'आनंद'
प्रिय ‘आनंद’,
अरे बाबा तू अशी काय
जादू केली आहेस ते एकदा तरी कळू देशील का ? की आम्ही कायमचं ते उत्तर शोधण्यात
गुंतून राहणार आहोत... की तुझीच तशी इच्छा आहे ? काहीतरी तरी सांगशील का ? कारण बघ
ना, तुला केव्हाही बघितलं तर तू प्रत्येक वेळी अगदी नवा (हो नवाच !) भासतोस.
म्हणजे तोच आनंद, तोच डॉ. भास्कर बॅनर्जी, तेच रामुकाका आणि डॉ. कुलकर्णी आणि तुला
झालेला लिम्फोसर्कोमा ऑफ द इंटस्टाइन या अवघड नावाचा कॅन्सरही तोच.

तू जेव्हा ‘दोस्त’
अशी हाक मारत आत येतो ना खर तर तेव्हाच तुझ्यात अडकून पडलेलो असतो. आणि नंतर ओळखही
नसलेल्या डॉ. भास्कर बॅनर्जींना जेव्हा तू ‘बाबूमोशाय’ अशी हाक मारतोस ना, तेव्हा
तू आम्हालाच हाक मारतोयस, असा भास होतो.
तू म्हणतो की, ‘जिंदगी
बडी होनी चाहिये, लंबी नहीं’... या वाक्याचा हजारदा विचार करून झालाय रे, पण ‘बडी
होनी चाहिये’ म्हणजे नेमकं काय ? याचं उत्तर काही सापडलेलं नाहीये अजून. आणि ते
सापडेल अशी अपेक्षाही ठेवत नाहीये आजकाल. पण ते अचानक कधी तरी सापडणार हे नक्की.
तू जेव्हा पियानोवर ‘मैने
तेरे लिये हि सात रंग के सपने चुने’ हे गाणं म्हणतोस तेव्हा कोणीतरी वेगळाच असतोस
आणि गॅलरीत उभं राहून, क्षितिजाकडे पाहत ‘कही दूर जब दिन ढल जाए’ हे गाणं म्हणतोस
तेव्हा आणखी वेगळा असतोस. पण खरं सांगायचं तर ते गाणं ऐकताना तू नकळत आम्हालाही
एका वेगळ्या विश्वात घेऊन गेलेला असतोस, पण तुझं एक बरं आहे रे की तू लगेच त्या विश्वातून
बाहेरही येतोस. पण आम्ही मात्र अडकून पडतो तिथेच आणि परतीचा रस्ता शोधत बसतो.
बरं तुला अगदी कधीही
बघू शकतो. म्हणजे अस्वस्थ असलो, आनंदी असलो, दुःखी असलो, कधीतरी अगदीच रिकाचोट
असलो तरीही. तुला वेळकाळ असा काही विषयच नाही. आणि तुला पाहण्यात गुंतल्यावर
आम्हालाही विसर पडतो रे सर्व गोष्टींचा.
पण एक गोष्ट खरी आहे
रे की, तुझा शेवट बघवत नाही बाबा. म्हणजे अगदी भावूक नसलो तरी पाणी आणतोस तू
डोळ्यात. कधी कधी वाटत रे की तो शेवट बदलता आला असता का ? आणि या एका प्रश्नाच
मात्र तू उत्तर देतोस, आणि ते पण ‘नाही’ असं.
असो,
फार लांबलं का रे ? पण
तुझ्याशी बोलायचं म्हणजे मोजक्या शब्दात नाही रे बोलता येतं.
तुझाच
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा