पुरोगामी द्वेषाचा पराभव
- “आत्महत्या करण्यापूर्वी हिटलरही जर्मनीत खूप लोकप्रिय होता”
- “मोदी – शहांनी देशात विष पसरवले आहे”
- “हा धक्कादायक आणि धोकादायक निकाल आहे”
- “हा भारतीय गोबेल्सचा विजय आहे”
अशा प्रकारची सुमारे विधाने करीत आपले नैराश्य लपविण्याची केविलवाणी धडपड देशातील पुरोगामी टोळी सध्या करीत आहेत. त्यात नवीन असे काहीच नाही, द्वेष करणे हाच पुरोगामी टोळीचा व्यवसाय आहे. त्यामुळे अशी विधाने करीत गावगन्ना हिंडणे हा पुरोगामी टोळीचा आवडता छंद आणि 2014 पासून तर गावगन्ना हिंडत “अघोषित आणीबाणी आली हो”, “असहिष्णुता वाढली हो” अशा बोंबा मारण्यात जर वाढच झालेली होती. पुरोगाम्यांचा उन्माद एवढा वाढला होता की भारतीय मतदारांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी बसवून फार मोठी चूक केली आहे आणि ती चूक सुधारण्याचा ठेका फक्त आपल्याकडेच आहे, अशा विचारात पुरोगामी टोळी आकंठ बुडाली होती. पण देशातील जनता अतिशय हुशार असल्याने त्यांनी 2019 मध्ये पुन्हा मोदींनाच पंतप्रधानपदी विराजमान केले आणि पुरोगामी टोळीचा उरलासुरला आवेशही धुळीत मिळवला. त्यामुळे हा भारतीय जनतेचा विजय आहे आणि पुरोगामी द्वेषाचा पराभव आहे.
- “मनुवादी पुन्हा सत्तेत आले”
देशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघ परिवारातील संघटनांचा विरोध करणारा एक वर्ग आहे. अनेकांना रा. स्व. संघाची विचारसरणी पटत नाही आणि त्यात वावगे असे काहीही नाही. विरोधी असण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र, याच गोष्टीचा पुरोगामी टोळीला विसर पडला. पुरोगामी टोळीमध्ये लेखक, विचारवंत (कथित), प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणवादी कार्यकर्ते, सिने – नाट्य कलावंत, पत्रकार, संपादक आदींचा समावेश होतो. आता या मंडळींचा समाजावर थोडाफार प्रभाव हा असतोत, म्हणजे सर्वसामान्य नागरिक या मंडळींच्या बोलण्याकडे लक्ष ठेवून असतात. त्यामुळे या मंडळींना बरेचदा आपण सर्वसामान्य जनतेपेक्षा काहीतरी वेगळे आहोत, अडाणचोट नागरिकांना शिकविण्याचा ठेका फक्त आपल्याकडेच आहे, असा गैरसमज या मंडळींच्या निर्माण होऊ लागतो. त्यातून मग सामान्य जनतेच्या प्रती तुच्छताभाव वाढीस लागतो. आणि 2014 पासून तर त्याचा अतिरेक व्हायला सुरूवात झाली होती.
नरेंद्र मोदी 2014 साली बहुमताने पंतप्रधानपदी बसले आणि पुरोगामी टोळीला आपलं दुकान आता लवकरच बंद होईल, अशी अंधुकशी चाहुल लागली. त्यामुळे मग “मोदी कसे फॅसिस्ट आहेत”, “मोदी कसे हुकुमशहा आहेत”, “मोदींनी कशी अघोषित आणीबाणी लादली आहे”, “मोदींमुळे असहिष्णुता निर्माण झाली आहे” अशा प्रकारची ओरड पुरोगामी टोळीने सुरू केली. त्याच्या जोडीला “पुरस्कार वापसी”, “नॉट माय पीएम” असले आचरट प्रकारही करून झाले. या सर्व प्रकारांना सर्वसामान्य जनतेचा पाठींबा आहे असा समजही त्यांनी करून घेतला. उठताबसता मोदींचा द्वेष करणे, मोदी समर्थकांचा द्वेष करणे, मोदींना निवडून दिले म्हणून मतदारांची संभावना मुर्ख अशी करणे, मोदी समर्थकांना भक्त संबोधणे हे सर्व करीत असताना आपणही वेठबिगार गुलाम झालो आहोत, याचा पुरोगामी टोळीला विसर पडला. अखेर जनतेने 2019 साली तब्बल 303 जागांसह भाजपला पुन्हा निवडून दिले आणि पुरोगामी टोळीला त्यांची नेमकी जागा दाखवून दिली.
निवडणूकीच्या काळात 600 कलावंत, साहित्यिक मंडळींनी एक पत्र प्रसिद्ध करून देश पुन्हा मोदींच्या हाती देऊ नये, असे आवाहन केले. तसे आवाहन करण्याचे त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. मात्र, त्या पत्राचा सूर पाहता सर्वसामान्य जनतेला थेट दोष देणारा तो मजकूर होता. अर्थात, त्याला नेहमीप्रमाणे भरपूर प्रसिद्धी मिळाली, माध्यमांतील एका गटाने त्यावर प्राईमटाईम शोदेखील चालवले. त्यानंतर पंतप्रधान मोदींना पुन्हा निवडून द्या, असे आवाहन करणारे पत्र 900 पेक्षा कलावंत, साहित्यिक यांनीही जारी केले आणि माध्यमांतील काहींचा सन्माननिय अपवाद वगळता अन्यांनी त्याकडे सपशेल दुर्लक्ष केले. त्यानंतर पुरोगामी टोळीचा आवडता आरोप म्हणजे देशात लागू असलेली अघोषित आणीबाणी. अघोषित आणीबाणी लागू असतानाही पुरोगामी टोळी मोदींना शिव्या देऊ शकत होती, हे अघोषित आणीबाणीचे विशेषच म्हणावे लागेल. एवढे सर्व होत असताना सामान्य जनता हे सर्व पाहत होती आणि पुन्हा मोदींनाच पंतप्रधान करायचे असा त्यांचा विचार ठाम होत गेला. त्याचा परिणाम कसा झाला, हे आता सर्वांसमोर आहेच.
पुरोगामी टोळीने एक ध्यानात घ्यायला हवे, ते म्हणजे सर्वसामान्य जनतेला कधीही गृहीत धरता येत नाही. आणि दुसरे म्हणजे उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये गुबगुबीत सोफ्यांवर रेलून काचेच्या उंची चषकातून चमकदार सोनेरी द्रवाचे घुटके घेत केवळ द्वेषाचा अजेंडा आणि पुरोगामी दुकानदारी चालविता येते, देश चालविता येत नाही.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा