गोष्ट बारीपाड्याची

“वनवासी कल्याण आश्रमाचा उद्देश म्हणजे गावं सक्षमतेने उभी करणे आणि त्यासाठी तिथेच माणूस घडवणे. जे काही करायचं ते गावानेच करायचं, तरुणांनी त्यासाठी वेळ हा दिलाच पाहिजे. हा विचार मनात रुजवण्याचे काम वनवासी कल्याण आश्रम करते. मला हे खूपच महत्वपूर्ण वाटते कारण मी सुद्धा याच व्यवस्थेतून उभा राहिलोय आणि गावासाठी काहीतरी वेगळ करू शकतो आहे”.               
वनवासी कल्याण आश्रम नेमकं करत काय ? हा प्रश्न चैत्रामभाऊंना विचारला असता अगदी थोडक्या शब्दात दिलेलं हे उत्तर.

बारीपाडा.. उत्तर महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील एक आदिवासी पाडा. धुळे, नाशिक आणि गुजरातमधील डांग या तीनही जिल्ह्यांच्या सीमेवर असलेला १००% आदिवासी पाडा. कोकणी, मावची/पावरा आणि भिल्ल या आदिवासी जमाती या पाड्यात आहेत. या पाड्यातील एक सुशिक्षित तरूण- चैत्राम पवार वनवासी कल्याण आश्रमाच्या संपर्कात आला आणि पाड्याच स्वरूपच बदलायला सुरुवात झाली.
बारीपाडा आणि वनवासी कल्याण आश्रम यांचा संपर्क येण्यापूर्वी बारीपाडा अन्य पाड्यांप्रमाणेच समस्यांनी ग्रस्त होतं- नैसर्गिक अनुकुलता असूनही पाण्याचे दुर्भिक्ष्य, त्यामुळे शेती नाही, पिण्याचे पाणी नाही, इतर उद्योगधंदे नाहीत, व्यसनाधीनता आणि गावातल्या लोकांची वेगवेगळ्या दिशांना असलेली तोंडे. एकूणच अतिशय निराशाजनक असं वातावरण. या अशा वातावरणात खरे तर कोणताही सुशिक्षित तरुण विचार करेल तो म्हणजे शहरात चांगली नोकरी शोधणे, शहरातच घर बांधणे आणि सुटी असली की चार दिवस गावात येऊन राहणे. अर्थात तसा मार्ग चैत्राम पवार यांच्याकडे चालूनही आला होता. पण त्याचवेळी पवार यांचा संपर्क त्याच भागात वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या डॉ. फाटक यांच्याशी आला. 

त्याबद्दल सांगताना चैत्राम पवार म्हणाले की, सुरुवातीला माझा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, वनवासी कल्याण आश्रम यांच्याशी अजिबात परिचय नव्हता. मी अगदी सर्वसामान्य कुटुंबातील आहे, समाजसेवा वगैरेंशी कधी संबंध आलेला नव्हता. मात्र आई वडिलांची आम्ही शिकावं अशी इच्छा होती. मी शिक्षण घेत असताना म्हणजे साधारणपणे १९९१-९२ च्या सुमारास माझा आमच्या भागात वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉ. आनंद फाटक यांच्याशी आला. डॉ. फाटक, रवी सहारे आणि शंकर राजपूत हे वारसा या जवळच्या गावात असणाऱ्या वनवासी कल्याण आश्रमाच्या केंद्रात कार्यरत होते. सुरवातीला आम्ही वनसमिती स्थापन केली, सोबतच ‘शबरी’ या नावाने बचत गटाचीही सुरुवात केली. सोबतच पारंपरिक चुलीला पर्याय म्हणून ‘निर्धूर चूल’ हा एक नवा उपक्रमही राबवण्याचा प्रयत्न केले. तेव्हा आम्हला बऱ्याच प्रमाणात अपयश आले. अर्थात प्रकल्प यशस्वी करण्यापेक्षाही लोकांपर्यंत पोहोचणे हा आमचा मुख्य उदेश होता. डॉ. फाटक हे आरोग्याचा क्षेत्रात काम करतच होते, त्या जोडीला सामाजिक क्षेत्रातही कामाला सुरुवात व्हावी, असा आमचा उद्देश होता. अशा प्रकारे माझा या संघटनांशी पहिला परीचय झाला आणि मी त्यांच्यातलाच एक भाग कधी बनलो ते समजलेही नाही.

कोणत्याही नवीन कामाला सुरुवात करण्यासाठी एक प्रेरणा आवश्यक असते, कारण अस कोणी तरी मार्गदर्शक हवा असतो जो आपल्याला हे सर्व करायला भाग पडेल. त्याबद्दल पवार म्हणतात, वनवासी कल्याण आश्रम, संघ याचं सर्वांत महत्वाच काम म्हणजे काहीतरी वेगळ करण्याची भावना जागृत करणे आणि राष्ट्रभावना जागृत करणे, कारण राष्ट्र असेल तरच आपण राहणार. अनेकदा काम करताना नैराश्याचेही प्रसंग येतात, काम करणेच बंद करावे असे वाटते. त्याचवेळी कोणीतरी संघाचा किंवा वनवासी कल्याण आश्रमाचा कार्यकर्ता येतो, पाठीवरून हात फिरवतो आणि पुन्हा कामाची उभारी मिळते. आम्हाला दिशा दाखवण्याच महत्ताव्च कार्य आज वनवासी कल्याण आश्रमाने केलं आहे.
यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, आदिवासी समाजासाठी आज खोलात जाऊन काम करण्याची नितांत गरज आहे. वनवासी कल्याण आश्रम आज बऱ्याच प्रमाणात अशा प्रकारचे काम करताना दिसते आहे. काम करताना विश्वास निर्माण होणेही गरजेचे असते. कारण विश्वास निर्माण झाल्याशिवाय काम यशस्वी होऊच शकत नाही.

आज बारीपाड्यात जल, जंगल, जन, जमीन आणि जनावर या पाच मुद्द्यांना समोर ठेवून काम सुरु आहे. आदिवासींचे जीवन याच बाबींशी निगडीत आहे.

जंगल व्यवस्थापन हा विषय बारीपाड्याने अतिशय महत्वाचा मानला आहे. जंगलामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष फायदा मोठ्या प्रमाणावर होतो. जंगल असल्यास पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते. परिणामी भूजल पातळी वाढून त्याचा शेतीसाठी फायदा होतो. आज बारीपाड्यात ११०० एकराच्या परिसरात सुमारे ७०% सागाचे जंगल आहे. त्याबद्दल चैत्राम पवार म्हणतात की, हे सागाचे जंगल म्हणजे आमच्या गावाचा बँक बॅलन्स आहे. जर या सागाच्या जंगलाची किंमत काढली तर ती आज काही कोटींच्या घरात जाईल. शिवाय गावाच्या वरच्या भागात असल्यामुळे पावसाळ्यात येणारे पाणी जमिनीत मुरते आणि गावाला पाण्याचा पुरवठा मुबलक प्रमाणात होऊ शकतो. त्यासाठी लोकसहभागातून बंधारेही बांधले आहेत. शिवाय या सर्व कामात शासनानेदेखील चांगली मदत केली.

तसे पाहिल्यास साग हे बाजारात उत्तम किंमत असणारे झाड. अनेकदा सागाच्या झाडांची अवैध कटाई, चोरी अशा अनेक घटना घडल्याचे आपण ऐकतो. बारीपाड्यात मात्र ११०० एकरात साग असूनही तसे काही घडत नसल्याचे चैत्राम पवार यांनी सांगितले- आम्ही यासाठी कडक असे नियम केले. मुख्य झाड तोडतांना कोणी सापडल्यास १०५१ रुपयांचा दंड, राखीव जंगलात बैलगाडी नेल्यास ७०० रुपयांचा दंड आणि चोरी पकडून देणाऱ्यास बक्षीस अशी व्यवस्था आम्ही केली आहे. जंगलाच्या रक्षणासाठी शासनाने रखवालदाराची नेमणूक केलेली असली तरी तो कधीही वेळेवर येत नाही. त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून एक रखवालदर ठेवला आणि त्याला आम्ही वर्षाला साडेसात क्विंटल धान्य देतो त्या बदल्यात तो जंगलावर लक्ष ठेवण्याच काम करतो. रखवालदर दरवर्षी बदलतो, जेणेकरून त्यानेही काही गैरप्रकार करू नयेत. गावाची जळणाची गरज भागवण्यासाठी वर्षातून वीस मोळ्या आणायचा नियम आम्ही सर्वांनी मिळून ठरवला. तेव्हा वर्षाला वीस मोळ्या पुरणार नाहीत, असे काही महिलांचे मत पडले. मग आम्ही काही घरांना सूर्यचुलीची ओळख करून दिली. आज सर्वच कुटुंब त्याचा वापर करत नसले तरी त्याबद्दल जागुती निश्चितच झाली आहे. आमचे हे प्रयत्न बघून शासनाने आम्हाला स्वतःहून एलपीजी गॅसचे कनेक्शन दिले. आज गावात ७५ कुटुंबांकडे  गॅस आहे. जनतेने सहभाग दाखवला तर शासनही त्याची दाखल घेतेच.

कोणतेही काम यशस्वी होण्यासाठी सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे लोकसहभाग. आज बारीपाड्यात जे काही घडतय ते लोकसहभागातूनच. मात्र चार लोकांना एकत्र आणून काही काम करणे हे फार अवघड असते, चैत्राम पवार यांनाही तो अनुभव आला, त्याबद्दल ते सांगतात, एक गोष्ट मान्य केली पाहिजे ती म्हणजे आदिवासी माणसाला एकत्र आणणे ही फार कठीण गोष्ट आहे. एकदा तो संघटीत झाला तर सहजासहजी विस्कळीत होत नाही मात्र विस्कळीत झाला तर पुन्हा एकत्र आणणे महाकठीण. त्यामुळे आम्हाला अगदी काळजीपूर्वक पावले टाकावी लागली. सर्वाना एकत्र आणण्यातच आमची किमान तीन ते चार वर्षे गेली.
हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. आज आदिवासी भागासाठी सरकारी पातळीवरून अनेक योजना आखल्या जात आहे, मात्र त्यांची अंमलबजावणी कदाचित सरकारी खाक्याने होत असावी, म्हणून आदिवासी त्यात जास्त सहभाग दाखवत नाही. आदिवासींना विश्वासाने एकत्र आणणे आणि त्यांची एकजूट टिकवून ठेवणे हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे.
एकूणच विकास साधत असताना त्यात महिलांचा असणारा सहभाग हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. बारीपाड्यात सुरुवातीला महिलांचा काहीही सहभाग नव्हता. नंतर अवघ्या चार महिलांनी थोडी रुची दाखवल्यावर त्यांना वनव्यवस्थापनात सहभागी करून घेतले. बचत गट ही संकल्पनाही फारशी प्रचारात आलेली नसताना १९९२मध्ये ‘शबरी महिला मंडळ’ या नावाने बचत गटाची सुरुवात केली, अर्थात त्यात बरेच यशापयशही आले. मात्र तसे असतानाही हा प्रकल्प यशस्वी झाला. आज पाच बचत गट अगदी यशस्वीपणे कार्यरत आहेत. विशेष म्हणजे पाचपैकी एकही गटाने अद्यापपर्यंत बॅंकेचे कर्ज आणि शासकीय योजना घेतलेली नाही. शिवाय बारीपाड्यातील बचत गट हे जरा वेगळ्या पद्धतीने चालवले जातात. वस्तूंचे उत्पादन करून त्यांच्या विक्रीवर भर देण्यापेक्षा पैसा साठवून तोच शेती किंवा अन्य बाबींसाठी वापरणे हा प्रमुख उद्देश आहे. आता बारीपाड्यात उत्पादित होणारा तांदूळ बचतगटांच्या माध्यमातून शहरी भागात विक्रीस आणण्याचा उपक्रम सुरु करण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले. 

जलसंधारण हा ग्रामविकासातील एक महत्वाचा मुद्दा. बारीपाडा आज पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला आहे. एकेकाळी कायमच पाण्याचे दुर्भिक्ष्य असणारा बारीपाडा आज आसपासच्या गावांना पाणी पुरवतो आहे. त्याबद्दल सांगताना चैत्राम पवार म्हणतात की, श्रमदानातून आम्ही ४८२ बंधारे बांधले. पिण्यासाठी, शेतीसाठी आणि वापरासाठी असे पाण्याचे सुयोग्य नियोजन केले. त्याचा परिणाम म्हणजे बारीपाड्याची भूजल पातळी तब्बल वीस फुटाने वाढली आहे. त्याचा थेट परिणाम शेतीवर झाला आहे. सुमारे २५० एकराचे क्षेत्र आज दुबार पेरणीखाली आणण्यात यश मिळाले आहे. तांदुळसोबतच आज स्ट्रॅाबेरीचेही उत्पादन बारीपाड्यात होते आहे.

शेतीमध्येही चैत्राम पवार यांनी अनेक नवनवे प्रयोग केले. जे पिक घ्यायचे आहे, त्याबद्दलच्या तज्ज्ञाला बारीपाड्यात बोलवून मार्गदर्शन घ्यायचे, अशी पद्धत त्यांनी अवलंबवली. त्यामुळे शेतकऱ्याना नव्या तंत्रांचे मार्गदर्शन मिळू लागले. त्यामुळे शेतीच्या पद्धतीत आमुलाग्र बदल झाला. ऊस, गहू आणि हरभरा यांचे उत्पादन त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाढले. सोबतच मधुमक्षिका पालनही सुरु झाले. परिणामी आदिवासी आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करायला लागला आहे.
जंगलाचे व्यवस्थापन, पाण्याचे नियोजन, सुधारणारी आर्थिक स्थिती याचा थेट परिणाम बारीपाड्याच्या आरोग्यावरही झालेला दिसतो. उपासमार पूर्णपणे थांबली आहे. कुपोषणाची समस्या सोडवण्यात बारीपाड्याने मोठ्या प्रमाणावर यश मिळवले आहे.

शिक्षण हा आणखी एक महत्वाचा मुद्दा. अन्य आदिवासी पाड्यांप्रमाणेच या ठिकाणीही शिक्षणाबद्दल प्रचंड उदासीनता होती- सरकारमध्ये आणि गावातल्या लोकांमध्येही. विद्यार्थी तर शिक्षक असणार याची खात्री नाही आणि शिक्षक असले तर विद्यार्थी असतीलच याची खात्री नाही. अशा परिस्थितीत चैत्राम यांनी एक अभिनव तोडगा काढला. तो म्हणजे दंड करण्याचा. परवानगी न घेता शाळेत अनुपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना एक रुपया तर शिक्षकांना ५१ रुपये असा दंड ठरवण्यात आला. ही कल्पना फारच यशस्वी झाली. मुले शाळेत जायला लागली परिणामी प्राथमिक शिक्षणात बारीपाडा १००% यशस्वी झाला आहे. 

व्यसनमुक्तीच्या बाबतीत मात्र बारीपाड्यात अजून काम होणे बाकी आहे. अर्थात त्याबद्दल विचारले असता चैत्राम म्हणाले की, प्रामुख्याने मोहाची दारू आदिवासी लोकं सेवन करताना दिसतात. अर्थात त्याला व्यसन म्हणायचे की नाही याबद्दल मी तरी साशंक आहे. कारण मोहाची दारू गळणे आणि तिचे सेवन करणे हे आदिवासींच्या सवयीचा एक भाग आहे. आज आजूबाजूच्या जंगलात सुमारे ४४३५ मोहाची झाडे आहेत. त्यामुळे प्रत्येक कुटुंब मोहाची फुलं साठवून ठेवतात आणि गरज पडेल तेव्हा त्याची दारू गाळतात. मात्र त्याचे सेवन करून कोणी शेतजमीन विकली, घरदार विकले, कुटुंबाकडे, मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले, असे प्रकार घडलेले नाहीत. त्यामुळे रूढअर्थाने याला व्यसन म्हणायचे की नाही हा प्रश्न आहे. तसे पाहिल्यास दिवसातून वीस कप चहा पिणे हे सुद्धा एक प्रकारचे व्यसनच आहे. लोकांची रोजची दिनचर्या पाहता प्रचंड कष्ट आणि त्यामुळे थोडा आराम मिळावा म्हणून स्वतःच दारू गाळून तिचे सेवन करणे आणि शांत झोपणे याला व्यसन कसे म्हणायचे ?

