होय, आम्हीही भारतीयच !
स्थळ : नागालँडमधील एका जिह्यातील कौन्सिल हॉल.
गावातील सर्व लोक समोर सुरू असलेला आरोग्यविषयक माहितीपट अगदी शांतपणे पाहत होते. इंग्रजीत असलेला तो माहितीपट तीन शाळकरी मुली स्थानिक भाषेत गावकर्यांना समजावून सांगत होत्या. माहितीपट संपल्यावर भारावलेले ते गावकरी म्हणाले, ’आजवर आमच्या गावातील अनेक मुलं बाहेर गेली. शिकून मोठी झाली. पण त्यांच्यापैकी कोणालाच आमच्यासाठी काही करावसं वाटलं नाही. असं काही करणार्या तुम्ही पहिल्याच आहात. तुम्ही हे सर्व शिकलात कुठून?’ त्यावर त्या मुली म्हणाल्या की, ’राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जनकल्याण समिती‘ने आम्हाला असं काही करण्याची प्रेरणा दिली...
गावातील सर्व लोक समोर सुरू असलेला आरोग्यविषयक माहितीपट अगदी शांतपणे पाहत होते. इंग्रजीत असलेला तो माहितीपट तीन शाळकरी मुली स्थानिक भाषेत गावकर्यांना समजावून सांगत होत्या. माहितीपट संपल्यावर भारावलेले ते गावकरी म्हणाले, ’आजवर आमच्या गावातील अनेक मुलं बाहेर गेली. शिकून मोठी झाली. पण त्यांच्यापैकी कोणालाच आमच्यासाठी काही करावसं वाटलं नाही. असं काही करणार्या तुम्ही पहिल्याच आहात. तुम्ही हे सर्व शिकलात कुठून?’ त्यावर त्या मुली म्हणाल्या की, ’राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जनकल्याण समिती‘ने आम्हाला असं काही करण्याची प्रेरणा दिली...

केवळ त्या तीन मुलींनाच नाही तर पूर्वांचलातील अशा शेकडो मुलामुलींना महाराष्ट्रात शिक्षण देऊन त्यांच्या भागात काहीतरी चांगलं काम करण्याची प्रेरणा ’राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती‘ देेत आहे. समितीच्या ’पूर्वांचल विकास आयाम’कडून हे काम केलं जातं. पूर्वांचलातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणणं, त्यांच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी स्वीकारणं, त्यांच्यासाठी वसतिगृह चालवणं, भारताबद्दल त्यांच्या मनात आपुलकी निर्माण करणं आणि त्यांच्या मनात भारताबद्दल निर्माण केला गेलेला दुरावा कळत नकळत दूर करणं, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.

’जनकल्याण समिती’तर्फे पूर्वांचलातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रात आठ ठिकाणी वसतिगृह चालवली जात आहेत. डोंबिवली, चिपळूण, सांगली, नाशिक, संभाजीनगर (औरंगाबाद), लातूर, पुणे आणि पिंपरी चिंचवड या आठ ठिकाणी ही वसतीगृह आहेत. त्यापैकी बहुतांश वसतिगृह स्वतःच्या जागेत सुरू आहेत. सध्या या आठ वसतीगृहांमध्ये मिळून 130 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

या वसतिगृह प्रकल्पाचं काम नेमकं कस चालतं, हे समजून घेण्यासाठी ’जनकल्याण समिती‘च्या ’पूर्वांचल विकास विभागा’ची महाराष्ट्र प्रांताची जबाबदारी असलेले श्री. संजय काठे यांच्याशी संवाद साधला. त्यांनी अतिशय मनमोकळ्या गप्पा मारल्या. गप्पांमधूनच मग उलगडत गेला ’पूर्वांचल विकास विभाग प्रकल्पा‘चा प्रवास...
संजय काठे सांगतात की, चिपळूणमध्ये सन 2005 साली ’जनकल्याण समिती‘च्या पूर्वांचल विकास विभागाच्या वसतिगृह प्रकल्पाची सुरुवात झाली. ’जनकल्याण समिती‘च्या कोकण प्रांतात डोंबिवली आणि चिपळूण येथे हा प्रकल्प सुरू आहे. डोंबिवली येथे मुलांची तर चिपळूण येथे मुलींची व्यवस्था करण्यात आली आहे. चिपळूण येथील वसतिगृह नुकतंच समितीच्या स्वतःच्या जागेत स्थानांतरीत करण्यात आलं आहे. वसतिगृहात सध्या 15 मुली शिक्षण घेत आहेत. तिसरीत शिकणार्या दोन मुली नुकत्याच आल्या आहेत. तीन मुली दहावीत आहेत. सुरुवातीला दहा मुली वसतिगृहात होत्या, त्यातील काही पदवीधर झाल्या आहेत तर काही विविध अभ्यासक्रम शिकत आहेत. त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यात आमचा हातभार लागला, ही आमच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे.

पूर्वांचलात, प्रामुख्यानं नागालँडमध्ये ’स्वतंत्र नागालँड’ चळवळीचा जोर मोठ्या प्रमाणात वाढलेला होता. अनेक राष्ट्रविघातक संस्था, संघटना परकीय मदतीनं नागालँडमधील जनतेला ’तुम्ही भारतीय नाही’, ’भारतीय तुमच्यावर अन्याय करतात’, भारताशी तुमचा काहीही संबंध नाही. नागालँड हे स्वतंत्र राष्ट्र आहे’, अशी विखारी पेरणी करत होत्या. एका संपूर्ण पिढीचं मन या प्रचारानं त्यांनी दूषित केलं होतं. त्यामुळे नागालँडमध्ये टोकाचा भारतद्वेष साठला होता. अशा विखारी आणि देशविघातक प्रचाराला प्रत्युत्तर देतानाच स्थानिक जनतेच्या मनात विश्वास निर्माण करणंही गरजेचं होतं. ’मी भारतीय आहे, हा देश माझा आहे’ ही जाणीव तेथे निर्माण करण्याची गरज होती. तेच काम रा. स्व. संघानं आणि जनकल्याण समितीनं ’पूर्वांचल विकास विभागा’मार्फत करण्यास सुरुवात केली. काम करताना कोणाचा धर्म कोणता, पूजापद्धती कोणती, असा भेद कार्यकर्त्यांनी केला नाही. त्याचे दृश्य परिणाम आज दिसत आहेत. फुटीरतावादास पायबंद बसला आहे.
नागालँड म्हणजे भारताचं एक टोक. नागालँडमध्ये सातत्याच्या सामाजिक अस्वस्थतेचा परिणाम त्या भागातील शिक्षणावर मोठ्या प्रमाणात झाल्याचं दिसत होतं. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना योग्य ते शिक्षण देऊन त्यांना यशस्वीपणे उभं करणंं अतिशय गरजेचं होतं. त्यामुळेच हा प्रकल्प हाती घ्यायचं ’जनकल्याण समिती‘नं ठरवलं. नागालँडमधील मुलींना महाराष्ट्रात चिपळूणमध्ये आणून शिकवणं, हे तसं कठीण आणि जबाबदारीचं काम. पण आज अगदी यशस्वीपणे हा प्रकल्प सुरू आहे.

या प्रकल्पाबद्दल काठे सांगतात की, दुसर्या इयत्तेपासूनच्या मुली शिक्षणासाठी चिपळूणमध्ये येतात. दहावीपर्यंतचं शिक्षण त्यांनी चिपळूणमध्ये घ्यावं आणि त्यानंतरचं शिक्षण पुणे अथवा अन्य ठिकाणी घ्यावं अशी व्यवस्था करण्यात आली आहे. चिपळूणमधल्या सुरेश दामोदर गद्रे इंग्लिश हायस्कूलमध्ये सर्वांची शिक्षणाची व्यवस्था केली जाते. गणेशोत्सवात दहाही दिवस मुली कोणाच्या ना कोणाच्या घरी जातात. दिवाळीत तर अभ्यंगस्नानापासूनच त्यांना घरोघरी खास आमंत्रित केलं जातं. एवढचं नाही तर वसतिगृहात नाताळही साजरा केला जातो. मुलींना एकटं वाटू नये, त्यांच्यात परकेपणाची भावना निर्माण होऊ नये, याची संपूर्ण काळजी आम्ही घेतो. परीक्षा संपल्यानंतर मुलींना घरी सोडायला आणि पुन्हा इकडे आणायला आमचे कार्यकर्ते दिमापूरपर्यंत जातात. दिमापूरमध्ये त्यांच्या पालकांचीही भेट होते. मुलींच्या सुरक्षेची पूर्ण काळजी आम्ही घेतो. कारण आमच्या इथल्या चांगल्या कार्याचे पडसाद पूर्वांचलात उमटतात. नागालँडमध्ये गेल्यावर मुली विविध उपक्रम राबवतात. त्याचा सकारात्मक परिणाम आज तेथील समाजमनावर झालेला दिसतो. त्यांच्यात असलेली भारतीयत्वाची जाणीव आज पुन्हा एकदा अगदी घट्ट झाली आहे. ’राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’, ’जनकल्याण समिती’ आणि संघविचारांनी काम करणार्या अन्य संस्थांना पूर्वांचलात मिळणारा पाठिंबा हा आमच्या कार्याचा आणखी एक दृश्य परिणाम.

नागालँडवासीयांच्या मनात महाराष्ट्राबद्दल विशेष अशी आपुलकी आहे. ’जनकल्याण समिती‘ नागालँडमध्येही विविध उपक्रम राबवते. स्थानिक शाळांमध्ये अनेकदा शिक्षकांची कमतरता असते. त्यासाठी महाराष्ट्रातून अनेक शिक्षक नागालँडमध्ये जाऊन अध्यापनाचं काम करतात. आरोग्य हा पूर्वांचलातील एक महत्त्वाचा विषय. आरोग्याबाबत जनजागृती व्हावी यासाठी वैद्यकीय शिबिरेही आयोजित करण्यात येतात.

चिपळूणमधील वसतिगृह प्रकल्पाला सन 2005 मध्ये सुरुवात झाली. त्यावेळी सुरुवातीला आलेले अनुभव कार्यकर्त्यांना खूप काही शिकवून जाणारे होते. त्याबद्दल काठे यांनी सांगितले की, पहिल्यांदा आलेला अनुभव खूप बोलका होता, असं म्हणायला हरकत नाही. नागालँडसारख्या राज्यातून शिक्षणासाठी मुली चिपळूणमध्ये आल्या होत्या. त्यांचं वागणं-बोलणं, जगण्याची पद्धती, संस्कृती हे सर्व इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांना अगदीच नवीन होतं. परस्परांशी नेमकं कसं जुळवून घ्यायचं, हे मोठंच प्रश्नचिन्ह आमच्यासमोर होतं. मुलींनाही सर्व गोष्टी नवीन होत्या. स्थानिक कार्यकर्ते हे सर्व कसं जमेल, अशा तणावात होते. त्यावर आम्ही एक उपाय शोधून काढला. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना नागालँडमध्ये मुलींच्या घरी पाठवलं. त्यांच्या कुटुंबातलं वातावरण, गावातलं वातावरण या गोष्टींचा अनुभव कार्यकर्त्यांना घ्यायला लावला. त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचं उत्तम स्वागत झालं आणि या मुली कोणी परक्या नाहीत, स्वतःच्या मुलींसारखच त्यांना सांभाळायचं आहे, शिवाय आपण त्यांच्यावर कोणतेही उपकार करत नाही, हा विचार समितीच्या आणि अन्य कार्यकर्त्यांमध्ये रुजला. सुरुवातीला अतिशय अवघड वाटणारं काम पाहता पाहता सोपं होऊन गेलं. सर्वच चिपळूणकर आज मुलींचे पालक बनले आहेत, असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही.
एवढ मोठ काम उभं करायचं आणि ते यशस्वीपणे चालवायचं म्हटल्यावर त्यासाठी आर्थिक बाजूही भक्कम हवीच. समितीच्या सुदैवानं आजपर्यंत कोणतीच आर्थिक अडचण उभी राहिलेली नाही. प्रकल्पाचं संपूर्ण काम समाजातून मिळालेल्या देणगीतून सुरू आहे. शिवाय मिळालेल्या प्रत्येक पैचा हिशेबही चोख ठेवला जातो. अतिशय पारदर्शकपणे हे काम सुरू आहे.
’पूर्वांचल विकास विभागा’ची महाराष्ट्र प्रांताची जबाबदारी असलेले संजय काठे हे एमटीएनएलमध्ये नोकरीस होते. त्यांनी सन 2013 साली स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि पूर्णवेळ या कामास सुरुवात केली. राज्यात असलेल्या आठही छात्रावासांची जबाबदारी काठे पाहतात. प्रत्येक छात्रावासाला भेट देणं, विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या पालकांशी नियमित संपर्क ठेवणं अशा प्रकारच काम त्यांच्याकडे आहे. मूळचे नांदेड येथील कार्यकर्ते शंतनू सांगवीकर हे त्यांना या कामात साहाय्य करतात. तेही ’जनकल्याण समिती‘चे पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत.
एकेकाळी पूर्वांचल कायमच अस्वस्थ आणि धुमसता असायचा. पूर्वांचल आज शांत व्हायला लागलाय. स्वतःच्या भारतीयत्वाबाबत साशंक असलेले पूर्वांचलवासी आणि त्यांच्याबद्दल मनात गैरसमज असणारे अन्य भारतीय यांच्यात आज आपुलकीचं नातं तयार झालं आहे. ’रा. स्व. संघ, जनकल्याण समिती पूर्वांचल विकास विभाग’ आणि अहोरात्र कष्ट करणारे हजारो कार्यकर्ते या बदलाचं माध्यम ठरले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा