‘स्व’- रूपवर्धिनी – ‘माणूस’ घडवणाऱ्या प्रयोगशाळेची गोष्ट




राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हजारो कार्यकर्ते आज देशभरात वेगवेगळ्या माध्यमातून समाज घडविण्याचे काम करत आहेत. काही प्रचारक म्हणून, काही संघ परिवारातील संस्थांमधून तर काही स्वतंत्र संस्था स्थापन करून.
अशीच एक संस्था म्हणजे ‘स्व’-रुपवर्धिनी. हि फक्त संस्था नाही, तर हि आहे माणूस घडवणारी प्रयोगशाळा. आजपर्यंत या संस्थेबद्दल खुप ऐकल होतं, त्यामुळे मंगळवार पेठेत असलेल्या या संस्थेस प्रत्यक्ष भेट दिली. संस्थेच्या शिरीष पटवर्धन यांच्याशी अगदी मनमोकळ्या गप्पा मारल्या. या गप्पांमधूनच या प्रयोगशाळेची गोष्ट उलगडत गेली.
१९७९ साली आंतरराष्ट्रीय बालक वर्षाचे निमित्त साधून या आगळ्यावेगळ्या प्रयोगशाळेची स्थापना केली ती किशाभाऊ पटवर्धन यांनी. पेशाने शिक्षक असलेले किशाभाऊ संघ प्रचारकही होते. त्यामुळे समाजात मिसळून काम करणं त्यांना नवीन नव्हतं. ही संस्था स्थापन करण्यामागे किशाभाऊंनी एक विशिष्ट असा विचार समोर ठेवला होता, कारण संस्था स्थापन करून, देश विदेशातून देणग्या जमवून ‘दुकान’ चालवण त्यांना जमणारच नव्हतं. किशाभाऊ हे मंगळवार पेठेतील एका शाळेत मुख्याध्यापक होते. शाळेतल्या विद्यार्थ्यांशी त्याचं शिक्षकापलीकडच एक घरासारखं नात होत.
मंगळवार पेठेचा हा भाग प्रामुख्याने कामगार वस्तीचा आहे. या भागात झोपडपट्टीचे प्रमाण जास्त आहे. झोपडपट्टीसोबतच येणारे सामाजिक, आर्थिक प्रश्न, व्यसनाधिनता, स्त्रियांचे प्रश्न, मुलांकडे दुर्लक्ष आणि या सर्वांचा परीपाक म्हणजे गुन्हेगारी असे प्रश्न या भागातही मोठ्या प्रमाणावर होते. या सर्व प्रश्नांना किशाभाऊ अगदी जवळून अनुभवत होते. मात्र या स्तरातील मुलांमध्येही बुद्धिमत्ता आहे, फक्त त्याला योग्य वळण देण्याच काम कराव लागेल, यावर त्यांचा ठाम विश्वास होता. त्यातूनच त्यांनी ठरवल की या बुद्धिमान मुलांना निवडून त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी काम करायचं. त्यासाठी काय करायचं, हे सुद्धा त्यांनी ठरवल होतं. कारण त्यांना ‘शाळा’ चालवायची नव्हती तर शाळेपेक्षाही मुलांना वेगळ काहीतरी देणारं साधन त्यांना निर्माण करायचं होतं.
सुरुवातीला त्यांनी वस्तीतल्या १२ मुलांची निवड करून कामाला सुरुवात केली. रोज संध्याकाळी शाळा सुटल्यावर ‘एक तास खेळ आणि दोन तास अभ्यास’ असे त्याचे स्वरूप होते. तस पाहायला गेलो तर अगदी सोपं काम, मात्र याद्वारे त्यांनी मुलांच्या कुटुंबाशी जवळीक वाढवली, त्यांचे नेमके प्रश्न समजून घेतले. कारण मुलांच्या कुटुंबातील वातावरणाचाच मुलांवर सर्वाधिक प्रभाव पडत असतो. त्यामुळे या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन मुलांचे व्यक्तिमत्व घडविणे, हे या संस्थेचे प्रधान कार्य आहे.
या अगदी सध्या वाटणाऱ्या कामामधूनच आज मल्लखांबाचा राष्ट्रीय प्रशिक्षक तयार झाला आहे, तो म्हणजे संतोष घाडगे. या संतोषची कहाणी ऐकून हि संस्था नेमकं काय करते, ते अधिक नेमकेपणाने समजेल. ‘संतोष हा अतिशय गरीब घरातला. वडिलांना दारूचे प्रचंड व्यसन, आई इतरांकडे घरकाम घरकाम करणारी, त्यामुळे घराकडे दुर्लक्षच. त्यात संतोष स्वभावाने अतिशय बंडखोर. वर्धिनीच्या एका शिबिरात तो सहभागी झाला, शिबिराचा विषय होता – क्रीडाकौशल्य. त्यामध्ये काही मुलांकडे क्रिडाक्षेत्रासाठीचे विशेष नैपुण्य असल्याचे आमच्या लक्षात आले. त्यात संतोषही होताच. त्या शिबिरानंतर संतोषने निगडीतल्या ज्ञानप्रबोधिनीच्या निवासी शाळेत हट्टाने आणि स्वतःच्या गुणवत्तेवर प्रवेश मिळवला. त्यानंतर मल्लखांबात प्रथम विभागीय पाळतीवर त्याने यश मिळवलं आणि त्यांनतर क्रमाक्रमाने पुणे विद्यापीठाचा कप्तान, महाराष्ट्र राज्याचा कप्तान असं यश त्याने मिळवलं. आज प्रशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या संतोषने एवढी सुवर्णपदकं मिळवली आहेत की तो ‘शिवछत्रपती’ पुरस्कारास पात्र आहे’. आता जरा विचार करा की, जर संतोष ‘स्व’-रुपवर्धिनीच्या संपर्कात आलाच नसता तर ?
आज ‘स्व’-रुपवर्धिनीच काम अतिशय निस्वार्थ भावनेने चालू आहे, ‘आपण समाजावर फार मोठे उपकार करतोय’ या भावनेचा लवलेशही त्यात नाही. ‘स्व’-रुपवर्धिनीच्या मुळाशी असलेली संघाची शिकवणच त्याला कारणीभूत आहे.
प्रत्येक चांगल्या कामाला ज्याप्रमाणे अडचणी येतात तशीच अडचण ‘स्व’-रुपवर्धिनीलाही आली, ती पण अगदी सुरुवातीलाच. ज्या शाळेचे वर्ग आणि मैदानाचा वापर करत होते, त्याची परवानगी महापालिकेने नाकारली. कारण अर्थातच राजकीय होतं. पण किशाभाऊंनी त्यावरही तोडगा काढला. त्यांनी मुलानांच विचारल की आता काय करायचं ?. त्यावर मुलं म्हणाली की आपण रस्त्यावरच काम करायचं. आ नि मग तब्बल दोन वर्षे रस्ता, फुटपाथ, मंदिर, गोठा, कडब्याची पोती, सायकलचे दुकान अगदी जिथे जागा मिळेल तिथे खेळ आणि अभ्यास सुरूच राहिले. मात्र यातूनच ‘स्व’-रुपवर्धिनीसाठी हक्काची जागा असावी हि इच्छा बळकट झाली.
मंगळवार पेठेत एक जागा रिकामी होती, कारण त्या जागेच्या समोर होती झोपडपट्टी आणि मागे नाला. जागा ताब्यात आल्यावर इमारत किती मजली बांधायची यावर कुणाचेच एकमत होत नव्हते, कारण तेव्हा शाखा आणि अभ्यास असं फक्त तीन तास काम चालायचं आणि या लोकांना शाळा तर चालवायची नव्हती आणि इमारत अन्य कारणांसाठीसाठी भाड्यानेही द्यायची नव्हती, तेव्हा दोन अथवा चार मजली इमारत बांधून करायचे काय हा प्रश्न उभा राहिला. त्याच वेळी शाखेतल्या मुलांनी आसपासच्या झोपडपट्टीमध्ये एक सर्वेक्षण केलं, त्यात त्यांना अस आढळून आलं की, या वस्त्यांमधली ३ ते ५ या वयोगटातली सुमारे ५८% मुल बालवाडीत गेलेली नाहीत, आणि सर्वांनी ठरवलं की सर्वप्रथम सुरू करायची ती बालवाडी. आज सत्तावीस वर्ष झाले बालवाडी सुरु आहे आणि सुमारे सहा हजार विद्यार्थ्यांनी या बालवाडीत आपल्या शिक्षणाला सुरुवात केलीय आणि करत आहेत.
मुलांना मिळणारे शिक्षण पाहून मुलांच्या आयांनाही काहीतरी कराव असं वाटायला लागलं आणि त्यातूनच मग ‘स्व’-रुपवर्धिनीने खास त्यांच्यासाठी १९८९ साली शिवणकामाच प्रशिक्षण सुरू केलं आणि स्त्रियांनाही सक्षम बनविणे ही आणखी एक जबाबदारी आनंदाने स्वीकारली. त्यातूनच मग पुढे ‘बेसिक टेलरिंग’, ‘fashion डिजाईनिंग’ ‘परिचारिका प्रशिक्षण वर्ग’ असे विविध वर्ग सुरु झाले. यामुळे आज विधवा, परित्यक्ता महिला अतिशय सन्मानाने आयुष्य जगत आहेत. त्यांच्या कुटुंबात त्यांना आता सन्मान मिळायला लागलाय, कुटुंबाच कर्तेपण आता महिलांकडे आलयं. बालवाडीपासून सुरु झालेलं ‘स्व’-रुपवर्धिनीच काम आता खूप विस्तारलयं.
·         बालवाडी
·         व्यवसायिक प्रशिक्षण वर्ग
·         परिचारिका प्रशिक्षण वर्ग
·         बालवाडी प्रशिक्षण वर्ग
·         शिवणकाम प्रशिक्षण वर्ग
·         Fashion Desigining
·         महिला आणि बालकांसाठी आरोग्य केंद्र
·         महिला साक्षरता वर्ग
·         संगणक प्रशिक्षण
·         संस्कार वर्ग
·         महिला बचत गट
·         समुपदेशन केंद्र
·         अभ्यासिका
·         स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग
‘स्व’-रुपवर्धिनीने २००० सालात ‘स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग’ सुरु केले. यामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विनामुल्य शिकवणी दिली जाते, त्यासाठी खास शिष्यवृत्तीची योजनाही राबली जाते. गेल्या वर्षी ‘स्व’-रुपवर्धिनीचे सुमारे ८० विद्यार्थी अधिकारी झालेत. आज ‘स्व’-रुपवर्धिनीचे शेकडो विद्यार्थी प्रशासनात जाऊन ‘स्व’-रुपवर्धिनीच्या शिकवणीप्रमाणे मूल्यांना धरून आपले काम अतिशय प्रामाणिकपणे करत आहेत.
आता ‘स्व’-रुपवर्धिनीने आपल्या कामाचा विस्तारही सुरु केला आहे. पुण्याबाहेर साताऱ्यात उपकेंद्र सुरु होत आहे, सोलापूर आणि लातूरमध्येही त्याच दिशेने वाटचाल होते आहे. हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रातही ‘स्व’-रुपवर्धिनी चा नक्कीच विस्तार होईल.
अतिशय प्रतिकूल परिस्थितीतल्या विद्यार्थ्यांच्या मनात एक आत्मविश्वास आज ‘स्व’-रुपवर्धिनी निर्माण करते आहे. त्यासाठी कविताची कहाणी आपण ऐकलीच पाहिजे. ‘दहावीत असलेल्या कविताच तिच्या वडिलांनी आणि आजीने अचानक लग्न ठरवलं. कविता ‘स्व’-रुपवर्धिनीत आली आणि म्हणाली, मला हे लग्न मान्य नाही, माझा उद्या साखरपुडा आहे आणि तो झाला तर मी जीव देणार. तेव्हा ‘स्व’-रुपवर्धिनीने प्रथम तिच्या आई आणि भावाला समजावून सांगितल, मात्र काही उपयोग होत नाही हे समजल्यावर त्यांनी मुलीला सांगितल की आता आपल्याला पोलिसात तक्रार करावी लागेल, तुझी तयारी आहे का ? त्यावर कविताने तिच्या कुटुंबाविरोधात पोलिसात तक्रार दिली. पोलिसी खाक्या दाखवल्यावर अखेर तिचे वडील आणि आजी भानावर आले आणि तीच लग्न त्यांनी थांबवल. त्यानंतर कविताने आपण शिक्षण पूर्ण केलं आणि आज ती सरकारी खात्यात अधिकारी म्हणून कार्यरत आहे.’
आता हा आत्मविश्वास कवितामध्ये कुठून आता ? ‘स्व’-रुपवर्धिनी हेच त्याच उत्तर आहे. ‘स्व’-रुपवर्धिनीबद्दल किशाभाऊ म्हणायचे – ‘हे संघाच Deposite आहे, आपण त्याच व्याज तरी द्यायलाच हवं !’
आज असे शेकडो संतोष आणि कविता यांना ‘स्व’-रुपवर्धिनीने घडवलं आहे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला आहे. त्यांच्यात उच्च मुल्ये रुजवली आहेत. आज ‘स्व’-रुपवर्धिनीचे विद्यार्थी आपापल्या क्षेत्रात अतिशय यशस्वीपणे कार्यरत आहेत. ‘स्व’-रुपवर्धिनी नसती तर देश अशा गुणवान व्यक्तींना मुकला असता.
खऱ्या अर्थाने ‘स्व’-रुपवर्धिनी ही एक प्रयोगशाळा आहे, माणूस घडवणारी प्रयोगशाळा !





टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नक्षलवाद : बदलते स्वरूप

हिंसक माणिक 'सरकार'

ती तेव्हा तशी... भाग ४ पुन्हा अस्वस्थता