वो भी एक दौर था !
![]() |
गोष्ट 'पांझरा-कान'ची |
“साखर कारखान्याच्या सकाळी वाजणाऱ्या पहिल्या भोंग्याच्या आवाजाने त्यांचा दिवस सुरू व्हायचा आणि शेवटच्या भोंग्याने संपायचा. मळीचा वास त्यांच्या जीवनातला एक अविभाज्य असा घटक होता. साखर कारखान्याच्या वसाहतीत त्यांचं आयुष्य गेलं, त्या वसाहतींनी खरं तर त्यांचं आयुष्य समृद्धचं केलं. ‘आदर्श वसाहत’ असं त्याचं वर्णन केल्यास अतिशयोक्ती अजिबातच ठरणार नाही. जन्म, मृत्यू, बारसं, लग्न असं सर्व काही, आयुष्यातले छोटे निर्णय ते मोठे निर्णय असे सर्व त्यांनी साखर कारखान्याच्या सोबतीने घेतले. साखर कारखाना, साखर कारखाना वसाहती, राज्यातली सहकार चळवळ आणि त्याचा समाजावर झालेला परिणाम हा फार मोठा आणि महत्त्वाचा असा विषय आहे. तो विषय जगासमोर मांडून त्या ऐतिहासिक पर्वाची आठवण पुन्हा एकदा मला सिनेमाच्या माध्यमातून मला पुन्हा जीवंत करायची आहे.”
‘वो भी एक दौर था...’ या सिनेमांच टिझर जयंतने काही दिवसांपूर्वी पाठवलं. खान्देशातल्या पहिला साखर कारखाना म्हणजे आपल्या धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यातला ‘पांझरा-कान साखर कारखाना’. सध्या तो बंद आहे. त्याची कारणं अनेक आहेत. टिझर पाहिल्यानंतर त्याबद्दलची उत्सुकता वाढली आणि त्याबद्दल जयंतची भेट घेतली आणि ‘पांझरा-कान’ची गोष्ट ऐकली. जयंत सोनवणे, विकास गोडगे आणि आकाश चटके या तिघांनी हा विषय हाती घेतलाय, ‘आय. सी. स्टुडीओज’ सिनेमाची निर्मिती करणार आहे. ‘पांझरा-कान’ची गोष्ट ऐकताना हा सिनेमा फार महत्त्वाचा ठरणार हे नक्की !सिनेमाबद्दल जयंत म्हणतो, “लहानपणापासून मी कारखान्याच्या परिसरात वाढलोय. त्याबद्दलची सर्व माहिती, सर्व घटना मी जवळून अनुभवल्या आहेत, अनुभवतो आहे. या सिनेमाच्या माध्यमातून मला साखर कारखाने आणि एकूणच सहकार चळवळीबद्दल भाष्य करायचं आहे. सहकार चळवळीने महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि मनोरंजन विश्वात फार मोठे आणि महत्त्वाचे असे बदल घडवले आहेत. ते या सिनेमातून आम्ही दाखवणार आहोत. ‘पांझरा-कान’ मध्यभागी ठेवून सहकार चळवळ हा या सिनेमाचा विषय आहे.”
![]() |
जयंत सोनवणे |
जयंत हा सहकार चळवळीचा अभ्यासक आहे. सहकाराबद्दलचा जिव्हाळा आणि सामाजिक भान यामुळे तो या सिनेमाच्या विषयाकडे अधिक जबाबदारीने बघतोय. सहकार चळवळीबद्दल बोलताना तो म्हणतो, “सहकार चळवळीचा हेतू अतिशय विधायक असा होता. सहकारी साखर कारखान असो की सुतगिरणी, त्यांच्या प्रवर्तकांनी अतिशय उदात्त हेतू समोर ठेवून अभ्यापूर्ण रितीने कारखान्यांची उभारणी केली होती. आपलं सर्व आयुष्य, राजकीय, सामाजिक कारकीर्द त्यांनी पणाला लावली. मात्र प्रवर्तकांच्या पुढच्या पिढीला हे संचित टिकवता आलेलं नाही. उदारीकरणानंतर तर त्याला अधिकच अवकळा आली. सहकारी साखर कारखान्याच्या शेजारीच खाजगी कारखाना उभा राहिला. सहकारी कारखान्यात कमी भाव आणि खाजगी कारखान्यात जास्त भाव, यामुळे शेतकऱ्यांची द्विधा मनस्थिती झाली. आणि त्याची अखेर सहकारी साखर कारखाने हळुहळू बंद होण्यात झाली. या सर्व कालखंडात कारखान्याच्या उभारणीतल्या पहिल्या पिढीच्या मनस्थितीवर मोठा परिणाम झाला. यावर माध्यमांनी हवं तसं लक्ष दिलेलं नाही, सिनेमात या बाबी ठळकपणे मांडल्या जातील.”
मराठी सिनेमात सहकार चळवळीवर भाष्य करणारे फारसे सिनेमे नाहीत. जे आहेत त्यात अन्य विषयांसोबत सहकार, सहकार चळवळ, त्याभोवती फिरणारं राजकारण, समाजकारण असे विषय थोडक्यात मांडण्यात आले आहेत. ‘वो भी एक दौर था...’मध्ये या सर्व विषयांना सविस्तर मांडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सिनेमाच्या कथानकाबद्दल जयंत म्हणाला, “कथेत तीन नायक असतील. विविध कालखंडांचं ते प्रतिनिधित्व करतील"
साधारणपणे सत्तरच्या दशकात सहकारी साखर कारखान्यांच्या वसाहती निर्माण झाल्या. त्यांचं समाजीवन एक अभ्यासाचा विषय आहे. त्या अनुषंगाने सुरू झालेली नाट्यचळवळ, तमाशा, वगनाट्य यांनी सांस्कृतिक क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन घडवलं आहे. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे शिक्षणाच्या क्षेत्रात साखरशाळांची भूमिका. सहकारी चळवळीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. एकूणच सहकार चळवळ म्हणजे महाराष्ट्रांचं एक समृद्ध असं वैभव आहे, ते जयंत आणि टीम त्यांच्या सिनेमात व्यवस्थित मांडतीलचं.
●पूर्वप्रसिद्धी: 'सहज सुचलेलं', बहर, दैनिक आपला महाराष्ट्र, ३ सप्टेंबर २०१७
●पूर्वप्रसिद्धी: 'सहज सुचलेलं', बहर, दैनिक आपला महाराष्ट्र, ३ सप्टेंबर २०१७
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा