पाऊस

पाऊस... तसं पाहायला गेलो तर तीन अक्षरी, अगदी साधा शब्द. इतर शब्दांसारखाच अगदी. पण हा शब्द आपल्या प्रत्येकासाठी अगदी खास, जिवाभावाचा. लहानपणापासून आपल्याला हा पाऊस वेड लावत असतो. पाऊस आला रे आला की लहानपणी कागदाच्या होड्या सोडायला अगदी वेड्यासारखे धावत सुटायचो आपण. त्यासाठी कित्येकदा आई-बाबांचा ओरडा (आणि मारसुद्धा !) आनंदाने सहन करायचो आपण. कागदाच्या होड्या सोडण्यात, पावसात मनसोक्त नाचण्यात, डबक्यातलं पाणी एकमेकांच्या अंगावर उडवण्यात एक वेगळीच नशा असायची. त्यावेळी डबक्यातलं पाणी खराब वगैरे असत, त्यामुळे विविध आजार होतात हे असे विचार मनातही नसायचे आपल्या.
तर असा पाऊस एकच असला म्हणजे जगाच्या सर्व भागांमध्ये तो सारखाच असला तरी त्याला अनुभवायची पद्धत प्रत्येकाची वेगळी असते. शेतकऱ्याचा पाऊस, लहान मुलांचा पाऊस, कुटुंबाचा पाऊस, गरीबाचा पाऊस, श्रीमंताचा पाऊस, मित्रांचा पाऊस, मैत्रिणींचा पाऊस, प्रेमात पडू पाहणाऱ्यांचा पाऊस, प्रेमात पडलेल्यांचा पाऊस, प्रेमभंग झालेल्यांचा पाऊस (ही यादी आणखीही वाढवता येईल) अशा प्रत्येकाचा पाऊस हा वेगळाच असतो हे मात्र नक्की.
हा पाऊस आपल्याला दरवषी भेटत असतो, पण नेहमीच आपल्याला तो नवा वाटत असतो. पावसाची आपण अगदी २७-२८ मे पासून अगदी आतुरतेने वाट बघत असतो. मग जून मध्ये अखेर तो अवतरतो. त्याची रिपरिप, टपटप कानावर आली की, आपण हातातली सर्व काम सोडतो आणि खिडकी, गॅलरी, गच्ची, रस्ता, मैदान अगदी जिथून आपल्याला त्याला मिठीत घेता येईल, तिकडे आपण धाव घेतो. त्याचे ते टपोरे थेंब आपल्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात आणि मग नकळत आपल्याला एखादी कविता सुचते –
पाऊस म्हणजे गारवा...
आपल्या मनाला भिजवणारा....
पाऊस म्हणजे मृद्गंध...
आपल्या मनाला मोहवणारा....
पाऊस म्हणजे धडपड पाखराची...
आडोशाला जाण्याची....
पाऊस म्हणजे ‘ती दोघं’...
एकाच गुलाबी छत्रीतली....
(©पार्थ)
हा पाऊस आपण कोणासोबत अनुभवतो ते सुद्धा खूप महत्वाच असत बरं का...                
 म्हणजे बघा ना कुटुंबासोबत तुम्ही आहात, चार पाच वाजलेत, मस्त पाऊस पडतोय, जरास अंधारूनही आलय, मग अशा वेळी गरमागरम कांदाभजी आणि मसालेदार चहा यासारखा दुसरा बेत नाही. पावसाला बघता बघता, भजी खाता खाता आणि चहा चे घोट घेता घेता जुन्या आठवणींना उजाळा देत आपण त्यात इतके गुंगून जातो की पाऊस थांबला तरी आपल्या गप्पा सुरूच राहतात (आणि यामुळे कुटुंबातील सदस्य एकमेकांच्या जास्त जवळही येतात !). किंवा मित्रासोबत बाईक वरून एखाद्या डोंगरावर बसून, त्यावरच्या एकुलत्या एक टपरीवरचा चहा पीत पाऊस अनुभवायची मजा काहीतरी वेगळीच असते. अशाच एखाद्या क्षणी आपण आपल्या मनातल्या खूप काही गोष्टी आपल्या त्या खास मित्राला नकळत सांगायला लागतो. मग एकदम पाऊस थांबतो आणि आपण सुद्धा... मग पाऊस थांबल्यामुळे आभाळ आणि मनातलं सर्व सांगितल्यामुळे आपण सुद्धा अगदी हलकं होऊन जातो.

