढं भारलेपणं येत की आपल्याला अगदी काहीच सुचेनास होत. मग त्याच वातावरणात आपल्या जवळ खास व्यक्ती आल्याचा भास (हो, भासचं !) होतो. त्याला खरं समजून आपण त्यात पुन्हा गुंतायला लागतो आणि त्यातचं फसतो. कारण समोर तर आपल्या कुणीच नसतं. आपण असतो एकटेच अगदी. म्हणजे अगदी एका क्षणी सर्व काही आपल्या डोळ्यासमोर असतं आणि आणि एका क्षणी ते सर्व नाहीसं होतं... एका अज्ञात अशा त्या भावनेच्या शोधात हरवुन जायला होतं आपल्याला.
कहीं तो ये दिल कभी मिल नहीं पाते
कहीं पे निकल आए जन्मों के नाते
घनी थी उलझन बैरी अपना मन
अपना ही होके सहे दर्द पराए
आणि मग आपल्याला एका गोष्टीची लख्ख जाणीव होते अगदी की काही व्यक्ती फक्त आपल्या आठवणींमध्येच आता आपल्याला भेटणार आहेत. म्हणजे आपण कितीही प्रयत्न केले तरी आठवणींव्यतिरिक्त त्यांची भेट होणं काही शक्यच नाहीये. ती भावना जरा त्रासदायकचं असते. अनेक व्यक्तींशी कितीही ठरवलं तरी मनात असेल तसं नाही राहता येत. त्यातच मग ती विचित्र अस्वस्थता आपल्या मनात अगदी व्यापून जाते. त्यातचं आपण अडकून पडतो. कारण त्या व्यक्तीचा विचार काही आपल्या मनातून जात नसतो. आणि ही अस्वस्थता फार विचित्र असते. बऱ्याचदा आपण त्याचा अनुभव घेतलेला असतो. आणि आपलं मन त्या व्यक्तीसाठीच्या अस्वस्थ होत राहतं, अगदी आपला त्याच्याशी काहीही संबंध नाही असं ठरवलं तरीही.
या गाण्यातल्या शब्दांमध्ये आपल्याला व्यक्त न करता येणाऱ्या अनेक भावनांना व्यक्त होण्याची संधी मिळते. म्हणजे दरवेळी व्यक्त होण्यासाठी शब्दांचीच गरज नसते. कारण शब्द नेहमीच कामी येतील असं नाही. हे गाण ऐकून आपल्या मनाची एकूणच जी अवस्था होते, त्यामुळे आपोआप अनेक गोष्टी व्यक्त व्हायला लागतात. आणि एकदा व्यक्त झालो की मनातलं मळभ अगदी दूर होऊन जातं.
तर एकूणच हे गाणं आपल्या वेळोवेळीच्या त्या विशिष्ट मनोवस्थेला अगदी योग्य रितीने समजून घेत असतं. अर्थात त्यात फक्त गाण्याचा वाटा नाही. तर त्या सिनेमाचा, त्यातल्या व्यक्तीरेखांचा, त्यातल्या संवादांचा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या आनंदचा यात अगदी मोठा वाटा आहे. तो नसता तर कदाचित या गाण्याचा एवढा प्रभाव आपल्यावर पडला नसता...!

●पूर्वप्रसिद्धी: "सहज सुचलेलं", बहर, दै. आपला महाराष्ट्र, धुळे, ७-५-२०१७
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा