राजधानीत पडले मराठमोळं 'पुढचं पाऊल' !
![]() |
मराठमोळं 'पुढचे पाऊल' |
राजधानी दिल्ली मध्ये कस्तुरबा गांधी मार्गावर असलेल्या नव्या महाराष्ट्र सदनात गेल्या आठवड्यात 5 आणि 6 मे रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परराष्ट्र विभागातील सचिव आणि ‘पासपोर्ट मॅन’ अशी ओळख असलेले डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या पुढाकाराने राजधानीत विविध विभागात कार्यरत असणाऱ्या मराठी अधिकाऱ्यांना एकत्रित करून ‘पुढचे पाऊल’ या विशेष सकारात्मक मंचाची स्थापना करण्यात आली आहे. त्याचाच एक उपक्रम म्हणून महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत ‘महाराष्ट्र महोत्सव- जागर महाराष्ट्राचा’ या दोन दिवसीय विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मराठी माणूस दिल्लीत फारसा रमत नाही, असे नेहमी म्हटले जाते. अगदी ऐतिहासिक काळापासून बघितल्यास दिल्लीचे तख्त राखणाऱ्या मराठी माणसाने त्या तख्तावर बसून दिल्ली आणि देशावर राज्य करण्याचे प्रयत्न कधीच केले नाहीत. कदाचित तेव्हापासूनच दिल्लीबद्दल मराठी माणसाच्या मनात एक संकोच निर्माण झाला असावा. स्वातंत्र्योत्तर काळातही दिवंगत यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, वसंत साठे, विलासराव देशमुख, प्रमोद महाजन तसेच, शरद पवार, नितीन गडकरी सुशीलकुमार शिंदे, शिवराज पाटील-चाकुरकर, मनोहर जोशी, सुमित्रा महाजन अशा मोजक्याच राजकीय नेत्यांना दिल्लीत आपले बस्तान बसविणे जमू शकले आहे. दिल्लीविषयी अकारण एक प्रकारची अढी नेहमीच मराठी माणाच्या मनात राहिलेली आहे. त्यामुळे दिल्लीला आपलं मानण्याचा मराठी माणूस फारसा कधीच प्रयत्न करताना दिसत नाही. मात्र याचा तोटाही महाराष्ट्र आणि मराठी माणसालाच झाला आहे.
![]() |
डॉ. ज्ञानेश्वर मुळे |
‘पुढचे पाऊल’विषयी सांगताना डॉ. ज्ञानेश्वर मुळे म्हणतात, मराठी आवाज भक्कम करण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. गेल्या 35 वर्षांपासून मी परराष्ट्र खात्यात कार्यरत आहे, मात्र मराठी शिष्टमंडळे मला दिसली नाहीत. यामध्ये बदल होणे गरजेचे आहे. दिल्लीत महाराष्ट्रासाठी सामूहिक प्रयत्न करून राज्याची नाममुद्रा तयार करणे गरजेचे आहे. आपल्याकडे गुणवत्ता भरपूर आहे, मात्र त्याचा नेमका वापर झालेला नाही. 'पुढचे पाऊल' हा महाराष्ट्र आणि दिल्ली व जग यांना जोडणारा सेतू म्हणून कार्यरत राहील, असे मत डॉ. मुळे यांनी व्यक्त केले. डॉ. मुळे यांच्यासोबतच सनदी अधिकारी प्रफुल्ल पाठक आणि विलास बुरडे हे दोघेही विशेष जबाबदारी पार पाडत आहेत.
दोन दिवसीय कार्यक्रमात उद्योजकतेवर विशेष भर
केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू |
दोन दिवसीय कार्यक्रमात महाराष्ट्र आणि उद्योजकता हा विषय मुख्य ठेवण्यात आला होता. त्याअंतर्गत उद्घाटनाच्या सत्रात उद्योजकता, महाराष्ट्राचे अर्थकारण आणि व्यापाराच्या संधी या विषयावर केंद्रीय हवाई वाहतुक मंत्री सुरेश प्रभू, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि माजी व्हाइस एअर मार्शल आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाचे सदस्य अजित भोसले यांनी आपले विचार मांडले. यावेळी सुरेश प्रभू यांनी उद्योगक्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी पायाभूत सुविधा प्रकल्प महत्वाचे असल्याचे सांगितले. उद्योग वाढले तर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल, असे नमूद करून ते म्हणाले, मी रेल्वे मंत्री असताना विविध रेल्वे प्रकल्पांसाठी 1.25 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली, आजवर महाराष्ट्राचा रेल्वेविषयीचा सर्व बॅकलॉग भरून काढण्याचे प्रयत्न केल्याचे प्रभू म्हणाले. तर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक उद्योगस्नेही राज्य असल्याचे सांगत मॅग्नेटिक महाराष्ट्रमुळे परदेशी गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर राज्यात आकर्षित झाल्याचे सांगितले.
संध्याकाळी औपचारिक उद्घाटनाच्या कार्यक्रमास राज्याचे महसूलमंत्री चंद्रकातदादा पाटील, पर्यटनमंत्री जयकुमार रावल आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांची विशेष उपस्थिती होती.
