आप क्रोनोलॉजी समझिए...


सुधारित नागरिकत्व कायद्यास विरोध करण्याच्या नावाखाली दिल्लीत नियोजनपूर्वक हिंसाचार घडविण्यात आला आहे. केंद्र सरकार एकाही दंगेखोराला सोडणार नाही, मग तो कोणत्याही पक्षाचा असो अथवा कोणत्याही धर्माचा असो. पुन्हा अशा प्रकारचा हिंसाचार घडविण्याची त्याची हिंमत होणार नाही, अशी कारवाई करण्यात येईल. हिंसाचार कोणी घडविली, त्यासाठी कोणी पैसा पुरविला, कोणत्या संस्था – संघटना त्यात होत्या याची संपूर्ण माहिती पोलिसांकडे आली आहे. त्यामुळे हिंसाचार घडवून आपण नामानिराळे राहू, असे कोणास वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे... अशा शब्दात देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत दिल्ली हिंसाचारावरील चर्चेस उत्तर दिले. ‘आप क्रोनोलॉजी समझिए’ हे शहांचे आवडते वाक्य. आपल्या भाषणात त्यांनी दिल्ली हिंसाचाराचे नेपथ्य कोणी आणि कसे केले हे अगदी सविस्तर मांडले, त्यामुळे त्यांच्याच शब्दात सांगावयाचे तर दिल्ली हिंसाचाराची बाजू घेणाऱ्यांना आता ‘आप क्रोनोलॉजी समझिए’ असा सवाल सर्वांनी विचारायला हवा.

सुधारित नागरिकत्व कायदा, जनगणनेसोबत होणारा एनपीआर आणि अद्याप मसुदाही तयार नसणाऱ्या एनआरसीविरोधात विशिष्ट समुदायाकडून दिल्लीसह देशभरात विविध ठिकाणी आंदोलने सुरू होती. देशाची राजधानी दिल्लीत तर शाहीनबाग परिसरात ७० दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी कथित आंदोलकांनी लाखो लोकांना वेठीस धरले होते, कारण शाहीनबागेतूनच नोएडाला दिल्लीशी जोडणारा मार्ग जातो. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर आले असताना दिल्लीतील जाफराबाद परिसरात याच कथित आंदोलकांनी हिंसाचारास प्रारंभ केला आणि आपले खरे इरादे दाखवून दिले. त्यानंतर ईशान्य दिल्लीत ३६ तास हिंसाचार भडकत होता, तो दिल्लीत अन्य भागांमध्ये पसरला नाही यासाठा दिल्ली पोलिसांचे प्रयत्न कारणीभूत ठरले आहेत. या हिंसाचारात ५२ बळी गेले, दिल्ली पोलिसांचे हेड कॉन्स्टेबल रतनलाल यांचा गोळीबारात तर आयबीचे जवान अंकीत शर्मा यांना भोसकून ठार करण्यात आले. विशेष म्हणजे या हिंसक उन्मादाचे समर्थन देशातील विरोधी पक्ष आणि पुरोगामी वगैरे म्हणवणारे करीत होते.
शाहीनबाग ते जाफराबाद हा आंदोलनाचा झालेला प्रवासही समजून घेणे गरजेचे आहे. सत्तर दिवस शाहीनबागेत आंदोलकांना बसविण्यात आले होते, काही प्रसारमाध्यमांनी त्यांना मुबलक प्रमाणात प्रसिद्धीही दिली होती. मात्र, शाहीनबागेतील आंदोलन हे पूर्णपणे पेड असल्याची कुणकुण बाहेर पसर लागल्यानंतर तेथील गर्दी अचानक कमी होऊ लागल्याने हवे ते साध्य करून घेण्याची शक्यता धूसर झाली होती. तेथील आंदोलनात सहभागी एका महिलेचे अवघ्या चार महिन्यांचे बाळ थंडी सहन झाल्याने मृत्यूमुखी पडले होते. त्यावर देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी “चार महिन्यांचे बाळ स्वतहून आंदोलनात सहभागी होते काय”, असा संतप्त सवालही विचारला होता.
त्यामुळे आता काहीतरी नवे करण्याची गरज त्यांना भासली. त्यामुळे मग शाहीनबागेतून केंद्र सरकवले गेले ते जाफराबाद परिसरात. जाफराबाद परिसरात हिंदू आणि मुस्लिमांची मिश्र लोकसंख्या आहे. जाफराबाद परिसरात २३ तारखेपासूनच आंदोलनास प्रारंभ झाला होता, मात्र आता तेथे असलेल्या हिंदू समुदायाने त्यास विरोध केला. मुस्लिम सीएए विरोधात धरणे देण्यास बसल्यावर त्याला प्रत्युत्तर म्हणून हिंदू समुदायदेखील सीएए समर्थनार्थ धरणे देण्यास रस्त्यावर उतरले. सीएएविरोधकांना असे काही होईल, याची अजिबात कल्पना नव्हती. त्याचप्रमाणे शाहीनबागेतून आंदोलन जाफराबाद येथे नेणे, तेथील हिंदू – मुस्लिम मिश्र लोकसंख्या आणि तेथेच जाणीवपूर्वक हिंसाचार सुरू करणे याद्वारे देशात पुन्हा एकदा हिंदू – मुस्लिम असा संघर्ष मोठ्या प्रमाणात सुरू करण्याचा इरादा असल्याचेही आता पुढे आले आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर पहिला आठवडा विरोधकांनी दिल्ली हिंसाचारावर चर्चा करण्यासाठी गदारोळात वाया घालवला. त्यानंतर लोकसभेत ११ तर राज्यसभेत १२ मार्च रोजी त्यावर चर्चा झाली. चर्चेदरम्यान विरोधी पक्षांनी नेहमीप्रमाणेच दिशाभूल करणारी वक्तव्ये केली. हा हिंसाचार सीएएमुळेच भडकला, सीएए मुस्लिमांच्या विरोधातील कायदा आहे, दिल्ली हिंसाचार हिंदूंनीच कसा घडविला असा सूर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी मांडला. मात्र, हे सर्व बोलताना सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आपणच अथवा आपल्या पक्षांच्या नेत्यांनीच कसे चिथावणीखोर वक्तव्ये केली, याचा सोयीस्कर विसर त्यांना पडला. मात्र, ती सर्व आठवण करून देण्याचे काम गृहमंत्री शहा यांनी अगदी चोखपणे बजावित देशासमोर त्यांचा बुरखा फाडला. ते अतिशय गरजेचे होते. शहा यांच्या भाषणामधून अनेक गोष्टींचा खुलासा झाला आहे, आता लवकरच त्यावर पोलीस कारवाई होऊन खरे चेहरे समोर येतीलच.
दिल्लीत दंगे भडकले ते २४ तारखेला मात्र त्यापूर्वी काय झाले, याची क्रोनोलॉजी त्यांनी सादर केली. सीएए संसदेत संमत झाल्यानंतर रामलिला मैदानात १४ डिसेंबरला झालेली काँग्रेसची रॅली, त्यात सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी – वाड्रा यांनी केलेली आरपार की लडाई ची भाषी. त्यानंतर १६ डिसेंबर पासून सुरू झालेला शाहीनबागेचा तमाशा यातील परस्पर संबंध संसदेत दाखवून देणे गरजेचे होते. दिल्लीबाहेर महाराष्ट्रात १७ फेब्रुवारीला ट्रम्प भारतात आल्यावर रस्त्यावर उतरण्याचे केलेल आव्हान, १९ फेब्रुवारीचे वारिस पठाणांचे आम्ही १५ कोटी १०० कोटींना भारी पडू ही चिथावणी, २२ आणि २३ फेब्रुवारीला दिल्लीत तयार केलेले उत्तेजक वातावरण आणि त्यानंतर २४ ते २५ फेब्रुवारी रोजी झालेला हिंसाचार ही साखळीही शहा यांनी संसदेत मांडली. त्यामुळे कदाचित उघडे पडण्याची भिती वाटल्यानेच दिल्ली हिंसाचारावर चर्चेची आठवडाभरापासून मागणी करणाऱ्या काँग्रेसने शहांचे उत्तर पूर्ण न ऐकताच सभात्याग करीत पळ काढला.

शहा यांच्या भाषणातील अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे हिंसाचारासाठी पुरविण्यात आलेला पैसा. कारण ज्याप्रकारचे वातावरण गेल्या तीन महिन्यांपासून तयार करण्यात आले आहे, ते पाहता त्यात मोठ्या प्रमाणावर पैसा वापरला गेला हे उघडच आहे. कारण त्याशिवाय २ महिन्यांपेक्षा जास्त काळ धरणे आंदोलन, घोषणा देणारे आंदोलक, त्यांचे तंबू, त्यांचे जेवणखाण असा खर्च भागणार नाही. दिल्लीत गेल्या तीन ते चार महिन्यांपासून हवालामार्गे आलेला पैसा, त्यात सहभागी व्यक्ती, संस्था आणि संघटना यांची सर्व माहिती पोलिसांनी तपासात मिळविली असल्याचे शहा म्हणाले. त्यामुळे आता अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि संघटनांचे धाबे दणाणले असेल, यात कोणतीही शंका नाही. मात्र, केवळ यावरच न थांबता देशात अशा प्रकारे पैसा घेऊन वातावरण बिघडविणाऱ्या टोळीच्या मुळावरच घाव घालण्याची वेळ आली आहे. कारण या लोकांना मोकळे सोडल्यास ते आणखी उन्माद पसरविणार यात कोणतीही शंका नाही.


दिल्ली हिंसाचारावरील चर्चेस उत्तर देतानाची शहांची देहबोली हा अतिशय महत्वाचा मुद्दा. शहा यांचे एकुणच व्यक्तीमत्व हे आक्रमक आणि धडाकेबाज असले तरी एरवी त्याचा अंदाज येत नाही. कारण शहा एरवी अतिशय शांतपणे वावरत असतात, त्यांच्या मनात नेमके काय विचार सुरू आहेत याचा अंदाजही लावता येत नाही. संसदेत बोलताना मात्र शहा यांचा वावर हा धडकी भरविणारा असतो, कारण ते पुराव्यांशिवाय कोणतीही गोष्ट बोलत नाही. संसदेत बोलताना नेमके काय आणि कसे बोलावे, कुठे चिमटा काढावा आणि कुठे पाठीत धपाटा घालावा याचा व्यवस्थित अंदाज त्यांना असतो. दिल्ली हिंसाचारावरील चर्चेस उत्तर देतानाही त्यांनी कुठेही आवाज चढविला नाही, आक्रमकता दाखविली नाही. अगदी शांतपणे बोलत त्यांनी विरोधकांचा अजेंडा मात्र उघडा पाडला आहे.


* पूर्वप्रसिद्धी- पार्लमेंट स्ट्रीट, दैनिक मुंबई तरुण भारत, १३ मार्च २०२०

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हिंसक माणिक 'सरकार'

नक्षलवाद : बदलते स्वरूप

ती तेव्हा तशी... भाग ४ पुन्हा अस्वस्थता