आज काल या मुव्ह आॅन या
शब्दाला भलतीच तेजी असल्याचं जाणवतय... म्हणजे अगदी प्रत्येक जण प्रत्येकाला मुव्ह
आॅन होण्याचा सल्ला देत असतो. पण या मुव्ह आॅन होण्याला खरंच काही अर्थ असतो का हो
? म्हणजे
तसं केल्याने म्हणे नव्या आयुष्याला वगैरे सुरूवात होते... पण अशा किती
गोष्टींपासून मुव्ह अाॅन व्हायचं असत...
म्हणजे
माणूस हा त्याच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीत थोड्याबहुत प्रमाणात
गुंतलेला असतो. म्हणजे एखादं पुस्तक, त्यातलं एखादं प्रकरण, त्यातली एखादी व्यक्तीरेखा,
त्याचा प्रारंभ, त्याचा शेवट, त्याच मुखपृष्ठ..... किंवा मग एखादा सिनेमा...
त्यातले संवाद, त्याची कथा, त्यातली गाणी.... किंवा मग एखादं शहर... त्या शहरातले
रस्ते, तिथल्या काही खास जागा... नेहमीचा चहावाला, नेहमीचा सिगारेटवाला, नेहमीचा
बार... त्या शहरातला पाऊस, त्या शहरातलं ऊन, त्या शहरातली थंडी, त्या शहराचा खास असा
गंध.... त्या शहरातल्या आठवणी, त्या शहरातली चीडचीड, तिथला आनंद....
आणि मग तेव्हाच काही व्यक्तीही आपल्या आयुष्यात येत असतात... ते
आल्यावर एकदम आपल्याला काहीतरी हरवलेलं सापडल्याचा किंवा एखादी अपूर्ण गोष्ट पुर्ण
वगैरे झाल्यासारखं वाटायला लागत... हे असं हरवलेलं सापडल्याचा आनंदच एवढा असतो
आपल्याला की त्यातच आपण हरवून जातो... हे आता नेहमी अस्सच राहणार, अशी समजूतही
करून घेतो आपण... आणि एकदा अशा समजूतीमध्ये आपण अडकलो की कुठेतरी धागे सैलही व्हायला
सुरुवात झालेली असते... अर्थात ते लक्षात यायच्या स्थितीतच नसतो आपण...
आणि मग एक दिवस जेव्हा सर्व धागे सैल होतात... तेव्हा एकदम भानावर
येतो... त्यातच मग काही काळ जातो... मग सुरू होतात सल्ले ते या मुव्ह आॅन व्हायचे...
आणि हाच तर महत्त्वाचा प्रश्न आहे की हे नेमकं असतं तरी काय ?. मुव्ह
आॅन व्हायचं म्हणजे नेमकं करायचं काय ?. या
ज्या काही गोष्टी असतात आपल्या आयुष्यात आलेल्या, त्याचं एक विशिष्ट असं स्थान
असतं आपल्या आयुष्यात... मग ते सोबत असो किंवा नसो... त्यामुळे त्यांच्या नसण्याचा
मोठा परिणाम हा निश्चितच होत असतो... आणि त्यांच्यापासून असं एकदम मुव्ह आॅन
व्हायच... ही कल्पनाच जरा भयावह असते...
म्हणजे त्यात अडकून पडल्याने आपल्याला बऱ्याचदा त्रास वगैरे होतो... पण तरीही त्या
आठवणी काही आपल्याला सोडवत नाहीत... म्हणजे अगदी कधीही, कुठेही आणि केव्हाही त्या
आपल्यासमोर एकदम येऊन उभ्या राहतात... मग अशावेळी काय करायचं ते सुचत नाही आणि आपण
अडकून पडतो परत.... मग अशावेळी मुव्ह आॅन झालेलो असलो काय आणि नसलो काय... काही
फरक पडत नाही... ते व्हायचं ते होतच... मग पुन्हा तोच प्रश्न की मुव्ह आॅन होणं
म्हणजे नेमकं काय आणि ते केल्याने नेमकं होत काय ?.
Mast parth
उत्तर द्याहटवा