किंवा मग एखाद्या उंच इमारतीच्या गच्चीत नाही तर गॅलरीत, अगदी जवळच्या मैत्रिणीसोबत, ओल्ड मंकचे घोट घेत, अगदी शांत, एकमेकांशी एक शब्दही न बोलता पावसाकडे नुसतं बघतानांही एकमेकांशी खूप काही बोलून जात असतो आपण.... किंवा मग एखाद्या शेतात, शेतकऱ्यासोबत, काळ्या मातीमध्ये उभं राहून, मातीचा वास घेत पावसात अगदी शब्दशः चिंब भिजण्यातला आनंद तर अवर्णनीयच.

पाऊस आणि चित्रपट याचं तर नात अगदी घट्ट आहे. आता हेच बघा ना राज कपूर आणि नर्गीस कोसळत्या पावसात, एकाच छत्रीत जेव्हा ‘प्यार हुआ...इकरार हुआ....’ म्हणतात तेव्हा आपल्या प्रत्येकाच्या मनात असलेल्या त्या एका ‘खास’ व्यक्तीची आठवण आल्याशिवाय राहत नाही.
 पाऊस पडत असतांना अजय देवगण आणि ऐश्वर्या राय यांचा ‘रेनकोट’ हा चित्रपट पाहणे हे अगदी झकास कॉम्बीनेशन आहे.                             
पाऊस आणि लगबग याचं तर वेगळच नात आहे. पाऊस आला रे आला की शेतकरी पेरणीच्या कामाला लागतो. छत्र्या, रेनकोट आणि प्लास्टिक चा कागद विकणारे विक्रेते आपले दुकान थाटायला लागतात, छत्र्या दुरुस्त करून देणारे रस्त्यांच्या कडेला येऊन बसतात. ऑफीसला जाणारे न भिजता पोहोचण्याचा प्रयत्न करतात, शाळकरी मुलं पुस्तकं – वह्या भिजू नये याची आटोकाट काळजी घेतात मात्र शाळा सुटल्यावर हट्टाने घेतलेला रेनकोट न घालता, डबक्यातलं पाणी एकमेकांच्या अंगावर उडवत मजेने घरी येतात. याच काळात साथीच्या आजारांच प्रमाणही वाढायला लागलेलं असत आणि आपली काळजी घेणारे डॉक्टर्सही अगदी बिझी होऊन गेलेले असतात.

पाऊस आणि आपलं मन याचं अगदी जवळच नातं असाव बहुदा. कारण बघा ना दाटून आलेले काळे ढग जेव्हा अखेरीस बरसायला लागतात तेव्हा कसं अगदी शांत आणि तणावमुक्त वातावरण तयार होत. आपलही अगदी असचं असतं. खूप काही गोष्टी, विचार, घटना यांचे काळे ढग आपल्याही मनात साठलेले असतात आणि जेव्हा बरसणाऱ्या पावसाप्रमाणेच आपण सुद्धा सर्व विचार कोणाशी तरी बोलतो तेव्हा आपल्यालाही अगदी तणावमुक्त आणि शांत वाटायला लागतं.
शेवटी या आपल्या पावसाबद्दलची एक कविता सांगतो आणि थांबतो (कारण वाचायच्या नादात पडणाऱ्या पावसाकडे दुर्लक्ष नको व्हायला !).
थेंब टपकला... ओघळला....
पाठीवरच्या पन्हळीमध्ये
ओलघेवडा अडखळला
 थेंब टपकला... ओघळला....
ओठांवरती रेंगाळूनी अन्
थेट निघाला खाली 
गेला... फाजील मेला 
थेंब टपकला... ओघळला....
अवचित आला, छत्रीत घुसला 
छत्रीचा मग करूनी आडोसा
उन्हात पाऊस विरघळला
थेंब टपकला... ओघळला....
छत्रीमध्ये मग उलगडली
इंद्रधनुची सात गुपिते
अवघा पाऊस साकळला
थेंब टपकला... ओघळला....

पूर्वप्रसिद्धी: 'सहज सुचलेलं', 'बहर'- दै. आपला महाराष्ट्र, दि. ११-६-२०१७

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नक्षलवाद : बदलते स्वरूप

हिंसक माणिक 'सरकार'

ती तेव्हा तशी... भाग ४ पुन्हा अस्वस्थता