आपलं दूरदर्शन

काल खूप दिवसांनंतर दूरदर्शनवर 'मिले सुर मेरा तुम्हारा' ऐकलं आणि जुन्या आठवणी ताज्या झाल्या..... सुमारे दहा ते बारा वर्षांपूर्वी जेव्हा केबलचा इतका प्रसार झाला नव्हता तेव्हा दूरदर्शनच आपलं मनोरंजन करतं होत, दूरदर्शनचा लोगो, त्याचं ते थीम साँग या साऱ्या गोष्टी अगदी अप्रतिम होत्या. आठवतयं मित्रांनो... रविवारच्या सकाळची सुरूवात हेमा मालिनी यांच्या 'रंगोली' ने व्हायची आणि नंतर 'श्रीकृष्ण' मालिका बघूनच आपली आंघोळ व्हायची. दूरदर्शनवर लागणाऱ्या मालिकाही अतिशय दर्जेदार होत्या, आजच्या उथळ आणि भपकेबाज मालिकांची त्यांच्याशी बरोबरी होऊच शकत नाही. शनिवारी लागणाऱ्या 'शक्तिमान' ने तर आपल्या सर्वांना अगदी वेड केल होत, मी तर ते पाहण्यासाठी कित्येकदा शाळेत उशीरा जायचो. त्याच्याही आधी 'रामायण' आणि 'महाभारत' या मालिकांनी तर संपूर्ण भारतालाचं वेड लावलं होतं. रात्री लागणारे 'छायागीत', 'चित्रहार' यांची आतुरतेनं वाट पाहायचो आपण, त्यांची सर आजच्या म्यूझीक चँनेल्सना येणं शक्यच नाही. दर सोमवारी लागणारे 'ओम नमः शिवाय', अलिफ लैला(सिंदबाद) आणि शनिवारी लागणारं 'जय हनुमान' यांना कोण विसरणार? याच दूरदर्शनवर आपण 'भारत- एक खोज' सारखी अभ्यासपूर्ण मालिका पाहिली, 'मालगुडी डेज' सारखी निखळ मनोरंजक मालिका पाहिली आणि याचं दूरदर्शनवर फक्त शुक्रवारी आणि शनिवारी लागणारे हिंदी चित्रपटही बघितले. 'सुरभी' या मालिकेला विसरणं तर शक्यच नाही, कला, मनोरंजन याची माहिती यातुनच घ्यायचो. दर रविवारी लागणारी आणि विज्ञानाला वाहिलेली 'भूमी' ही मालिका आठवते आहे ना? सोमवारी लागणारी 'सुराग' आणि गुरूवारी लागणारी 'आँखे' पाहिल्याशिवाय झोपायचो नाही आपण. 'महाराणा प्रताप', 'मैँ दिल्ली हू', 'राजा शिवछत्रपती', या ऐतिहासिक मालिका एक वेगळ्याच विश्वात घेऊन जायच्या. 'जंगल जंगल बात चली है पता चला है' या थीम साँग आणि 'मोगली' या कसं बरं विसरणार? मित्रांनो किती छान दिवस होते ना दूरदर्शनचे...! आजच्या केबलच्या जगात ढिगभर चँनेल्स असूनही काहीतरी हरवल्यासारखं वाटतयं... नाही का? 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हिंसक माणिक 'सरकार'

नक्षलवाद : बदलते स्वरूप

ती तेव्हा तशी... भाग ४ पुन्हा अस्वस्थता