आपली संसद

संसदेचे प्रथम दर्शन हे डोळे दिपविणारेच असते..... ''डौलाने उभी असलेली, स्वतःच एक इतिहास असलेली  भव्य, दगडी वास्तु, भव्य आवार, त्यात उभ्या  असलेल्या लाल दिव्याच्या मोटारी, एका बाजूला थांबलेले वृत्तपत्र, वृत्तवाहिन्यांचे पत्रकार, प्रचंड(!) सुरक्षाव्यवस्था, वातावरणात असलेली एक वेगळीच ‘लोकशाहीची नशा’ आणि त्यात असणारे आपले लोकप्रतिनिधी.'' 

या सर्व गोष्टींचा आपल्यावर प्रभाव पडल्याशिवाय राहात नाही. एरवी दूरदर्शनवर संसदेचे दर्शन घेणारे आपण प्रत्यक्ष संसद पाहिल्यावर थोडे का होईना पण दडपणात येतोच. खर सांगायचं तर आपली त्यावेळची मनस्थिती म्हणजे,‘संसद प्रत्यक्ष बघतोय याचा आनंद, उत्साह आणि वाटणारी अगदी थोडीशी भिती याचं मिश्रण.’
ते अस शब्दात सांगता येणं खूप अवघड आहे, त्यासाठी तुम्ही ते स्वतःच अनुभवायला हवं!
अगदी असाच अनुभव आम्हाला आला. निमित्त होत ते आमच्या अभ्यासक्रमातील बहुचर्चित ‘दिल्ली अभ्यास दौऱ्या’चे.
तर आम्ही सर्व ‘भावी पत्रकार’ संसदेच्या आवारात पोहोचलो ते मनात उत्सुकता आणि दडपण घेऊन. अर्धा तास सुरक्षेचे सोपस्कार पार पडण्यात गेले आणि अखेर आम्ही लोकसभेच्या ‘प्रेक्षक दिर्घे’मध्ये स्थानापन्न झालो.
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि आमचा अभ्यास दौरा यांचा योग जुळून आल्यामुळे प्रत्यक्ष कामकाज बघण्याची उत्कृष्ट संधी आम्हाला मिळाली. आम्ही आतमध्ये गेल्यावर सदनात संसदीय कामकाज मंत्री वैंकैया नायडू यांचे भाषण सुरु होते, विरोधकांच्या कुठल्यातरी आक्षेपावर तर ते उत्तर देत होते. त्यांची हिंदी आणि इंग्रजी बोलण्याची खास ‘दक्षिण भारतीय’ ढब, बोलण्यात असलेली संयमित आक्रमकता आणि विरोधकांना लगावलेले खास ‘शालजोडीतले’ टोले अप्रतिम होते.
सदनात कॉंग्रेस पक्षाची अगतिकता पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवली. एके काळी सत्ताधारी असलेल्या या पक्षाच्या बाकांवर शब्दशः ‘शुकशुकाट’ होता! नायडूंच्या भाषणानंतर विरोधी बाकावरून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते मुलायम सिंह बोलायला उभे राहिले. आपल्या खास ढंगात त्यांनी सरकारच्या गंगा शुद्धीकरण धोरणावर टिकास्त्र सोडले. कॉंग्रेसचे उपाध्यक्ष, खासदार राहुल गांधी हे ‘चिंतन’ करत असल्यामुळे त्यांना संसदेत बोलतांना(!) पाहण्याची संधी काही मिळाली नाही.
मागच्या बाकावर बसलेले पुण्याचे खासदार अनिल शिरोळे, डुलकी लागलेले रामकृपाल यादव, कानात ‘हेडफोन’ घालून बसलेल्या सुप्रिया सुळे आणि दर १० मिनिटाला आपली जागा बदलणारे आप चे भगवंत मान हे लोक विशेष लक्षात राहणारे ठरले.
·      आपल्याश्या वाटणाऱ्या ‘सुमित्रा महाजन’
लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांच्याशी झालेली भेट ही विशेष स्मरणात राहणारी ठरली. अतिशय मनमोकळ्या, निगर्वी आणि बोलक्या स्वभावाच्या सुमित्राताई जेव्हा आमच्याशी संवाद साधत होत्या तेव्हा एक वेगळाच आनंद मिळाला. त्यांच्याशी बोलतांना आपण लोकसभेच्या सभापतींना भेटत आहोत याचे कोणतेच दडपण आमच्यावर नव्हते. एका सुसंस्कृत राजकीय व्यक्तिमत्वाला भेटण्याच एक वेगळच समाधान मिळाल.

तर असा हा संसदेचा अनुभव अतिशय अविस्मरणीय असा होता.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नक्षलवाद : बदलते स्वरूप

हिंसक माणिक 'सरकार'

ती तेव्हा तशी... भाग ४ पुन्हा अस्वस्थता