चर्चासत्रात सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, मी महाराष्ट्र ट्रस्ट चे अभिजित पाटील, पायोनिअर इंडिया कंपनीचे कंट्री मॅनेजर रोहित कुलकर्णी, मराठे ज्वेलर्सचे कौस्तुभ मराठे व खादी ग्रामोद्योगाचे अध्यक्ष विशाल चोरडिया उपस्थित होते. भुषण गगराणी यांनी राज्यात ईज ऑफ डुईंग बिजनेस वर प्रकाश टाकला व राज्यात सुरु असलेले विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांची माहिती दिली. विशाल चोरडिया यांनी खादी ग्रामोद्योग अंतर्गत सुरु असलेल्या प्रकल्प- कलात्मक कोल्हापूर व महाखादी बद्दल माहिती दिली.
महिला उद्योजकांचे विशेष चर्चासत्र |
महिला उद्योजकांच्या चर्चासत्रात बंगळुरू येथील पूर्णब्रह्म फूड्सच्या व्यवस्थापकीय संचालक जयंती कठाळे, वात्सल्य फाउंडेशनच्या स्वाती बेडेकर, महिको या बियाणे कंपनीच्या संचालक डॉ. उषा बारवाले आणि शिक्षणक्षेत्रात स्कूल डिझाईन संकल्पना राबविणाऱ्या दिल्लीमधील उद्योजिका निवेदिता पांडे यांनी या परिसंवादात सहभाग घेतला.
वसंत वसंत लिमये आणि डॉ. आनंद नाडकर्णी |
![]() |
डॉ. आशुतोष जावडेकर |
"क्रीडा क्षेत्रासमोरील नवी आव्हाने" या चर्चासत्रात, रायगडचे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी, राष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटनपटू मंजुषा पवनगडकर- कंवर, स्पोटर्स् सीड या खाजगी कंपनीचे संस्थापक सुधांशू फडणीस यांचा सहभाग होता. यावेळी चर्चासत्रात राज्यातील क्रिडासंस्कृतीविषयी चर्चा करण्यात आली. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक तरी निवासी क्रिडा शाळा असावी, असा सूर या चर्चासत्रातून निघाला.
चर्चासत्रांसोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांचाही उपस्थितांनी आस्वाद घेतला. पहिल्या दिवशी अहमदनगर येथील एका नाट्यगटाने‘बाप व्हाया फेसबुक’हे नाटक तर अखेरच्या दुसऱ्या दिवशी‘दिल्ली महफिल ग्रुप’तर्फे कार्यक्रम सादर करण्यात आला. दिल्लीस्थित मुक्त पत्रकार निवेदिता खांडेकर यांच्या गप्पांच्या निवेदनातून हा कार्यक्रम पुढे सरकला. निवेदिता खांडेकर यांच्या खुमासदार संवादाने कार्यक्रमास वेगळीच झळाळी प्राप्त झाली. दिल्ली महफिल ग्रुप’च्या सदस्यांनी केलेल्या गीतांनी उपस्थितांची मने जिंकली.
पद्मभूषण राम सुतार व पद्मश्री मालती जोशी यांचा सन्मान
कार्यक्रमात जागतिक कीर्तीचे शिल्पकार पद्मभूषण राम सुतार आणि ज्येष्ठ लेखिका पद्मश्री मालती जोशी यांचा विशेष सन्मान केंद्रीय मानव संसाधन राज्यमंत्री सत्यपाल सिंग, खासदार आणि अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.
पद्मभुषण राम सुतार |
पद्मश्री मालती जोशी |
दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी परिसरात बहुसंख्येने असूनही मराठी माणसाचे अस्तित्व ठळकपणे जाणवत नाही, त्याचे हेच कारण आहे की मराठी माणूस स्वत:हून कधीही मराठी संस्कृतीविषयी, महाराष्ट्राविषयी फारसे कोणाला सांगण्याचा प्रयत्न करत नाही. अन्य राज्यांमधील लोकांकडून तसे आक्रमकपणे होताना दिसते. परिणामी आपल्या राज्यांपासून लांब असूनही आपल्या राज्याचा ठसा उमटविण्यात ते यशस्वी होताना दिसतात. राजधानीतच वास्तव्यास असणाऱ्या मराठी माणसाने, मग ते राजकीय नेते असोत की सनदी अधिकारी, व्यापारी, विद्यार्थी अशा सर्वांनी एकत्र एकाच व्यासपीठावर यावे, चर्चा करावी, परस्परांच्या समस्या, प्रश्न जाणून घ्यावेत असे प्रयत्न फारसे कोणी यापूर्वी केले नव्हते. मात्र, डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी गरज ओळखली आणि त्यादृष्टीने काम करण्यास दोन वर्षांपूर्वी म्हणजे 2016 साली प्रारंभ केला. त्यानंतर दोन वर्ष त्यावर फारसा गाजावाजा न करता काम सुरू झाले आणि अखेर 2018 साली ‘पुढचे पाऊल’ या मंचाचा पहिलाच जाहीर कार्यक्रम घेण्यात आला. यंदाच्या वर्षापासून ‘पुढचे पाऊल’ची मुहुर्तमेढ रोवली गेली आहे, आता उत्तरोत्तर त्याचे काम वाढतच जाणार यात शंका नाही.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा