दूरदर्शन



काही दिवसांपूर्वी दूरदर्शन या सरकारी वाहिनीचं बोधचिन्ह (लोगो) बदलण्याविषयीची बातमी वाचली. दूरदर्शनचं बोधचिन्ह बदलण्यासाठी एक स्पर्धाच आयोजित करण्यात आली आहे. देशभरातून कोणालाही या स्पर्धेत भाग घेता येणार असून त्यातून सर्वोत्तम बोधचिन्ह हे यापुढे दूरदर्शनचं अधिकृत नवं बोधचिन्ह असणार आहे.
ही बातमी वाचली खरं सांगायचं तर थोड वाईटच वाटलं. म्हणजे आपलं लहानपण ज्या बोधचिन्हाला पाहून समृध्द (!) झालं, ते बोधचिन्ह असं बदलण्याची खरोखर गरज आहे का ?, म्हणजे नव्या गोष्टींना विरोध वगैरे नसला तरी प्रत्येकच गोष्टीत नवेपण आणणं गरजेचं आहे का ? हे आणि असे अनेक प्रश्न मनात आले. दूरदर्शनच्या त्या बोधचिन्हाशी सर्व बालपण आणि आता बालपणाच्या आठवणी एवढ्या घट्ट जोडलेल्या आहेत की यापुढे लवकरच नवं बोधचिन्ह असणार, ही कल्पनाचं मनाला पटत नाहीये. दूरदर्शनंच एक वेगळंच स्थान समस्त भारतीयांच्या मनात आहे हे नक्की.
सुमारे दहा ते बारा वर्षांपूर्वी जेव्हा केबलचा इतका प्रसार झाला नव्हता तेव्हा दूरदर्शनचं आपलं मनोरंजन करत होतं, दूरदर्शनचा लोगो, त्याचं ते थीम साँग या साऱ्या गोष्टी अगदी अप्रतिम होत्या.
आठवतयं... रविवारच्या सकाळची सुरूवात हेमा मालिनी यांच्या 'रंगोली' ने व्हायची आणि नंतर 'श्रीकृष्ण' मालिका बघूनच आपली आंघोळ व्हायची. दूरदर्शनवर लागणाऱ्या मालिकाही अतिशय दर्जेदार होत्या, आजच्या उथळ आणि भपकेबाज मालिकांची त्यांच्याशी बरोबरी होऊच शकत नाही. शनिवारी लागणाऱ्या 'शक्तिमान' ने तर आपल्या सर्वांना अगदी वेडं केलं होतं, मी तर ते पाहण्यासाठी कित्येकदा शाळेत उशीरा जायचो. त्याच्याही आधी 'रामायण' आणि 'महाभारत' या मालिकांनी तर संपूर्ण भारतालाचं वेड लावलं होतं. या मालिका लागल्या की रस्ते अक्षरश: निर्मनुष्य व्हायचे, अशा आठवणी आजही बरेच लोकं सांगतात.
रात्री लागणारे 'छायागीत', 'चित्रहार' यांची आतुरतेनं वाट पाहायचो आपण, त्यांची सर आजच्या म्यूझीक चँनेल्सना येणं शक्यच नाही. दर सोमवारी लागणारे 'ओम नमः शिवाय', अलिफ लैला(सिंदबाद) आणि शनिवारी लागणारं 'जय हनुमान' यांना कोण विसरणार?

याच दूरदर्शनवर आपण 'भारत- एक खोज' सारखी अभ्यासपूर्ण मालिका पाहिली, 'मालगुडी डेज' सारखी निखळ मनोरंजक मालिका पाहिली आणि याचं दूरदर्शनवर फक्त शुक्रवारी आणि शनिवारी लागणारे हिंदी चित्रपटही बघितले. 'सुरभी' या मालिकेला विसरणं तर शक्यच नाही, कला, मनोरंजन याची माहिती यातुनच घ्यायचो. दर रविवारी लागणारी आणि विज्ञानाला वाहिलेली 'भूमी' ही मालिका आठवते आहे ना? सोमवारी लागणारी 'सुराग' आणि गुरूवारी लागणारी 'आँखे' पाहिल्याशिवाय झोपायचो नाही आपण. 'महाराणा प्रताप', 'मैँ दिल्ली हू', 'राजा शिवछत्रपती', या ऐतिहासिक मालिका एक वेगळ्याच विश्वात घेऊन जायच्या. 'जंगल जंगल बात चली है पता चला है' या थीम साँग आणि 'मोगली' या कसं बरं विसरणार?  दूरदर्शनच्या बातम्या हा आणखी एक महत्वाचा मुद्दा. बातम्या नेमक्या आणि मुद्देसुद कशा असाव्यात याचं उत्तम उदाहरण म्हणजे दूरदर्शन. आक्रस्ताळेपणा, अभिनिवेश, ब्रेकींग न्यूजचा हव्यास, सनसनाटी यापासून अंतर राखत दूरदर्शन नेहमीच दर्जेदार बातम्या देत आलंय. त्यामुळे आजही वस्तुनिष्ठ बातम्यांसाठी दूरदर्शन हाच विश्वासार्ह पर्याय आहे.
दूरदर्शन म्हणजे एकूणच भारतीय समाजाचं प्रतिनिधित्व करणारी एक संस्थाच आहे. त्यात सुख, दु:ख, आनंद, राग, द्वेष, असं सर्व काही भारतीयांनी दूरदर्शनसोबत साजरं केलं आहे. दूरदर्शन म्हणजे प्रत्येक कुटुंबातील एक अविभाज्य असा घटकचं आहे. त्यामुळे आज जरी दूरदर्शन कुठेतरी मागे पडल्यासारखं वाटत असलं तरीही प्रत्येक भारतीयाच्या मनात मात्र त्याचं स्थान नेहमीच अढळ राहणार, यात शंका नाही.

● पूर्वप्रसिद्धी: 'सहज सुचलेलं', बहर, दै. आपला महाराष्ट्र, १३ ऑगस्ट २०१७

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हिंसक माणिक 'सरकार'

नक्षलवाद : बदलते स्वरूप

ती तेव्हा तशी... भाग ४ पुन्हा अस्वस्थता