शौचालयांच्या बाबतीतही बारीपाड्यात फारसे यश मिळाले नाही. आजही येथील लोक उघड्यावरच शौचास जातात. त्याबद्दल सांगताना पवार म्हणाले की, सुरुवातीला ६६ शोषखड्ड्यांच्या शौचालयाची निर्मिर्ती केली होती. मात्र गावातल्या लोकांना शौचास जाण्याची ही पद्धत काही पचनी पडली नाही. परिणामी आम्ही या विषयात अपयशी ठरलो. आज शासनाच्या योजनेतून ३० स्वच्छतागृहे बांधली आहेत. सध्या सर्व स्वच्छतागृहांसाठी पाण्याची व्यवस्था देणगीतून आम्ही करत आहोत. त्यामुळे एकदा २४ तास पाणी उपलब्ध झाले की आपोआपच लोक त्याचा वापर करायला लागतील.
गावातील सामाजिक जीवनाबद्दल बोलताना चैत्राम म्हणतात, शहरात असणारे अनेक महत्वाचे प्रश्न आमच्या भागात अस्तित्वातही नाही. आज शहरी भागात ‘बेटी बचाओ’ सारखे अभियान राबवावे लागते, आमच्या गावात या प्रकाराला सर्व हसतात. आज बारीपाड्यात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे. गर्भलिंगचाचणीसारखे प्रकार अजिबात घडत नाहीत. आम्हाला वनवासी कल्याण आश्रमाच्या सहकार्याने सुरुवातीपासूनच डॉक्टर मिळाल्याने गावातील लोक आरोग्याबाबत जागरूक आहे. प्रत्येक घरात मछ्चरदाणी वापरली जाते. पाणी शुद्ध होण्यासाठी जीवनड्रोप वापरले जाते. बचतगटांच्या माध्यमातून लहान मुलांचे आरोग्य म्हणजे त्याची स्वच्छता, नखे कापणे, आंघोळ घालणे अशा अगदी साध्या साध्या गोष्टींमध्ये जागरूकता निर्माण केली. बारीपाड्यातील ७०% पुरुषांची नसबंदी झाली आहे. आरोग्याच्या क्षेत्रात आज मोठे यश मिळाले असल्याचे आपण म्हणू शकतो. विविध पुरस्कारातून मिळालेल्या रकमेतून आज दोन कम्युनिटी हॉल आणि बाहेरगावच्या पाहुण्यांसाठी राहण्यासाठी खोल्या बांधल्या आहेत.

बारीपाड्यात ‘वनभाजी महोत्सव’ हा एक आगळावेगळा उपक्रम घेतला जातो. जंगलात मिळणाऱ्या अनेक भाज्या आहेत की ज्यांच्याशी शहरी लोकांचा परिचयही नसतो. अशा महोत्सवाच्या माध्यमातून औषधी गुणधर्म असलेल्या भाज्या समोर मांडल्या जाता. सोबतच भाजी बनवण्याची पद्धत, त्यासाठी वापरलेले घटक आणि भाजीचे औषधी गुणधर्म पुढे आणले जाऊन त्यांचे जतन करण्याच्या उद्देशाने प्रयत्न केले जातात.

बारीपाड्याची दखल आज राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जात आहे. चैत्राम पवार यांना इटाली मधील International Fund for Agticultural Development या संस्थेने आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवले आहे. त्याशिवाय राज्य सरकारच २५ लाख रुपयांचे अनुदान, कै. वसंतराव नाईक सामायिक पुरस्कार, आदिवासी सेवा पुरस्कार, संत तुकाराम वनग्राम पुरस्कार असे पुरस्कार मिळाले आहेत. भारतातील अनेक अभ्यासक बारीपाड्याचा अभ्यास करण्यासाठी येत आहेत. आयआयटी पवई, दिल्ली, मद्रास आणि खरगपूर येथील विद्यार्थी खास अभ्यासासाठी येत आहेत. कॅनडा, अमेरिका, डेन्मार्क, जर्मनी यासह नऊ देशातील लोक बारीपाड्याला भेट देऊन गेले आहेत. हे सर्व श्रेय फक्त आणि फक्त वनवासी कल्याण आश्रमालाच आहे. वनवासी कल्याण आश्रमाने आमच्यात आत्मविश्वास निर्माण केला आहे. 
आश्रमाचे प्रमुख काम म्हणजे आदिवासींना स्वतःच्या पायावर उभे करणे. शासनाशी कसा संपर्क साधावा हे सर्वात महत्वाचे काम वनवासी कल्याण आश्रम आ नि संघाने शिकवले. एकेकाळी सरकारी कामांना घाबरणारा आदिवासी आत्मविश्वासाने सर्व गोष्टी करतो आहे. अन्य संघटनांशी जोडण्याचे कामही वनवासी कल्याण आश्रमाने केले आहे. सर्वात महत्वाचे काम म्हणजे ‘योजनांच्या मागे जायचे नाही तर योजना स्वतःहून आपल्याकडे आली पाहिजे’ हे सूत्र वनवासी कल्याण आश्रमाचे आहे. त्यासाठी आपसूकच गावातील लोक एकत्र येतात आणि नवीन काहीतरी करायला सुरुवात करतात. त्याची दखल सरकारदरबारी लगेच घेतली जाते. 

चैत्राम पवार म्हणतात, संघ आणि वनवासी कल्याण आश्रमाची मुख्य शिकवण म्हणजे ‘पैसा दुय्यम आहे, माणूस महत्वाचा आहे.’ आज हेच सूत्र डोळ्यासमोर ठेवून आम्ही वाटचाल करतो आहोत. भविष्यात बारीपाड्यात गोपालव, सामुदायिक शेती, सामुदायिक गोठा, बायोमास, सौरउर्जेचा जास्तीतजास्त वापर असे प्रकल्प हातात घ्यायचे आहेत.
या सर्व यशाचे प्रमुख सुत्रधार असलेले चैत्राम पवार म्हणजे अगदी निगर्वी आणि पाय जमिनीवर असलेले व्यक्तिमत्व आहे. वनवासी कल्याण आश्रमाची महाराष्ट्र प्रांत उपाध्यक्ष आणि देवगिरी प्रांत अध्यक्ष अशी जबाबदारी सांभाळत आहेत. केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाच्या उच्चस्तरीय सल्लागार समितीचे सदस्य आहेत. या सर्व यशाचे श्रेय ते गावातील लोकांची साथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि वनवासी कल्याण आश्रम यांना देऊन मोकळे होतात.
वनवासी कल्याण आश्रम ही संघटना लोकांमध्ये जाऊन त्यांच्यातूनच नेतृत्व उभे करण्यावर भर देतेने दिसते. परिणामी कायमस्वरूपाचे काम उभे राहते आहे. लोकामध्ये आत्मविश्वास निर्माण झाल्यामुळे होणारा विकास हा शाश्वत स्वरूपाचा होतो आहे.
चैत्राम पवार 
सागाचे वन 


टिप्पण्या

  1. अतिशय सुंदर शब्दांत तुम्ही बारीपाड्याची ओळख करून दिली आहे, धन्यवाद!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नक्षलवाद : बदलते स्वरूप

हिंसक माणिक 'सरकार'

ती तेव्हा तशी... भाग ४ पुन्हा अस्वस्थता