आयसर : एक नवी आशा



“जागतिक विचार करता भारताला विज्ञानात आंतरविद्याशाखीय संशोधनात काम करण्याची गरज आहे. कारण जगाच्या तुलनेत भारतात त्या प्रकारच्या संशोधनाचे प्रमाण फारचं कमी आहे. ‘आयसर’मध्ये मात्र आंतरविद्याशाखीय संशोधनाकडे जाणीवपूर्वक लक्ष पुरवण्यात येते. एकूणच विज्ञानात मुलभूत संशोधन वाढावे हा आमचा प्रयत्न आहे.” ‘आयसर’चे समन्वयक डॉ. अरविंद नातू सांगत होते.
‘आयसर’. भारत सरकारने मुलभूत विज्ञानात नवनवे संशोधन व्हावे आणि दर्जेदार असे शिक्षण मिळावे यासाठी भारतात विविध ठिकाणी ‘आयसर’या संस्थेची स्थापना केली आहे. त्यापैकी पुण्यातल्या ‘आयसर’ने जगभरात संशोधनाच्या क्षेत्रात आपलं वेगळं असं स्थान अल्पावधीतच निर्माण केलंय. भारतात मुलभूत विज्ञानात संशोधन आणि शिक्षणाच्या बाबतीत सध्या ‘आयसर’ अग्रेसर अशी संस्था आहे.
‘आयसर’च्या स्थापनेबद्दल बोलताना डॉ. नातू म्हणाले, “आपल्याकडे बारावीनंतर करिअरच्या दृष्टीने विचार केल्यास 90 टक्के विद्यार्थ्यांचा कल हा मेडिकल आणि इंजिनिअरींगकडे असतो. मात्र त्याऐवजी जर संशोधनाकडे विद्यार्थी वळले तर काहीतरी वेगळं करून दाखवण्याची संधी त्यांना असते. दुर्दैवाने आपल्याकडे याच्यासाठी योग्य आणि आवश्यक अशी सोय नव्हती, जसं सोय अभियांत्रिकीसाठी आयआयटी, व्यवस्थापनशास्त्रसाठी आयआयएम, मेडिकल काॅलेजेस आहेत. जर एखाद्यास विज्ञानात सखोल अभ्यास आणि संशोधन करायचं असेल तर त्यासाठी काहीही सोय नव्हती. सोय होती ती विद्यापीठांकडे. परिणामी तरुण पिढीमध्ये विज्ञानाबाबत औदासिन्य निर्माण व्हायला लागले होते. कारण नवे असे काहीच नव्हते. त्यामुळे अशा प्रकारची संस्था असायला हवी हे बऱ्याच वर्षांपासून अनेकांना वाटत होते, त्यात वि. ग. भिडे, गोविंद स्वरूप, डॉ. रघुनाथ माशेलकर आणि भारतरत्न प्रा. सी. एन. आर. राव यांचा समावेश होता. मुरली मनोहर जोशी मनुष्यबळविकास मंत्री असताना या कामास सुरूवात झाली आणि प्रा. राव यांच्या प्रयत्नाने त्यास गती मिळाली आणि 2006मध्ये सर्वप्रथम पुणे आणि कोलकाता इथं ‘आयसर’ची स्थापना झाली. सर्वानुमते बारावीनंतर पाच वर्षांचा अभ्यासक्रम, असे स्वरूप ठरवण्यात आले.”
पारंपरिक विद्यापीठांपेक्षा ‘आयसर’ फारच वेगळं आहे, पारंपरिक विद्यापीठांना सध्या परिक्षा घेण्याशिवाय अन्य काही कामच नाही. अर्थात त्याला विद्यापीठांपेक्षा धोरण कारणीभूत आहे. मात्र ‘आयसर’मध्ये जाणीवपूर्वक या गोष्टींना फाटा देण्यात आला आहे. ‘आयसर’मध्ये बारावीनंतर पाच वर्षांचा अभ्यासक्रम ठरवण्यात आला आहे, त्याला खास असे कारण आहे. त्याबद्दल डॉ. नातू सांगतात, “बारावी हे अतिशय अॅमॅच्युअर असं वय आहे. तेव्हा विद्यार्थ्यांस आपली नेमकी आवड काय, हे समजलेलंच नसत. ती समजण्यासाठी दोन वर्ष गरजेची असतात. आणि ते एकदा समजल्यावर मग पुढची वर्ष प्रत्यक्षात त्यात काम करायची. तर ‘आयसर’मधले अभ्यासक्रम आणि अन्य पारंपरिक अभ्यासक्रम यात प्रामुख्याने दोन फरक आहेत, पहिला फरक म्हणजे विषय निवडीचं कोणतच बंधन आमच्याकडे नाही. पहिले दोन वर्ष सर्व विषय म्हणजे फिजिक्स, केमेस्ट्री, बायोलाॅजी आणि मॅथ्स हे अनिवार्य आहेत. त्यामागचे कारण म्हणजे दहावी किंवा बारावीत नेमकी आवड विद्यार्थ्यांना समजलेली नसते, कारण या चारही विषयांशी त्यांना पूर्ण ओळखचं झालेली नसते, ती व्हावी, यासाठी हे विषय दोन वर्ष अनिवार्य आहेत. आणि त्याच्यावरूव विद्यार्थी आपली नेमकी आवड ओळखू शकतात. पुढच्या तीन वर्षांत एकही विषय अनिवार्य नाही. याचा फायदा म्हणजे आवडत्या विषयाचा अभ्यास करण्याची संधी मिळते, जेणेकरून नवीन काहीतरी शोधण्याची उर्मी विद्यार्थ्यांना मिळते.”

एरवी पारंपरिक अभ्यासक्रमांमध्ये जो विषय घेतला असले, त्यातच अभ्यास करण्याची विद्यार्थ्यांवर सक्ती असते. उदाहरणार्थ. जर तुम्ही केमेस्ट्रीचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला फिजिक्स किंवा गणितात अभ्यास करताच येणार नाही. मात्र‘आयसर’ त्याला अपवाद आहे आणि तेच ‘आयसर’चं खरं वेगळेपण आहे. ‘आयसर’मध्ये विषयनिवडीला मोठा वाव आहे. तब्बल 110 विविध अभ्यासक्रम याठिकाणी आहेत आणि यातून हवा तो अभ्यासक्रम विद्यार्थी निवडू शकतात.
आंतरशाखीय संशोधन हा सध्या जगा परवलीचा शब्द बनतो आहे, त्याबद्दल बोलताना डॉ. नातू म्हणतात, “भारत आंतरशाखीय संशोधनात खूप मागे आहे, म्हणजे फिजिक्स + केमेस्ट्री, केमेस्ट्री + बायोलाॅजी, बायोलाॅजी + मॅथेमॅटिक्स अशा प्रकारचे संशोधन भारतात होत नाही. त्यामुळे संशोधनावर मर्यादा येतात. जगात तशी परिस्थिती नाही. गेल्या दहा वर्षांतील नोबेल पुरस्कारांवर नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल की मेडिसीनमधील 10 नोबेल पुरस्कार हे केमिस्टने तर केमिस्ट्रीमधील 10 नोबेल पुरस्कार हे बायोलाॅजिस्टना मिळाले आहेत. याचाच अर्थ असा की आंतरशाखीय संशोधन भारतात झाले तरच आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण टिकू शकू. कारण जगात जे काही संशोधन होतंय, ते आंतरविद्याशाखीयच आहे. त्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशिल असतो. मुलं ज्यावेळी विषय निवडतात, त्यावेळीच आम्ही काळजी घेतो. म्हणजे गणिताचा विद्यार्थी फिजिक्स, केमेस्ट्री, बायोलाॅजी यातील विषय निवडून अभ्यास-संशोधन करू शकतो. त्यामुळे आमच्याकडे बायोलाॅजिकल मॅथेमॅटीक्स, मॅथेमॅटिकल फिजियाॅलाॅजी, केमिकल बायोलाॅजी असे आंतरशाखीय विषय, ज्यांचं नावही कोणी ऐकलेलं नसतं, आमच्याकडे आहेत.”

संशोधन या मुळ हेतून स्थापन झालेल्या ‘आयसर’मध्ये विद्यार्थी साठ महिन्यापैकी किमान 18 महिने हे संशोधनात घालवतात. भारतात संशोधन आणि पदवीचे विद्यार्थी यांची फारकत झाली आहे. म्हणजे विद्यापीठे आणि एनसीएल यासारख्या संस्था, जेथे संशोधन चालते; त्यांच्याकडे पदवीचे विद्यार्थी नाहीत आणि ज्या ठिकाणी ते विद्यार्थी आहेत, म्हणजे महाविद्यालये; त्यांच्याकडे संशोधनाच्या सुविधा नाहीत. परिणामी मुलभूत संशोधनाची प्रक्रीयाच थंडावली आहे. मात्र ‘आयसर’मध्ये नेमकं तेच केल जात. अभ्यासक्रमाच्या पाचव्या आणि शेवटच्या वर्षी विद्यार्थी आपला संपूर्ण वेळ हा संशोधनासाठी देतात. तसेच उर्वरित चार वर्षांत तीन – तीन महिन्यांचे दोन संशोधन प्रकल्प असतात. परिणामी मुलभूत संशोधनाचे बीज विद्यार्थ्यांमध्ये रुजण्यास मदत होते.
‘आयसर’चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लवचिकता. पारंपरिक विद्यापीठांमधील अतिशय घट्ट अशा व्यवस्थेची सवय असणाऱ्यांना त्याबद्दल नक्कीच कौतुक वाटेल. त्याबद्दल डॉ. नातू सांगतात, “ आमच्याकडे अभ्यासक्रमाबाबत लवचिकता आहे. म्हणजे जर एखादा अभ्यासक्रम शिकवताना वाटलं की आपल्या विषयात काहीततरी नवीन शोध लागलाय, तर तो भाग ताबडतोब अभ्यासक्रमात सहभागी करून घेतला जातो. उदा. गेल्या वर्षी फेब्रुवारीत गुरुत्वाकर्षणासंबंधी मोठा शोध लागला, तो विषय अवघ्या 15 दिवसात आमच्या अभ्यासक्रमात आला. विद्यार्थ्यांना शक्य तितक्या लवकर नवनव्या शोधांशी अवगत करून देणे यास आम्ही प्राधान्य देतो. आमच्याकडे सुमारे 200 कोटींची अद्ययावत उपकरणे असलेल्या प्रयोगशाळा आहेत, त्या विद्यार्थ्यांना मुक्तपणे वापरता येतात, संशोधन करता येते. शिवाय आमच्याकडची प्राध्यापक मंडळी ही संशोधखही आहेत, प्रत्येकाने किमान काही वर्ष भारतात अथवा परदेशात संशोधन केले आहे, परिणामी एकदा आमच्याकडे आलेला विद्यार्थी हा पूर्णपण संशोधनमयच होऊन जातो.”
अर्थात असे बदल करताना एकूणच पध्दतीत आमुलाग्र बदल करणे गरजेचे असते. ‘आयसर’मध्येही ते केले गेलेच. त्यातला महत्त्वाचा भाग म्हणजे कामाच्या वेळांमध्ये लवचिकता, शिकवण्याच्या पध्दतीत लवचिकता. म्हणजे जर एखाद्या प्रयोगाच्या वेळी जर एखाद्या विद्यार्थ्यांने प्राध्यापकांस ते वापरत असलेली पध्दती योग्य वाटत नसल्याचे सांगितले तर अशावेळी विद्यार्थ्यांस त्यांच्या पध्दतीने तो प्रयोग करण्याची मुभा दिली जाते. शिवाय त्यासाठी त्याला जास्तीचे गुणही दिले जातात. साठ टक्के प्रात्यक्षिक आणि चाळीस टक्के वर्गात अभ्यास, असे चित्र ‘आयसर’मध्ये दिसते. परिणामी येथील विद्यार्थी जे वर्गात शिकतो ते लगेच प्रयोगशाळेत
प्रयोग करून अनुभवतो आणि समजून घेतो.


‘आयसर’चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे परिक्षापध्दती. त्याबद्ल डॉ. नातू सांगतात, “आमच्याकडे वार्षिक परिक्षा हा प्रकारच नाही. त्याऐवजी आम्ही मुल्यमापनाच्या अन्य अभिनव अशा पध्दती वापरतो. ओपन बुक एग्झाम, ट्यूटोरिअल्स, सोबतच अनेकदा आम्ही विद्यार्थ्यांनाच प्रश्नपत्रिकाही सेट करायची संधी देतो. तसेच मी बऱ्याचदा तोंडी परिक्षेच्या वेळी विद्यार्थ्याने जे वाचलं असेल, अभ्यास केला असेल त्यावरच प्रश्न विचारतो. आणि शेवटी गुणही त्यालाच विचारून देतो. यामुले विद्यार्थी हा सर्व बाबतीत सहभागी होतो आणि पारंपरिक विद्यापीठांत ज्याप्रमाणे शिक्षक आणि विद्यार्थी यात परिक्षेवरून शीतयुद्धच सुरू असते, ते टाळता येते. परिणामी विद्यार्थीकेंद्री शिक्षणातून मुलभूत असे संशोधन करणारे संशोधक घडवण्याचे आमचे ध्येय साध्य होते आहे. आमच्याकडून बाहेर पडलेले सुमारे 60 टक्के विद्यार्थी हे पुढेही संशोधन क्षेत्रातच काम करतात.”
सुमारे 98 एकराच्या अतिशय निसर्गरम्य परिसरात ‘आयसर’ स्थिरावलंय. परदेशात किमान पाच ते सात वर्ष संशोधन केलेले 120 संशोधक – प्राध्यापक कार्यरत आहेत पदवीचे 900 तर पीएचडीचे 500 विद्यार्थी एका वेळी ‘आयसर’मध्ये कार्यरत आहेत.

असा घ्या प्रवेश :
 ‘आयसर’मध्ये फक्त आणि फक्त गुणवत्तेवरच प्रवेश दिला जातो. त्यासाठी पुढील तीन मार्ग आहेत :
KVPY – किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना : बंगळुरुमधील आयआयएससीद्वारे (इंडियन इन्स्टीट्यूट आॅफ सायन्स) प्रवेश.
IIT Advance- आयआयटीमधील विद्यार्थ्यांसाठी.
‘आयसर अॅप्टीट्यूट टेस्ट’- बारावीची परिक्षा बोर्डातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी.
संस्थेचा पत्ता :
Indian Institute of Sciences Education and Research (IISER) Pune (भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, पुणे)
डॉ. होमी भाभा मार्ग, पाषाण
दुरध्वनी- +91-20-25908001
फॅक्स- +91-20-25865086
संकेतस्थळ- www.iiserpune.ac.in

* पूर्वप्रसिद्धी: मासिक जडणघडण, फेब्रुवारी २०१७



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नक्षलवाद : बदलते स्वरूप

हिंसक माणिक 'सरकार'

ती तेव्हा तशी... भाग ४ पुन्हा अस्वस्थता