तो बोल मंद हळवासा...
पुण्यात सर परशुरामभाऊ महाविद्यालयात शिकत होतो, २०१२ची गोष्ट. नुकत्याच नवीन झालेल्या दृकश्राव्य सभागृहात संध्याकाळी सहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमासाठी सव्वापाच वाजेपासूनच तिथे येऊन बसलो होतो. मांडलेल्या सर्व खुर्च्या रिकाम्या होत्या तरीही व्यासपीठासमोरच्या मोकळ्या जागेतच बसलो होतो, जेणेकरून अधिक जवळून त्यांना अनुभवता यावं.
आणि बरोबर सहा वाजता त्यांचं व्यासपीठावर येणं झालं. आजवर त्यांना वाढलेली दाढी आणि कधीकधी डोक्यावर हॅट या वेशात पाहीलेलं असल्याने थोडं वेगळं वाटलं. सुरुवातीला परिचय, सत्कार वगैरे सोपस्कार संपल्यावर त्यांनी माईकचा ताबा घेतला आणि पुढचे दोनेक तास ते मनमुराद बोलत होते आणि आम्ही अगदी तल्लीन होऊन ऐकत होतो.
ग्रेस उपाख्य माणिक सिताराम गोडघाटे या माणसाचं पहिलं दर्शन (आणि दुर्दैवानं शेवटचंही. कारण त्या कार्यक्रमानंतर अवघ्या आठेक दिवसातचं ग्रेस गेले !) या अशा पध्दतीने झालं. तोपर्यंत अनेकांकडून ग्रेसबद्दल ऐकलं होतं, काही कविताही वाचल्या होत्या त्यांच्या. त्यातून ग्रेस या व्यक्तीभोवती एखादं गुढवलय वगैरे आहे, असं वाटायला लागलेलं. त्या कार्यक्रमात ते खरं असल्याचं जाणवलंही. आणि मग दिवस मित्राने त्यांचा ‘संध्याकाळच्या कविता’ हा संग्रह वाचायला दिला (नंतर त्यातल्या कविता खास ‘ओल्ड माँक’सोबतही अनुभवल्या, त्याबद्दल नंतर कधीतरी) आणि ग्रेसबद्दलचं ते गुढ आणखीनच जाणवायला लागलं.
खरं तर ग्रेसचे शब्द अगदीच साधे असतात, म्हणजे तुम्ही आम्ही वापरतो, तसेच. पण ते शब्द जेव्हा ग्रेस वापरतात, तेव्हा त्यांच्याच एक वेगळीच जादू अवतरते. आणि ती जादू एक वेगळं जगचं तयार करते आणि त्या जगात आपण अगदी अलगद उतरतो. त्यात मनसोक्त फिरतो आणि त्या जगातून एकदम बाहेरही येतो. पण बाहेर आल्यावर जी हुरहूर लागते, तीला व्यक्त करायला शब्दचं नसतात. मग पुन्हा एकदा आणखी एखादी कविता निवडायची आणि ते सर्व पुन्हा एकदा अनुभवायचं व्यसनचं लागतं आपल्याला. तर ग्रेसची अशीच एक कविता- ‘भय इथले संपत नाही.’
तर ‘भय इथले संपत नाही’ हे काव्य पं. बाळासाहेब उपाख्य ह्रदयनाथ मंगेशकर यांचं संगीत आणि लता मंगेशकर यांच्या आवाजाने आणखीनच गुढ आणि आपलंस वाटायला लागतं. म्हणजे हे लिहीतांना ग्रेसच्या मनात नेमक काय असेल, याचा थांग लागणं तर अवघडचं. पण हे ऐकताना, वाचताना आपण त्याला स्वत:शी अगदी सहजपणे जोडून घेतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीने एखाद्या क्षणी लिहीलेली कविता आपल्याला भावते, यातचं त्यातलं सामर्थ्य लक्षात येतं.
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो तू मला शिकविली गीते
आपल्या प्रत्येकाच्या मनात अशी एखादी गोष्ट असतेच. ज्याबद्दल आपल्या मनात प्रचंड खळबळ होत असते. म्हणजे एखादा असा प्रसंग, अशी एखादी व्यक्ती की त्यात कुठेतरी काहीतरी चुक झालेली असते आणि त्याबद्दल एक अनामिक भीती आपल्या मनात असते. अर्थात भीतीसोबतच अनेक चांगल्या, मनाला भावणाऱ्या अशा आठवणीही असतातच. आणि संध्याकाळच्या वेळात बऱ्याचदा ते प्रसंग आपला ताबा घेतात आणि आपणही त्या आठवणींप्रमाणेच वागायला लागतो.
ते झरे चंद्र सजणांचे, ती धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण, झाडात पुन्हा उगवाया
आता या आठवणी अशा अचानक येतात आणि अचानक जातातही. म्हणजे त्यांची तीव्रता नेहमीच सारखे नसते. चंद्र जसा कलेकलेने वाढतो किंवा झरे जसे अगदी सहजतेने वाहतात, अगदी त्याच सहजतेने अशा आठवणी, व्यक्ती आपल्या स्मरणात येतच असतात. अर्थात हे सर्व आपल्या स्मरणकप्प्याचं वैशिष्ट्य. म्हणजे अगदी हळुवारपणे एक एक आठवण तो बाहेर काढतो. अर्थात त्या आठवणी काही कायमस्वरूपी राबत नाहीत सोबत. त्यासुध्दा कधीतरी त्या व्यक्तीप्रमाणेच सोडून जातात, अर्थात तोपर्यंत त्यांची जागा आणखी दुसऱ्या आठवणींनी, व्यक्तींनी घेतलेली असतेच. एकूणच आपणं मोकळे राहू नये, यासाठी हे चक्र अविरत सुरूच असतं.
तो बोल मंद हळवासा, आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला
हे मात्र अगदी खरयं. म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात असे काही प्रसंग असतात, व्यक्ती असतात की त्यांच्यामुळे आपल्या आयुष्यात एक वेगळीच चमक वगैरे असते. आणि त्यांच्याशी झालेला तो संवाद, ते अगदी मोजकं बोलण किंवा कधीकधी अगदी नजरेनेच झालेला संवादही खूप सुखावणारा असतो. म्हणजे तो अगदी साधासा जरी संवाद असेल तरी अगदी आयुष्यभर तो आपल्याला. यासाठी ग्रेसने सीतेचा वनवास आणि रामाचा शेला यांचा अगदी चपखल वापर केलाय, म्हणजे कल्पना करून बघा वनवासात सीता एकटीच रामाच्या आठवणीत दिवस काढतेय. हा वनवास कधी संपतोय आणि कधी रामाची भेट होतेय, याच विचारात सदैव. यावेळी सोबतीला आहे तो फक्त रामाचा शेला. त्यासोबतच सीता दिवस काढतेय. आता याजागी स्वत:लाही ठेवता येत. म्हणजे बघा ना, एखादा प्रसंग अगदी मनात घर करून बसलेला असतो, त्या प्रसंगात जे कोणी आपल्या सोबत असतात, ते आता अगदी दूर किंवा अनोळखी (?) झालेले असतात. आणि उरलेलं सारं आयुष्य आपण त्या मोजक्याच आठवणींसोबत काढणार असतो.
स्तोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख कुणाचे
हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे
मग हे प्रसंग पुन्हा जगता येणार नाहीत आणि व्यक्तीही कदाचित पुन्हा भेटणार नाहीत, ही जाणीव भयंकर अशीच असते. त्यामुळे त्यातून दु:ख हे साहजिकच येतं. आणि मग आपल्या प्रत्येक गोष्टीत थोड्याफार प्रमाणात को असेना, पण ते अगदी बेमालूमपणे मिसळून जातं. आणि सर्वांत महत्वाच्या असतात त्या आठवणी. आपण कितीही आणि काहीही प्रयत्न केले तर त्या विशिष्ट व्यक्तीच्या आठवणी काही संपत नसतात. म्हणजे अगदी दहा वर्ष जरी झाली असतील तरीही त्या अजिबात जुन्या होतचं नाहीत. अगदी कालपरवाचं घडल्यासारखं वाटतं सर्व. अर्थात त्या आठवणी मनातून जायला नको, असंही आपल्याला वाटतचं असतं. ज्याप्रमाणे अगदी टिपूर वगैरे पडलेलं चांदण जसं संपूच नये असं एखाद्या रात्री आपल्याला वाटतं असतं, अगदी तसंच या आठवणींचंही असतं हे नक्की.
छान लिहिलय.
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवासुंदर लेख आहे. 👍
उत्तर द्याहटवाअतिशय छान लिहलय
उत्तर द्याहटवा