तो बोल मंद हळवासा...

पुण्यात सर परशुरामभाऊ महाविद्यालयात शिकत होतो, २०१२ची गोष्ट. नुकत्याच नवीन झालेल्या दृकश्राव्य सभागृहात संध्याकाळी सहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमासाठी सव्वापाच वाजेपासूनच तिथे येऊन बसलो होतो. मांडलेल्या सर्व खुर्च्या रिकाम्या होत्या तरीही व्यासपीठासमोरच्या मोकळ्या जागेतच बसलो होतो, जेणेकरून अधिक जवळून त्यांना अनुभवता यावं. आणि बरोबर सहा वाजता त्यांचं व्यासपीठावर येणं झालं. आजवर त्यांना वाढलेली दाढी आणि कधीकधी डोक्यावर हॅट या वेशात पाहीलेलं असल्याने थोडं वेगळं वाटलं. सुरुवातीला परिचय, सत्कार वगैरे सोपस्कार संपल्यावर त्यांनी माईकचा ताबा घेतला आणि पुढचे दोनेक तास ते मनमुराद बोलत होते आणि आम्ही अगदी तल्लीन होऊन ऐकत होतो. ग्रेस उपाख्य माणिक सिताराम गोडघाटे या माणसाचं पहिलं दर्शन (आणि दुर्दैवानं शेवटचंही. कारण त्या कार्यक्रमानंतर अवघ्या आठेक दिवसातचं ग्रेस गेले !) या अशा पध्दतीने झालं. तोपर्यंत अनेकांकडून ग्रेसबद्दल ऐकलं होतं, काही कविताही वाचल्या होत्या त्यांच्या. त्यातून ग्रेस या व्यक्तीभोवती एखादं गुढवलय वगैरे आहे, असं वाटायला लागलेलं. त्या कार्यक्रमात ते खरं असल्याचं जाणवलंही. आणि मग...