टाटायन....... प्रवास एका उद्योगसमूहाचा !
आज २३ एप्रिल.
जागतिक पुस्तक दिन. पुस्तकं आणि आपलं एक वेगळच नात असत. चंपक आणि चांदोबा पासून
आपली पुस्तकांशी ओळख होते. मग ती ओळख हळुहळू वाढत जाते. तिचे घट्ट मैत्रीत कधी
रूपांतर होते ते आपल्याला कळतही नाही. मग आपण त्यांच्याशी बोलतो आणि भांडतो
सुद्धा. काही पुस्तकं आपली आवडती असतात आणि काही नावडतीही !. आज अशाच एका आवडत्या
लेखकाच्या नव्या पुस्तकाबद्दल बोलूया. तो लेखक म्हणजे गिरीश कुबेर आणि पुस्तक
म्हणजे नुकतच प्रकाशित झालेले “टाटायन”.
टाटा....
भारतीयांसाठी ही केवळ दोन अक्षर नाहीत.
त्यांच्यासाठी ते आहे लक्ष्मीचं दुसर नाव.
सचोटीच्या, विश्वासाच्या भक्कम पायावर उभी,
सव्वाशे वर्षांची मूल्याधिष्ठित परंपरा लाभलेली, पाच पिढ्यांनी परिश्रमपूर्वक
जोपासलेली, भारताची निरलस उद्यमशीलता म्हणजे टाटा संस्कृती.
टाटांनी केलेली संपत्तीनिर्मिती म्हणजे
लक्ष्मी – सरस्वतीचा संगम.
सालंकृत, तरीही सात्त्विक.
ऐश्वर्यवंत, तशीच नीतिमंत.
जमशेटजी आणि दोराबजीपासून
जेआरडी आणि रतन टाटांपर्यंत
साऱ्यांच्या कर्तबगारीन सतत चढतं राहिलेलं
उद्योगतोरण म्हणजेच
टाटायन !
अशा समर्पक शब्दात लेखकाने टाटा उद्योग
समूहाच यथार्थ वर्णन केलय. आपण भारतीयांसाठी ‘टाटा’ म्हणजे एक अभिमान आहे. ‘टाटा’
म्हटल की आपल्या मनात आपोआपच आदर निर्माण होतो. आज भारतात अनेक उद्योगपती आहेत,
त्यांचा पसारा टाटांपेक्षा खूप मोठा असेल, अगदी त्यांनी ‘दुनिया मुठ्ठी में’ वगैरे
घ्यायचा प्रयत्न केला असेल. पण भारतीयांच्या मनात ‘टाटां’साठी जे स्थान आहे, ते
दुसऱ्या कोणालाच निर्माण करता आलेलं नाही आणि करता येणारही नाही कदाचित !.
‘टाटायन – एक पोलादी उद्यमगाथा’ हे या
पुस्तकच नाव. या पुस्तकात लेखकाने टाटांचे उद्योगक्षेत्रातील आद्य पुरुष
‘नुसेरवानजी टाटा’ ते ‘रतन टाटा’ अशा सर्व टाटांचा आपल्याला परिचय करून दिला आहे. कोणतेही
मोठे पाठबळ नसतांना नुसेरवानजी टाटा यांची विजिगीषु वृत्ती त्यांना कसे यशस्वी
करते याची कथा आपल्याला खूप काही शिकवून जाते. त्यांनंतर जमशेटजी हाती घेतलेली
सूत्रे, त्याला दिलेले उद्योगसमुहाचे स्वरूप, भारताची खास निर्माण केलेली ओळख. हे
सर्व वाचतांना आपण त्यात कधी गुंतून जातो, ते आपल्याला कळतही नाही.
लेखकाने टाटा उद्योगसमूह
आणि भारताचा प्रवास समांतरपणे सांगितला आहे. टाटांच्या प्रत्येक कृतीला
देशाभिमानाची एक किनार असतेच असते. लेखकाने ती नेमकेपणाने अधोरेखित केली आहे. टाटा
स्टील उभारणीचा प्रवास, त्यात आलेले असंख्य अडथळे, पण काहीही करून कारखाना उभा
करायचाच ही टाटांची जिद्द. हे सर्व लेखक आपल्या डोळ्यांसमोर हुबेहूब उभे करण्यात
लेखक यशस्वी झाला आहे. टाटा स्टील नंतरचा प्रत्येक प्रकल्प उभारणीचा प्रवास
वाचतांना मात्र आपण मंत्रमुग्ध होऊन जातो, हे मात्र नक्की.
सर्वांत
भावलेले प्रकरण म्हणजे ‘टाटा nano’ चा संपूर्ण प्रवास आणि त्यात दिसलेले
रतन टाटा यांचे कुशल नेतृत्व.
या पुस्तकात लेखकाने टाटांची व्यक्तीचित्रणे अतिशय रंजक शैलीत
मांडलेली आहेत. ते वाचतांना ही उत्तुंग मंडळी अगदी आपल्यासारखीच असल्याचा भास
आपल्याला होतो, या व्यक्तींचे कुठेही दडपण जाणवत नाही, जाणवतो तो फक्त आदरच !
टाटा उद्योगसमूहाच्या आणि टाटा कुटुंबाच्या वाटचालीबद्दल जर तुम्हाला
जाणून घ्यायची उत्सुकता असेल तर हे पुस्तक तुम्ही वाचलेच पाहिजे.
लेखकाबद्दल थोडसं – दैनिक लोकसत्ताचे मुख्य संपादक गिरीश कुबेर हे
यांच पाचवं पुस्तक आहे. राजहंस प्रकाशनाने
हे पुस्तक प्रकाशित केले आहे. यापूर्वी त्यांनी ‘अधर्म युद्ध’, ‘हा तेल नावाचा
इतिहास आहे’, ‘एका तेलियाने’, ‘युद्ध जीवांचे’ ही पुस्तके लिहिलेली आहेत. अतिशय
गुंतागुंतीचे विषय अगदी नेमकेपणाने आणि साध्या शब्दात मांडण्याची लेखकाची शैली
अतिशय भावणारी आहे. त्यामुळे वाचतांना कुठेही कंटाळा येत नाही. खास ‘कुबेरी
शैली’ने पुस्तक सजलेले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा