कार्यकर्त्याचे भावविश्व जगणारा नेता


[चंद्रकांत पाटील यांची आजच महाराष्ट्र भाजप अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या व्यक्तीमत्वाचा वेध घेणारा हा लेख. सदर लेख दैनिक मुंबई तरुण भारतमध्ये 16 जुलै, 2016 रोजी प्रकाशित झाला होता.]

“चंद्रकांत पाटील यांचा सर्वात महत्वाचा गुण म्हणजे ते उत्तम संघटक आहेत. त्यांचे संघटनकौशल्य हे वादातीत आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम करत असताना त्यांना मी फार जवळून पाहीलंय. सरकारमध्येही आता ते उत्तम कामगिरी करणार, असा माझा विश्वास आहे”. रा. स्व. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख प्रा. अनिरुद्ध देशपांडे सांगतात.

सध्या महाराष्ट सरकारमध्ये चंद्रकांत दादा हे महसुल, मदत व पुर्नवसन आणि सार्वजनिक बांधकाम ही महत्वाची खाती सांभाळत आहेत. राज्याच्या मंत्रीमंडळातील ते एक ज्येष्ठ मंत्री आहेत. चंद्रकांत दादा यांचे नेतृत्व हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या विद्यार्थी संघटनेतून पुढे आले. विद्यार्थी संघटना म्हटली की संघर्ष हा आलाच. त्याचप्रमाणे दादांचे नेतृत्वही संघर्षातून तावून सुलाखून निघालेले असे ‘आंदोलनात्मक नेतृत्व’ आहे.

दादांच्या नेतृत्वाचे असे अनेक पदर सांगता येतात. त्याबद्दल प्रा. देशपांडे सांगतात की, त्यांना कोणत्याही समस्येची अचूक जाण, समस्या प्रथम समजावून घेणे आणि त्यावर नेमकी अशी भूमिका घेउन तो प्रश्न सोडवणे. शिवाय त्यांचे वक्तृत्वही अतिशय उत्तम आहे.
विद्यार्थी परिषदेचे काम करत असताना दादांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री आणि राष्ट्रीय महामंत्री या जबाबदाऱ्या सांभाळत असताना त्यांनी देशभर प्रवास केला. त्या काळातच त्यांचे नेतृत्व हे पुढे यायला सुरुवात झाली. विद्यार्थी परिषदेत असताना त्यांनी अनेक आंदोलने यशस्वी केला आहेत. विशेषत देशभरातील विद्यापीठांमधील निवडणूका परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर जिंकल्या, त्यात दादांनी केलेल्या नियोजनाचा सर्वांत मोठा वाटा होता. दिल्ली येथे परिषदेतर्फे काढण्यात आलेल्या मोर्चात महाराष्ट्रातून तब्बल दहा हजार विद्यार्थी सहभागी झाले होते, त्याचे नियोजनही दादांनीच केले होते.

दादा अतिशय साध्या कुटुंबातील व्यक्ती. राजकारणाची कोणतीही पार्श्वभूमी त्यांना नाही. असे असतानाही ते राजकारणात आले आणि यशस्वीही झाले. राजकारणात कोणी तरी गाँडफादर हवाच, त्याशिवाय राजकारणात यशस्वी होताच येत नाही. असा बऱ्याच लोकांचा समज असतो. तो समज दादांनी खोटा ठरवला आहे. दादांचे वडील मुंबईत गिरणी कामगार होते. ते मुळचे खानापूरचे. त्यांना चार बहिणी. अतिशय साधे आणि राजकारणाशी सुतराम संबंध नसणारे त्यांचे कुटुंब. त्यानंतर महाविद्यालयीन जीवनात त्यांचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी सबंध आला आणि ते लवकरच सक्रीय कार्यकर्ते म्हणून काम करायला त्यांनी सुरुवात केली.

दादांबद्दल बोलताना त्यांचे जुने सहकारी प्रमोद कुलकर्णी सांगतात की, चंद्रकांत पाटील हे अगदी सामान्य घरातून आले आहेत. परिषदेचे काम करताना मी दीर्घकाळ त्यांच्यासोबत होतो. विद्यार्थी संघटनेत कार्यकर्ता उभा करणे, हे अत्यंत महत्वाचे काम असते. ते दादांनी अतिशय समर्थपणे केले आहे. माणसांची काळजी घेणे हा त्यांचा अतिशय महत्वाचा गुण. कार्यकर्त्यांशी त्यांनी संघटनेपलिकडे मैत्री जपली. प्रत्येकाशी ते आपुलकीने बोलायचे, त्याच्या अडचणी, कुटुंबातील अडचणी, परिस्थिती हे सर्व समजून घेऊन त्यांनी काम केले. आजही ते याच पद्धतीने काम करत आहेत. मोठमोठी आव्हानं स्विकारणं हा दादांचा स्थायीभाव. कार्यकर्त्यांनाही त्यांनी मोठी स्वप्न पहायला शिकवले. कोणतेही काम करताना त्याचे बारकाईने नियोजन करतात. म्हणजे कामांची यादी बनविणे, त्यानुसार योजना आखणे अशी त्यांची कार्यपद्धती आहे. मुंबईत परिषदेने एका मोर्चाचे आयोजन केले होते. त्यावेळी संपुर्ण महाराष्ट्रातून सुमारे एक लाख कार्यकर्ते त्यांनी मुंबईत आणले होते.

कार्यकर्त्यांची काळजी दादा कशी घेतात त्यांचे आणखी एक उदाहरण. मिरज येथे झालेल्या दंगलीनंतर हजारो हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर विनाकरण खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यावेळी सर्व कार्यकर्त्यांसाठी कायदेशीर मदतीसाठी वकिलांची फौज उभी करणे, कार्यकर्त्यांना, त्यांच्या कुटुंबाला आधार देण्याच काम दादांनी सत्तेत नसतानाही केले होते.

दादा दक्षिण महाराष्ट्रासारख्या भारतीय जनता पक्षासाठी तुलनेने प्रतिकूल असलेल्या भागातून पदवीधर मतदारसंघातून निवडून येत आले आहेत. दक्षिण महाराष्ट्राचा विचार करता तेथे अनुकूल परिस्थिती नसतानाही दादांनी आपले काम सुरूच ठेवले आहे. त्या भागात प्रामुख्याने कॉंग्रेस, साम्यवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष आणि समाजवादी पक्षाचे प्राबल्य आहे. वर्षानुवर्षे ही मंडळी या भागात राजकीय वर्चस्व राखून आहेत. त्यांची मक्तेदारी मोडून यशस्वी होणे, ही मोठी गोष्ट आहे. मात्र आपल्यातील अंगभूत कौशल्ये आणि कार्यकर्त्यांची साथ यामुळे दादांनी ते लीलया करून दाखवले.
दादांचा शेती आणि सहकार या क्षेत्रात दांडगा अभ्यास. कोणताही प्रश्न, विषय अगोदर व्यवस्थित समजून घ्यायचा आणि मग त्यावर काम करायला सुरुवात करायची, या कार्यपद्धतीमुळे त्यांनी सहकार क्षेत्राचा बारकाईने अभ्यास केला आहे. राज्यात भारतीय जनता पार्टी सत्तेत आल्यावर सहकार खात्याचा कारभार सांभाळत असताना दादांना या अभ्यासाचा फायदा झाला. सहकार मंत्री म्हणून त्यांचे सर्वात महत्वाचे काम म्हणजे राज्यातील सुमारे ५०,००० ‘बोगस’ सहकारी संस्था त्यांनी बंद केल्या. ‘सहकारमहर्षी’, ‘सहकारधुरीण’ म्हणवणाऱ्या अनेकांना त्यामुळे मोठा धक्का बसला आहे. त्यातूनच काहींनी ‘भाजपाला सहकारातील काहीही समजत नाही’ अशी टिका करायला सुरुवात केली. अनेक सहकार सम्राटांनी नफ्यात चालणारे सहकारी साखर कारखाने तोट्यात दाखवून त्यांच्या विक्रीची परवानगी मिळवायची, ते कारखाने स्वतःच विकत घ्यायचे आणि नंतर तेच कारखाने नफ्यात चालवायचे, बोगस संस्था स्थापन करून कोट्यावधींची कर्जे घ्यायची, त्याद्वारे जिल्हा मध्यवर्ती बँकांवर ताबा ठेवायचा असे प्रकार सुरु केले होते. दादांनी सर्वप्रथम या गैरप्रकाराला आळा घातला. ‘त्यांना सहकार समजलाच नाही’ अशी टिका करणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षत घ्यावी, ती म्हणजे दादांनी कोणतेही गैरव्यवहार न करता सहकार क्षेत्रात काम केले आहे, त्यामुळे सहकार क्षेत्र अधिकाधिक विकसित, लोकाभिमुख आणि शेतकऱ्यासाठी कसे लाभदायक ठरेल असेच त्यांचे प्रयत्न असणार.

दादांचे व्यवसायातील सहकारी आणि ज्येष्ठ पत्रकार प्रशांत पोळ सांगतात की, माझा आणि दादांचा संपर्क १९९५ सालात व्यवसायाच्या निमित्ताने आला. तेव्हा मला प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे ‘हा माणूस प्रचंड सचोटीचा आहे’. दादांच्या कंपनीचे सेल्स स्टेक्स हे नेहमीच वेळेवर जमा व्हायचे. आर्थिक मंदीच्या काळात अडचण असतानाही ते वेळेवर जमा व्हायचे, त्याबद्दल तत्कालीन आयुक्तांनी दादांचा खास सन्मानही केला होता. शिवाय दादांना आपल्या सहकाऱ्यांची खूप काळजी घेतात. त्याच्याशी अगदी घरगुती संबंध ते जपतात. आता ते मंत्री असले तरीही त्यांच्या या स्वभावात फरक पडलेला नाही.


दक्षिण महाराष्ट्रातील ‘दैनिक ऐक्य’ चे संपादक वासुदेव कुलकर्णी म्हणतात की, दादांचे व्यक्तिमत्व हे अजातशत्रू आहे. कोणत्याही पक्षाचे नेता असो त्यांच्याशी राजकारणापलीकडेही संबंध जपणे त्यांना आवडते. त्यांचे कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. कार्यकर्त्यांच्या पाठबळावरच ते प्रतिकूल परिस्थिती असूनही यशस्वी ठरले आहेत. आज ते मंत्री झाले असले तरीही त्यांचे पाय जमिनीवरच आहेत. आजही ते कार्यकर्त्यांशी, सामान्य जनतेशी तितक्याच आत्मीयतेने बोलतात. हे सर्व संघाचे संघाचे संस्कार आहेत. दादांचे मोजक्या शब्दात वर्णन करायचे झाल्यास ‘कामाप्रती निष्ठा, निष्कलंक चारित्र्य आणि शेतकऱ्याचा कळवला असणारा कार्यकर्ता’ असेच करावे लागेल.

(पूर्वप्रसिद्धी- दै. मुंबई तरुण भारत, 16 जुलै, 2016)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नक्षलवाद : बदलते स्वरूप

हिंसक माणिक 'सरकार'

ती तेव्हा तशी... भाग ४ पुन्हा अस्वस्थता