बात निकलेगी तो फिर...

अनेकदा आपल्या आयुष्यात अशा काही घडामोडी घडत असतात, की त्यामुळे आपण अगदी अस्वस्थ होतो. आणि ती अस्वस्थता आपल्या रोजच्या आयुष्याचा पार मोठा भाग व्यापून टाकते. त्यामुळे आपला रोजचा दिनक्रमचं अगदी बिघडून जातो.
आणि त्या घडामोडी काहीही असू शकतात. प्रेमात पडणं, प्रेमभंग होणं, जवळच्या व्यक्ती एकदम दुर होणं, ओळखीच्या व्यक्ती अचानक अनोळखी होत जाणं, आणि त्यात आपण एवढे अडकून पडलेलो असतो की विचारता सोय नाही. अगदी कधीही त्या घडामोडी आपल्यावर परिणाम करत असतात. म्हणजे स्थळ-वेळ-काळ याचं बंधनचं जणू त्यांना मान्य नसतं.
 मग अशा वेळी काफील अजहरनी लिहिलेली आणि जगजीत सिंगांनी गायलेली गझल आपल्या मनाचं अगदी यथार्थ वर्णन करते....



बात निकलेगी तो फिर दूर तलक जाएगी
लोग बेवजह उदासी का सबब पूछेंगे
ये भी पूछेंगे के तुम इतनी परेशान क्यों हो
उंगलीयाँ उठेंगी सूखे हुए बालों की तरफ

म्हणजे जर आपण अस्वस्थ झालोय, हे एकदा अन्यांना समजलं की मग त्यांचे प्रश्न सुरू होतात. प्रश्नांची सरबत्तीच असते ती.. त्याला काय उत्तर द्यावं, याचा  विचार करून आणखीनच गुंता वाढतो. कारण लोकांना आपल्या मनाची अस्वस्थता जाणून घेण्यात कमालीचा रस असतो. त्यात आपल्या अगदी छोट्या छोट्या गोष्टींकडे मग त्याचं लक्ष जायला लागतं, खरं तर जाणीवपूर्वक लक्ष द्यायला सुरूवात होते. कारण काहीही करून त्यांना आपल्या आयुष्यात नेमकं काय चाललंय, हे जाणून घ्यायचं असतं. आणि आपण मात्र एका वेगळ्याच विश्वात वावरत असतो...



एक नजर देखेंगे गुजरे हुए सालों की तरफ
चूडीयों पर भी कई तंज किये जाएंगे
काँपते हाथों पे भी फिकरे कसे जाएंगे

आणि हवं ते उत्तर आपल्याकडून मिळालं नाही तरी ते काही पिच्छा सोडत नाही ना... मग उत्तरर मिळवण्यासाठी अगदी आपला भूतकाळ खरवडून काढतात ती मंडळी, काहीतरी सापडेल या अपेक्षेने... त्या प्रकारात मग आपल्यावर तर टोमण्यांचा वर्षावच होत असतो, उपहासात्मक बोलणं तर छंदच होऊन जातो अन्यांचा... त्यात आपल्या कातर मनाचा विचार मात्र त्यांच्या मनात येतच नाही. त्यांना फक्त प्रत्येक गोष्टीबद्दल उत्तरं हवी असतात आणि ती उत्तर एकतर आपल्याकडे नसतात किंवा असली तरी त्यांना ती द्यायची नसतात आपल्याला.




लोग जालिम हैं हर एक बात का ताना देंगे
बातों बातों में मेरा जिक्र भी ले आएंगे
उनकी बातों का जरा सा भी असर मत लेना
वरना चेहरे की तासुर से समझ जाएंगे

मात्र ती उत्तरं मिळावी यासाठी लोकं काही थांबत नाहीत ना. म्हणजे काहीही करून त्यांना ती उत्तर हवीच असतात. मग बोलताना ते अशा एखाद्या व्यक्तीचा जाणीपूर्वक उल्लेख करता, त्यामुळे आपण पुन्हा अस्वस्थ होतो. मात्र त्यांच्या या बोलण्याचा खरं तर आपण त्रास करून घ्यायचा नसतो कारण त्यांना तेच तर हवं असतं. म्हणजे त्या व्यक्तीच्या उल्लेखाने आपण कसे अस्वस्थ झालो, आपल्या चेहऱ्यावरचे भाव कसे बदलले याकडे त्यांचं अगदी बारीक लक्ष असतं आणि त्यात झालेला अगदी लहानसाही बदल आणि त्यांना सर्व काही समजतं...


चाहे कुछ भी हो सवालात ना करना उनसे
मेरे बारे में कोई बात न करना उनसे

त्यामुळे या सर्व त्रासापासून वाचण्याचा आणि आपल्या विश्वात आयुष्य जगण्याचा एकच मार्ग असतो. तो म्हणजे त्यांच्याशी संवाद टाळणं... संवाद टाळला की प्रश्नही टळतात... आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या गोष्टीबद्दल, व्यक्तीबदद्ल त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संवाद न साधणे... जेणेकरून काही गोष्टी या आपल्यापुरत्याच राहतील...
काफिल अजहर यांनी अशा अगदी समर्पक शब्दात मनाची अवस्था मांडलीय... अगदी सहज, साधे आणि सोपे शब्द, पण त्यात जी जादू आहे ती काही औरच...
त्यात जगजीत सिंगांनी आपल्या जादूभऱ्या आवाजात ती गझल गायलीय त्याला तर तोडच नाही. आणि विशेष म्हणजे ती ऐकताना आपल्या मनातलचं आहे ‘अगदी असे उद्गार अगदी नकळत बाहेर पडतात...’

https://youtu.be/P_xUfzhXJVc

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नक्षलवाद : बदलते स्वरूप

हिंसक माणिक 'सरकार'

ती तेव्हा तशी... भाग ४ पुन्हा अस्वस्थता