‘अटल’ चरितकहाणी

“अटलजी तेव्हा अवघ्या १५ वर्षांचे होते. डॉक्टरांचे एकदाच घडलेले, पण मनात घर केलेले दर्शन त्यांच्या डोळ्यांपुढून जात नव्हते. अशा अस्वस्थ आणि भारलेल्या मनस्थितीत त्यांच्या मनात एक एक शब्द जुळू लागला. कवितेची एकेक ओळ जन्म घेऊ लागली. अटल कागदावर एकेक ओळ लिहू लागला. त्या कवितेची पहिलीच ओळ होती...
हिंदू तन-मन, हिंदू जीवन,
रग रग हिंदू मेरा परिचय...”


माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी. स्वातंत्र्योत्तर काळात हिंदुत्वविचार ठामपणे, मात्र अन्यांना न दुखविता मांडणारा एक कुशल राजनेता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शामाप्रसाद मुखर्जी, पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या तालमीत तयार झालेला कार्यकर्ता. प्रथम जनसंघ, अल्पकाळ जनता पक्ष आणि नंतर दीर्घकाळ भारतीय जनता पक्षाला दिशा देणारा मार्गदर्शक, आपल्या अमोघ वक्तृत्व आणि परराष्ट्र धोरणाच्या अभ्यासाने पं. नेहरूंचेही लक्ष वेधून घेणारा खासदार, लालकृष्ण आडवाणींचा सख्खा मित्र, लहानग्यांना ‘स्कुल चलें हम’ या अनोख्या गाण्याच्या रूपात सकाळी सकाळी भेटणारा प्रेमळ चेहरा, कर्तव्यकठोर पंतप्रधान आणि भारतरत्न... अशा विविध रूपांमध्ये अटलजींनी तब्बल पाच – सहा दशके भारतीय राजकारणाच्या पटावर अटलजी वावरत होते. अटलजींच्या या बहुआयामी व्यक्तीमत्वाचे यथार्थ चित्रण ज्येष्ठ पत्रकार सारंग दर्शने यांनी आपल्या ‘अटलजी- कविह्रदयाच्या राष्ट्रनेत्याची चरितकहाणी’ पुस्तकात अगदी नेमकेपणाने केले आहे.

‘कविह्रदयाच्या राष्ट्रनेत्याची चरितकहाणी’ या ओळीमध्ये राजकारणासारख्या धकाधकीच्या क्षेत्रात असुनही अटलजींनी आपले कवीमन जपून ठेवले होते, ते जाणवते. या पुस्तकाचे एक वैशिष्य्ष म्हणजे ही केवळ अटलजींची चरितकहाणी अजिबात नाही. तर यामध्ये स्वातंत्र्योत्तर काळातील जनसंघाच्या स्थापनेपासूनच्या समकालीन राजकीय घडामोडीदेखील लेखकाने अगदी नेमकेपणाने मांडल्या आहेत. त्यामुळे या पुस्तकात पं. नेहरू, शामाप्रसाद मुखर्जी, पं. दीनदयाळ उपाध्याय, गोळवलकर गुरूजी, इंदिरा गांधी यांच्यासोबतच रा. स्व. संघ,  देशाची फाळणी, महात्मा गांधी यांची हत्या, आणिबाणी, जनता पक्षाचा फसलेला प्रयोग, भारतीय जनता पक्षाची स्थापना, गांधीवादी समाजवाद, हिंदुत्व, राजन्मभूमी आंदोलन, पक्षांतर्गत संघर्ष, राष्ट्रीय राजकारणातील १९९१ नंतरची राजकीय सुंदोपसुंदी, भाजपविषयीची राजकीय अस्पृश्यता, भाजपला मिळालेली सत्ता आणि २००४ साली गमवावी लागेलेली सत्ता या आणि अशा अनेक विषयांना लेखकाने स्पर्श केला आहे. मात्र, त्यामुळे पुस्तक रटाळ अजिबात झालेले नाही. उलट अटलजींच्या राजकीय कारकिर्दीची विशालता आणि सर्वसमावेशकता कळून येण्यास मदत होते आणि त्यानंतर अटलजी केवढ्या मोठ्या उंचीचे राजनेता होते, हे पाहून एक वेगळेच समाधान मिळते.

लेखकाने एकूण सत्तावीस प्रकरणांमध्ये अटलजींचे चरित्र मांडले आहे. पुस्तकाची सुरुवात होते ‘ऐतिहासिक; पण क्षणभंगुर...’ या प्रकरणापासून. यामध्ये १९९६ साली पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुका, त्यात भाजपला मिळालेल्या १६१ जागा, भाजपला मिळालेली सत्तास्थापनेची संधी, मात्र बहुमत नसल्याने अवघ्या तेरा दिवसात कोसळलेले सरकार. लोकसभेत विश्वासदर्शक ठराव मांडताना अटलजींनी केलेले भाषण म्हणजे भारतीय राजकारणाची दिशा बदलणारे होते, त्याविषयी लेखकाने अगदी सविस्तर आणि रंजक भाषेत लिहिले आहे. शिवाय लेखकाची भाषा अगदी ओघवती असल्यामुळे वाचताना सर्व घडामोडी अगदी आपल्यासमोरच घडत असल्याचे जाणवते.

त्यानंतरच्या काही प्रकरणांमध्ये अटलजींचा जन्म, बालपण, किशोरावस्थेतील आर्य समाजात घालविलेला काही काळ आणि त्यानंतर रा. स्व. संघासोबत त्यांची जुळलेली नाळ या घटना अगदी सरळसोप्या शैलीत मांडल्या आहेत. दीनदयालजींच्या सहवासात अटलजींच्या व्यक्तीमत्वाला आकार येऊ लागला. मग ‘राष्ट्रधर्म’, ‘पान्चजन्य’ या नियतकालिकांच्या घडणीत अटलजींच्यातला पत्रकारही आकार घेऊ लागला. या दोन्ही नियतकालिके बाळसे धरत असतानात झालेली गांधी हत्या आणि त्यानंतर रा. स्व. संघावर आलेली बंदी, अशा प्रतिकूल काळातला अटलजींचा संघर्ष अतिशय वाचनीय आहे. 

भारतीय जनसंघाची स्थापना झाल्यावर शामाप्रसाद मुखर्जी आणि पं. दीनदयालांसोबत अटलजींच्या राजकीय प्रवासाला सुरूवात झाली. मात्र, प्रथम मुखर्जींचा आणि त्यानंतर दीनदयालांच्या झालेल्या अकाली (आणि संशयास्पद !) मृत्यूमुळे प्रथम कोलमडलेले हळवे अटलजी आणि नंतर पक्षसंघटना आणि कार्यकर्त्यांना सावरण्यासाठी दोन वज्राघात सोसून धिरोदात्तपणे उभे राहिलेले ‘अटल’ लेखकाने यथावत दाखविले आहे. ते वाचताना अटलजींच्या अनेक कंगोऱ्यांची ओळख होते आणि वाचत त्यात हरवत जातात. इंदिरा गांधीप्रणित आणिबाणी, त्यात लोकशाहीचा झालेला खून आणि विरोधकांनी खचाखच भरलेले तुरूंग. त्यानंतर झालेल्या जनता पक्षाच्या प्रयोगात अटलजी प्रमुख भूमिकेत होते. जयप्रकाश नारायण यांच्याप्रती असलेला आदर आणि जनता पक्षाचा प्रयोग यशस्वी होण्यासाठी त्यांनी अटलजींनी केलेली धडपड यातून त्यांची लोकशाहीप्रती असणारी निष्ठा स्पष्टपण दिसून येते. जनता पक्षाचे सरकार अंतर्गत लाथाळ्यांमुळे पाच वर्ष पूर्ण न करताच कोसळले. त्यानंतर अटलजींनी केलेली भारतीय जनता पक्षाची स्थापना आणि ‘अंधेरा छटेगा... सूरज निकलेगा... और कमल खिलेगा...’ अशी आत्मविश्वासपूर्ण घोषणा... हा सर्व प्रवास लेखकाने अगदी यथार्थ मांडला आहे.


अटल आणि आडवाणी ही भारतीय राजकारणातील एक अभेद्य जोडी. तब्बल पासष्ट वर्षांची दोघांची मैत्री परस्परांनी अगदी निगुतीने जपली. यामध्ये मग अनेक मतभेदाचेही प्रसंग आले, पण मतभेदाचे रूपांतर दोघांनीही जाहीर वादात कधीही होऊ दिले नाही. अटलजी आणि आडवाणीजी यांच्यातले संबंध नेमके कसे होते, हे लेखकाने ‘अध्यक्षपदावरून पायउतार’ या प्रकरणात अतिशय नेमकेपणाने मांडले आहेत. १९७२ सालात जनसंघाच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचे अटलजींनी ठरवले होते. आपल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष लालकृष्ण आडवाणी यांनी घ्यावे, असे अटलजींच्या मनात होते. तसे आडवाणीजींना सांगितल्यावर त्यांनी ते नाकारले आणि राजमाता विजयाराजे शिंदे यांचे नाव सुचविले. मात्र, राजमातांनी पद स्विकारण्यास नकार दिला. त्यानंतर मग डॉ. भाई महावीर यांचे नाव पुढे आले, त्यांनीही ते पद नाकारले. “डॉ. महावीर यांच्या घरातून बाहेर आल्यावर मात्र अटलजींनी लालजींना तेथेच थांबविले. गाडीत बसण्यापूर्वी निर्धाराने म्हणाले, ‘लालजी, आता हे पुरे. अशी नेत्यांची समजूत काढत बसण्याला अर्थ नाही आणि अंतही नाही. मी सांगतो आहे, ते करण्यावाचून मार्ग नाही. तुम्हीच अध्यक्ष व्हा..’ इतके बोलून अटलजी खळखळून हसले...” हा प्रसंग वाचल्यानंतर एकाच पक्षातल्या दोन उत्तुंग नेत्यांची परस्परांविषयीची भावना किती स्वच्छ होती, याची खात्री पटते.
पुढील प्रकरणांमध्ये रामजन्मभूमीचे आंदोलन, त्यात सुरूवातीस अटलजींना घेतलेली तटस्थ भूमिका मात्र मोक्याच्या वेळी “जमीन को समतल करना होगा” हा जाहीर सभेतून दिलेला संदेश त्यांच्यातील धोरणी राजनेत्याची ओळख पटविणारा आहे. लेखकाने रामजन्मभूमी आंदोलन, आडवाणींचे बहरत असलेले आणि पक्षसंघटनेवर घट्ट पकड निर्माण करणारे नेतृत्व, त्यादरम्यान अटलजींना अल्पकाळ आलेला विजनवास, संघपरिवारातील दत्तोपंत ठेंगडी, अशोक सिंघल आणि रज्जूभय्यांनतर सरसंघचालक झालेल्या कुप सुदर्शन यांच्यातील कुरबुरी मांडताना लेखकाने सनसनाटी अथवा सवंगता टाळली आहे.

प्रथम तेरा दिवसांचे, नंतर तेरा महिन्यांचे आणि अखेर साडेचार वर्षांचे सरकार चालवितांना अटलजींचा पाच दशकांचा अनुभव कामी आला, हे लेखकाने मांडले आहे. याच काळात झालेले कारगील युद्ध आणि तरीदेखील पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्याची अटलजींनी दाखविलेली उदारवृत्ती, संसदेवरील हल्ला, कंदाहार विमान अपहरण या बाबीही मांडल्या आहेत. याच काळात रा. स्व. संघ आणि अटलजी यांच्यात काहीसा दुराव निर्माण झाला होता, आडवाणींसोबतही काही मतभेद होत होते. मात्र, असे असतानाही अटलजींना त्याची कधीही जाहीर वाच्यता केली नाही आणि राजकारणातली शालिनता जपून ठेवली. त्यानंतर मुदतपूर्व निवडणूका घेण्याचा निर्णय फसल्यानंतर अटलजींनी राजकारणातून घेतलेला सन्यास हा सर्वांनाच चटका लावून जाणार निर्णय... पण लेखकाने या सर्व घटना अगदी सुरस शैलीत मांडल्या आहेत.


‘अटलवादाची अक्षय देणगी’ या अखेरच्या प्रकरणात लेखकाने संपुर्ण पुस्तकाचा आढाव तर घेतलाच आहे. पण त्यासोबतच ‘अटलवाद’ म्हणजे नेमके काय, हे अतिशय सोप्या भाषेत सांगितले आहे. लेखकाने म्हटले आहे, “अटलजींचे व्यक्तीमत्व, वारसा, कार्यशैली आणि दूरदृष्टी मिळून ‘अटलवाद’ असे नाव दिले; तर तो स्वतंत्र भारताच्या वाटचालीतील अनमोल ठेवा ठरेल, यात शंकाच नाही. 
असा अटलवाद ही अटलजींची अक्षय देणगी आहे !
जोवर भारतीय लोकशाही आहे, तोवर सोबत राहणारी !!”

अटलजी- कविह्रदयाच्या राष्ट्रनेत्याची चरितकहाणी
लेखक- सारंग दर्शने
पृष्ठसंख्या- ५२९
किंमत- ६०० रूपये
राजहंस प्रकाशन

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नक्षलवाद : बदलते स्वरूप

हिंसक माणिक 'सरकार'

ती तेव्हा तशी... भाग ४ पुन्हा अस्वस्थता