फडणवीस युगाची चाहुल, ‘ईडी’च्या फेऱ्यात पवारपर्व...



काही दिवसांपूर्वी एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक प्रश्न विचारला. तो म्हणजे ‘शरद पवारांचे राजकारण आता तुम्ही शिकला आहात, तुम्ही 21 शतकातले शरद पवार आहात...’   त्यावर फडणवीसांनी उत्तर देताना अगदी सहजपणे सांगितले की ‘मी शरद पवार का बनू, मी देवेंद्र फडणवीस म्हणूनच ठीक आहे.’  यातला हजरजबाबीपण सोडता एक महत्वाची गोष्ट अधोरेखीत होते, ती म्हणजे आजही महाराष्ट्रात एखाद्या नेत्याची राजकीय उंची मोजावयाची असल्यास त्यासाठी परिमाण हे शरद पवारांचेच वापरावे लागते. मात्र, आता देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या राजकारणातील आपले स्थान भक्कम केले आहे. किंबहुना शरद पवारांच्या नेतृत्वाला एकहाती आव्हान देऊन फडणवीस यांनी आपले राजकीय नेतृत्व सामर्थ्यवान असल्याचेच दाखवून दिले आहे.

शरद पवार या शब्दाभोवतीच राज्याचे राजकारण दीर्घकाळपासून फिरत राहिले आहे. त्यात पवारांना आव्हान देऊ शकणारे नेतेही राज्याच्या राजकारणात होते, त्यात भाजपचे प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि काँग्रेसचे विलासराव देशमुख यांचे नाव घ्यावे लागेल. मात्र, या सर्वांचा अकाली मृत्यू झाल्याने तशा अर्थाने पवारांना आव्हान देईल, असा नेता राज्यात नव्हताच. मात्र, अलिकडे ती जागा घेतली भाजपच्याच देवेंद्र फडणवीस यांनी. गत विधानसभा निवडणुकीत पवारांनी भाजपला कथितरित्या न मागता पाठिंबा जाहीर करीत सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा करून दिला होता. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी तर थेट गुरूपदच बहाल केले होते. अर्थात, त्यामागे पवार कृषीमंत्री आणि मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असतानाच्या काळाचा संदर्भ होता. कारण त्या काळात मोदींना अप्रत्यक्षपणे राजकारणात वाळीत टाकल्यासारखीच स्थिती होती. मात्र, पवारांनी आपल्यासोबत कधीही दुजाभाव केला नाही, हे मोदींना अनेकदा सांगितले होते. त्यामुळे राजकारण बाकी काहीही असो, मात्र शरद पवारांना थेट मोदीच मानतात, अशी परिस्थिती निर्माण झाली. काही काळ या परिस्थितीचा फायदाही दोन्ही पक्षांना झाला. कारण यामुळे काँग्रेसचे खच्चीकरण करण्याची आयतीच संधी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मिळत होती. आणि भाजपच्या काँग्रेसमुक्त धोरणासही ते साजेसे असल्याने व्यवस्थित सर्व सुरू होते. या सर्व प्रकारामुळे शरद पवार यांच्या सामर्थ्याविषयीचे एक वलय अधिकच मजबूत झाल्यासारखे वाटत होते. “आपले साहेब अजिंक्य आहेत, आपल्या साहेबांचा सल्ला खुद्द पंतप्रधान घेतात” अशा चर्चाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये होत होत्या. 

अर्थात, त्यात तथ्यही होते. सुमारे पन्नासहून अधिक वर्षांची राजकीय कारकिर्द पवारांची आहे. तरुण राजकारणी, अफाट क्षमतेचा नेता, संरक्षण आणि कृषी खात्याचा कारभार, राज्याचं मुख्यमंत्रीपद, पंतप्रधानपदासाठी थेट नरसिंह रावांना आव्हान देणारा नेता, सोनिया गांधी यांच्या परदेशी मुळाच्या मुद्यावरून काँग्रेस सोडणारा व राष्ट्रवादी काँग्रेस हा नवा पक्ष स्थापन करणारा नेता, पुन्हा त्याच काँग्रेससोबत आघाडी करीत राज्याच्या आणि केंद्राच्या सत्तेत सहभागी होणारा धोरणी नेता, दोन आकडी खासदार निवडून येत नसले तरीही राष्ट्रीय राजकारणावर असामान्य पकड, प्रशासनावर प्रभुत्व आणि कष्ट करण्याची वृत्ती, अशी विविधतेने भरलेली पवारांची कारकिर्द आहे.


