राजयोगी नेता

आज अटलजींना भारतरत्न प्रदान करण्यात आले, यानिमित्ताने तरी त्यांचे दर्शन घडेल अशी अपेक्षा होती, मात्र फक्त छायाचित्रावर समाधान मानावे लागले. त्यामुळे जरा हिरमोड झाला असला तरी एका अटलजींना भारतरत्न मिळाला आहे, हा आनंद अगदी अवर्णनीय असाच आहे. तस पाहायला गेल तर अटलजी म्हणजे आमच्यासाठी जुन्या पिढीतले राजकारणी. पण या जुन्या पिढीतल्या नेत्याने आमच्यावर एक वेगळच गारुड केलय. अटलजींकडे पाहिल्यावर आपोआप आदर वाटतोच पण सोबतच एक आपलेपणाही जाणवतो.
    अटलजी म्हटले की सर्वांत अगोदर आठवतात ती त्यांची भाषणे !
भारतरत्न प्रदान करताना महामहीम राष्ट्रपती !





 हिंदीवर असामान्य प्रभुत्व, तोंडपाठ असणारे संदर्भ आणि जरा श्रोत्यांचा अंदाज घेत केलेली अचूक शब्दफेक. एक वेगळीच नजाकत त्यांच्या भाषणात असायची. त्यांची संसदेतील भाषणे ऐकणे म्हणजे तर पर्वणीच. ज्यांनी अटलजींना प्रत्यक्ष बोलतांना ऐकलय, पाहिलय त्या सर्वांचा खूप हेवा वाटतो. प्रचारसभा अथवा अन्य सभा यांत काय बोलावे आणि संसदेत काय बोलावे याचा वस्तुपाठच अटलजींनी घालून दिला आहे. आमच्या आजच्या “नेत्यांनी” हे जरुर शिकण्यासारखे आहे !.
    अटलजी प्रधानमंत्री होते तेव्हा मी अगदीच लहान होतो, पण दूरदर्शनवर दिसणारी त्यांची धीरगंभीर मुद्रा, बोलण्याची विशिष्ट लकब खूप आवडायची. लोक त्यांच्या सुशासनाविषयी जी चर्चा करायचे ते ऐकून त्यांच्याविषयी खूप आदर वाटायचा. पुढे कळायला लागल्यावर आमच्या पिढीच्या दुर्दैवाने अटलजी सक्रीय राजकारणातून दूर झणे आणि त्यांचे काम पाहण्याची, त्यांना ऐकण्याची इच्छा अपूर्णच राहिली. मग इंटरनेटवर त्यांची जुनी भाषणे ऐकून दुधाची तहान ताकावर भागवायला सुरुवात केली. पुढे “मेरी इक्यावन कविताए” हा त्यांचा काव्यसंग्रह वाचला आणि कवी मनाच्या अटलजींचा नव्याने परिचय झाला.
    अटलजींची भाषणे ऐकण्यात जो आनंद मिळतो तोच आनंद त्यांच्या कविता वाचतानाही मिळतो. एक राजकारण्याची काव्यप्रतिभा एवढी विलक्षण असू शकते, हे पाहून अगदी थक्क व्हायला होत.
‘भारी दुपहरी में अंधियारा
सूरज परछाई से हारा
अन्तरतम का नेह निचोडे,
बुझी हुई बाते सुलगाए
आओ फिर से दिया जलाए’
हे शब्द वाचून आपल्या मनात असलेल निराशेच मळभ अगदी कुठल्याकुठे पळून जात. तर
‘हार नहीं मानूंगा
रार नई ठानूंगा
काल के कपाल पर लिखता – मिटाता हू
गीत नया गाता हू’
या ओळी आपल्यात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण करतात. अनेकवेळा आपण जीवनात यशस्वी होतो, त्याचबरोबर आपल्या जबाबदाऱ्याही वाढतात, तेव्हा अटलजींच्या
‘जो जितना उॅंचा
उतना ही एकाकी होता है
हर भार को स्वयं ही ढोता है
चेहरे पर मुस्काने चिपका
मन ही मन रोता है’
या ओळी आपल्याला धीर देतात. त्याचप्रमाणे मिळालेल्या यशाने आपण हुरळून जाऊ नये, आपले पाय जमिनीवरच राहावे यासाठी
‘मेरे प्रभू !
मुझे इतनी उॅंचाई कभी मत देना
गैरों को गले न लगा सकू
इतनी रुखाई कभी मत देना’
हे शब्द उपयोगी पडतात.
‘हिंदू तन-मन, हिंदू जीवन, रग रग हिंदू मेरा परिचय’ अस म्हणत अटलजी “हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व” याचा पुनरुच्चार करतात, तर
‘इसे मिटाने की साजिश करने वालों से
कह दो चिनगारी का खेल बुरा होता है
औरो के घर में आग लगाने का जो सपना  वह अपने ही घर में सदा खरा होता है’
असं म्हणत आपल्या “नादान” शेजाऱ्याला कठोरपणे सुनावतात. पण त्याच वेळी
‘कभी न खेतो में फिर खूनी खाद फलेगी
खलिहानो में नहीं मौत की फसल खिलेगी
आसमान फिर कभी न अंगारे उगलेगा
एटम से नागासाकी फिर नहीं जलेगी
युद्धविहीन विश्व का सपना भंग न होने  देंगे..... हम जंग न होने देंगे’ असे म्हणत विश्वशांतीसाठीचे साधक असल्याचे स्पष्ट करतात.
तर असे हे विलक्षण प्रतिभा असलेले, राजयोगी अटलजी. यांच्याबाबत लिहिण्याएवढा मी निश्चितच मोठा नाही, पण ज्या व्यक्तीला लहानपणापासून पाहत आलोय, त्या व्यक्तीबद्दल लिहिण्यापासून स्वतःला रोखू शकलो नाही. या लेखनाचा शेवट अटलजींच्याच कवितेने करतोय....
‘एक हाथ में सृजन,
दुसरे में हम प्रलय लिए चलते है,
सभी कीर्ती ज्वाला में जलते,
हम अॅंधियारे में जलते है
आखो में वैभव के सपने,
पग में तुफानो की गति हो,
राष्ट्रभक्ती का ज्वार न रूकता,
आए जिस-जिस की हिंमत हो’


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नक्षलवाद : बदलते स्वरूप

हिंसक माणिक 'सरकार'

ती तेव्हा तशी... भाग ४ पुन्हा अस्वस्थता