‘स्वीट’कॉर्न क्लब – मधुमक्याची गोष्ट
![]() |
फर्गसन महाविद्यालय रस्त्यावरील आउटलेट |
पुण्यातल्या फर्गसन
महाविद्यालय रस्त्यावर पोलीस ग्राउंडच्या समोर ‘कॉर्न क्लब’ असा बोर्ड असलेल एक
छोटेखानी रेस्टोरंट आपल लक्ष वेधून घेत. तिथे पाउल ठेवल्यावर मधुमका अर्थात स्वीट कॉर्न
च्या अनोख्या जगात आपला प्रवेश होतो. एरवी फक्त भाजून खाणे एवढाच आपला मक्याशी
संबंध येत असतो, आणि इथे मात्र मधुमक्याची एक वेगळीच दुनिया आपल्या समोर येते आणि
आपल्याला त्यात अगदी हरवून जायला होतं.
त्याबद्दल कॉर्न
क्लबचे राहुल म्हस्के यांच्याशी बोलल्यावर ते म्हणाले, ‘या उद्योगाची सुरुवात एका
साध्या गोष्टीतून झाली. १९९९ साली माझी पत्नीने मॉडेल कॉलनीत स्वीट कॉर्नच्या
विविध तयार पदार्थांचे दुकान सुरु केले. कारण मधुमका हा खायला अतिशय गोड आणि मऊ
आहे. त्याची वैशिष्ट्यपूर्ण गोड चव सर्वांनाच आवडते. त्याचे वैविध्यपूर्ण पदार्थ
विक्रीस ठेवले, त्याला ग्राहकांचा अगदी उत्तम प्रतिसाद मिळाला. त्याच काळात स्वीट कॉर्नची
ओळख नुकतीच लोकांना व्हायला लागली होती. त्यामुळे लोकांची पसंती आम्हाला मिळाली.
आज या अतिशय छोट्या प्रयोगाचे रूपांतर Monsoon Agro Bio LTD अशा मोठ्या उद्योगात
झाले आहे. आज आम्ही गोठवलेल्या मधुमक्याची विविध उत्पादने रशिया, सौदी अरेबिया,
युरोप अशा अनेक ठिकाणी निर्यात करतो आहोत’.
शेतकरी जरा वेगळे
प्रयोग करून कसे यश मिळवू शकतो, याचे उदाहरण म्हणून राहुल म्हस्के यांच्याकडे
पाहावे लागेल. शेतकरी कुटुंबातील असलेले राहुल हे रेफ्रिजरेशन इंजिनिअर आहेत.
इंजिनिअर असूनही याकडे ते कसे वळले याची कहाणीही खूप इंटरेस्टिंग आहे, ते म्हणतात,
‘आम्ही शेतकरीच. १९९५ सालापासून आम्ही मधुमक्याची शेती करतो आहोत. त्यापूर्वी
आम्ही स्ट्रोबेरीचे उत्पादन घेत होतो, मात्र त्यात आर्थिक शाश्वती दिसत नसल्याने
आम्ही मधुमक्याकडे वळलो. मला स्वतःला शेतीत नवनवे प्रयोग करायला आवडतात.
मधुमक्याची लागवड, हा देखील एक प्रयोगच. त्यानंतर फक्त शेतीपुरतच मर्यादित राहणे
हे माझ्या स्वभावातच नव्हते. मग आम्ही मधुमक्याचे विविध खाद्य पदार्थ बनवून आमच्या
दुकानातून विकायला सुरुवात केली. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला आणि मधुमक्याची
मागणीही वाढू लागली, त्यामुळे आम्ही आजूबाजूच्या शेतकऱ्यांकडे गेलो आणि त्यांना
मधुमक्याची लागवड करण्याकरता तयार केले. आणि त्यातूनच मग Contarct Farming या
संकल्पनेचा वापर आम्ही सुरु केला’.
Contarct Farming
बद्दल अधिक विचारले असता ते म्हणाले, ‘हा सुद्धा एक प्रयोगच म्हणावा लागेल.
मधुमक्याचे विविध खाद्यपदार्थ बनवून विकायला सुरुवात केल्यानंतर मधुमक्याची मागणी
वाढायला लागले आणि ती मागणी फक्त आम्हाला पूर्ण करणे शक्य नव्हते. मग आम्ही आमच्या
आजूबाजूच्या शेतकऱ्यांना मधुमक्याची लागवड करण्याबाबत विचारले, त्यांनी सुरुवातीला
सावध पण आश्वासक भूमिका घेतली आणि मधुमक्याची लागवड करण्यास होकार दिला. मात्र
सुरुवातीला आपला माल विकला जाणार काय ?, त्याला योग्य भाव मिळेल काय ? अशा शंका
त्यांच्या मनात होत्या. त्यानंतर शेतकऱ्यांची अशी अट होती की त्यांचा सर्व माल
आम्ही विकत घेतलाच पाहिजे. मात्र आम्हीही त्यांना त्यांचा संपूर्ण माल योग्य
किमतीत विकत घेऊ अशी खात्री दिल्यानंतर त्यांनी आमच्या प्रस्तावाचा सकारात्मक विचार केला आणि मधुमक्याचे उत्पादन
घ्यायला सुरुवात केली आणि Contarct Farming सुरु झाले. त्यात आम्हाला मोठे यश मिळाले.
Contarct Farmingसाठी मुख्यत्वेकरून शेतकऱ्यात विश्वास निर्माण करणे आणि त्याचा
आवाका जास्त असणे गरजेचे आहे. लहान प्रमाणात ही संकल्पना यशस्वी ठरणे जरा अवघड
जाते’.
सामान्यपणे
शेतकऱ्यांना कोणत्याही नव्या पिकासाठी राजी करणे, हे एक मोठे काम असते. कारण शेतकरी
सहसा धोका पत्करायला तयार होत नसतो, अशाच अडचणी राहुलनाही आल्या, मात्र त्यातही ते
यशस्वी ठरले. ते सांगतात, ‘शेतकऱ्यांना तयार केल्यानंतर आम्हाला एका वेगळ्याच
प्रश्नाला तोंड द्यावे लागले, तो म्हणजे ‘सरकारी निर्बंध’. मधुमक्याचे बियाणे
मुख्यत्वे परदेशी असल्याने भारत सरकारने त्यावर निर्बंध लादले होते. त्यामुळे
सरकारशी झगडून आम्ही ते निर्बंध उठवले आणि सरकारकडून बियाणे आयात करण्याची परवानगी
मिळवली’.
त्यानंतर मधुमक्याचा पुरवठा वाढला आणि मागणी
मात्र तेवढीच राहिली. कारण आम्ही फक्त खाद्य पदार्थच त्यावेळी विकत होतो.
मधुमक्यासारख्या नाशवंत मालाचा वापर वेळीच झाला नाही तर मोठे नुकसान होत असते,
त्यामुळे आम्ही मग प्रोसेसिंगमध्येही उतरण्याचा निर्णय घेतला. ‘२००६ साली आम्ही
स्वतःचे प्रोसेसिंग युनिट हडपसर येथील रामटेकडी औद्योगिक वसाहतीत सुरु केले. आम्हाला
आज पुणे जिल्ह्यातील प्रामुख्याने लहान शेतकऱ्यांचे मोठे सहकार्य मिळते आहे. आज
आम्ही प्रतिवर्षी ६००० टन मक्याचे प्रोसेसिंग करतो. त्यातून सुमारे २५०० टनाचा
वापर विविध ‘frozen products’ बनविण्यासाठी होतो आहे. त्यात canned Sweet Corn,
Whole kernel sweet corn, Frozen corn kernels आणि Ready to Cook पदार्थांसाठी
होतो. मी स्वतः रेफ्रिजरेशन इंजिनिअर असल्याने मला त्याचा या प्रक्रिया उद्योगात
मोठा फायदा झाला.’
राहुल म्हस्के यांनी
भारतात मधुमक्याची ओळख करून दिली, असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. ते म्हणतात,
‘आम्ही ज्यावेळी मधुमक्याचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली, तेव्हा हे पीक भारतात
अगदी नवीन होते. त्यामुळे आमच्या सोबतच्या शेतकऱ्याना आम्ही अगदी अर्ध्या
एकरापासून सुरुवात करण्यास सांगितले आणि अपयश येणार नाही, याची जबाबदारी आमची असा
धीरही दिला. सुदैवाने आमचा हा प्रयोग यशस्वी झाला आणि एका नव्या पर्वाला प्रारंभ
झाला. ठराविक पीके घेणारा शेतकरी हमखास उत्पन्न आणि पैसा मिळवून देणारे हे नवे पिक
आनंदाने घेऊ लागला. सोबतच आम्ही प्रोसेसिंगही सुरु केले. contract farming मुळे
त्याला बाजारपेठही अगदी सहज उपलब्ध झाली एकंदरीतच शेतकऱ्याला अनुकूल असेच वातावरण
तयार करण्यात यश मिळाले.
![]() |
राहुल म्हस्के |
‘खरे तर मधुमका हे
हमखास उत्पादन देणारे आणि ग्राहकांनाही आवडणारे असेच पीक आहे. मात्र
ग्राहकांपर्यंत त्याला योग्यरीत्या पोहोचवणे आवश्यक होते. तेच काम आम्ही केले आणि
आज त्याला मिळालेले यश आपण बघतोच आहोत.’
संपूर्ण भारतातील हा
पहिलाच प्रकल्प आहे, जो मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला आहे, गुजरातमध्येही असा
प्रयोग झाला होता, मात्र त्याला एवढे यश मिळाले नाही. आज दररोज सुमारे ५०० टन
मक्याचे हार्वेस्टिंग होते आहे. खर तर अगदी छोटी असणारी चळवळ आज मोठ्या प्रमाणावर
यशस्वी झाली आहे. सुरुवातीला आमच्या सोबत असणारे शेतकरी आज उत्पादनात आमच्याशी
स्पर्धा करत आहेत. हे मोठेच यश आहे.’
ते पुढे म्हणाले,
‘आज पश्चिम महाराष्ट्र हे भारतातील स्वीट कॉर्न हब बनले आहे. याची सुरुवात आम्ही
केली, याचा आम्हाला अभिमानच वाटतो. अतिशय छोट्या अशा प्रयोगातून खरे तर या सर्व
उद्योगाला सुरुवात झाली होती. आज खेड, आंबेगाव, जुन्नर या भागातून आज सर्वाधिक
उत्पन्न होते. कराड, नगर आणि नाशिक या ठिकाणीही मधुमका आता चांगलाच रुजलाय. सोबतच
आज सर्वत्र मधुमक्याचा वावर आहे, मग हॉटेलात असो किंवा घरी, सर्वत्र मधुमक्याने
जागा पटकावली आहे. आणि हे सर्व फक्त गेल्या काही वर्षात घडले आहे. आज आपण मडईत
गेलो, तर मधुमका आपल्याला अगदी सहज नजरेस पडतो. हे सर्व घडण्यास आमचा काहीतरी वाटा
निश्चितच आहे.’
या सर्व प्रवासाबाबत
बोलताना राहुल म्हणतात, ‘मी स्वतः इंजिनिअर असल्याने पारंपरिक शेतीतच अडकून राहणे
मला जमणारे नव्हते. त्यामुळे शेत मालाचे नेमके मार्केटिंग कसे करता येईल याचा
विचार मी सुरु केला. कारण शेत मालाचे योग्य मार्केटिंग करणे हे अतिशय महत्वाचे
आहे. आणि मधुमक्यासारख्या वेगळ्या पिकाला तर योग्य मार्केटिंगची जोड देणे आवश्यक
आहे. त्यामुळे मग शेतकरी, शेतमाल आणि ग्राहक अशी एक साखळी आम्ही कॉर्न क्लबच्या
माध्यमातून सुरु केली. आम्हाला प्रतिसादही अगदी पहिल्या दिवसापासून उत्तम मिळाला.
या नवीन गोष्टीचे स्वागत सर्वांनी अगदी उत्साहात केले.’
आज कॉर्न क्लब मध्ये अगदी १५ रुपयापासून पदार्थ
आम्ही विकतो. त्यात फ्रोजन कॉर्न समोसा, फ्रोजन कॉर्न टिक्की, फ्रोजन व्हेज कॉर्न
बर्गर, फ्रोजन फ्रेंच फ्राइज, कॉर्न पॅटीस असे विविध पदार्थ उपलब्ध आहेत. सोबतच
आता फ्रोजन मटार, बीन्स, ब्रोकोली, विविध फळांचे पल्प देखील उपलब्ध आहेत. मधुमका
आणि त्याचे विविध पदार्थ हे आरोग्यासाठी देखील अतिशय योग्य आहेत. मक्यामध्ये
कोलेस्ट्रोलचे प्रमाण शून्य आहे, सोडीयमचे प्रमाण देखील अत्यल्प आहे सोबतच झिरो
fat अशी वैशिष्ट्ये मक्याची आहेत. उकडलेला मका हा रोगप्रतिकारक शक्ती वाढवायलाही
उपयुक्त आहे.’
![]() |
आता पुढे काय नियोजन
यावर ते म्हणाले, ‘सध्या पुण्यात आमची दोन आउटलेट्स आहेत. आता ही संख्या वाढवणार
आहोत. बस स्थानक, रेल्वे स्टेशन आणि शहरात विविध ठिकाणी छोटी छोटी स्नॅक्स सेंटर
असे एकूण नियोजन आहे.’ हे सांगत असतानाच गरमागरम फ्रोजन कॉर्न समोसा समोर आला.
त्याचा समाचार घेतला आणि राहुलजींचा निरोप घेतला.
* मुंबई तरुण भारत च्या यंदाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली मी घेतलेली मुलाखत
* मुंबई तरुण भारत च्या यंदाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली मी घेतलेली मुलाखत
Nice
उत्तर द्याहटवा