धुळयातील संस्थावैभव
एखाद्या शहराच्या एकूणच जडणघडणीत विविध संस्थांचा फार मोठा वाटा असतो. संस्था म्हणजे समाजाला दिशा देणारी एक व्यवस्था. संस्थांमुळे समाज हा कायम जागृत राहतो, विविध प्रवाहांशी तो जोडलेला राहू शकतो. समाजाला एकूणच क्रियाशील ठेवण्यासाठी संस्थांचे योगदान कमी लेखून चालणार नाही. धुळे शहराच्या ऐतिहासिक वाटचालीतही अशाच काही संस्थांचा मोलाचा वाटा आहे. त्यांचाच या लेखात उलगडलेला वारसा.
उत्तर महाराष्ट्र खान्देशातील धुळे शहराला काही वैशिष्ट्यपूर्ण संस्थांच्या कार्याची किनार लाभली आहे. धुळे शहरात इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांचे समग्र संशोधन जतन केलेले राजवाडे संशोधन मंडळ, श्रीसमर्थहृदय शंकर श्रीकृष्ण देव स्थापित श्री समर्थ वाग्देवता मंदिर या जुन्या संस्था, तर नुकतेच उभे राहिलेले भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या स्मृती संग्रहालय अशा तीन महत्त्वाच्या संस्था
आहेत. यापैकी पहिल्या दोन संस्था या ऐतिहासिक बाबींचे महत्त्व सांगणार्या, तर तिसरी संस्था आधुनिक भारताचे प्रतिनिधित्व करणारी. म्हणजे एकाच शहरात अशा तीनही प्रकारच्या संस्था असणे खरे तर दुर्मीळच; मात्र धुळे शहरात हा योग साधला गेला आहे.
विश्वेश्वरय्या : भारताला पडलेले सुंदर स्वप्न!
भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्याबद्दल भारताचे पहिले पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांनी म्हटले आहे, ‘‘विश्वेश्वरय्या म्हणजे भारताला पडलेले सुंदर स्वप्न होते.‘‘ आधुनिक भारताच्या एका शिल्पकाराने दुसर्या शिल्पकाराचा अतिशय योग्य शब्दांत केलेला हा गौरव. विश्वेश्वरय्या श्रेष्ठ अभियंता तर होतेच, मात्र त्यासोबतच उत्तम प्रशासक, जलतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि योजनाकारही होते.
विश्वेश्वरय्या आणि धुळे शहराचे एक वेगळेच नाते. अवघी १६ महिन्यांची त्यांची धुळ्यातली कारकीर्द. या कालावधीत त्यांनी या भागात मोठे धरण बांधले नाही की नवे नगरही वसवले नाही. थोडक्यात ‘भव्यदिव्य’ म्हणावे असे काही विशेष धुळ्यात आकाराला आले नाही. मात्र, त्यांच्या भावी आयुष्यातील ‘भव्यदिव्य’ कामांच्या पहिल्या पाऊलखुणा मात्र धुळ्यात उमटल्या आणि त्या आजही जतन करून ठेवलेल्या आहेत, हे विशेष.
पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात (सीओईपी) अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर विश्वेश्वरय्या मुंबई सार्वजनिक बांधकाम विभागात (पी. डब्ल्यू.डी) सहाय्यक अभियंता म्हणून रूजू झाले. त्यांना पहिली नेमणूक मिळाली एप्रिल, १८८४ साली नाशिक विभागात- खान्देशातील धुळ्यात. धुळे त्या काळात खान्देशची राजधानी होते.
कॅप्टन ब्रिग्ज या ब्रिटिश कलेक्टरने वसविलेल्या धुळे शहराच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी विश्वेश्वरय्या धुळ्यात आले. डेडरगाव तलावातून तत्कालीन धुळे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी त्यांनी अभिनव अशा ‘सायफन’ पद्धतीचा वापर केला. डेडरगावतलावापासून पाईपलाईनद्वारे पाणी धुळे शहरापर्यंत वाहून आणणे, शहरातील पाण्याच्या टाकीत ते साठवणे, त्यानंतर पाणी गाळणे (Filtaration Plant), साठवून निवळविणे (Setting tank) आणि पाणी शहराकडे सोडणे (Water release Room) असे त्यांचे महत्त्वपूर्ण काम. विशेष म्हणजे, हे सर्व काम म्हणजे सायफन्स (वक्रनलिका), पाण्याची टाकी आजही अस्तित्वात आहे. पाईपलाईन जुनी झाल्याने बदलली गेली असली तरी त्याचे अवशेष आजही आपण पाहू शकतो.
विश्वेश्वरय्या आणि धुळ्याचे हे ऋणानुबंध जतन झाले पाहिजे, नव्या पिढीला त्याचा अभिमान वाटेल आणि प्रेरणाही मिळेल, असे एक स्मारक उभे राहावे, असे सर्वप्रथम धुळ्यातील स्थापत्य अभियंता, आर्किटेक्ट आणि सुप्रसिद्धजलतज्ज्ञ दिवंगत मुकुंद धाराशिवकर यांच्या मनात आले. त्यांनी आपली कल्पना महाविद्यालयीन विद्यार्थी, सिंचन खाते आणि सार्वजनिक बांधकाम विभागासमोर मांडली आणि एकमताने ती संमतही करून घेतली.
त्यानंतर स्मारक उभारायचे कुठे, असा प्रश्न निर्माण झाला. त्यावर धुळ्यात असताना विश्वेश्वरय्या जेथून काम करत, त्याच ठिकाणी त्यांचे स्मारक उभारायचे ठरले, जेणेकरून एका द्रष्ट्या अभियंत्याच्या आठवणींना मूर्त स्वरुप प्राप्त होईल.
शहरातील मध्यवर्ती भागात म्हणजे शासकीय रुग्णालयासमोर, कमलाबाई कन्या शाळा आणि एलआयसी कार्यालय यांच्या मधोमध सार्वजनिक बांधकाम खात्याचे जुने कार्यालय आहे, तेथे आता उपविभागीय कार्यालय आहे. त्या आवारात प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला एक दगडी इमारत आपल्याला दिसते. कौलारू, बैठ्या बांधणीच्या त्या इमारतीतच विश्वेश्वरय्या यांचे कार्यालय होते. त्यामुळे त्याच ठिकाणी स्मृती संग्रहालय उभारण्याचे निश्चित झाले. त्यानुसार ‘विश्वेश्वरय्या स्मृती परिसर’ या नावाने अखेर धुळ्यातभारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचे स्मारक उभे राहिले.
स्मारकात प्रवेश केल्यावर विश्वेश्वरय्या जेथे बसायचे तेथेच त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे सर्वप्रथम दर्शन होते. त्यानंतरच्या खोलीत विश्वेश्वरय्यांचा संपूणजीवनपट छायाचित्रांच्या स्वरूपात मांडण्यात आला आहे. डेडरगाव तलाव आणि पाणीपुरवठा योजना, याची प्रतिकृतीही विशेष लक्ष वेधून घेते.
स्मारक स्मृती समितीने अतिशय अभिनव अशा पद्धतीने योजना आखल्या आहेत. खान्देशातील चारही जिल्हे (धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक) यांतील सर्व विद्याशाखा आणि व्यवसाय शाखा यांतील विद्यार्थ्यांना संशोधनास वाव देणारी ही संस्था असणार आहे. तरुणांच्या नव्या योजना, संकल्पना आणि संशोधनासाठी फेलोशिप देणे हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. सोबतच नवनवी संशोधने, तंत्रज्ञान यांची विद्यार्थ्यांनी माहिती व्हावी यासाठी व्याख्याने, चर्चासत्र घेणे,नागरी व ग्रामीण समस्यांचा अभ्यास करणे, त्या सोडविण्यासाठी योजना तयार करून शासनाला सादर करणे, नियोजन व अंमलबजावणीच्या प्रक्रियेतील उणिवा दूर करण्यासाठी प्रयत्न करणे, अभियंत्यांना भेडसावणार्या अडचणी दूर करण्यासाठी संशोधन करणे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे अभियंत्यांसाठी आचारसंहिता तयार करणे, अशा उद्दिष्टांनी स्थापन झालेले हे स्मारक म्हणजे अभियंत्यांसाठी खरे तर तीर्थक्षेत्रच आहे.
‘‘विश्वेश्वरय्यांचे हे स्मारक म्हणजे केवळ स्मारक नाही, स्वतंत्र भारताचे हे एक गौरवस्थळ आहे. अभियंता हा केवळ अभियंता नसतो, तर राष्ट्राचे निर्माण करणारा एक महत्त्वपूर्ण घटक असतो. या स्मारकाच्या द्वारे आम्हाला तरुण अभियंत्यांना एका गोष्टीची जाणीव करून द्यायची आहे, ती म्हणजे तुम्ही जे काम कराल ते समाजासाठी पोषकच असले पाहिजे, प्रत्येक कामाला राष्ट्रकार्यच समजले पाहिजे. विश्वेश्वरय्या यांनी भारतीय अभियांत्रिकीमध्ये जे बीज रोवले आहे, त्याचा आता वटवृक्ष झाला आहे, त्या वटवृक्षाचे जतन आता नव्या पिढीच्या अभियंत्यांनाच करायचे आहे.’’
-हिरालाल ओसवाल, ज्येष्ठ अभियंता आणि स्मृती समितीचे उपाध्यक्ष.
-हिरालाल ओसवाल, ज्येष्ठ अभियंता आणि स्मृती समितीचे उपाध्यक्ष.
ठेवा इतिहासाचार्यांचा...
धुळ्यातील अजून एक महत्त्वाची संस्था म्हणजे इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे संशोधन मंडळ. इतिहासाचार्य राजवाडे यांच्या कार्याचे उचित दर्शन घडविणारे असे स्मारक राजवाडे संशोधन मंडळाच्या रूपात धुळ्यात उभे आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात दिमाखात उभी असलेली राजवाडे संशोधन मंडळ आणि वस्तू संग्रहालयाची इमारत धुळ्याच्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष देते. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन मंडळाने इतिहास व संस्कृती या क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावली. संस्थेने ऐतिहासिक साधने व दुर्मीळ अशा संशोधनपर ग्रंथांचे प्रकाशन, वस्तू संग्रहालय, संदर्भ ग्रंथालय, ऐतिहासिक कागदपत्रांचे दालन, कलादालन यांच्या उभारणीसोबतच ‘संशोधन’ हे इतिहास, संस्कृती व प्राचीन साहित्याला वाहिलेले त्रैमासिक अव्याहतपणे प्रसिद्ध करून इतिहास संशोधन क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे.
राजवाडे आणि धुळ्याचे नाते तसे अपघातानेच निर्माण झालेले. पुण्यातील सुप्रसिद्ध भारत इतिहास संशोधन मंडळाच्या स्थापनेत राजवाडे यांचेही सहभाग होता. मात्र, कालांतराने मंडळाच्या पदाधिकार्यांशी राजवाडे यांचे मतभेद झाले आणि त्यांनी पुणे सोडून थेट धुळे गाठले. धुळ्यात त्यांना तात्यासाहेब भट आणि शंकर श्रीकृष्ण देव यांचा सहवास लाभला. देव आणि राजवाडे दोघेही इतिहासाच्या अभ्यासाने झपाटलेले, परिणामी त्यांचा चांगलाच स्नेह निर्माण झाला. तात्यासाहेब भटांच्या घरीच राजवाडे बहुतांशी वेळा मुक्कामास असत. धुळ्यातील २६ वर्षांच्या वास्तव्यात त्यांनी आपले इतिहास संशोधनाचे काम अविरतपणे सुरू ठेवले. या कालावधीत इतिहास आणि संपूर्ण साहित्यविश्वाला दिशा देणार्या ग्रंथसंपदेची निर्मिती झाली. राजवाडेंच्या निधनानंतर त्यांच्या संशोधन कार्याचा यज्ञ पुढील काळातही अखंडपणे सुरू राहावा, या उद्देशाने त्यांच्या अनुयायांनी ९ जानेवारी, १९२७ रोजी आयोजित श्रद्धांजली सभेत राजवाडे इतिहास संशोधन मंडळाचीस्थापना केली.