मात्र, सक्तवसुली संचालनालयाने अर्थात ईडीने पवारांवर गुन्हा नोंदविला आणि अचानक पवारांच्या क्षमतेवर राजकीय वर्तुळात प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला सुरूवात झाली. मात्र, न बोलवताही ईडीच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय घेणे आणि नंतर माघार घेणे, यातून पवारांनी नेमके साधले, हा प्रश्न आहे. कारण यातून कुठेतरी पवारांच्या क्षमतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले. ईडीच्या कार्यालयात न बोलावता जाण्याची गरज नव्हती, ही गोष्ट दीर्घ प्रशासकिय अनुभव असणाऱ्या पवारांना माहिती नसावी, यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. तसे करून आपल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असावा, मात्र तेदेखील अर्धवट सोडावे लागले. यामुळे कार्यकर्ते अधिकच गोंधळले असणार, यात शंका नाही. 

भाजपमध्ये आज होत असलेली आयात समर्थनीय नसली तरीही पवारांच्या फोडाफोडीच्या राजकारणाला फडणवीसांनी त्याच शब्दात प्रत्युत्तर दिले आहे. कदाचित ते पवारांना अगदीच अनपेक्षित असावे. विशेष म्हणजे पवारांच्या भोवती गेली अनेक वर्षे असलेले वलय फडणवीसांनी अलगद मोडून काढले आहे, त्यामुळे आता पवारांचे राजकारण अधिकच दयनीय वाटू लागले आहे. वयाच्या 80 व्या वर्षी पवार भाजपविरोधात मैदानात उतरले आहेत. पक्षातील लोक सोडून जात असतानाही पवार ठामपणे उभे आहेत, या त्यांच्या क्षमतेला खरोखरच दाद द्यावी लागेल. गेले दहा ते बारा दिवस पवार राज्यभऱ दौरे घत आहेत, पुढेही घेतील. त्याला मिळणारा प्रतिसाद पाहता शरद पवार यांना मानणारा आजही मोठा वर्ग अस्तित्वात आहे, हे नाकारता येणार नाही. 

मात्र, कुठेतरी पवारांना कोंडीत पकडण्यात भाजप आणि प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस हे यशस्वी ठरलेत का, असा प्रश्न निर्माण होतो. पवारांच्या वलयाला छेद देण्याची सुरूवात 2014 सालीच झाली होती. पवारांच्या नेतृत्वाविषयी संभ्रम निर्माण करणे, प्रश्नचिन्ह लावणे, पवार आणि नरेंद्र मोदी यांची सतत तुलना करणे, हे प्रकार सुरू होते. अर्थात, राजकारण म्हटल्यावर हे आलेच. मात्र हा एक सापळा होता आणि कुठेतरी पवार त्यात अलगद अडकत गेले का, असा प्रश्न निर्माण होतो. कारण गेल्या पाच वर्षात पवारांभोवतीचे वलय कमी होत गेले आणि ईडी प्रकरणाने तर सर्वांवर कडी केली. विशेष म्हणजे पवारांच्या राजकीय अनुभवापेक्षाही वय कमी असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना शह देण्याचा प्रयत्न केला आणि त्यात बऱ्याच अंशी यशही मिळविले. त्यामुळे राज्यात आता पवारपर्व संपतानाचा फडणवीस युगाचा प्रारंभ होतोय की काय, यावर चर्चा व्हायला हवी.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नक्षलवाद : बदलते स्वरूप

पाळणाघरं- गरज आणि वास्तव

महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था (डेक्कन व्हर्न्याक्युलर ट्रान्स्लेशन सोसायटी)