अनुभवायची गाणी – १



आपणा सर्वांना गाणी ऐकायला खूप आवडते. वेगवेगळी गाणी आपण ऐकत असतो. अगदी जुन्या गाण्यांपासून नवीन गाण्यांपर्यंत (हनी सिंग, मिका सिंग क्षमस्व). प्रत्येक गाण आपल्यासाठी “खास” असत. प्रत्येक गाण्यासोबत आपल्या काही आठवणी निगडीत असतात, ती गाणी ऐकतांना आपण आठवणींत रमून जातो.... मग त्या आठवणी हव्याहव्याशा वाटणाऱ्या असतील किंवा नकोशा वाटणाऱ्या. गाणी ऐकतांना आपण पुन्हा एकदा “ते” प्रसंग अनुभवतो.
गाणी नुसती ऐकायची नसतात, तर ती अनुभवायची असतात. अस मला वाटत. आता हेच बघा ना, जगजित सिंह यांनी गायलेली “होशवालों को खबर क्या” ही गझल ऐकतांना आपण अक्षरशः त्यात बुडून जातो. आणि त्यात जर तुम्ही प्रेमात पडलेला असाल किंवा त्याच्या उंबरठ्यावर असाल तर मग विचारायलाच नको. खास करून ती शेवटची ओळ – “हम लबोंसे कह ना पाए, उन से हाल-ए-दिल कभी और वो समझे नहीं, ये खामोशी क्या चीज है” आणि “खामोशी क्या चीज है” यापूर्वी घेतलेला अर्थपूर्ण पॉझ... ती गझल आपल्यासाठीच लिहिलेली आहे, असा आपला समज करायला पुरेशी असते (हसलात ना स्वतःशीच).
“आनंद” चित्रपटातील “मैने तेरे लिये ही सात रंग के सपने चुने” हे आणखी एक ‘अनुभवण्याच’ गाण. या गाण्याशी माझी ओळख झाली ती दूरदर्शनवरच्या रंगोली या कार्यक्रमातून. लहानपणी हे गाण फक्त ऐकल होत, पण आता जेव्हा ते गाण अनुभवलं तेव्हापासून त्याच्या प्रेमातच पडलोय. अगदी साधे शब्द, त्यांना ‘साजेसं’ संगीत आपला कितीही खराब असलेला मूड क्षणार्धात बदलून टाकतात.
याच चित्रपटातलं आणखी एक गाण म्हणजे “कही दूर जाब दिन ढल जाए” हे गाण ऐकतांना आपल्या नकळत आपण भावूक होऊन जातो. “कहीं तो ये दिल कभी मिल नहीं पाते, कहीं से निकल आये जनमो के नाते, घनी थी उलझन बैरी अपना मन, अपना ही होके सहे दर्द पराए” या ओळी ऐकल्यावर आपलीसुद्धा काहीतरी ‘उलझन’ आहे (!), याची जाणीव होते.
शास्त्रीय संगीताची तर बातच काही और आहे. मला त्यातल फारस काही समजत नाही... पण पंडित  भीमसेन जोशी यांच्या आवाजात “तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल” हे गाण ऐकताना तुम्ही हरवून जातात. भीमसेनजींच्या आवाजाचं जणू काही गारुड तुमच्यावर होत. त्यांचा पहाडी आवाज सर्व काही विसरायला आपल्याला भाग पाडतो. शास्त्रीय संगीतामधले तुम्ही जाणकार असाल तर सोन्याहून पिवळ, मात्र त्यातल काहीही कळत नसल तरी हे गाण तुम्हाला एक वेगळीच अनुभूती देऊन जात.
“हजारों ख्वाहिशे ऐसी” या चित्रपटातलं “बावरा मन देखने चला एक सपना” हे गाण आपल्या गोंधळलेल्या मनाला शांत करण्यासाठी उपयुक्त आहे. आपलं मन म्हणजे एक वेगळच प्रकरण असत. त्या मनाच उत्कृष्ट वर्णन या गाण्यात आहे. “बावरेसे इस जहा में बावरा एक साथ हो, इस सयानी भीड में बस हाथो में तेरा हाथ हो” ही ओळ आपल्याला नक्कीच कुणाची तरी आठवण यायला भाग पाडते.
तर अशी ही काही ‘अनुभवायची गाणी’. अशी पुष्कळ गाणी आहेत, पण आज एवढच. पुढच्या वेळी आणखी गाण्यांवर बोलूया.
जाता जाता
“बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी” ही काफिर अजहर यांची जगजित सिंह यांनी गायलेली गझल जरूर ऐका.
https://www.youtube.com/watch?v=P_xUfzhXJVc

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हिंसक माणिक 'सरकार'

नक्षलवाद : बदलते स्वरूप

ती तेव्हा तशी... भाग ४ पुन्हा अस्वस्थता