राजवाडे संशोधन मंडळ आणि वस्तू संग्रहालयात आज इतिहासाचा मोठा ठेवा उपलब्ध आहे. त्याच्यावर एक नजर टाकली असता त्याचे महत्त्व आपणास लक्षात येईल.
वस्तूसंग्रहालय
यादवकालीन १२व्या शतकापासून असणार्या या संग्रहालयात जनार्दन, केशव, तोरणाचा खंड, गजराज पाषाण, मधुसूदन, गजलक्ष्मी, वराह अवतार, त्रिविक्रम, बलसाणे सूरसदरीचे शिरे, अनिरुद्ध, महिषासूर मर्दिनी, खान्देशातील यादवकालीन पाषाणमूर्तीआदींचा समावेश आहे. धातूमूर्तीच्या संग्रहात देवदेवतांच्या मूर्ती, सुट्या प्रभावळी, दीपलक्ष्मी, खेळातील प्राण्यांच्या मूर्ती, तबके, उपकरणी, देवमूर्ती, प्रभावळी, प्राणिमूर्ती आहेत. त्यातील बहुतेक वस्तू पितळी असून काही तांब्याच्या, तर क्वचित कांस्याचीही दिसून येते. याव्यतिरिक्त विविध ऐतिहासिक कागदपत्रांचे मूळ नमुने, उत्खननावशेष, धातूमूर्ती व कलात्मक भांडी, ३०० वर्षांपूर्वीची रेखीव चित्रे, बोलकी व्यक्तिचित्रआदींनी संग्रहालय सजले आहे. चित्रांचा एक अतिशय आकर्षक संग्रह येथे आहे. मंडळाची स्थापना करणारे भा. वा. भट यांचे एक पूर्वज त्र्यंबकशास्त्री भट हे सवाई माधवराव व दुसरा बाजीराव या पेशव्यांकडे चाकरीस होते. त्यांनी संग्रही केलेल्या चित्रसंग्रहात झरोका चित्रेही आहेत. अतिशय मोठ्या प्रमाणात असणार्या हस्तलिखितांमध्ये भगवद्गीता गंगा लहरी, देवी सप्तशती, गणेशगीता, गीता पंचरत्नी, रुक्मिणी स्वयंवर या पाच सचित्र पोथ्याआहेत. त्यातील एक मराठी, तर चार संस्कृत असून त्यातून १८व्या शतकात प्रचलित असणार्या चित्रशैलीचे दर्शन घडते. शस्त्रागारात ताम्रपाषाण युगातील पंचधातूची कुर्हाड, भाल्याची टोके, बंदुकीचा चाप, तोफा, तोफगोळे, तलवारी, ठासणीची बंदूक व पिस्तूल आदी आयुधे लक्ष वेधतात. नाणी संग्रहात प्रामुख्याने दिल्ली, माळवा, गुजरात, बहामनी, निजामशाही, कुतूबशाहीसुलतान यांच्या कारकीर्दीतील नाणी मोठ्या संख्येने आढळतात.
मंडळामधील संग्रह
शिवाजी महाराजांच्या हस्ताक्षरातील दुर्मीळ पत्रांचा अमूल्य दस्तावेज, बखर, मध्ययुगीन काव्य, ज्योतिष व वैद्यविषयक ग्रंथ, पुराण व चरित्र आदींचा समावेश असलेली जवळपास सहा हजार दुर्मीळ व मौल्यवान हस्तलिखिते आणि ३० हजार कागदपत्रांचा मंडळाकडे रितसर संग्रह आहे. त्यापैकी जवळपास २० हजार कागदपत्रे तर खुद्द राजवाडे यांनी गावोगावी भ्रमंती करून संकलित केलेली आहेत. बहुसंख्य कागदपत्रे मोडीलिपीतील असून अन्य कागदपत्रे ही फारसी व इंग्रजी भाषेतील आहेत. मराठ्यांच्या इतिहासावर प्रकाश टाकणारी त्यात सुमारे २० हजारांहून अधिक कागदपत्रे आहेत. अकबरकालीन दोन विक्री खताचा सारांश, गहाणपत्र, सम्राज्ञी बेगम मुमताज महल - हुकूमनामा, असफजाहा निजाम उल मुल्क बादशाही फर्मान आदी फारसी दप्तर आहे. कागदपत्रांच्या दालनात जन्मटिपण, वंशावळ, आज्ञापत्र, इनामपत्र, सरंजामपत्र, कबुलायत, ताकीदपत्र, करीना, महजर सनद, तहनामा आदी प्रकार पाहावयास मिळतात. खान्देशातील कदमबांडे यांची ‘कैफियत’,सुलतान परगण्याचे कागद, खान्देशातील होळकरी सत्ता (काही पत्रं), ‘श्रीकृष्ण समाराधन’, ‘खान्देश ओळख’ आदी ऐतिहासिक कागदपत्रे, तर ‘राधामाधव विलास चंपू’, ‘विवेकसार ऊर्फ मननग्रंथ’, ‘पंचीकृत विवेक’, ‘नवरस रागमाला’, ‘सहदेव भाडळी’, ‘मराठी काव्य फटका’, ‘कटाव’, ‘पोवाडा’, ‘लावण्या’,‘श्लोक’, ‘आर्या’ आदी हस्तलिखित ग्रंथांचाही समावेश आहे.
ग्रंथ प्रकाशन
छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे, शिवछत्रपतींची १०९ कलमी बखर, मराठ्यांच्या इतिहासाची साधने (खंड १ ते ११), शिवाजीची राजनीती, राजवाडे चरित्र, गीताई धर्मसार, इ. वि. का. राजवाडे समग्र साहित्य (खंड ४ ते १०), ज्ञानेश्वर नितीकथा, अमृतानुभव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान, निबंधसंग्रह भाग- १, नागपूरकर भोसल्यांच्या चिटणीशी बयान, नंदुरबार दप्तर, आज्ञापत्र, योग चिंतामणी, वेडिया नागेश, नवरस रागमाला, तात्या जोगांच्या चरित्राची साधने, मराठी हस्तलिखित ग्रंथ, दुर्मीळ संच (संशोधक) अशा जवळपास ६० हून अधिक दुर्मीळ ग्रंथांचे प्रकाशन राजवाडे मंडळाने आजवर केले आहे.
संशोधन मंडळाने सध्या वनवासी संस्कृतीच्या दालनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेश अशा तीन राज्यांच्या सीमेवर वसलेल्या धुळ्याला सातपुडा पर्वतराजीचे सान्निध्य लाभले आहे. या प्रदेशात अनादी काळापासून वनवासी, वनवासी सभ्यता नांदत होती व आजही आहे. या भागातील भिल्लांची राजवट, अभिर संस्कृतीचे येणे, त्यांचा प्रामाणिक इतिहास, वनवासी कला व वस्तूंचा इतिहास, इतिहासाचार्यांनी जमा केलेल्या असंख्य अप्रकाशित कागदपत्रांचे अध्ययन, या भागातील गावांचा इतिहास आदींचा विधीवत आलेख तयार करावयाचे संस्थेचे ध्येय आहे. एका संग्राहकाकडून मिळालेले २५० राजे, संस्थानिक यांची दुर्मीळ छायाचित्रे मंडळास भेट मिळाली आहेत. त्यासाठी मंडळाने ऐतिहासिक छायाचित्रांसाठी रॉयल गॅलरी उभारणीचे काम हाती घेतले आहे.
मंडळाचे विद्यमान कार्याध्यक्ष संजय मुंडदा यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणतात, ‘‘गेल्या ८५ वर्षांपासून ही संस्था धुळ्यात आहे. धुळ्यासारख्या तुलनेने मुख्य प्रवाहापासून दूर असणार्या या शहरात तात्यासाहेब भट आणि कुटुंबीय यांच्या स्नेहातून इतिहासाचार्य राजवाडे यांचे आगमन झाले. आपल्या आयुष्याची २५ ते २६ वर्षे त्यांनी धुळ्यात काढली आहेत, हा या शहरास मिळालेला मोठा बहुमान आहे. राजवाडे संशोधन मंडळाचा कारभार सांभाळणे हे माझ्यासाठी व सर्व कर्मचार्यांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. मात्र, असे असतानाही या महत्त्वाच्या संस्थेकडे राज्य शासन आणि केंद्र शासनाने विशेष लक्ष देण्याची गरज आहे, जेणेकरून ही संस्था अधिक समर्थपणे वाटचाल करत राहील.’’
समर्थांचे अधिष्ठान - श्री समर्थ वाग्देवता मंदिर
१७व्या शतकात समर्थ रामदासांनी आणि त्यांच्या साहित्याने यवनी पारतंत्र्य उलथवून टाकण्यासाठी प्रेरणा दिली. त्याचप्रमाणे ब्रिटिश साम्राज्याविरोधात समाज उभा राहावा, यासाठी त्यांच्या साहित्याचे मंदिर उभे राहिले, जेणेकरून समाजाने त्यापासून प्रेरणा घ्यावी आणि स्वातंत्र्यप्राप्तीचे प्रयत्न करावेत. धुळ्यात ख्यातनाम फौजदारी वकील शंकरराव देव यांनी त्यात पुढाकार घेतला आणि उभे राहिले श्री समर्थ वाग्देवता मंदिर. हे मंदिर असले तरी इथे कुठला देव नाही, पूजाअर्चा नाही, आरती, प्रसाद, घंटानाद असे काहीही नाही. येथे पूजा होते ती फक्त वाड्.मयाची.
संपूर्ण भारतात ब्रिटिशविरोधी लढ्याला व्यापक स्वरूप येत असतानाच धुळ्यातील शंकरराव देव यांनी सन १८९३ मध्ये सत्कार्योत्तेजक सभा स्थापन केली. त्याद्वारे खान्देशात त्यांनी विविध सार्वजनिक कार्यक्रमांद्वारे समाजाला सतत जागृत ठेवले. त्याचाच पुढचा टप्पा म्हणजे श्री समर्थ वाग्देवता मंदिर.
शंकरराव देव यांच्यावर लोकमान्य टिळकांचा मोठा प्रभाव होता. टिळकांचे अनुयायीच होते ते. त्यामुळे समर्थ वाड्.मयाकडेही त्यांचा ओढा असणे साहजिक होते. पारतंत्र्यातील समाजाला जागृत करायचे असेल, तर समर्थ विचारच उपयोगी आहेत, यावर त्यांची ठाम श्रद्धा होती. त्यानुसार त्यांनी समर्थ रामदास स्वामींचे जुने मठ, अन्य संतांचे मठ, तेथील मठाधिपती यांना सातत्याने भेटी दिल्या, त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्याकडील जुने ग्रंथ, कागदपत्रे मिळवली, त्यांचा संग्रह केला. त्याचप्रमाणे संतसाहित्याच्या अभ्यासकांकडे असलेली कागदपत्रे, ग्रंथही त्यांनी मिळविले. त्यानंतर १९३५ साली स्थापना झाली ती, श्री समर्थ वाग्देवता मंदिराची. यातील महत्त्वाची गोष्ट ध्यानात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे देवांनी अगोदर कागदपत्रे, ग्रंथ यांचा संग्रह केला आणि मगच संस्था स्थापन केली. जेणेकरून संस्थेचे जे ध्येय आहे तेच कायम राहील.
श्री समर्थ वाग्देवता मंदिरात सर्व भारतीय भाषांमधील कागदपत्रे आहेत. साधारण १०० ते ६०० वर्षांपूर्वीची ही कागदपत्रे, ज्यात संस्कृत, उर्दू आणि प्राकृत भाषेचाही समावेश आहे. त्याशिवाय देवनागरी, उर्दू आणि मोडी लिपीतीलही कागदपत्रे आहेत.
संस्थेत असलेली कागदपत्रे हा तर स्वतंत्र अशा लेखमालिकेचाच विषय आहे. संस्थेत समर्थांनी लिहिलेल्या ‘वाल्मिकी’ रामायणाची प्रत आहे. इसवी सन १६२२ मध्ये हे हस्तलिखित तयार झाले आहे. ‘गीतगोविंद’ हा जयदेव याने लिहिलेला दुर्मीळ ग्रंथ. कृष्ण आणि राधेच्या प्रेमावरील हे दीर्घ असे संस्कृत काव्य आहे. ग्रंथाच्या प्रत्येकपानावर ओवी आणि तिला व्यक्त करणारे चित्र आहे. संस्थेत आज पाच हजार बाडं आहेत. बाडं म्हणजे विशिष्ट विषयांच्या कागदपत्रांचा गठ्ठा, त्याला ‘बाड’ असे म्हणतात. संस्थेच्या दफ्तरात समर्थांविषयक, पोथीपत्रांसंबंधी, मंत्रांसंबंधीची बाडं, चित्रे असलेली बाडं, युद्धासंबंधीची, ज्योतिषविषयक, औषधांची माहिती असलेली, पहाटगाणी, डफगाणी असलेली अशी तब्बल पाच हजार बाडं आहेत. संस्थेतील एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे दासबोधाच्या मूळ ग्रंथाची नक्कल प्रत. दासबोधाची मूळ प्रत परांडा येथील डोमगावच्या मठात आहे. देवांनी या प्रतीची अगदी जशीच्या तशी म्हणजे अगदी त्यात असलेल्या चुका आणि दुरुस्तीसह नक्कल केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित तब्बल सात पत्रे संस्थेच्या संग्रही आहेत. यात काही आदेशपत्रे, सनदा आणि काही निवाड्यांचा समावेश आहे. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, समर्थ, त्यांचे शिष्य कल्याणस्वामी व अन्य काही व्यक्तिमत्त्वांशी केलेले पत्रव्यवहार याठिकाणी आहेत. समर्थांनी त्यांचे सर्व लिखाण हे पद्यातच केले आहे, मात्र त्यांचे एकमेव गद्यातील लिखाण संस्थेच्या संग्रही आहे.
‘मनाचे श्लोक’ची मुळाक्षरे!
‘मनाचे श्लोक’ हे समर्थांचे एक अक्षरवाङ्मय. मानवी जीवनमूल्यांची ही गीता समर्थांनी चाफळ येथे ध्वनित केली आणि त्यांचे पट्टशिष्य कल्याणस्वामी यांनी ती उतरवून घेतली. कल्याणस्वामींनी लिहिलेला हा मूळ ग्रंथच इथे पाहायला मिळतो. २०५ श्लोकांचे हे काव्य इथे ९२४ पानांवरविसावले आहे. या पानांवरची सुंदर अक्षरवाटिका लक्ष वेधून घेते.
‘‘देवांनी सकल समाजाला समर्थ विचारांचे अधिष्ठान लाभावे, या हेतूने या कार्याचा संकल्प केला. ही संस्था म्हणजे समाजाला एक दिशा देण्याचे काम करते आहे. आता तरुणांनी या संस्थेत येऊन अभ्यास करणे गरजेचे आहे. कारण कोणत्याही समस्येवर उत्तर हे समर्थ वाड्.मयात हमखास मिळेलच, त्यासाठी गरज आहे ती फक्त ध्येयनिष्ठ संशोधन करण्याची.’’
- शरदराव कुबेर, समर्थ वाग्देवता मंदिर
छान !! पार्थ
उत्तर द्याहटवा