संविधान बचाव ते शरियत बचाव: एक पुरोगामी प्रवास

“मुस्लिम भगिनींना संरक्षण द्यायचा विचार असेल तर मुस्लिम समाजातील प्रमुख लोकांना विश्वासात घेऊन, धर्मगुरूंना विश्वासात घेऊन काय पाऊल टाकायचं ते टाकता येईल. पण तलाक हा कुराणाने इस्लामच्या माध्यमातून दिलेला मार्ग आहे, संदेश आहे. आणि त्या संदेशामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार कोणत्याही राज्यकर्त्यांना नाही.”

प्रथमदर्शनी हे विधान कोणा मध्ययुगीन मानसिकतेत जगणाऱ्या, धर्माला स्वत:ची वैयक्तिक जहागिरी मानणाऱ्या मुल्ला-मौलवीचे असावे, असा आपला समज होईल. मात्र तो समज साफ चुकीचा आहे. हे विधान आहे भारतीय राजकारणातील धुरंधर, फुले-शाहू-आंबेडकरांचा पुरोगामी विचार मानणारे आणि त्यावरच वाटचाल करणारे, नेहमी पुरोगामी भुमिकाच घेत प्रतिगाम्यांना शह देणारे असे पद्मविभुषण रा. रा. शरदचंद्रजी पवारजी साहेब यांचे. धक्का बसला ना ?, पण शरदजी साहेबांचे राजकारण हे असेच, धक्के दिल्याशिवाय पुढे न जाणारे !

शरदजी साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने विद्यमान राज्यसरकारच्या कारभाराविरोधात ‘हल्लाबोल यात्रे’चे आयोजन केले होते. त्याचा समारोप काल औंरंगाबाद येथे झाला. समारोपाच्या सभेत शरदजी साहेबांनी वरील निखळ पुरोगामी, विवेकी आणि लोकशाहीवादी विधान करत भारतीय संविधानास चार चाँद लावण्याचे काम केले आहे, त्यासाठी अवघे राष्ट्र त्यांचे शतश: आभारी राहील. आता तु्म्ही म्हणाल की हे विधान पुरोगामी कसे काय बुवा ?, तर तुम्ही अतिशय प्रतिगामी, संविधानविरोधी आणि फ्यासिस्ट विचारसरणीचे समर्थक असल्याने असे नतद्रष्ट प्रश्न तुम्हास पडतात, हे त्यावर उत्तर आहे.

एकीकडे अतिशय पुरोगामी आणि लोकशाहीवादी राजीव गांधी सरकारने शाहबानो प्रकरणी मुल्लामौलवींपुढे शरणागती पत्करत मुस्लिम भगिनींना न्याय्य हक्कापासून वंचित ठेवण्याचे ऐतिहासिक कार्य केले होते. तर प्रतिगामी, लोकशाहीचे मारेकरी, अघोषित आणिबाणी लादणाऱ्या अशा फ्यासिस्ट नरेंद्र मोदी सरकारने शायराबानोसोबत ठाम उभे राहत अतिशय अन्यायकारक असा तिहेरी तलाक रद्द करत त्याविषयी कायदा लोकसभेत संमत करवून घेतला. त्या निर्णयाचे स्वागत मुस्लिम समाजातील महिलांनी आणि पुरुषांनीही केले. अपवाद मात्र धर्मास स्वत:ची जहागिरी मानणाऱ्या आणि आम्ही सांगू तोच धर्म अशी उद्दाम भुमिका घेणाऱ्या मुल्लामौलवींचा.


कुराण आणि शरियतमध्ये ढवळाढवळ करण्याचा अधिकार न्यायालय आणि सरकारला अजिबात नाही, अशी तद्दन सुमार भुमिका या मंडळींनी मांडली. अर्थात त्यांना धर्माची दुकानदारी बंद पडण्याचा धोका सतावत असल्याने त्यांच्याकडून तीच भुमिका येणे अपेक्षित आहे. मात्र प्रखर पुरोगामी अशा शरदजी साहेबांना नेमका कसला धोका सतावत असावा, की त्यांनाही मुल्लामौलवींच्या भाषेत बोलावे लागले ? तर शरदजी साहेबांना आता निवडणुकीचे वेध (सर्वांत आधी असे वेध त्यांनाच लागतात !) लागल्याने अशी निखळ पुरोगामी विधाने केली जाता आहेत, अर्थात ही सुरूवात असून आणखी बरेच काही ऐकायला मिळणार आहे.

मुंबईत 26 जानेवारी रोजी शऱदजी साहेबांच्या नेतृत्वाखाली ‘संविधान बचाव रॅली’ काढण्यात आली होती. त्यात सर्वश्री डॉ. बंटी उपाख्य जितेंद्रजी आव्हाडजी, हार्दीकजी पटेलजी, शरदजी यादवजी, तरुण तडफदार आमदार (‘मोदी हड्डीया गलाने चले जाए’ फेम) जिग्नेशजी मेवानीजी, कॉम्रेड सितारामजी येचुरीजी, कन्हैयाजी कुमारजी (‘आजादी’ फेम) हे आणि असे देशभरातील संविधानाचे स्वघोषित राखणदार सहभागी झाले होते. “देशात सध्या जातीयवादी, फ्यासिस्ट सरकार असून त्यामुळे संविधानास धोका निर्माण झाला आहे” अशी या मंडळींची मांडणी आहे. मात्र निवडणुकीत हक्काची व्होटबँक निसटून जाऊ नये, किंबहुना ती अधिकच घट्ट व्हावी म्हणून शऱदजी साहेबांचा प्रवास संविधान बचाव ते शरियत बचाव असा होतो आहे.
खरे तर तिहेरी तलाक किती अन्यायकारक आहे, मुस्लिम भगिनींना त्यामुळे काय भोगाले लागते, याबद्दल शरदजी साहेब अनभिज्ञ अजिबात नाही. मुस्लिम समाजातील खरेखुरे पुरोगामी समाजसुधारक हमीद दलवाई यांना शरदजी साहेबांनी खूप सहाय्य केल्याचेही ऐकिवात आहे. मात्र राजकारणात पन्नासहून अधिक वर्ष झाले तरी शरदजी साहेबांना अखेर प्रतिगामी भुमिका घेऊनच निवडणुकीत उतरावे लागते. शऱदजी साहेबांच्या याच सवयीमुळे राष्ट्रीय राजकारणाचा आवाका असूनही केवळ महाराष्ट्र आणि त्यातही पश्चिम महाराष्ट्रापुरताच त्यांचा ‘राष्ट्रीय’ म्हणावणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कामगिरी करू शकला आहे. आणि आता तर पक्षापुढे अस्तित्वाचाच प्रश्न उभा राहिला आहे.

आणि विशेष म्हणजे शरदजी साहेबांच्या या मध्ययुगीन,
प्रतिगामी आणि पुरुषी मानसिकतेच्या विधानाचा विरोध एरवी पुरोगामीत्वाचा टेंभा मिरवत गावगन्ना हिंडणाऱ्या एकाही कथित पुरोगामी विचारवंत, पत्रकार, लेखक, साहित्यिक यांनी केल्याचे दिसलेले नाही. अर्थात यात त्यांची चुक नाही, ‘ज्याची खावी पोऴी, त्याचीच वाजवावी टाळी’ या म्हणीचे उदाहरणासह स्पष्टीकरण ही मंडळी सध्या देत आहेत. अशी विधाने करण्याची ही काही शरदजी साहेबांची पहिलीच वेळ नाही. महाराष्ट्रात सत्ताबदल झाला आणि ब्राह्मण व्यक्ती मुख्यमंत्री झाला की एरवी पुरोगामी असलेले पवार साहेब अचानक ‘जातीयवादी’ विधाने करू लागतात. पहिल्या युती सरकारच्या वेळी मनोहर जोशी सर मुख्यमंत्री असताना त्यांना असेच ‘पळी-पंचपात्र’ वगैरे आठवले होते. तर यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर कोल्हापुरकर युवराज संभाजीराजे छत्रपती यांना भाजपने राज्यसभा देऊ केली, त्यावर ‘पूर्वी छत्रपती पेशव्यांची नेमणूक करायचे, आता पेशवे छत्रपतींची नेमणूक करतात’ असे निखळ पुरोगामी विधान केले होते. अर्थात त्यांची ही विधाने तमाम पुरोगामी, जातीअंताच्या लढाया वगैरे लढणार्‍यांना अजिबात जातीयवादी वाटत नाहीत. कारण केवळ ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ हाच काय तो जातीयवादी असल्याचा या मंडळींचा ठाम असा ‘अंधविश्वास’ आहे.


शरदजी साहेबांना अळणी राजकारणाची अजिबात सवय नाही, त्यांना लागतो तो मसालेदारपणा. म्हणूनच साहेबांचे राजकीय ताट हे चाणाक्षपणा, अभ्यासूवृत्ती, कोणताही विषय झपाट्याने समजून घ्यायची हातोटी, प्रशासनावर पकड यासोबतच चवीपुरते पुरोगामीत्व, निधर्मवाद, जातीयवाद, पेशवे, पळी-पंचपात्र असे ‘भरलेले’ असते. मग साहेब हव्या त्या पदार्थांचा मुक्तपणे आस्वाद घ्यायला मोकळे. शिवाय काही कमी जास्त पडायला नको म्हणून तमाम पुरोगामी लेखक, विचारवंत, पत्रकार आणि आणखी काही काही असणारे लोक तर सदैव दिमतीला असतातच. एकूण काय ती ज्याप्रमाणे सुखवस्तु घरातील कर्ता पुरुष पोटभर जेवण वगैरे करून, ओसरीवरच्या बंगळीत बसून सुपारी (अथवा अन्य काहीही..) कातरता कातरता जे काही करतो, तशीच पवारांची अशी अचानक येणारी विधानं असतात. अर्थात त्याला विशेष अशी साधना लागते.

©पार्थ कपोले
●सदर लेखाचा लेखकाच्या परवानगीशिवाय अन्य कोठेही वापर करू नये.

टिप्पण्या

  1. छापण्याची परवानगी हवी आहे. माझा दूरभाष ९६७३४७१६५८

    उत्तर द्याहटवा
  2. दांभिक आणि ढोंगी पुरोगाम्यांवर अतिशय योग्य प्रहार!

    उत्तर द्याहटवा
  3. जिवंतपणी पवारांनी त्यांचे राजकीय गुरु यशवंतराव चव्हाण यांच्या पाठीत खंजीर खुपसले होते....आता पवारांनी त्यांचे जवळचे मित्र हमीद दलवाई यांच्या पाठीत दलवाईंंच्या म्रुत्यु नंतर खंजीर खुपसले आहे....खंजीर खुपसणे ही बीमारी असु शकते.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नक्षलवाद : बदलते स्वरूप

हिंसक माणिक 'सरकार'

ती तेव्हा तशी... भाग ४ पुन्हा अस्वस्थता