लम्हा लम्हा

जरा फासले पर पहुंचे तो यह एससास हुआ
कोई कितने करीब से गुजर कर चला गया था

काही लोक अगदी साध्या शब्दात लिहीतात. म्हणजे ते शब्द तुम्ही – आम्ही वापरतो, तेच असतात. पण त्यांचे शब्द आपल्या मनाला भावतात. असं का होत असेल ?. अर्थात, प्रश्नाचं उत्तर मिळणं अवघड आहे. किंवा काही प्रश्नांची उत्तरं मिळायलाच हवी, याचा हटट्ही धरायला नको. काही शब्द असेच अनुत्तरीत राहू द्यायला हवे. जेणेकरून पुन्हा त्यांच्या वाटेला गेलो की काही जुन्या आठवणी उफाळून वर यायला हव्यात. त्या आठवणी नेहमीच जीवंत रहायला हव्यात. म्हणजे काही शब्दांचे अर्थ अगदी व्यवस्थित लागतात. आता दीप्ती नवल यांच्या या दोन ओळी अनुभवायच्या असतील तर सर्व काही जागच्याजागी असून कसं चालेल ?

चलो दूर तक
अजनबी रास्तो पे पैदल चलें
कुछ न कहें
अपनी अपनी तन्हाइयां लिये
सवालों के दायरों से निकल कर
रिवाजों की सरहदों के परे
हम यूं ही साथ चलते रहें
कुछ न कहें
तुम अपनी माजी का कोई जिक्र न छेडो
मैं भुली हुई कोई नज्म न दोहराऊं
तुम कौन हो
मै क्या हूं
इन सब बातों को, बस रहने दें
कुछ न कहें
चलो दूर तक
अजनबी रास्तों पे पैदल चलें
स्वत:ला विसरून असं जगण्यात एक वेगळीच मजा असते. म्हणजे मनात असलेले सर्व विचार, सर्व प्रश्न आणि सर्व काही विसरून जगायला लागलो की कित्येक वर्षांपासून मनात साठून राहिलेले आणि मधूनच टोचणारे विचार हळुहळू नाहीसे व्हायला लागतात. असं जगायची सवय झाली की मग काही प्रश्नच उरत नाहीत. प्रत्येकाला असं जगायची इच्छा असते. या कवितेत त्याचं अगदी यथार्थ वर्णन केलंय.

दीप्ती नवल. ऐंशीच्या दशकातल्या भारतीय सिनेमा, प्रामुख्याने साधं कथानक आणि सुंदर अभिनय या पठडीतल्या सिनेमातलं एक महत्त्वाचं नाव. सकस अभिनयाने भारतीय सिनेमाविश्वातलं त्यांचं स्थान अनन्यसाधारण आहे. दिवंगत फारूख शेख यांच्यासोबतचे त्यांचे सिनेमे म्हणजे तर पर्वणीच. दीप्ती नवल यांच्या साध्या सरळ अभिनयाने प्रत्येक सिनेमाला एक वेगळीच उंची प्राप्त होते. 

काही दिवसांपूर्वी दीप्ती यांचा ‘लम्हा लम्हा’ हा हिंदी काव्यसंग्रह हाती पडला आणि त्यात अगदी हरवून जायला झालं. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवी गुलजार यांनी काव्यसंग्रहाला प्रस्तावना दिली आहे.
आपल्या प्रत्येकाच्या मनात काही विशिष्ट अशा आठवणी कैद असतात. म्हणजे एखादी जागा, एखादं पुस्तक, एखादं गाणं, एखादी व्यक्ती. आणि कितीही ठरवलं तरी त्याबद्दल आणखी आठवणी साठवणं काही आपण थांबवत नसतो. त्याचं वर्णन दीप्ती यांनी अगदी साध्या शब्दात केलंय,  
वो सितारा
जो रात गये
टूट कर गिरा है फ़लक से
मैंने इन कांच तके टुकडो को
इस हथेली में बन्द कर लिया है
तमाम यादों में तुम्हारी औक एक याद को
शामिल कर लिया है
अब इस हथेली से जो टपकेगा
उसे लहू मत कहना



बऱ्याचदा आपण स्वत:ला चौकटीत बंदिस्त करून घेत असतो, अन्यांपासून स्वत:ला जाणीवपूर्वक वेगळं ठेवायचा प्रयत्न करत असतो. आपला हा प्रयत्न इतरांना कळतही असतो, ते चौकटीतून डोकावून बघायचा प्रयत्नही करत असतात, मात्र आपण आपण त्याला विरोधच करतो. दीप्ती यांनी त्याबद्दल म्हटलंय, 


मेरे चारो तरफ यूं लगता है जैसे
कांच की दीवारे हैं

तमाम लोग इन दीवारों में
मुझे देख सकते है
मगर सुन नहीं पाते
मेरी आवाज उन तक पहुंचती नहीं
वो भी शायद कहते है, जाने क्या

आणि मग कधीतरी आपल्याही मनात विचार येतोच की आता ही चौकट मोडलीच पाहिजे. किती दिवस त्याच चौकटीत अडकून पडायचं ?, हा प्रश्न मनात जोर धरायला लागतो. मग एक दिवस अखेर ती चौकट तोडायचं आणि मुक्तपणे जगायचं मनावर घेतोच, 

मुमकीन है किसी रोज
मैं अपनी ही बनायी इन कांच की दीवारों को
तोड कर रेजा-रेजा कर दूं
और बिखरे हुए शफ्फाफ टुकडों से गुजर कर
कहीं दूर निकल जाऊं
जहां मैं बातें करूं, और कहकशाएं सुना करें

पुस्तकातल्या कविता म्हणजे अगदी साध्या, सोप्या आणि सर्व काही स्पष्ट बोलणाऱ्या आहेत. उगाचच लपवाछपवी वगैरे त्यात नाही. अगदी दोन किंवा  चार ओळातही बराच काही अर्थ त्यात सापडतो (अर्थात ते वाचणाऱ्यावर आणि त्याच्या मूडवर अवलंबून आहे !),

कुछ लोगों को जिन्दगी से निकाला नहीं जाता
हां, रिश्ते बदल लिये जाते हैं
अगदी साध्या वाटणाऱ्या या दोन ओळी. हा अनुभव बऱ्याचदा येतच असतो. म्हणजे काही व्यक्तींना आपण विसरू शकत नाही, त्यांच्या आठवणींना आयुष्यातून काढणंही शक्य होत नाही. पण त्यांच्याशी असलेलं ‘नातं’ मात्र बदलता येतं, बदललेलं असतं. अर्थात याला पळवाट म्हणता येईल, पण हे आहे हे असं.


आपल्या कवितांबद्दल दिप्ती नवल म्हणतात, “जसं सुचेल तसं लिहीत गेले, ही शायरी असेल हे मनातही नव्हतं. मित्रमंडळींना ते ऐकवल्यावर ते म्हणाले; ही तर शायरी आहे.”
“उस रोज से जिस किताब पर ‘डायरी’ लफ्ज लिख रखा था, उसके आगे दो लफ्ज और जुड गये- नज्मों की डायरी.” 
शुरूआत यूं हुई.
कोई लम्हा,
कोई आवाज,
कोई नाम,
कोई ख्वाब,
कोई पहचान,
या दर्द कोई...

एकूणच दीप्ती यांच्या कविता म्हणजे काव्य या विषयात रस (आवड नव्हे !, रस असणे ही एक स्वतंत्र संकल्पना आहे.) असणाऱ्यांना आनंद देणाऱ्या आहेत. त्यांच्या अफाट अभिनयाची सुंदरता शब्दातही अगदी तंतोतंत उतरली आहे. त्यातबाबत फार काही लिहीणं योग्य नाही, कारण त्या कविता प्रत्यक्ष अनुभवणं अधिक योग्य. दिप्ती यांच्याच शब्दात शेवट करतो, 
जब बहुत कुछ कहने को जी चाहता है ना,
तब कुछ भी कहने को जी नहीं चाहता

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हिंसक माणिक 'सरकार'

नक्षलवाद : बदलते स्वरूप

ती तेव्हा तशी... भाग ४ पुन्हा अस्वस्थता