पश्चिम बंगाल- ममतांचे फुलटॉस आणि भाजपचे सिक्सर

पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारून ममता बॅनर्जीं यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. प. बंगालमध्ये आगामी काळात भाजप विरुद्ध तृणमूल काँग्रेस असा सामना रंगणार आहे, त्याचा आढावा प्रस्तुत लेखातून घेण्यात आला आहे.


ममतांच्या वर्चस्वाला सुरूंग ! 


पश्चिम बंगाल आणि ओडिशा या दोन राज्यांमध्ये भाजपला यश मिळाल्याशिवाय भारतीय जनता पक्षाच्या सुवर्णयुगास प्रारंभ होणार नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यासाठी प्रयत्नशील रहावे. असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आपल्या कार्यकर्त्यांना वारंवार केले होते. कारण प. बंगालमध्ये तब्बल 34 वर्ष डाव्यांची आणि गेल्या काही काळापासून ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसची एकाधिकारशाही होती. अनेक प्रयत्न करूनही प. बंगालमध्ये भाजपला आपला पाया उभा करता आला नव्हता. त्यामुळे आपण अजिंक्य आहोत, असा भ्रम ममतांना झाला होता. त्या भ्रमाचा भोपळा भाजपने 42 पैकी 18 जागांवर विजय मिळवून फोडला आहे. मात्र, आता ममता बॅनर्जी यांच्या वर्चस्वाला सुरूंग लावण्यात भारतीय जनता पक्षाला यश मिळाले आहे. 

ममता बॅनर्जी या खरे तर लढवय्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात. प. बंगालमध्ये डाव्यांना सत्तेतून हद्दपार करण्याची शपथ त्यांनी एकेकाळी घेतली आणि ती पूर्णही करून दाखविली. डाव्यांना पराभूत करून बंगालमध्ये एकछत्री अंमल प्रस्थापित करण्यात यश आल्यानंतर ममतांच्या आत्मविश्वासाचे रूपांतर अतिआत्मविश्वासात आणि मग्रुरीत होत गेले आणि नेमके बंगाली जनतेला रूचले नाही.
ममता बॅनर्जी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावर जे शाब्दीक बाण चालविले, ते बंगाली संस्कृतीत बसणारे नव्हते. मोदी – शहा यांना बंगालमध्ये यश मिळणे शक्यच नाही, असा ठाम ममतांचा समज होता. दुसरे म्हणजे, विद्यमान भाजपचे नेतृत्व अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारखे उदार आणि सामोपचाराला प्राधान्य देणाऱ्या नेत्यांचे नाही, याचाच ममतांना विसर पडला. त्यामुळे त्या एकामागोमाग चुका करीत गेल्या आणि भाजपला फुलटॉस देत गेल्या. आयतेच फुलटॉस मिळाल्यावर सिक्सर ठोकण्यात मोदी – शहांच्या भाजपने कोणतीही कसर बाकी सोडली नाही. 
याबाबत पुढील उदाहरण फार बोलके आहे – सिने अभिनेता अक्षय कुमार याने घेतलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, “ममता दिदींसोबत आमचे राजकीय मतभेद असले तरी त्या आजही मला मिठाई पाठवित असतात. यावर ममता आपल्या आक्रस्ताळ्या स्वभावासला अनुसरून म्हणाल्या की “मी मोदींना माती आणि दगडाची मिठाई पाठविणार.” आता यावर मोदींनी “सिक्सर” हाणत बंगालमध्येच एका जाहीर सभेत म्हटले- “ममता दिदी मला मातीचे रसगुल्ले देऊ इच्छित आहेत. बंगालची माती म्हणजे चैत्यन्य महाप्रभू, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती. या मातीचे रसगुल्ले खाणे म्हणजे माझ्यासाठी तर फारच भाग्याचे आहे !”
लोकसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर ममता बॅनर्जी यांचा आक्रस्ताळेपणा फारच वाढला होता. भाजपाध्यक्ष अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आदी नेत्यांच्या सभांना परवानगी नाकारणे, परवानगीस विलंब लावणे, हेलिकॉप्टर उतरण्यास परवानगी नाकारणे आदी रडीचे डाव ममता खेळत होत्या. त्यासोबतच तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हिंसाचाराचा आधार घेत भाजपच्या कार्यकर्त्यांचे मनोबल खच्ची करण्यास प्रारंभ केला होता. निवडणुकीच्या सातपैकी प्रत्येक टप्प्यात मतदान केंद्रे ताब्यात घेणे, भाजपचे उमेदवार कार्यकर्ते यांच्यावर हल्ले करणे असे प्रकार घडत होते. 
हिंसाचाराने कळस गाठला तो भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या कोलकात्यातील रोड शोवर झालेल्या हल्ल्याने. शहा यांच्या रोड शोवर दगडफेक करण्यात आली, केरोसीन बॉम्ब फेकण्यात आले. सीआरपीएफच्या जवानांमुळे आपला जीव वाचला, आसा दावा त्यानंतर शहा यांनी केला होता. या हिंसाचारामुळे भाजपच्या मनोबलावर परिणाम होईल, असा ममतांचा समज मात्र अगदीच फसवा निघाला. कारण यामुळे भाजप कार्यकर्ता पेटून उठला. मतदारांनाही या प्रकाराचा उबग आला आणि त्याची परिणिती भाजपला यश मिळण्यात झाली आहे. आता तर भाजपचा आत्मविश्वास एवढा वाढला आहे की बंगालच्या विधानसभेत भाजपने सत्ता मिळविली तरी त्यात आश्चर्यकारक असे काहीच नसेल.

लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला 43.28 टक्के तर भाजपला 40.25 टक्के मते मिळाली आहेत. गत लोकसभा निवडणुकीपेक्षा यावेळी तृणमूलची टक्केवारी सुमारे 4.28 टक्क्यांनी वाढली असली तरीही भाजपचे वाढलेले मताधिक्य हे ममतांसाठी चिंताजनक आहे. कारण भाजप आता राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष झाला असून डावे पक्ष आणि काँग्रेसची जागा आता भाजपने घेतली आहे. बंगालमधील मतदारदेखील आता भाजपकडे विश्वासाने पाहू लागले आहेत. ममतांच्या कार्यकाळात झालेला हिंसाचार, आर्थिक घोटाळे या प्रकाराला जनता आता कंटाळली आहे. त्यामुळे भाजपवर लोक आता विश्वास ठेवू लागले आहेत. भाजपनेदेखील विधानसभा निवडणुकीसाठी मजबूत पाया तयार केला आहे. अमित शहा यांच्यासारखा रणनीतीकार शांत बसणारा नाही आणि आता भाजप बंगाल विधानसभा निवडणुकीत सत्ता मिळविण्यासाठीच उतरेल, यात कोणतीही शंका नाही.


बंगालमध्ये सर्वांत मोठे नुकसान माकपच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीचे झाले आहे. सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीत डाव्या आघाडीस 29.9 टक्के मते मिळाली होती. यावेळी डाव्या आघाडीस केवळ 7.5 टक्के मते मिळाली आहेत. डाव्या पक्षांच्या इतिहासात प्रथमच बंगालमधून डाव्या पक्षांचा खासदार विजयी झालेला नाही. त्यामुळे डाव्या पक्षांवर आता खरोखर विचार करण्याची वेळ आली आहे. बंगालमधूनच नव्हे, त्रिपुरामधून देखील डाव्या पक्षांचा सफाया झाला आहे, आता केवळ केरळमध्येच डावे पक्ष दिसतात. आगामी काळात भाजप केरळकडे लक्ष केंद्रीत करणार यात कोणतीही शंका नाही. त्यामुळे डाव्यांनी आता ‘तुकडे तुकडे गँग’चे पालकत्व निभावण्याऐवजी पक्षाच्या शोचनीय स्थितीकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

----------------------------

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत तृणमूलचा किल्ला ढासळणार ?

