“शिवसैनिक” खासदार
स्थळ – नवे
महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली.
“सदन परिसरातील
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ पुतळ्याखाली एक व्यक्ती ‘भावी’
पत्रकारांच्या प्रश्नांना आपल्या ‘खास शैलीत’ ‘बिनधास्त’ उत्तरे देत होती, त्या
व्यक्तीची ती शैली पाहून सर्व भावी पत्रकार जरा गडबडलेच होते !”.
ती व्यक्ती म्हणजे
शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत आणि ते भावी पत्रकार होते सावित्रीबाई फुले पुणे
विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या व संज्ञापन विभागाचे विद्यार्थी.
या भेटीचे निमित्त होते आमच्या बहुचर्चित
‘दिल्ली अभ्यास दौऱ्या’चे.
या दौऱ्यादरम्यान
दिल्लीतील ‘आलिशान’ महाराष्ट्र सदनात आमची अनेक खासदारांशी भेट झाली, पण सर्वाधिक
लक्षात राहणारी भेट होती ती खासदार अरविंद सावंत यांचीच.
“मी अतिशय सामान्य
घरातून आलेलो आहे. सुरुवातीला एमटीएनएल मध्ये नोकरीस होतो, त्यानंतर बाळासाहेब
ठाकरे आणि शिवसेनेच्या संपर्कात आलो. त्यानंतर माझ्यासारखा राजकारणाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेला तरूण राजकारणात
यशस्वी झाला ते फक्त आणि फक्त बाळासाहेबांमुळेच” हे सांगताना सावंत हे अतिशय वेगळच
रसायन आहे, ते जाणवत होत.
एरवी दूरचित्रवाणीवरील
चर्चेतच दिसणारे अरविंद सावंत यांची
प्रत्यक्ष भेट अतिशय प्रभावित करणारी ठरली. त्याचे व्यक्तिमत्व अतिशय मनमिळावू,
बोलके आणि स्पष्टवक्ते असे होते फक्त त्यात होती एक विशिष्ट अशी ‘सेना स्टाईल’. ती
कुठेही खटकणारी नव्हती तर हवीहवीशी वाटणारी होती. सावंत यांचे ‘संयमित आक्रमक’ असे
वर्णन करणे समर्पक ठरेल.
सर्व विद्यार्थ्यांना
पाहून सावंत यांची कळी खुलली होती, अतिशय उत्साहात ते आमच्याशी संवाद साधत होते.
सुरुवातीला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या त्यांच्या विजयाबद्दल ते म्हणाले,
“मी मलबार हिल या मुंबईतल्या उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या भागातून मी निवडून आलो.
माझ्याविरोधात मिलिंद देवरा यांच्यासारखा प्रस्थापित उमेदवार होता. माझ्या
विजयाबद्दल सुरुवातीला मी सुद्धा साशंक होतो. मात्र या निवडणुकीत मी एक डार्क
हॉर्स ठरलो आणि निवडून आलो. मला हे सर्व शक्य झाल कारण मी बाळासाहेबांच्या तालमीत
तयार झालेला शिवसैनिक आहे, आणि त्यांनी आम्हाला सदैव आव्हानं स्विकारायलाच शिकवलय!”.
आमच्या प्रश्नांना
उत्तरे देताना अरविंद सावंत अगदी बिनधास्त होते, मात्र त्यांच्यातला अभ्यासू आणि हजरजबाबी
संसदपटूचे क्षणाक्षणाला दर्शन घडत होते. शिवसेनेच्या हिंदुत्वाबाबतच्या भुमिकेवर
विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देतांना अतिशय संयमितपणे ते म्हणाले, “हिंदुत्वाबाबत
शिवसेना कधीही तडजोड करणार नाही, आम्ही कधीही दुसऱ्या धर्माचा विनाकारण द्वेष
केलेला नाही”. हे सांगताना ‘महाराष्ट्रात मराठी आणि देशात हिंदू अशीच आमची ओळख
राहणार’ हे सांगायलाही ते विसरले नाहीत. घर वापसी, मराठीचा मुद्दा ते भूमी
अधिग्रहण विधेयक व्हाया जैतापूर अशा सर्व प्रश्नांना अरविंदजींनी खास ‘सेना
स्टाईल’ उत्तरे दिली, प्रत्येक प्रश्नाचा सखोल अभ्यास त्यांच्या उत्तरात दिसत
होता.
अखेर उशीर
झाल्यामुळे थोड्या नाखुशीनेच अरविंदजींचा आम्हाला निरोप घ्यावा लागला, परंतु एका
अभ्यासू आणि दिलखुलास अशा “शिवसैनिक” खासदाराला भेटण्याच समाधान आम्हा सर्वांना
मिळाल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा