'योद्धा शेतकरी' आणि बरंच काही...
“प्रेमाची जोशींची व्याख्या वेगळीच होती. प्रेमावर बोलताना ते मला म्हणाले, आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात असतो नं, तेव्हा ती व्यक्ती जणू काही सूर्य होते आपल्यासाठी. सूर्याभोवती जसे ग्रह फिरतात, तसं आपलं अवघं विश्व तिच्याभोवती फिरत असतं. ती व्यक्ती म्हणजे जणूकाही जीवनाचं केंद्रच, असं वाटत. ती व्यक्ती नाही तर जीवन नाही, इतपत मनोवस्था येते. ओशोंनी हे फार सुंदर वर्णन केलं आहे. सुफी तत्त्वज्ञानात प्रेमासाठी दोन शब्द आहेत. एक म्हणजे मोहब्बत आणि दुसरं म्हणजे इश्क. मोहब्बत म्हणजे सामान्य दर्जाचं प्रेम. जे काही क्षणी असतं तर कधी नसतंदेखील. त्यामध्ये गेहराई नसते. ज्यामध्ये तुम्ही काही अंशी तरी स्वत:च्या नियंत्रणात असता. पण इश्क ही भिन्न गोष्ट आहे. इश्कात संपूर्ण विलय आहे. हरवणं आहे. स्वत:ला गमावून बसणं आहे. इश्कामध्ये मृत्यूपूर्वी मृत्यू अनुभवणं आहे.”
हे वाचून कोण्या प्रेमावर वगैरे लिहिणाऱ्या लेखकाने हे सांगितलं असावं, असा तुमचा समज होईल. पण शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांचे हे विचार. वाचून थोडा धक्का बसला ना ?
'शरद जोशी- शोध अस्वस्थ कल्लोळाचा' हे वसुंधरा काशीकर- भागवत यांचं पुस्तक वाचून असे बरेच धक्के वाचकांना बसतात. म्हणजे आजवर शरद जोशी, शेतकरी संघटना, आंदोलनं, चळवळ असं बरंच लिखाण झालंय, ते आपण वाचलंही आहे. मात्र या पुस्तकात शरद जोशींच्या अज्ञात अशा पैलूंशी आपली ओळख होते. म्हणजे योध्दा शेतकरी, एक प्रेमळ, काळजी काळजी करणारा बाप, प्रेमाबद्दल मुक्त चिंतन करणारा प्रेमी, बायकोची आठवण येऊन हळवा होणारा नवरा, आयुष्याच्या उत्तरार्धात अध्यात्माकडे गेलेला एक सामान्य माणूस आणि वय आड न येऊ देता मैत्री जपणारा एक मित्र... असे शरद जोशींचे अनेक संवेदनशिल कोपरे लेखिकेने अतिशय तरलपणे मांडले आहेत.
या पुस्तकात शरद जोशींबद्दलची एकूण 18 प्रकरणं आहेत. पुस्तकाचं स्वरूप पारंपरिक पुस्तकासारखं अजिबात नाही. कारण ज्याच्याबद्दल हे पुस्तक आहे, त्या व्यक्तीचा लेखिकेला दीर्घ सहवास लाभला आहे. अगदी महाविद्यालयीन जीवनापासून. आणि तो फक्त सहवास नव्हता तर एका योध्द्यासोबतचा प्रवास होता. या प्रवासात लेखिकेने त्यांच्याशी भरपूर गप्पा मारल्या, चर्चा केली, प्रश्न विचारले. त्यात शरद जोशी अगदी मनापासून सहभागी झाले. त्यातून लेखिकेला जे शरद जोशी उलगडले ते त्यांनी अगदी यथार्थ शब्दबध्द केले आहेत. त्यामुळे हे पुस्तक वाचताना आपणही त्यात हरवून जातो, हे नक्की.
या पुस्तकात शरद जोशींचा संपूर्ण प्रवास तर लेखिकेने मांडलाच आहे, पण हा प्रवास फक्त शेतकरी संघटनेचा नाही. तर शरद जोशी या व्यक्तीच्या आयुष्यात या सबंध चळवळीत नेमके काय आणि कसे बदल घडले, बदलाना ते कसे सामोरे गेले, असं सर्व पुस्तकात नेमकेपणाने मांडलंय. शिवाय पुस्तकात वेळोवेळी केलेली गझलांची पखरण तर अगदी खासचं.
तर्कशुध्द मांडणीला शरज जोशींचं नेहमीच प्राधान्य राहिलेलं आहे. आपल्या जीवनाबद्दल बोलताना ते म्हणायचे, “हा माझा व्यक्तिगत नरक आहे आणि तो मला पवित्र आहे.” हे असं स्पष्ट बोलणं अनेकांना जमत नाही. कारण कुठेतरी मी समाजावर उपकार करतोय, अशी भावना त्यांच्या मनात येत असते. मात्र जोशी हे अगदीच वेगळं रसायन होते.
शरद जोशींचं आपल्या पत्नीवर विशेष प्रेम. म्हणजे युनोमधली नोकरी सोडून भारतात परत यायचा निर्णय घेतल्यावर त्यांनी त्यात सर्वतोपरी मदत केली. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर जोशी हे खचले होते. त्यांच्याबाबत जोशी एक किस्सा नेहमी सांगत, “युनोमध्ये असताना त्यांच्या घऱी एक काॅकटेल पार्टी ठेवली होती. त्या पार्टीला जोशींची एक सेक्रेटरी आली होती. लिलाकाकूंशी (शरद जोशी यांच्या पत्नी) बोलताना सेक्रेचरी म्हणाली की, मिसेस जोशी, तिमचे मिस्टर एवढे लाजाळू आहेत म्णून सांगू. कोणत्याच स्त्रीशी ते शेकहँडसुध्दा करत नाहीत. हे ऐकून लिलाकाकू अतिशय खूश झाली.”
भारतात परत आल्यावर आंबेठाण इथं जोशींनी आपली शेती सुरू केली. गावातल्या लोकांना साहजिकच प्रचंड कुतुहल. त्यावेळी त्यांच्या शेतात काम करणाऱ्यांशी त्यांचं म्हणाव तेवढं सूत काही जुळलं नव्हतं. तेव्हा दुपारच्या जेवणाच्या वेळी भजनं म्हणावीत, असं जोशींनी सुचवलं. अर्थात भजन करून तरी स्वत:ला शांतता मिळेल हा जोशींचा त्यामागचा हेतू होता. कारण एकदम जिनेव्हा, न्यूयाॅर्क मधल्या बैठका आणि कुठे इथलं उन्हातान्हातलं राबणं. मात्र गावातल्या लोकांना ती अस्वस्थता चांगलीच लक्षात आली होती. त्या दिवशी मग भजनाची सुरुवात झाली ती,
हरिश्चंद्र राजा, तारामती राणी
डोंबाघरी भरी पाणी, डोंबाघरी पाणी
या भजनानं. जे शरद जोशींच्या तत्कालीन स्थितीशी अगदी नेमकेपणानं जुळत होतं. आणि हे जोशींनी अगदी मोकळेपणाने कबुलही केलं.
माणसात बदल झाला, तर एकतर तो त्याला स्विकारणं जमतं नाही किवां तो त्या बदलांना अन्यांपासून लपवून ठेवण्याचा प्रयत्न करतो. मात्र शरद जोशी त्यालाही अपवाद होते. म्हणजे आयुष्याच्या उत्तरार्धात ते अध्यात्माकडे वळले होते. देव मानणारे जोशी उपवास करायला लागले होते. संध्या करू लागले होते, त्यांनी शेंडी ठेवली होती. शंकराचार्य, ज्ञानेश्वरीचं पुन्हा वाचन सुरू केलं होतं. आणि त्याबद्ल लेखिकेने विचारल्यावर त्यांनी अगदी मोकळेपणाने सांगितलं की, “मनाला कमकुवतपणा आलाय, हे मी मान्य करतो.” असे अनेक प्रसंग लेखिकेने मांडले आहेत.
आपल्या धुळ्याशी त्यांचा विशेष संबंध आला तो विपश्यनेच्या निमित्ताने. शेतकरी संघटनेचे माजी अध्यक्ष रवी देवांग हे धुळ्यात विपश्यना केंद्र चालवतात. त्यांनी 2000 सालात धुळ्यात विपश्यना केली, मात्र ती पूर्ण करणं काही त्यांना जमलं नाही. कारण विपश्यनेच्या काळात बाहेरचा संवाद पूर्णपणे बंद करायचा असतो, आणि जोशींसारख्या माणसाला कदाचित तेच रुचलं नसाव.
एकूणच हे पुस्तक वाचून शरद जोशींच्या काही अस्पर्श पैलूंशी आपली ओळख होते. त्यातही लेखिकेने ते सर्व अस्पर्श पैलू प्रत्यक्ष अनुभवले असल्याने वाचताना ते ‘अगदी आपणच अनुभवतोय की काय’ असा अनुभव वाचकांना नक्कीच येतो.
![]() |
शरद जोशी- शोध अस्वस्थ कल्लोळाचा’
प्रकाशक : राजहंस प्रकाशन
लेखक : वसुंधरा काशीकर- भागवत
पृष्ठे : १५३; किंमत : २०० रु
|
छान समीक्षा!!
उत्तर द्याहटवा