"बरे झाले, निवडणूक हरलो !"










"गेल्या बारा वर्षांपासून मी टीडीआरच्या व्यवसायात आहे. कोणतीही पार्श्वभूमी नसताना या व्यवसायात आलो. सामान्यपणे या व्यवसायाकडे समाज काहीशा वेगळया नजरेनेच पाहतो. टीडीआरवाले म्हणजे बदमाष अशीच प्रतिमा समाजात आहे. मात्र एवढया वर्षांत मी माझी सचोटी कधीच सोडली नाही. त्यामुळेच माझी एवढी उन्नती होऊ  शकली, समाजात एक वेगळे स्थान निर्माण करू शकलो. आता मला निवृत्तीचे वेध लागले आहेत. जास्तीत जास्त वेळ सामाजिक कार्यासाठी द्यायचा आहे.'' श्यामसुंदरजी म्हणाले.
श्यामसुंदर कलंत्री. टीडीआर व्यवसायातील पुण्यातील अनुभवी व्यक्ती. पुण्यातील गंगाधाम परिसरात असलेल्या त्यांच्या निवासस्थानी मुलाखतीच्या निमित्ताने जाणे झाले. श्यामसुंदरजी म्हणजे अनुभवांचा खजिनाच. सुमारे बारा वर्षांपासून ते टीडीआरच्या व्यवसायात आहेत. अगदी काहीशे रुपयांच्या व्यवहारापासून सुरुवात केलेला माणूस आज कोटयवधीची उलाढाल करतो आहे. टीडीआर व्यवसायातील खाचाखोचा हा माणूस कोळून प्यायला आहे. त्यांच्याशी बोलताना त्यांची व्यवसायातली वाटचाल आणि पुणे शहरातील टीडीआरविषयक अनेक गोष्टी समजल्या.
श्यामसुंदरजींचा जन्म अगदी सामान्य कुटुंबात झाला. त्याबद्दल ते सांगतात, ''राजस्थानमधल्या अगदी गरीब कुटुंबात मी जन्मलो. राजस्थान म्हणजे दुष्काळ आणि वाळवंट. अशा परिस्थितीत तिथे राहून प्रगती होणे शक्यच नव्हते. त्यामुळे माझे वडील राजस्थानातून महाराष्ट्रात पुण्यात आले. तेव्हा मी पाच वर्षांचा होतो. वडील घरात सर्वात मोठे, त्यांच्या मागे चार भाऊ  आणि चार बहिणी. अशा सर्वांना घेऊन ते एकदम अनोळखी प्रांतात आले. वडिलांनी सुरुवातीला 80 रुपये महिना एवढया पगारावर किराणा मालाच्या एका दुकानावर नोकरी सुरू केली. बाकीच्या कुटुंबानेही कोळशाचा व्यवसाय सुरू केला. त्या वेळी मी महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेतले, कारण ते विनामूल्य होते. मी बी.एस्सी.पर्यंत शिक्षण घेतले. त्या वेळी वडिलांनी सुरू केलेल्या गुळाच्या व्यवसायात वडिलांच्या सोबतीला व्यवसायात उतरलो.''
एका छोटया व्यापाऱ्याचा मुलगा कोणतीही पार्श्वभूमी नसताना टीडीआरसारख्या काहीशा जोखमीच्या व्यवसायात पाऊल ठेवतो आणि त्यात यशस्वीही होतो. या व्यवसायात ते कसे आले, हे सांगताना ते म्हणतात, ''वडिलांच्या गुळाच्या व्यवसायात मी मदतीला उतरलो. व्यवसाय चांगला वाढत होता, आम्हाला आर्थिक स्थैर्यही यायला सुरुवात झाली होती. मात्र व्यवसायातली परिस्थिती बदलल्यामुळे मी आणखी काहीतरी दुसरा व्यवसाय करण्याचे ठरवले. सुरुवातीला मी घरे खरेदी-विक्रीचा व्यवसाय छोटया प्रमाणात करत होतोच. पूर्वी पुण्यात टी.डी.आर.चा व्यवसाय मोजकेच लोक करत होते. त्यांच्यात मी सर्वात नवखा. हा व्यवसाय म्हणजे गुंड, बदमाश लोकांचा व्यवसाय असा समज समाजात असल्याने सुरुवातीला प्रत्यक्ष ट्रेडिंगकडे माझा कल नव्हता. कारण तेवढी आर्थिक जोखीम मला घ्यायची नव्हती आणि फारशी माहितीही  नव्हती. मग मी प्रामुख्याने ब्रोकरेजवर (दलालीवर) लक्ष केंद्रित केले. त्यात प्रामाणिकपणा आणि सचोटी माझ्या कामास आली. बांधकाम व्यावसायिकांचा माझ्यावर विश्वास बसला आणि हळूहळू व्यवसायात माझा जम बसायला लागला. त्यानंतर पुन्हा परिस्थिती बदलली, बांधकाम व्यावसायिक ब्रोकरेज द्यायला टाळाटाळ करू लागले. ज्याचा टीडीआर असेल त्याच्याशी थेट व्यवहार करायला लागले. त्यामुळे व्यवसायातली दलालांची गरजही कमी व्हायला लागली. मग मी आवश्यक ते भांडवल उभे करून स्वत:च टीडीआरच्या व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. आज माझी जी आर्थिक उन्नती झाली आहे, ती याच व्यवसायातून.
टीडीआरच्या व्यवसाय म्हणजे बदमाश लोकांचा व्यवसाय, असा समाजात समज आहे. त्यात अनेकांना टीडीआर म्हणजे नेमके काय, याची माहितीच नसते. टीडीआर म्हणजे ट्रान्स्फरेबल डेव्हलपमेंट राईट्स - हस्तांतरणीय विकास हक्क. टीडीआर म्हणजे एक प्रकारचे कागदी चलनच आहे. प्रत्येक शहरातील स्थानिक स्वराज्य संस्था शहराच्या विकासासाठी 'शहर विकास आराखडा' तयार करत असते. शहराची दहा वर्षांनी वाढणारी लोकसंख्या लक्षात घेऊन शहरात काय काय असावे - म्हणजे उद्याने, रुग्णालये, शाळा इत्यादीची आखणी त्यात केलेली असते. शहरातील विविध जागांवर या सुविधा दर्शविलेल्या असतात. मात्र शहरात मोकळया जागा फारशा शिल्लक राहिलेल्या नाहीत. पण मोकळी जागा नसेल तरीही या सुविधा देणे गरजेचे असते. उदाहरणार्थ, शहराच्या दाट लोकवस्तीच्या भागात अग्निशमन सुविधा देणे गरजेचे आहे, त्या वेळी उपलब्ध असलेल्या आणि नसलेल्या जागेवर प्रशासनास आरक्षण टाकण्याचा हक्क असतो. म्हणजे कोणाच्याही मिळकतीवर असे आरक्षण टाकता येते. असे आरक्षण पडलेली जागा मालकाला वापरता येत नाही. म्हणजेच ती व्यक्ती 'भूमिहीन' होते. झालेल्या नुकसानाची भरपाईही दिली जाते. भरपाई देण्याच्या तीन पध्दती आहेत - रेडी रेकनरच्या दराप्रमाणे रोख रक्कम देणे, एफएसआय म्हणजे चटईक्षेत्र निर्देशांक देणे आणि टीडीआर. एका ठिकाणच्या जागेचा सोडलेला हक्क दुसरीकडे वापरण्याची सोय म्हणजे टीडीआर. जागा जेवढी चौरस फूट असेल, तेवढा टीडीआर मिळतो आणि तो बाजारात विकण्याचीही परवानगी असते. विशेषत: बांधकाम व्यावसायिकांना हा टीडीआर विकला जातो, जेणेकरून त्यांना बांधकामात सोयीचे होईल. टीडीआरच्या व्यवसायात असणारे लोक ज्यांना असा टीडीआर मिळतो, त्यांच्याकडून बाजारभावाने विकत घेतात आणि तो बांधकाम व्यावसायिकांना गरज पडेल तेव्हा अधिक भावाने विकतात.''
कलंत्री यांना या व्यवसायात आज बारा वर्षे झाली आहेत. सुरुवातीच्या काळाबद्दल काही ते सांगतात - ''मी व्यवसायाला सुरुवात केली, तेव्हा सी झोनचा दर 200 रुपये आणि बी झोनचा दर 600 रुपये होता. त्यात 2% एवढे ब्रोकरेज मिळायचे. तेव्हा व्यवहारही मोठमोठे व्हायचे.
पुण्यात झोपडपट्टया मोठया प्रमाणात आहेत. त्यांच्या पुनर्वसनाचे प्रकल्प सात-आठ वषर्े झाली, तरीही पूर्ण होण्याच्या मार्गावर नाहीत. त्यामुळे टीडीआरचा भाव 200  रुपयांवरून वाढत आकाशाला भिडला आहे. आज पुण्याचा टीडीआरचा दर देशात सर्वात जास्त आहे. अशी परिस्थिती निर्माण व्हायला शासन आणि प्रशासन कारणीभूत आहेत. सरकारने यावर उपाय करणे गरजेचे आहे. आज झोपडपट्टी भागात बांधकाम व्यावसायिकांना प्रकल्प सुरू करताना मोठया प्रमाणात अडचणी येत आहेत, सरकारने त्यांना संरक्षण देण्याची गरज आहे.''
कोणताही व्यवसाय करताना अडचणी येतातच. श्यामसुंदरजींनीही अडचणींचा सामना केला आहे. अन्य व्यवसायांच्या तुलनेत टीडीआर व्यवसायात येणाऱ्या अडचणींचे स्वरूप जरा वेगळे असते. श्यामसुंदरजी म्हणतात, ''एक वर्षापूर्वी एका विकासकाकडून मी टीडीआर विकत घेतला. यात माझी बरीच मोठी रक्कम अडकली आहे. विकासकाने तोच टीडीआर सात-आठ वर्षांपूर्वी अन्य एका व्यक्तीला विकला होता, मात्र ठरलेली रक्कम विकासकाला मिळाली नव्हती. परिणामी न्यायालयाने त्या व्यक्तीचा टीडीआरवरचा दावा फेटाळून लावला होता. आम्हाला या प्रकाराची संपूर्ण कल्पनाही होती. मात्र विद्यमान सरकारच्या एका निर्णयामुळे तो टीडीआर अजूनही खर्च करता येत नाही. माझ्यासह अन्य चार ते पाच बांधकाम व्यवसायिकांचे पैसे यामुळे अडकले आहेत. वास्तविक पाहता न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करून मंत्रिमहोदयांनी निर्णय घेणे अपेक्षित आहे, मात्र तसे होताना दिसत नाही. अशा प्रकारच्या निर्णयांमुळे लोकांचा टीडीआरवरचा विश्वास उडतो आहे. कोणीही टीडीआर घेताना आज दहा वेळा विचार करतो आहे. तेव्हा सरकारने याचा पाठपुरावा करावा, असे सुचवू इच्छितो.''

टीडीआरचा व्यवसाय हा मोठया प्रमाणावर जोखमीचा व्यवसाय आहे. दबाव, धाकदपटशा हे तर या व्यवसायाचे अविभाज्य भागच आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. विशेषत: झोपडपट्टी पुनर्वसनाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या विकासकांना तर या प्रकाराचा मोठया प्रमाणावर सामना करावा लागतो. स्थानिक गुंड, स्थानिक नगरसेवक याचा प्रचंड दबाव असतो. जयंती, पुण्यतिथी, विविध सण, उत्सव यांना 'वर्गणी' द्यावीच लागते. आम्हा टीडीआर व्यावसायिकांनाही या वागण्याचा खूप त्रास होतो. आम्ही काही कामानिमित्त महानगरपालिकेत गेलो, तर आमच्याकडे विचित्र नजरेनेच पहिले जाते. त्यामुळे मी शक्यतो तिकडे जाणे टाळत असतो. मात्र असे असूनही मी प्रामाणिकपणा आणि सचोटी कधीच सोडली नाही आणि म्हणूनच मी आजवर या व्यवसायात यशस्वीरित्या टिकून आहे.''
श्यामसुंदरजी व्यवसायासोबतच सामाजिक कार्यातही अग्रेसर आहेत. पुणे महानगरपालिकेतर्फे दिला जाणारा सामाजिक कार्यासाठीचा गौरव पुरस्कार, व्यापारी एकता पुरस्कार, महेश सहकारी बँकेचा उत्कृष्ट संचालक असे पुरस्कार मिळाले आहेत. श्यामसुंदरजी पुण्यातील सर्वात मोठया महेश सांस्कृतिक भवन या मंगल कार्यालयाच्या संचालक मंडळावर गेली पंधरा वर्षे कार्यरत आहेत. त्याची संपूर्ण व्यवस्था तेच पाहतात. गेल्या वीस वर्षांपासून माहेश्वरी समाजातील लग्ने जमवण्याचे काम ते नि:शुल्क करतात. त्याच्या वडिलांनी या कामाला सुरुवात केली होती, त्यांचाच वारसा श्यामसुंदरजी पुढे नेत आहेत. महाराष्ट्रातील माहेश्वरी समाजातील विधवा आणि गरीब कुटुंबांना दरमहा एक हजार रुपये रक्कमही ते देतात. समाजातून त्यासाठी देणग्याही मिळवतात. सध्याचा दुष्काळ लक्षात घेता मराठवाडयातील बीड, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यात माहेश्वरी समाज आणि पूना मर्चंट चेंबर यांच्या सहयोगाने पिण्याच्या पाण्याचे टँकरही पुरवणार आहेत.
श्यामसुंदरजी हे मनाने पक्के 'भाजपाई' आहेत. गेल्या 30 वर्षांपासून ते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत. राजकारणातील त्यांच्या भूमिकेबद्दल ते सांगतात, ''1980  साली भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. साधारणपणे 1982 साली  माझे मित्र शंकर पाटील यांच्यामुळे मी भाजपामध्ये आलो. ज्या वेळी मी भाजपामध्ये जायचा निर्णय घेतला, तेव्हा 98% व्यापारीवर्ग हा काँग्रेस पक्षाशी जोडलेला होता. त्यांनी आणि माझे नातेवाईक, मित्रमंडळी यांनी तर मला वेडयातच काढले होते. मात्र अटलजी आणि अडवाणीजी यांचे विचार मला मनापासून भावले आणि हा नवीन पक्ष आहे, काहीतरी बदल नक्कीच घडवेल या विचाराने मी पक्षात आलो. विविध जबाबदाऱ्या मी पार पाडल्या आहेत.  माझ्याकडे नेहमीच 'कोषाध्यक्ष'पदाची जबाबदारी येते. माझी सचोटी आणि प्रामाणिकपणाच त्याला कारणीभूत असल्याचे मी मानतो. 1997  साली तत्कालीन उपमहापौर यांच्याविरोधात मी पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढवली. त्यात पक्षातूनच बंडखोरी झाल्यामुळे अवघ्या 98 मतांनी मी पराभूत झालो. मात्र मला याचा आनंदच वाटतो; कारण जर मी तेव्हा विजयी झालो असतो, तर मी व्यवसायात पडलोच नसतो आणि एक यशस्वी व्यावसायिक झालोच नसतो. त्यानंतर मी कधीच निवडणुकीच्या भानगडीत पडलो नाही.''
राजकारण म्हटले की त्यात डावपेच, कुरघोडया आल्याच. याचा सर्वाधिक फटका बसतो तो प्रामाणिक कार्यकर्त्यांना. त्याबद्दल श्यामसुंदरजी सांगतात, ''आज 30 वर्षांपासून मी पक्षाचे काम निष्ठेने करतो आहे. तेव्हा माझ्यासारख्या ज्येष्ठ आणि अनुभवी कार्यकर्त्यांची पक्षात योग्य दखल घेतली जावी अशी अपेक्षा आहे. आपले सरकार सत्तेवर आहे, तेव्हा व्यवसायात येणाऱ्या अडचणी कमी व्हाव्यात अशी अपेक्षा आहे.''
'स्मार्ट सिटी' योजनेत नुकताच पुण्याचा समावेश झाला आहे, त्याबद्दल ते सांगतात - ''स्मार्ट सिटी' हा शब्द फसवा आहे. वरवर तो आकर्षक वाटतो. मात्र पुण्यात त्याची कितपत अंमलबजावणी होईल, हे सांगणे अवघड आहे. हा प्रकल्प कागदावरच राहण्याची मोठी शक्यता आहे. स्पष्टच बोलायचे, तर पुणेकरांना अनेक वाईट सवयी आहेत - ते वाहतूक सुरळीत चालवत नाहीत, कचऱ्याचे व्यवस्थापन नीट होत नाही; महानगरपालिकेत टीडीआर आणि अन्य विषयांवर तातडीने निर्णयच घेतले जात नाहीत, बांधकाम व्यवसाय तर ठप्प झाल्यासारखाच आहे. 'स्मार्ट सिटी'साठी गतिमान प्रशासनाची आणि ठाम नेतृत्वाची गरज आहे, ते सध्या तरी दिसत नाही. त्यात महापालिकेत वेगळया पक्षाची सत्ता, राज्यात वेगळया पक्षाची सत्ता. एकूणच कोणाचा कोणाशी ताळमेळ नाही. अशा परिस्थितीत मी तरी 'स्मार्ट सिटी'चे स्वप्न पाहू शकत नाही.''
तरुणांनी उद्योग-व्यवसायात यावे, अशी आज देशात सर्वत्र मागणी होताना दिसते आहे. सरकार त्यासाठी अनेक योजनाही जाहीर करत आहे. श्यामसुंदरजी तरुणांना सल्ला देतात की, ''तरुणांनी व्यवसायात जरूर यावे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवावी, ती म्हणजे सध्या बाजारात प्रचंड मोठया प्रमाणात मंदी आहे. कोणताही व्यवसाय केला, तरी त्यात दोन ते तीन वर्षे फायदा होण्याची शक्यता धूसर आहे; उलट गुंतवलेली रक्कम बुडणार नाही, याचीच काळजी त्यांना घ्यावी लागणार आहे. धोका पत्करण्याची आणि परिश्रम करण्याची तयारी असेल, तरच तरुणांनी व्यवसायात यावे, असे मी सुचवेन. टीडीआरच्या व्यवसायाबद्दल बोलायचे तर आता नवीन धोरणांमुळे या व्यवसायाचे स्वरूप आमूलाग्र बदलले आहे. तेव्हा तरुणांनी काळजीपूर्वक निर्णय घेण्याची वेळ आहे.'

* साप्ताहिक विवेकच्या वर्धापनदिन अंकात प्रकाशित मुलाखत 

http://www.evivek.com/Encyc/2016/5/2/tdr.aspx#.VyiSUstX7qC

* शब्दखेळ

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हिंसक माणिक 'सरकार'

नक्षलवाद : बदलते स्वरूप

ती तेव्हा तशी... भाग ४ पुन्हा अस्वस्थता