गोष्ट भास्कर बॅनर्जींची......
काही व्यक्तिरेखा आपल्याला इतक्या आवडून जातात की आपल्या मनात त्या घर
करून बसलेल्या असतात. मग त्या व्यक्तिरेखेला आपण एकतर पुस्तकात वाचलेलं असत किंवा
एखाद्या नाटकात नाहीतर चित्रपटात पाहिलेलं असत. त्या व्यक्तिरेखेत आपण कळतनकळत
इतके गुंतलेलो असतो की वास्तवातही त्या व्यक्तीला शोधण्याचा प्रयत्न करत असतो.
डॉ. भास्कर बॅनर्जी (आनंद - १९७१) |
मनात घर करून राहिलेली अशीच एक व्यक्तिरेखा म्हणजे ‘भास्कर बॅनर्जी’.
तर हे पहिल्यांदा भेटले ते १९७१च्या ‘आनंद’ या चित्रपटात डॉ. भास्कर बॅनर्जी
म्हणून. ‘आनंद’ हा चित्रपट म्हणजे सुपरस्टार राजेश खन्ना आणि त्यांचा हृद्यस्पर्शी
अभिनय. अगदी कधीही आपण बघू शकतो असे मोजकेच काही चित्रपट असतात, त्यात ‘आनंद’चा
समावेश हमखास होतोच होतो. त्यात राजेश खन्ना यांनी साकारलेला ‘आनंद’ अप्रतिमच आहे. पण
वरवर अगदी शिस्तप्रिय, अबोल (आणि थोडासा खडूसही ! )पण तितकाच हळवा असा अमिताभ
बच्चन यांनी साकारलेला ‘डॉ. भास्कर बॅनर्जी’ आपल्या आपल्या मनात एक जागा पक्की
करून टाकतो. सुरुवातीला आनंदवर चिडचिड करणारा, एका चौकटीत स्वतःला बंदिस्त करून
घेतलेला आणि फक्त आपल्या कामातच गढलेला डॉ. भास्कर बॅनर्जी हळूहळू चौकटीतून बाहेर
येतो आणि एका वेगळ्याच पद्धतीने आयुष्याकडे बघायला लागतो. रेणूवर प्रेम करणारा पण ते
तिला सांगायला घाबरणारा, डॉ. कुलकर्णींचा मित्र, आनंदची सातत्याने काळजी करणारा,
त्याच्यासाठी ‘बाबू मोशाय’ असणारा, त्याच्या आग्रहाखातर “मौत, तू एक कविता है”
म्हणणारा डॉ. भास्कर बॅनर्जी अमिताभ यांनी अतिशय दमदारपणे साकारला आहे. याठिकाणी ‘आनंद’
आणि ‘डॉ. भास्कर बॅनर्जी’ यांची तुलना करण्याचा कोणताही हेतू नाही, किंबहुना तशी
तुलना होऊच शकत नाही, पण हा डॉ. भास्कर बॅनर्जी मनात घर करून बसलाय हे नक्की !
भास्कर बॅनर्जी (पिकू - २०१५) |
त्यानंतर भास्कर बॅनर्जी भेटले ते २०१५ मध्ये. “पिकू” या चित्रपटात.
तर आताचे भास्कर बॅनर्जी आहेत आपल्या अविवाहित मुलीसोबत दिल्लीत राहणारे ७०
वर्षांचे वृद्ध. एका कानाने ऐकायला कमी येणारे, अपचनाच्या त्रासाला कंटाळलेले, ब्लड
प्रेशर, डायबिटीस हे सगळ नॉर्मल आहे याचं टेन्शन घेणारे (!). आपल्या मुलीने आपली
काळजी घेण्यासाठी लग्न करू नये अशी इच्छा असणारे, सहन होत नाही तरीही मोटारीनेच
कोलकात्याला जायचा हट्ट करणारे. कोलकात्यात सकाळी सकाळी सायकलवरून २० – २५
किलोमीटर फिरून येणारे, येतांना सर्वांसाठी गरमगरम कचोऱ्या आणणारे. आणि शेवटी
समाधानाने पोट साफ झाल्यावर प्राण सोडणारे भास्कर बॅनर्जी पुन्हा एकदा अमिताभ
बच्चन यांनीच साकारले आहे.
तसं पाहायला गेलो तर या दोन व्यक्तिरेखा अगदी भिन्न आहेत. एक आहे
तिशीतला डॉक्टर तर दुसरा आहे सत्तरीतला तिरसट आणि हट्टी म्हातारा. पण या दोघांना
जोडणारा एक समान दुवा म्हणजे “भास्कर बॅनर्जी” हे नाव. कदाचित अमिताभ यांच्या
अभिनयाची जादू असेल किंवा आणखी काही पण तिशीतला “डॉ. भास्कर बॅनर्जी” आणि सत्तरीतला “भास्कर
बॅनर्जी” हे आपल्यावर अगदी सारखच गारुड करतात आणि आपल्याला वाटत की ते आपल्यातीलच
एक आहेत म्हणून.
©parthkapole
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा