तिसरं पात्र
![]() |
अमृता प्रीतम |
त्यानंतर मग कथेचं व्यसन लागतं आणि अधिकाधिक कथा वाचायला आपण सुरूवात करतो. मग जी. ए. कुलकर्णी, व. पु. काळे, पु. ल. देशपांडे, विजया राजाध्यक्ष, गौरी देशपांडे, सानिया, या आणि अशा अनेकांच्या कथा वाचतो आपण. त्यातलं वातावरण, पात्र, यात हरवून जातो. प्रत्येक कथा आणि त्यातलं वेगळेपण शोधायची सवय लागते आपल्याला. त्यातून आपण एकूणच समृद्ध होत असतो. ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकरांच्या विज्ञानकथा आपल्याला अगदीत सोप्या आणि रंजक शब्दात वैज्ञानिक संकल्पना समजावून सांगतात. एकूणच कथा हा प्रकार नसता तर आपलं भावविश्व एवढं समृद्ध आणि वैविध्यपूर्ण झालं असतं का ? तर या प्रश्नाचं उत्तर ‘नाही’ असंच आहे.
आता कथा म्हणजे काय, तर वास्तवाचा आधार घेऊन कल्पिताची केलेली निर्मीती. व्यक्तीची मनस्थिती, त्याचे मनोव्यापार, त्यांच्या आयुष्यात घडलेला एखादा प्रसंग किंवा अनुभव यांचं मोजक्या शब्दात केलेलं चित्रण. त्यात सर्वांत महत्वाची ठरतात ती त्यातली पात्र आणि त्यांची नेमकी असी मांडणी. कारण त्या पात्रांवरचं तर संपुर्ण कथा बेतलेली असते, म्हणजे पात्रांचं महत्त्व फार आहे कथेत. तर पात्रांबद्दल लिहायचं कारण म्हणजे अमृता प्रितम.
पंजाबीतल्या साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त श्रेष्ठ लेखिका अमृता प्रितम यांच्या निवडक हिंदी कथांचा संग्रह असलेलं ‘मेरी प्रिय कहानिया’ हे पुस्तक नुकतंच वाचलं. पुस्तकाच्या सुरूवातीला अमृता यांनी आपली ‘भूमिका’ स्पष्ट केली आहे. त्यांची ही ‘भूमिका’ अशासाठी श्रेष्ठ आहे कारण एखाद्या लेखकाने आपल्या कथा वाचकांनी वाचायच्या आधी त्याबद्दल असं सुंदर काही लिहिणं, त्यातही ‘पात्र’ या संकल्पनेवर लिहिणं फारसं कुठे आढळत नाही. पण ते वाचल्यावर एक समाधान मात्र नक्कीच मिळतं. फक्त कथा वाचण्यात मात्र ते समाधान फारसं मिळत नाही.
अमृता म्हणतात, “प्रत्येक कथेचं एक मुख्य पात्र असतं आणि जे कोणी त्यासाठीचं म्हणजे मुख्य पात्र असण्याचं कारण बनतं, ते कोणीही असू शकतं. त्याचा प्रियकर, वातावरण हे त्या कथेतलं दुसरं पात्र होय. त्यात मग कथेच्या ओघात येणारे लोग, प्रसंग, पात्र, त्यांच्या सवयी हे सर्व कथारूपी महालाच्या खिडक्याचं म्हणता येतील.” अतिशय तरल शब्दात त्यांनी हे सर्व वर्णन केलंय, कथा वाचताना त्यातल्या पात्रांबद्दल एवढा विचार करत नाही हे खरंय, अमृता त्याची जाणीव आपल्याला करून देतात.
कथेतल्या दोन पात्रांबद्दल बोलतानाचं त्या ‘तिसऱ्या पात्रा’बद्दल फार महत्त्वाचं सांगतात. आता आपल्या मनात ही कल्पना असते की लेखक हाचं तिसरं पात्र असेल, पण अमृता ते साफ नाकारतात. त्यांच्यामते कथालेखक हा ते ‘तिसरं पात्र’ असू शकत नाही. कथा लिहीतांना त्याला त्यापासून अलिप्त राहता येणं शक्य नसतंच, तो आपल्या पात्राचं मन ह्रदयात सामावून घेतो आणि त्याचे अश्रू आपल्या डोळ्यात. त्यामुळे तो ‘तिसरं पात्र’ असू शकत नाही.
तर हे ‘तिसरं पात्र’ म्हणजे वाचक. आता कथा वाचताना वाचक त्यात हरवले की ते स्वत:ला त्यात पाहत असतात. मग ते कधी त्यातलं मुख्य पात्र असतात तर कधी दुसरं पात्र. अर्थात कोणतं मुख्य आणि कोणतं दुय्यम याबद्दल प्रत्येकाच्या स्वतंत्र अशा कल्पना असतात.

अमृता यांच्यासाठी ते ‘तिसरं पात्र’ म्हणजे वाचक ! वाचकाला ‘तिसरं पात्र’ संबोधून अमृता यांनी आपल्या लिखाणासारखाचं वेगळेपणा दाखवलाय, त्या नेमंक काय म्हणतात हे हिंदीतचं वाचण्यात जास्त समाधान आहे- “कहानी का तीसरा अहम पात्र उसका पाठक होता है, जो उस कहानी को पहला बार लफ्जों में से उभरते हुए देखता है और उसके वजूद की गवाही देता है, और चाहे वह भी पात्र के मन को अपनी छाती में धडकते हुए सुन सकता है, पात्र के आँसू अपनी आँखों सें पोंछ सकता है, पर फिर भी उनका इपना अस्तित्व इतना-सा अलग जरूर रहात है की उसे कहानी का तीसरा पात्र कहा जा सकता है.”
वाचकाबद्दल एवढा विचार करून त्याला ‘तिसरं पात्र’ ठरवणं हे फार सुंदर आहे. म्हणजे एखाद्या कथेला वाचक अगदी कोऱ्या मनाने वाचायला सुरूवात करत असतो, त्यामुळे त्या कथेबद्दल त्याचं जे काय मत असेल त्यावर ती कथा अवलंबून राहणार, म्हणजे त्या कथेला वाचक आपल्या पध्दतीने सजवणार आणि त्याचा आनंद घेणारं. अमृता यांची ही संकल्पना एकूणच वेगळी आणि महत्त्वाची आहे कारण यात वाचकाला फार महत्त्वाची भूमिका पार पाडायची जबाबदारी त्यांनी दिलेली आहे.
● पूर्वप्रसिद्धी: 'सहज सुचलेलं', बहर, दै. आपला महाराष्ट्र, १० सप्टेंबर २०१७
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा