राजधानीत रंगली दिवाळी पहाट !
सकाळी साडेपाच-सहाची वेळ, हिवाळ्याची नुकतीच चाहुल लागल्यामुळे वातावरणात असलेला सुखद गारवा, खास ठेवणीतला झब्बा, पायजमा, आणि पैठणी परिधान करून आलेली मंडळी, त्यावरच्या अत्तराच्या हलक्या शिडकाव्याने आसमंतात भरून गेलेला हलकासा गंध आणि सज्ज झालेला रंगमंच ! आता सुरू होणार अभिजात आणि सुरेल मराठी गाण्यांची मैफल......दिवाळी पहाट म्हणजे महाराष्ट्राचे खास वैशिष्ट्य. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दिवाळी पहाट अगदी उत्साहात साजरी करण्यात येते. अगदी त्याच उत्साहात राजधानी दिल्लीत दिल्ली मराठी प्रतिष्ठानतर्फे दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यंदाचे प्रतिष्ठानचे तिसरे वर्ष होते. या कार्यक्रमाचे स्थानही अगदी विशेष होते - इंडिया गेट ! इंडिया गेटची भव्यता सोबतीला असल्यामुळे कार्यक्रमाला वेगळीच उभारी प्राप्त झाली आणि दिवाळी पहाट अगदी बहारदारपणे साजरी झाली.
हे वर्णन ‘दिवाळी पहाट’चे आहे, हे एव्हाना वाचकांच्या लक्षात आले असेलच. मात्र, ही ‘दिवाळी पहाट’ रंगली ती राजधानी दिल्लीत, इंडिया गेटजवळ- राजपथावर !

सकाळी सहा वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीस इंडिया गेटवर आदल्या दिवशी दुपारपासूनच प्रारंभ झाला. सुमारे साडेपाच ते सहा हजार लोक या कार्यक्रमाला हजेरी लावत असतात, त्यामुळे कार्यक्रमात कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते डोळ्यात तेल घालून झटत होते. विशेष म्हणजे कार्यक्रमस्थळी स्वच्छतेस सर्वाधिक महत्व देण्यात आले, त्यामुळे कार्यक्रमानंतरही इंडिया गेटचा परिसर अतिशय स्वच्छ होता. विशेष म्हणजे कलाकारांसाठी व्हॅनिटी व्हॅनसह सर्व सुसज्ज व्यवस्थाही पुरविण्यात आली होती. राजधानी आणि राष्ट्रीय राजधानी परिसरातील मराठी जन या कार्यक्रमाची अगदी आतुरतेने वाट पाहत असतात. कार्यक्रमास राजधानीतील राजकीय, सामाजिक, प्रशासन आणि अन्य नामवंत मराठी जन आवर्जून उपस्थित राहतात.
यंदाचे आकर्षण किल्ले !


भव्य मराठमोळी रांगोळी

रांगोळी म्हणजे मराठी संस्कृतीचे खास वैशिष्ट्य. प्रत्येक मराठी घराच्या अंगणात दररोज अगदी छोटी का होईना, पण रांगोळी रेखाटली जातेच. दिवाळीत तर विविध प्रकारच्या रांगोळ्या डोळ्याचे पारणे फेडत असतात. इंडिया गेटवर कार्यक्रमाच्या प्रवेशाद्वारावरही दहा फूट व्यासाची भव्य रांगोळी रेखाटली होती, इंडिया गेटची भव्यता आणि सुंदर रांगोळी हे अगदी पाहण्यासारखे चित्र होते. इंजिनिअर असलेली मधुरिमा पटवारी ही तरुणी आणि तिचे साथीदारींनी ही भव्य रांगोळी साकारली. तिच्याशी संवाद साधला असता ती म्हणाली की, यंदाच्या वर्षी दहा फूट व्यासाच्या दोन पारंपरिक मराठी रांगोळ्या रेखाटण्यात आल्या. संस्कार भारती प्रकारातील त्या रांगोळ्या असतील. ‘इन्क्रेडीबल इंडिया’ अथवा ‘अतुल्य भारत’ अशी खास थीम घेऊन यंदाच्या वर्षी रांगोळी रेखाटली आहे. राजधानीत खास मराठमोळी रांगोळी रेखाटताना वेगळाच आनंद मिळतो, यापूर्वीच्या दोन्ही दिवाळी पहाट कार्यक्रमांना भव्य रांगोळी रेखाटल्याचेही मधुरिमा पटवारी यांनी सांगितले.
सिल्क साड्या, पैठणी, नाशिकची मिसळ आणि बरंच काही...
कार्यक्रमस्थळी बनारसचे मोहम्मद कालिम हे बनारसी सिल्कच्या कापड्यांचा, त्याचप्रमाणे मराठमोळ्या पैठणीचादेखील स्टॉल लावण्यात आला होता. त्याचप्रमाणे राजधानी दिल्लीतील मराठी खवय्यांसाठी खास नाशिकची झणझणीत मिसळही होती. गाण्यासोबतच रसिकांच्या पोटपूजेचीही काळजी अगदी निगुतीने घेण्यात आली.

कार्यक्रमातला विशेष भाग म्हणजे उल्लेखनिय कार्य करणाऱ्या मराठी जनांचा सत्कार. ज्येष्ठ शिल्पकार पद्मभूषण राम सुतार, समाजसेवक चंद्रशेखर गर्गे, दिवंगत समाजसेवक रा. मो. हेजिब आणि शतकपूर्तीकडे वाटचाल करणाऱ्या महाराष्ट्र स्नेह संवर्धक समाज या संस्थेचा विशेष गौरव करण्यात आला.
कोणत्याही कार्यक्रमाची आखणी करायची म्हणजे त्यासाठी सुयोग्य नियोजनाची आवश्यकता असते. दिल्ली मराठी प्रतिष्ठानच्या नियोजन समितीमधील सर्व सदस्यांनी अतिशय काटेकोरपणे कार्यक्रमाचे नियोजन केले होते. ही दिवाळी पहाट अनुभवण्यासाठी केवळ मराठीच नव्हे, तर अमराठी बांधवदेखील मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. एवढेच काय, पण विविध परदेशी दूतासावासातील परदेशी अधिकारीदेखील हा अनोखा सोहळा अनुभवण्यासाठी येतात. महाराष्ट्रातील मराठी परंपरा उत्तरेत, थेट देशाच्या राजधानीत जपण्याचा प्रयत्न दिल्ली मराठी प्रतिष्ठानतर्फे करण्यात येत आहे. यानिमित्ताने मराठी जनांना एकत्र करण्याचेही महत्वाचे काम याद्वारे साध्य होत आहे. त्यामुळे राजधानीतील दिवाळी पहाट ही प्रत्येकाने एकदा तरी अनुभवावी, असेच म्हणावे लागेल.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा