यहा के हम सिकंदर.....


लहान असतांना आपणा सर्वांनाच ‘हॉस्टेल’ बद्दल भीतीयुक्त आकर्षण असतं....! आपल्या सर्वांनाच आई बाबांनी एकदा तरी ‘तुला होस्टेलमध्ये ठेवल पाहिजे’ अशी तंबी दिलेली असते आणि त्यामुळे आपण काही दिवस तरी अगदी सुतासारखे सरळ वागायचो.
तर ‘हॉस्टेल’ नावाच्या शब्दात एक वेगळीच जादू आहे, वेगळीच नशा आहे. आयुष्यात एकदा तरी घरापासून दूर, आपल्या नेहमीच्या अगदी सुरक्षित जीवनशैलीपासून दूर जात ‘हॉस्टेल लाईफ’चा अनुभव हा घेतलाच पाहिजे.
दहावी किंवा बारावी नंतर पहिल्यांदाच घर सोडल्यानंतर ‘हॉस्टेल’ किंवा रूम शोधून त्यात राहायची सोय केली जाते. होस्टेलवरच्या पहिल्या काही दिवसांची अवस्था ‘क्या करे क्या ना करे’ अशी असते. रूममध्ये आधीच असलेल्या मुलांशी सुरूवातीला अगदीच संवाद नसतो, कारण प्रत्येक जण आपला ‘Ego’ आणि ‘Attitude’ सांभाळत असतो.
पण नंतर एकमेकांशी इतकी चांगली ओळख होते आणि आपल्या ‘happy days’ना प्रारंभ होतो. हॉस्टेलमध्य आपल्याला भिन्न भिन्न भागांतले, भिन्न भिन्न भाषांचे असंख्य मित्र भेटतात. सोबत राहतांना एक वेगळाच आत्मविश्वास आपल्याला मिळतो. घरी असतांना अगदी साध्या साध्या गोष्टी करायला घाबरणारे, संकोचणारे आपण अगदी ‘बिंधास’ होऊन जातो.
हॉस्टेल लाईफमध्ये आपली कोणतीच गोष्ट ‘प्रायव्हेट’(!) राहत नाही. रूमालापासून ते प्रेमापर्यंत आणि आनंदापासून ते ताणतणावापर्यंत. सर्वच गोष्टी साग्रसंगीत साजऱ्या केल्या जातात. एखाद्याने नवीन कपडे घेतल्यावर रुममेट हमखास त्यांच उद्घाटन करतात. कोणाला कोण आवडतयं यावर अगदी पद्धतशीर ‘पाळत’ ठेवली जाते, त्याच्या मोबाईलवर पद्धतशीर लक्ष ठेवल जातं आणि मग एक दिवस त्याची जाहीर कबुली द्यायला लावून मस्तपैकी पार्टी उकळली जाते. हेच रुममेट कोणी आजारी पडलं कि अगदी ‘दिलसे’ काळजीही घेतात.
‘हॉस्टेल लाईफ’मधली रूमची परिस्थिती हा एक संशोधनाचा विषय आहे. रूममध्ये गेल्या-गेल्या प्रथम आपल स्वागत करतात ते लटकलेले कपडे. जे १५ (किंवा जास्त !) दिवसांपासून धुतलेले नसतात!. भिंतीवर आपले आयडियल्स चिकटवलेले असतात.एखादा इन्स्पीरेशनल थॉट खरडलेला असतो. फिल्मी मासिकातली आपली आवडती अभिनेत्री असते. एकंदरीतच ‘भारावून’ टाकणार वातावरण असतं.
‘मेस’ हा आणखी महत्वाचा विषय. ज्या पदार्थाला घरी हातही लावत नसतो तो पदार्थ मेसमध्ये अगदी आवडीने खायला लागतो आपण. बटाटा, फ्लॉवर, वांगी या भाज्या मेससाठीच निर्माण झाल्या आहेत, यावर आपला ठाम विश्वास बसायला लागतो. कंटाळा आल्यावर मेस बदलण्याचे अनेक प्रयोग केल्यानंतर ‘सर्व मेस ची रेसिपी एकसारखीच असते’ या वैश्विक सत्याप्रत आपण येऊन पोहोचतो.
हे सर्व असलं तरी हॉस्टेललाईफ कडून एक महत्वाची गोष्ट शिकायला मिळते ती म्हणजे ‘Adjustment’. जी आपल्याला संपूर्ण जगात उपयोगी पडणार असते. हॉस्टेललाईफमुळे आपल्या व्यक्तिमत्वाला एक वेगळीच झळाळी मिळते. कुठेही आणि कशाही परिस्थितीत ठामपणे उभं राहायचं बळ आपल्याला मिळतं आणि यशाचा एक दुर्दम्य आशावादही मिळतो.
त्यामुळे एकदा तरी हॉस्टेललाईफ अनुभवा आणि म्हणा ‘यहा के हम सिकंदर’ !.
(२८/४/२०१२ रोजी दैनिक ‘सामना’मध्ये प्रकाशित झालेला लेख.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नक्षलवाद : बदलते स्वरूप

हिंसक माणिक 'सरकार'

ती तेव्हा तशी... भाग ४ पुन्हा अस्वस्थता