पुतिन

व्लादिमिर व्लादिमिरोविच पुतिन

“पुतिन हे कमालीचे केंद्रवादी... सेंट्रिस्ट... अशा मताचे आहेत. देशाचं केंद्र अत्यंत सामर्थ्यवान असायला हवं, असं त्यांचं मत आहे. अत्यंत सामर्थ्यवान केंद्र आणि आसपास छोट्या छोट्या आज्ञाधारक देशांची पिलावळ हा त्यांचा राज्यविचार आहे. केंद्र सक्षम असलं की, परिघावरच्या उचापतखोरांना आळा बसतो, असं त्यांना वाटतं. इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर पुतिन यांची ही मानसिकता दिसून आली आहे. ‘सोविएत रशियाचं विघटन ही या शतकातली सर्वांत मोठी भूराजकीय हाहाकार घडवणारी घटना आहे,’ असं त्यांचं मत आहे. याचाच अर्थ रशिया पुन्हा पूर्वीइतकाच, आपल्या सोविएत काळाइतकाच मजबूत, दरारा निर्माण करणारा असायला हवा, असं त्यांना सातत्याने वाटचत आलेलं आहे. म्हणजे क्रीमीयाचा घास घेणं हा त्यांच्या या योजनेतलाच एक भाग आहे, हे उघड आहे. तो त्यांनी कमालीच्या निष्ठुरपणे राबवला”. रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचं हे यथार्थ वर्णन. अनेकांना भावणारं तर अनेकांना काळजीत टाकणारं...
रशिया. रशियाबद्दल सर्वसामान्यांच्या मनात कायमच एक प्रकारचं आकर्षण आहे. म्हणजे अगदी सोविएत रशिया असल्यापासूनचा भारताचा एक खंबीर मित्र, अशी प्रतिमा भारतीयांच्या मनात रशियाबद्दल आहे. काही प्रमाणात ते खरंही आहे.
व्लादिमीर पुतिन. रशियाचे विद्यमान (आणि कदाचित पुढचा बराच काळ !) राष्ट्राध्यक्ष. पुतिन यांची रांगडी प्रतिमा तर आपल्याकडे सर्वांनाच आकर्षित करणारी. म्हणजे वयाच्या पासष्टीतही ते फिट आहेत, ते पोहण्यापासून ते पियानो वाजवण्यापर्यंत कसे विविध छंद जोपासतात, आणि अनेकांना तर त्यांच्या चेहऱ्यावर असणारी खास मग्रुरी आणि अमेरिकेसह अन्यांना काहीही किंमत न देणारा स्वभाव आवडतो.
तर अशा या रहस्यमय वाटाव्या अशा व्यक्तीबद्दलचे अनेक पैलू गिरीश कुबेर यांनी आपल्या नव्या ‘पुतिन- महासत्तेच्या इतिहासाचे अस्वस्थ वर्तमान’ या रंजक आणि उत्कंठावर्धक पुस्तकात सविस्तर मांडले आहेत.
‘महासत्तेच्या इतिहासाचे अस्वस्थ वर्तमान’ ही ओळ बरंच काही सांगून जाणारी. म्हणजे सोविएत रशिया ही एकेकाळची महासत्ता. अमेरिकेला समर्थपणे तोंड देणारा, दुसऱ्या महायुध्दानंतर दीर्घकाळ शितयुध्द खेळणारा आणि युरोप ते आशिया असा विशाल विस्तार असणाऱ्या रशियाचं महासत्तापण अस्वस्थतेत संपलं पण ती अस्वस्थता वर्तमानातही रशियाचा पिच्छा सोडत नाहीये. ते सर्व या पुस्तकात लेखकाने अतिशय समग्रपणे मांडलंय.
एकेकाळची महासत्ता- सोविएत रशिया ते आताचा रशिया जाणून घेण्यासाठी रशियाचा एकूणच इतिहास जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. त्यासाठी लेखकाने पहिल्या प्रकरणात इ. स. 862च्या परिस्थितीपासून सुरूवात केली आहे. तत्कालीन रूरीक, ओलेग, आणि इव्हान द ग्रेट आणि इव्हान द टेरीबल यांच्याबदद्ल वाचताना वाचक हळुहळू रशियात गुंतत जातो.
त्यानंतर एकोणिसावं शतक, पहिलं महायुध्द आणि त्यात झालेला रशियाचा पराभव. त्यानंतर लेनिनच्या नेतृत्वाखाली झालेली आॅक्टोबर क्रांती. लेनिन यांचा रशियावर जम बसत असतानाच स्टालिन यांचा होत असलेला उदय. लेनिन नंतर स्टालिन यांच्या कराल राजवटीने रशियाचा झालेला कायापालट, दुसरं महायुध्द, हिटलरचं रशियावर आक्रमण आणि लाल सेनेने त्याचा केलेला पराभव, महायुध्दोत्तर परीस्थिती आणि शितयुध्दाची सुरुवात. या सर्व घडामोडी पुस्तकात योग्यप्रकारे मांडल्या आहेत. पुतिन यांचा उदय समजून घेण्यासाठी ही पार्श्वभूमी माहिती असणं अतिशय गरजेचं आहे.
रशियन राजकीय क्षितीजावर पुतिन यांचा प्रवेश फार काही भव्यदिव्य वगैरे पध्दतीने झाला नाही. केजीबी या सोविएतकालिन गुप्तहेर यंत्रणेतील एक गुप्तहेर असलेल्या पुतिन यांनी नंतर मात्र नाट्यमय पध्दतीने रशियन राजकारणावर आपला प्रभाव निर्माण केला. साम-दाम-दंड-भेद या सर्वांचा मुक्तहस्ते वापर करत. पुतिन यांना तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बोरिस येल्त्सिन यांना पंतप्रधान बनवलं आणि पुतिन यांचा विधीवत राजकीय प्रवेश झाला. अर्थात पुतिन यांना पंतप्रधान बनवण्यामागे येल्त्सिन यांचा असलेला स्वार्थ लेखकाने अतिशय रंजकपणे मांडला आहे.
पंतप्रधान झाल्यावर पुतिन यांची आपले रंग दाखवायला सुरूवात केली. त्याबद्दल मिखाईल गोर्बाचेव्ह आणि बोरिस येल्त्सिन यांनी चपखल शब्दात आपलं मत व्यक्त केलं- “पुतिन यांची वागणूक रशियाला हुकूमशाहीकडे नेणारी आहे... देश एकाधिकारशाहीकडे निघालाय...”
त्यानंतरच्या सात प्रकरणांमध्ये लेखकाने व्लादिमीर पुतिन या व्यक्तीचे नेमके पैलू मांडले आहेत. ते वाचताना अनेकदा अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. म्हणजे पुतिन यांनी आपले राजकीय आणि सर्वच प्रकारचे विरोधक ज्याप्रमाणे अतिशय़ थंड डोक्याने संपवले ते विचारी जनांना निश्चितच काळजी करण्याजोगे आहे.
पुतिन हे आपल्या विरोधकांना अजिबात सहन करू शकत नाहीत. पुतिन म्हणजे रशिया आणि रशिया म्हणजे पुतिन यावर त्यांचा ठाम विश्वास. ज्या उद्योगपतीने त्यांना राजकारणात वरच्या पदावर जायला सर्वतोपरी मदत केली, त्यांना पुतिन यांनी अगदी सहज आपल्या मार्गातून बाजूला केलं. असे अनेक बळी पुतिन यांनी अगदी घेतले. त्यात गुप्तहेर आणि पत्रकारांनाही अभय मिळालं नाही.
अॅना पोलित्कोव्हस्काया या पत्रकाराचा बळी पुतिन यांनी ज्याप्रकारे घेतला ते लेखकाने साद्यंत मांडलंय. अॅना रशियातल्या एक आघाडीच्या पत्रकार. त्यांनी पुतिन यांच्या एकूणच धोरणाबद्दल विशेषत: चेचेन संघर्षाबद्दलची पुतिन यांची भूमिका त्यांनी उघडी पाडायला सुरुवात केली होती. तर 7 आॅक्टोबर 2006 या दिवशी अॅना यांची त्यांच्या राहत्या घरीच गोळ्या घालून हत्या करण्यात आली आणि त्याच दिवशी राजमहालात पुतिन यांचा 54वा वाढदिवस साजरा होत होता...!
‘पुतिनिझमचा जन्म’ आणि  ‘पुतिनपर्व’ ही शेवटची दोन प्रकरणं विशेष. त्यात एकूणच पुतिन यांची राजवट, त्याचे रशियावरचे चांगले-वाईट परिणाम, रशियन जनमानस आणि त्याचे जगावरचे परिणाम लेखकाने अतिशय सविस्तर असे मांडले आहेत. त्यातच मग सायबर युध्द खेळण्याची रशियाची अफाट क्षमता अधोरेखीत केली आहे. ज्याचा संबंध थेट नुकत्याच झालेल्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाशी कसा आहे, ते वाचकांची मती नक्कीच गुंग होणार.
लेखकाने पुतिन यांच्या विषयी वापरलेल्या अवघ्या दोन ओळींत पुतिन लक्षात यावेत- “जोसेफ स्टालिन यांचा क्रूरपणा आणि मिखाईल गोर्बाचेव्ह यांचा धोरणीपणा ज्या एकाच व्यक्तीत एकवटलेला आहे, ती म्हणजे व्लादिमीर व्लादिमिरोविच पुतिन.”
तर अतिशय वाचनीय असं असणारं हे पुस्तक. आंतरराष्ट्रीय राजकारण, मुत्सद्देगिरी आदीं विषयांची आवड असणाऱ्यांसाठी हे पुस्तक म्हणजे खास मेजवानी ठरेल यात शंका नाही. कारण खास ‘कुबेरी शैली’त (ज्यांनी लेखकांची अन्य पुस्तक वाचली आहेत, त्यांना ती शैली आवडणारच !).
पुतिन- महासत्तेच्या इतिहासाचे अस्वस्थ वर्तमान
लेखक- गिरीश कुबेर
पृष्ठसंख्या- 265
किंमत- 300 रूपये
राजहंस प्रकाशन

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हिंसक माणिक 'सरकार'

नक्षलवाद : बदलते स्वरूप

ती तेव्हा तशी... भाग ४ पुन्हा अस्वस्थता