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत सर्वांचे लक्ष भाजपला बहुमत मिळणार का, यासोबतच भाजपला पश्चिम बंगालमध्ये यश मिळणार का, याकडेही लागले होते. कारण  2014 साली मोदी लाट असतानाही ममता बॅनर्जींनी प. बंगालमध्ये भाजपला मुसंडी मारण्यापासून रोखले होते, केवळ दोन जागांवर भाजपला समाधान मानावे लागले होते. 2016 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीतही भाजपला फारसा प्रभाव पाडता आला नव्हता. त्यामुळे आपण अजिंक्य आहोत, असा ठाम समज ममता बॅनर्जींचा झाला होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपला थेट अंगावर घेण्याचे धोरण अवलंबिले आणि तेथेच त्यांची चुक झाली. कारण भाजपला विरोध करण्याच्या नादात ममता बॅनर्जींनी एवढा आक्रस्ताळेपणा केली, की त्यामुळे तृणमुलचा पारंपरिक मतदारही त्यांच्यापासून दुरावला. परिणामी 42 पैकी तब्बल 18 जागांवर भाजपला विजय मिळाला, विशेष म्हणजे भाजपला 128 विधानसभा मतदारसंघांमध्ये निर्णायक आघाडी मिळाली आहे. त्यामुळे बंगालात आता भाजप कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावले आहे, ममतांशी दोन हात करण्यासाठी कार्यकर्ते उत्सुक आहेत. त्यासाठी तृणमूल काँग्रेसद्वारे होणाऱ्या हिंसाचाराचाही सामना करण्यासाठी ते तयार आहेत. दुसरीकडे राज्यात भाजपला वाढता जनाधार पाहून ममता बॅनर्जी हैराण झाल्या आहेत. त्यामुळे 2021 साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला निर्णायक यश मिळून ममतांचा अभेद्य किल्ला ढासळणार का, याचविषयी राजकीय वर्तुळात आतापासूनच चर्चा सुरू झाल्या आहेत.

सन 2014च्या लोकसभा निवडणुकीनंतर दोन वर्षांनी म्हणजे 2016 साली झालेल्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने 295 सदस्यांच्या विधानसभेत 211 जागा प्राप्त करीत निर्विवाद वर्चस्व मिळविले होते. त्या खालोखाल काँग्रेस 43, माकप 23 तर भाजपला केवळ 10 जागांवर समाधान मानावे लागले होते. भाजपला हा पराभव फार जिव्हारी लागला होता, कारण त्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी प. बंगाल, ओडिशा आणि केरळमध्ये पक्षाची सत्ता येत नाही, तोपर्यंत भाजपचा सुवर्णकाळ येणार नाही, असे सांगितले आणि त्यानंतरही वारंवार त्याचा पुनरूच्चारही केला. 2016 साली राज्यात सन्मानजनक जागा जिंकण्याचा भाजपचा मनसुबा होता, मात्र त्यास ममतांनी चाप लावला होता. 2016 साली भाजपला अपेक्षित विजय का मिळाला नाही, याविषयी भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी सांगितलेले कारण विचार करण्याजोगे आहे. देवधर म्हणाले की, 2016 सालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये लोकांसमोऱ भाजपचा पर्याय फारच नवा होता. केंद्रातील मोदी सरकारला सत्तेत येवून केवळ दोन वर्षेच झाली होती. मोदी सरकारच्या अनेक कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यास नुकतीच सुरूवात झाली होती, त्यामुळे मोदी सरकारचा हवा तेवढा प्रभाव 2016 मध्ये जाणवला नाही. मात्र, 2021 साली होणाऱ्या निवडणुकीत राज्यातील वातावरण वेगळे असणार आहे. कारण बंगाली जनतेने मोदी सरकारची कल्याणकारी राजवट अनुभवली आहे. त्यामुळे ममतांच्या एकाधिकारशाहीस कंटाळलेली जनता आता भाजपकडे आशेचा किरण म्हणून पाहत आहे. असे देवधर यांनी स्पष्ट केले होते.

लोकसभा निवडणुकीतील मतांचे विश्लेषण केल्यास ममता बॅनर्जी यांच्यासमोर भाजपने मोठे आव्हान उभे केले आहे, हे स्पष्ट होते. कारण 2014 च्या निवडणुकीत भाजपला केवळ 2 जागा आणि केवळ 17 टक्के मते मिळाली होती. तर तृणमुल काँग्रेसला 34 जागांसह 39.7 टक्के एवढी मते मिळाली होती. यावेळच्या लोकसभा निवडणुकीत तृणमुलच्या मतांची टक्केवारी वाढून 43.3 एवढी झाली असली तरी 22 जागांवर विजय मिळाला आहे. दुसरी भाजपच्या मतांची टक्केवारी 17 वरून 40.3 झाला असून जागाही 2 वरून 18 झाल्या आहेत. त्यामुळे राज्यात भाजपचा जनाधार जबरदस्त वाढत असल्याचे सत्य ममता बॅनर्जी नाकारू शकत नाहीत. विधानसभावार आकडेवारी पाहिल्यास तेथेही भाजपला अनुकूल परिस्थिती आहे. गत सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला केवळ 28 विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडी प्राप्त झाली होती, तो आकडा आता वाढून 128 झाला आहे. दुसरीकडे 2014 साली 214 विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडी घेणाऱ्या तृणमूलला यावेळी केवळ 158 मतदारसंघांमध्ये आघाडी मिळविणे शक्य झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप आता आगामी विधानसभा निवडणुकीत सत्ता काबीज करण्याच्या तयारीनेच उतरणार, यात कोणतीही शंका नाही.

आक्रस्ताळेपणा करणार ममतांचा घात



लोकसभा निवडणुकी दरम्यान ममता बॅनर्जींनी आक्रस्ताळेपणाचा कळस गाठला होता. भाजप नेत्यांच्या सभांना परवानगी नाकारणे, हेलिकॉप्टर उतरण्यास परवानगी नाकारणे, पंतप्रधानांना कानाखाली मारण्याची भाषा करणे असा आचरटपणा ममतानी केला होता. त्याचा परिणाम मतदारांच्या मनावरही झाला आणि तृणमूलविषयी लोकांच्या मनात राग निर्माण झाला. निवडणुक झाल्यानंतरही ममतांचा आक्रस्ताळेपणा कमी झालेला नाही. ममतांसमोर कोणी 'जय श्रीराम' अशी घोषणा दिली, तर त्याला थेट तुरूंगात टाकण्याचा अनाकलनीय प्रकार ममता करीत आहेत. भाजपला तेथे हिंदुत्वाचे कार्ड खेळण्यासाठी ममता आयतीच खेळपट्टी तयार करून देत आहेत. भाजप ममतांच्या आक्रस्ताळेपणाचा पूर्ण फायदा उठविण्याचा प्रयत्न करीत आहे. तृणमूल काँग्रेसमधून आमदार, नेते, कार्यकर्ते यांचे इनकमिंग भाजपमध्ये सुरू आहे. ममतांचा पूर्ण पक्ष खिळखीळा करण्याचे भाजपचे धोरण आहे. राज्यात झालेल्या राजकीय कार्यकर्त्यांच्या हत्या, सततचा हिंसाचार – अराजकता, ममतांची एकाधिकारशाही आणि धार्मिक लांगुलचालन, त्यामुळे प्रक्षुब्ध झालेले जनमानस, शारदा, नारदा आणि रोझव्हॅली या बड्या कंपन्यांसह दहा ते बारा लहान कंपन्यांनी जनतेच्या कष्टाच्या पैशांवर मारलेला प्रचंड मोठा डल्ला, तृणमूल काँग्रेसच्या आमदार, खासदारांपर्यंत पोहोचलेली त्याची पाळेमुळे, वाढती बेरोजगारी याविरोधात भाजपने रान उठविण्यास सुरूवात केली आहे. थोडक्यात आगामी विधानसभा निवडणुक ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेससाठी “करो वा मरो”ची ठरणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हिंसक माणिक 'सरकार'

नक्षलवाद : बदलते स्वरूप

ती तेव्हा तशी... भाग ४ पुन्हा अस्वस्थता