ओळख हरवलेलं शहर


धुळे शहरात पारोळा रस्त्यावरच्या गोपाल टी हाऊससमोर (‘पिवर’ चहासाठी प्रसिध्द असलेलं धुळेकरांचं आवडत ठिकाण !) गुड्ड्या नामक गुन्हेगाराचा खून करण्यात आला. सकाळी साडेसहा – सातच्या सुमारास झालेल्या या खुनामुळे अवघं शहर हादरलं, त्याची चित्रफित काही वेळातच संपुर्ण देशभर पसरली. वृत्तवाहिन्या, समाजमाध्यमांवर आजपर्यंत या घटनेची चर्चा सुरू आहे. फेसबुक, व्हॉट्स अप सारख्या समाजमाध्यमांवरून सदरची चित्रफित आणखी पसरून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी तशा सुचना जारी केल्या.
गुड्ड्याच्या खुनानंतर शहरात अनेक ठिकाणी फटाके वाजवून, पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. शहराच्या एकूणच आरोग्याच्या दृष्टीने ही घटना अधिक विचार करण्यासारखी आहे. एका गुन्हेगाराबद्दल नागरिकांच्या मानत असलेला संताप व्यवहार्य असला तरी तो अशाप्रकारे बाहेर पडणे विचारी जनांना काळजीत टाकणारा आहे.
या घटनेनंतर धुळ्यातील गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अगोदरच दंगलीमुळे धुळे शहराची विशेष ओळख सर्व देशभर झाली आहेच, त्यात या घटनेमुळे टोळीयुध्दासाठीही शहर ओळखलं जाऊ लागलंय. या सर्व गदारोळात धुळे शहराची नेमकी ‘ओळख’ मात्र पार हरवून गेली आहे. कोणत्याही शहराची ओळख ही सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक बाबींवरून होत असते. धुळ्याचा एकेकाळचा समृध्द वारसा पार अडगळीत पडला असून नकारात्मक गोष्टींसाठी म्हणजे दंगल, संघटीत गुन्हेगारी, अग्निकांड, रॉकेलचा, धान्याचा काळा बाजार, सोरटबाजी यासाठी धुळे आता नावारूपाला येताना दिसत आहे.
धुळ्याच्या या हरवलेल्या ओळखीबद्दल जर विचार केला तर ‘हेच का ते समृध्द सांस्कृतिक वारसा असेललं धुळे’ असा प्रश्न पडतो. धुळ्यातला समृध्द वारसा जगलेले दिवंगत रावसाहेब गरूड यांच्या शब्दात सांगायचं तर ‘धुळे म्हणजे महाराष्ट्रातलं अत्यंत सुदैवी शहर.’
रावसाहेबांकडे गेलं की त्यांच्या तोंडून धुळ्याबद्दल अनेक गोष्टी ऐकायला मिळायच्या, म्हणजे भारतातलं पहिलं बंदिस्त नाट्यगृह- विजयानंद थिएटर (आताचं स्वस्तिक चित्रमंदिर), संगीत नाटकांच्या सुवर्णकाळात प्रत्येक नाटक कंपनीचा पुण्यानंतरचा दौरा हा धुळ्यात असायचा, लता मंगेशकर अवघ्या सोळा वर्षांच्या असताना खोलगल्लीत झालेला त्यांचा गाण्याचा कार्यक्रम, कलामंदिरात (आताचं राजर्षी शाहू नाट्यमंदीर) गाजलेली नाटकं या आणि अशा बऱ्याच आठवणी रावसाहेब सांगायचे. मात्र आज हे सर्व कुठेकरी हरवून गेलंय. शहराला एकूणच सर्वच बाबतीत साचलेपणा आलाय. नवीन काहीतरी करणंतर दूरच पण सध्या आहे ते टिकवण्याच्या बाबतीतही धुळेकर उदासीन होतोय का ? असा प्रश्न पडतो.
सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रात प्रचंड काम असणारी माणसं या धुळे शहरात होती, आहेत. लोकमित्र भाई मदानेंची मुलुखमैदान तोफ याच धुळ्यात धडाडली आहे, ‘आपला महाराष्ट्र’ने शोषितांचा आवाज बुलंद केला आहे, जनसंघाचे मातब्बर नेते उत्तमराव पाटील धुळ्यातलेच, प्राचार्य जे. जी. खैरनार यांनी धुळ्यातूनच दलित चळवळीला दिशा दिली, धुळ्यात झालेल्या ‘अस्मितादर्श’ने एक नवा विचार महाराष्ट्राला दिला, ‘खान्देश साहित्य संमेलना’ने साहित्यक्षेत्रात नवी उमेद आणली, जलतज्ज्ञ मुकुंद धाराशिवकर धुळ्यातलेच, डॉ. रा. भ. चौधरी, लखन भतवाल, मदनलाल मिश्र, एम. जी. धिवरे, वाल्मिक दामोदर यांनी राजकीय क्षेत्रात असामान्य काम केलंय. ज्येष्ठ वास्तुविशारद रवी बेलपाठक यांचं काम वेगळा ठसा उमटवतंय तर वैद्यकीय क्षेत्रात डॉ. विवेकानंद चितळे यांचं वेगळंच महत्व आहे.
झुलाल भिलाजीराव उपाख्य नानासाहेब पाटील यांनी ‘जयहिंद’ची उभारणी करून शैक्षणिक क्षेत्रात धुळ्याचा झेंडा रोवला, एस. एस. व्हि. पी. एस, विद्यावर्धिनी, धुळे एज्युकेशन सोसायटी, स्त्री शिक्षण संस्था यांनी शिक्षणाबद्दल धुळ्याला समृध्द आणि स्वयंपूर्ण बनवलं. पी. डी. दलाल, रावसाहेब ओगले, प्राचार्य मा. य. वैद्य यांचं योगदान अनन्यसाधारण आहे. साहित्याच्या क्षेत्रात रावसाहेब गरूड, सुषमा गरूड, प्राचार्य डॉ. कृष्णा पोतदार, प्रभा बैकर, सुनंदा वैद्य, प्रा. मु. ब. शहा, डॉ. हेमा जावडेकर यांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे. पुरुषोत्तम पाटलांच्या ‘कवितारती’ने एक वेगळाच मानदंड प्रस्थापित केला आहे. नाटककार अनिल सोनार यांची नाटकं मराठी रंगभूमीला समृद्ध करताय तर दिवंगत यादव खैरनारांच्या अभिनयाने मराठी प्रेक्षक समृद्ध झालाय. इतिहासाचार्य राजवाड्यांचं अवघं संशोधन ‘राजवाडे संशोधन मंडळा’त जतन करण्यात आलंय, समर्थह्रदय शंकरराव देव यांनी आपलं अवघं आयुष्य समर्थ रामदासांसाठी अर्पण केलं, ‘वाग्देवता मंदिरा’च्या रुपाने समर्थसाहित्य आज देशाला मार्गदर्शक ठरतंय.
अशी समृद्ध परंपरा लाभलेल्या धुळे शहराची ही ओळख आज कुठे गेली आहे ? गल्लोगल्ली आज सट्ट्याच्या पेढ्या विराजमान आहेत, प्रत्येक गल्लीत एकतरी स्वंयघोषित नेता तयार होतो आहे. शहरातल्या तरूणांना वर उल्लेख केलेल्या व्यक्तींबद्दल अभिमान वाटण्याऐवजी कोणा गल्लीपुरताच वकुब असलेल्या सुमार गावगुंडांबद्दल अभिमान वाटतोय. गणंगांना ‘देवा’प्रमाणे मानण्याची प्रवृत्ती धुळ्यात रूजली आहे. धुळ्यातल्या राजकारण्यांना या शहराशी काही देणंघेणं आहे की नाही, हा प्रश्न पडावा एवढी उदासिनता त्यांच्याकडून दिसते आहे. आपापले हितसंबंध आणि संघर्षात ते एवढे मश्गुल आहेत की फक्त ‘पत्रकबाजीत’च अनेक जण अडकून पडलेत. धुळ्यात चांगली नाटकं येत नाहीत, व्याख्यामालांची समृद्ध परंपरा तर लुप्त झाली आहे.
खरं तर समृद्ध वारसा असलेल्या धुळ्याची परिस्थिती बदलायला काहीच अवघड नाही. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी याकामी पुढाकार घेण्याची गरज आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमची तरुण पिढी काम करण्यास तयार आहे. कारण यात आमचाच स्वार्थ आहे- कारण तुम्ही धुळ्याचं जे वैभव अनुभवलंय तेच पुन्हा एकदा आम्हालाही अनुभवायची इच्छा आहे. त्यामुळे आता सर्वांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे.

टिप्पण्या

  1. अजून सुसंस्कृतसमाजपुरक काम करणाऱ्या व्यक्तींंची यादी खूप मोठी आहे. विचारवंत कै. शरद पाटील, शिवाजीराव भावे, कांतीलालजी, ग.ब.जोशी, बाजीराव माळी, आताचे पु.भा.भावे पुरस्कारप्राप्त प्रा. प्रकाश पाठक ही चटकन आठवलेली नावे. अजूनही शेकडो आहेत. बालनाट्य चळवळही जोरात होती. विद्या आणि सांस्कृतिक यात धुळे आघाडीवर होते. गुंडाना पोसणारे नेतेच जबाबदार असावेत. काय झालय ? दुर्जनांची कार्यक्षमता आणि सज्जनांची अकार्यक्षमता एकाच वेळी वाढली की अशी स्थिती होते.

    उत्तर द्याहटवा
  2. अत्यंत स्तय लिखाण आहे सद्ध्या धुळ्यात नाहिये मात्र आयुष्याची 2 महत्वपूर्ण वर्षे धुळ्याला राहन्याचा योग आलेला आहे धुळ्यात असण्याचा अनुभव मिळालेला आहे उत्तम आर्किटेक्ट चा नमूना असलेले हे शहर स्वतःची चांगली ओळख विसरून वाईट ओळखिने महाराष्ट्राच्या जनसमान्यांच्या नजरेत येत आहे

    उत्तर द्याहटवा
  3. विचार करायला लावणारा लेख 👌👌👍👍
    तरुणांनीच यासाठी पुढे यायला हवे, त्यासाठी इच्छाशक्ती हवी, मेहनत करण्याची तयारी हवी, मग सगळं काही साध्य होईल. वरील मातब्बर मंडळीत तरुणांचा वाटा खूप कमी आहे,
    जो काही टॅलेंट आहे तो धुळे सोडून बाहेर गेला, इथे जे आहेत ते हे जे काही चाललंय त्याचा आमच्याशी काहीएक संबंध नाही असा आव आणून बसलेले आहेत मग पुढाकार घेणार कोण ?
    सर्वांनी एकत्र येऊन शहराला साहित्यिक, सांस्कृतिक आणि औद्योगिक केंद्र बनवण्यासाठी प्रयत्न करायला हवे,
    जर रोजगार वाढेल तर अशा समस्या अर्ध्या तिथेच सुटतील त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती चे पाठबळ असणे आवश्यक आहे.
    धन्यवाद

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हिंसक माणिक 'सरकार'

नक्षलवाद : बदलते स्वरूप

ती तेव्हा तशी... भाग ४ पुन्हा अस्वस्थता