माहितीचा धबधबाचं...

सहावी किंवा सातवीत असतानाची गोष्ट. संध्याकाळी शाळेच्या पटांगणावर सर्वांना बसवलं होतं. कोणीतरी मोठा माणूस येऊन काहीतरी बोलणार होते. सुरूवातीला आम्ही नेहमीप्रमाणे टवाळक्या करण्यात गुंतलो होतो. तेवढ्याच स्टेजवर “ते” बोलायला उभे राहिले. आणि त्यांनी आम्हाला गोष्ट सांगायला सुरूवात केती, ती म्हणजे ‘लिलीपूटच्या शोधात’. आणि सुरूवातीला टवाळक्या करणारे आम्ही तब्बल दोन तास आम्ही ‘लिलीपूटच्या शोधात’ अगदी हरवून गेलो.

त्यानंतर एकदा धुळे शहराच्या नगररचनेसंबंधी त्यांच्याशी बोलायला नगरपट्टीतल्या त्यांच्या घरी जाणं झालं, कारण शहराची नगररचना मोक्षगुंडम विश्वेश्वरय्यांनी केल्याचा आमचा समज होता. पण त्यांच्याशी बोलल्यावर त्यांनी समजावून सांगितल की, ब्रिटीश कलेक्टर कॅप्टन ब्रिग्जने शहराची रचना केली असून त्यासाठी त्याने कौटिल्यीय अर्थशास्रातल्या दंडकग्राम रचनेचा अभ्यास त्याने केला होता, म्हणून धुळ्यातल्या गल्ल्या या परस्परांना काटकोनात छेदतात. त्यानंतर मग त्यांच्याशी स्नेह वाढतचं गेला, कारण वयाने मोठे असले तरी बोलताना वय कधीच आड आलं नाही. म्हणजे बोलताना ते अगदी तल्लीन होऊन जायचे आणि एवढी सर्व माहिती ऐकताना, लिहून घेताना आमची अगदी तारांबळ उडायची. जणूकाही माहितीचा धबधबाचं !

मुकुंदजी धाराशिवकर. संपुर्ण महाराष्ट्र त्यांना जलतज्ज्ञ  म्हणून ओळखतो. पण एक अस्सल धुळेकर ही त्यांची आपल्यासाठी विशेष ओळख. ते म्हणजे धुळ्याचा चालताबोलता इतिहासचं. अगदी कधीही त्यांच्याशी बोलायला जावं, नेहमीच त्यांच्या घराचे दरवाजे सर्वांसाठी उघडे असायचे.

मुकंदजींचा जन्म धुळ्यातलाचं. शिक्षणाचा काही काळ वगळल्यास त्यांचं सर्व आयुष्य धुळ्यातचं गेलंय. अगदी त्यांनी आपला व्यवसायही धुळ्यातचं सुरू केला. धुळ्यावर आणि एकूणच खान्देशावर त्यांचं अपार प्रेम. त्यातूनच मग त्यांनी ध्यास घेतला तो धुळ्याची जीवनवाहीनी- पांझरेला बारमाही वाहती करण्याचा. त्यासाठी सरकारच्या समितीमध्ये ते मानद तांत्रिक सल्लागार म्हणून कार्यरत होते. दुर्दैवाने सध्या या प्रकल्पाची स्थिती समाधानकारक नाही, मात्र ज्या ठिकाणी काम पूर्ण झालंय, तिथली परिस्थिती अगदी उत्तम आहे. शिवाय वैशिष्ट्यपूर्ण अशा फड सिंचन पध्दतीचा त्यांचा विशेष अभ्यास. एकूणच खान्देशाची नस ओळखली होती, या प्रदेशाचे नेमके प्रश्न काय, त्यावरची उत्तरं काय, असा सर्व अभ्यास त्यांचा होता. ते नेहमी म्हणायचे की, “खान्देशात आज जरी पाण्याची समस्या आहे, अन्य काही समस्या आहेत. पण पूर्वी हा प्रदेश तसा नव्हता. शिवाय पाण्याचा प्रश्न आज सोडवला नाही तर हे गाव पुन्हा ओस पडणार. गरज आहे ती सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची आणि खान्देश पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम करण्याची आणि ते शक्य आहे.”

मुकुंदजींचा विज्ञान हा अतिशय आवडता विषय. विज्ञानाची आवड निर्माण करायची तर ती शुगरकोटेड पध्दतीने विज्ञान शिकवायला हवं. त्यातूनच मग उभी राहिली घासकडबी विज्ञान प्रयोगिका. त्यांच्या राहत्या घरीच ती त्यांनी सुरू केली. शिवाय ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी फिरत्या प्रयोगशाळेचा अभिनव उपक्रमही त्यांनी सुरू केला. विज्ञानाच्या या आवडीतूनच त्यांनी विज्ञान कथाही लिहिल्या आणि त्या सर्वांच्या पसंतीसही उतरल्या.

गॅलिलिओ हा त्यांचा आवडीचा आणि अभ्यासाचा विषय. त्यावर ते काम करतच होते. शिवाय त्यासाठी इटलीला जाऊन अधिक माहीती, संशोधन करण्याचाही त्यांचा मानस होता, मात्र सर्वचं अपुर राहिलं आणि आपण आणखी एका आगळ्यावेगळ्या लिखाणाला मुकलो.
संस्कृतचाही त्यांचा अभ्यास होता. विशेष म्हणजे त्याचा वापर करून त्यांनी प्राचीन भारतीय वेद वाड.मय, रामायण, महाभारत यांचा सखोल अभ्यास करून पाण्याबाबतचे संदर्भही शोधून काढले होते आणि प्राचीन भारतीय ज्ञान – विज्ञान खऱ्या अर्थाने सर्वांसमोर आणलं.

आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे नगरपट्टीतल्या त्यांच्या घरातली त्यांची अभ्यासिका ! म्हणजे अगदी शांतता, एकच खिडकी, एक टेबल, खूर्ची आणि खोलीच्या चहुबाजूंनी तब्बल सहा हजारांहून जास्त दुर्मिळ पुस्तकं. म्हणजे अगदी ज्ञानगुहेत प्रवेश केल्यासारखं जाणवायचं. आणि त्या अभ्यासिकेत त्यांच्याशी गप्पा मारण्यात तर वेगळंच सुख होतं. त्यांच्या पुस्तकांबद्दल बोलायचं झालं तर त्यात स्थापत्त्यशास्रावरची सुमारे 300 पुस्तकं आहेत, त्याच विषयावर मुकुंदजींनीही पुस्तकं लिहीली आहेत. सोबतच वेदवाड.मयापासून रामायण – महाभारतापर्यंत अशी सर्व प्रकारची ग्रंथसंपदा त्यात आहेत. त्यांच्याशी बोलताना त्यातले संदर्भ अगदी सहजच बाहेर पडायचे.
आणि गेल्या वर्षी एक दिवस अचानक सकाळी सकाळी बातमी आली की ह्रदयविकाराच्या धक्क्याने मुकंदजी गेले. क्षणभर अगदी सून्न झालो. कारण अगदी आठवड्याभरातच त्यांच्या अभिजीत अफलातून... सागराच्या पोटातून या विज्ञान कादंबरीचं प्रकाशन होणार होतं, अगदी सर्व तयारी पूर्ण झाली होती. आणि त्यातचं हे असं घडलं...

त्यांची ही सर्व ग्रंथसंपदा त्यांच्या कुटुंबाने धुळ्यातल्या सत्कार्योत्तेजक सभेला देण्याचं ठरवलंय. सत्कार्योत्तेजक सभा आणि धाराशिवकर कुटुंब मिळून जलतज्ज्ञ मुकुंद धाराशिवकर अभ्यासिका आणि ग्रंथालयाची स्थापना करताय. जेणेकरून या ग्रंथसंपदेचा अन्यांनाही फायदा व्हावा आणि धुळ्यातून मुकुंदजींसारखे शेकडो अभ्यासक बाहेर पडावेत. माझ्यामते समर्थ रामदास आणि समर्थह्रदय नानासाहेब देव यांच्या स्मृतींच्या सान्निध्यात त्यांच्यासारख्या ध्येयवेड्याचं यापेक्षा उचित स्मारक होणे नाही !

पूर्वप्रसिद्धी-  दै. आपला महाराष्ट्र, धुळे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नक्षलवाद : बदलते स्वरूप

हिंसक माणिक 'सरकार'

ती तेव्हा तशी... भाग ४ पुन्हा अस्वस्थता