प्रेमात पाडणारी ‘दिल्ली’

“एखाद्या अनोळखी शहरात एकट्याने
फिरण्याची मजा काही औरच असते.
सुरुवातीला अनोळखी वाटणारे रस्ते, झाडं,
इमारती हळुहळू आपल्याशी संवाद साधू
लागतात आणि मग
आपलाही नवखेपणा गळून पडतो.
आपली त्या सर्वांशी छान गट्टी जमते,
आणि ते शहर आपल्याशी काय बोलतय
ते आपल्याला समजायला लागत, मग आपण
                         त्या शहराच्या प्रेमात पडायला लागतो”

पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने दिल्लीला जायचा योग आला आणि अगदी असाच अनुभव मला आला. दिल्लीला जायची, दिल्ली अनुभवायची इच्छा यानिमित्ताने थोड्या प्रमाणात पुर्ण झाली असली तरी आठवड्याभराच्या या धावत्या भेटीमुळे तूर्तास तरी दुधाची तहान ताकावर भागली, असेच म्हणावे लागेल.
सुमारे आठवडाभरासाठी आमचा पत्ता होता ‘आंतरराष्ट्रीय छात्र आवास, ५, न्याय मार्ग, चाणक्यपुरी, नवी दिल्ली.’ चाणक्यपुरी या भागाबद्दल सांगायचे तर हा भाग म्हणजे भारताचे परराष्ट्र धोरण ठरविणारा एक महत्वाचा भाग, ते अशासाठी कारण प्रामुख्याने परकीय देशांच्या भारतातील वकीलाती आणि त्यांचे अधिकारी, कर्मचारी वर्ग यांची निवासस्थाने या भागात एकवटलेली आहेत.

साधारणपणे १९५०च्या दरम्यान ‘ल्युटन्स दिल्ली’च्या पुढे वसविण्यात आलेल्या ‘चाणक्यपुरी’ या भागाचा आपला स्वतःचा असा एक वेगळाच डौल आहे. ‘शांती पथ’ या प्रशस्त राजमार्गाभोवती(!) वसविलेल्या या भागात आपण प्रवेश करतो तोच प्रशस्त, आणि स्वच्छ रस्ते, भव्य असे चौक आणि सुंदर अशी उद्याने आपले स्वागत करतात. त्यांच्या प्रथम दर्शनाने आपल्याला थोडस दबून जायला होत, पण लगेच आपण सावरतोही.

या संपूर्ण भागाचा एक वेगळाच रुबाब आहे. एक वेगळाच ‘नशा’ या भागात आहे, त्यामुळे आपण अक्षरशः गुंगून जातो. प्रथमच हा भाग पाहणाऱ्या व्यक्तीवर तर या भागाचा प्रचंड प्रभाव पडतो. अगदी असच काहीस आमच झाल होत. त्याचा एवढा प्रभाव पडलाय की अजूनही ‘न्याय मार्ग’, ‘शांती पथ’, ‘नीती मार्ग’, ‘कौटिल्य मार्ग’, ‘विनय मार्ग’ ही नाव डोक्यातून जात नाहीयेत.
या भागात असलेल्या परकीय वकीलातींचे स्थापत्य तर अगदी पाहण्यासारखे आहे (जरी आतमधून पाहणे शक्य नसले तरी बाहेरून बराच अंदाज येतो!). त्यापैकी ब्रिटीश हाय कमिशन, जर्मन, रशियन, पोलिश आणि बेल्जियम या वकीलाती स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना आहेत.

या भागाला स्वतःची अशी एक वेगळी ओळख आहे. या भागातील ईमारती, रस्ते, झाडं, माती इतकच काय तर हवा सुद्धा ‘वेगळीच’ आहे. उर्वरीत दिल्लीमध्ये काय चाललय, याच्याशी या भागाला काहीच देणघेण नाही, हा भाग आपल्याच विश्वात ‘मश्गूल’ असतो.

तर अशा या ‘चाणक्यपुरी’ला एकदा तरी भेट द्यायलाच हवी.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नक्षलवाद : बदलते स्वरूप

हिंसक माणिक 'सरकार'

ती तेव्हा तशी... भाग ४ पुन्हा अस्वस्थता